रजनी परांजपे
रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांचा मुख्य प्रश्न एका जागी बसण्याचा आहे. त्यांना स्थिरता नाही. गाणी, गोष्टी किंवा चित्र काढणे वगरेत त्यांचे मन रमते, पण तेही थोडा वेळच. जास्त वेळ झाला की आपसात भांडणे किंवा वर्गातून उठून पळून जाणे, परत थोडा वेळ येऊन बसणे आणि मनात आले की, परत उठून जाणे असा मुलांचा खेळ चालतो. आई-वडिलांना मुलांना शिकवावे, असे वाटताना दिसत नाही. मुलांच्या शिक्षणाचा विचार त्यांच्या मनात कसा रुजवायचा हे आम्हाला अजून कळलेले नाही.
मागच्या लेखात (२ मार्च) आपण रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांविषयी वाचले. भीक मागण्याच्या कामासाठी मुलांचा वापर करण्याची आणखीही एक पद्धत आहे. या लोकांची एक वेगळी जमातच आहे. आम्हीच काम करत असलेली एक वस्ती. शहरापासून फार दूर नाही किंवा मुख्य वस्तीपासून फार लांबही नाही अशा ठिकाणी रस्त्यापासून जरा आडोशाला १५-२० झोपडय़ांची ही वस्ती आहे. ही मंडळी इथे बरीच वर्षे राहत असावीत. त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात करून आम्हालाच अडीच-तीन वर्षे झाली. शाळेच्या वयाची अशी २५-३० मुले या वस्तीत असतील. तशी प्रत्येक कुटुंबात मुले पुष्कळ. मुलगा व्हावा म्हणून वाट पाहणेही आहेच. तरी इथे मुलीच्या लग्नाचा खर्च, मुलीच्या वडिलांना करावा लागत नाही आणि भीक मागण्याचे काम जवळजवळ पूर्णपणे मुलीच करतात. लहान वयाची मुले म्हणजे मुलगे, मोठय़ा बहिणींबरोबर भीक मागायला जातातही, पण एकदा मोठे झाले की ते या कामाला जात नाहीत. असे असले तरी ‘मुलगा हवा’चा हट्ट सुटलेला नाही.
वस्ती १५-२० झोपडय़ांचीच. फारशी वर्णन करण्यासारखी किंवा सकारात्मक वर्णन करण्यासारखी नाही. इथली मंडळी एकूणच स्वतच्या, घराच्या किंवा परिसराच्या स्वच्छतेविषयी उदासीन. तसे राहणे ही एक सवयच. रोजची आन्हिके म्हणून आंघोळ करणे इत्यादी कामे इथे नसतात. मुलांना तर यातले कुठलेच बंधन नाही. मुलांचे फक्त एकच काम. ते म्हणजे ठरावीक वेळेला, ठरावीक ठिकाणी जाऊन अन्न मागून आणणे. भीक म्हणून अन्न मागणे हा या मुलांचा रोजचा उद्योग. कुणी पैसे वगरे दिले तर ते घ्यायचे, पण ती वरकमाई. ते घरी नेऊन देण्याचे बंधन नाही. त्यांनी त्याचे काहीही करावे, गुटखा खावा नाही तर आणखी काही.
मुलांचे आई-वडील दोघेही सकाळी-सकाळीच बाहेर पडतात. कोणी महानगरपालिकेच्या कचरा गाडीवरही काम करतात, इतर बहुतेक मंडळी आकडे, पिना आदी किरकोळ वस्तू विकतात. बायका, पुरुष आणि अगदी लहान मुलेसुद्धा गुटखा खातात. आपण जसा चहा पिताना जवळच्या लहान मुलाला कौतुकाने घोट दोन घोट चहा पाजतो, त्याची चव देतो, तशी इथली माणसे आपल्या लहान मुलाच्या हातात कौतुकाने गुटख्याचे रिकामे पाकीट देतात आणि मूल आवडीने तो कागद चोखत राहते.
सकाळी घरात चूल पेटत नाही. चहा, नाश्ता जे काय असेल ते सर्व विकतच आणले जाते. घर सोडताना दिवसभर मुले काय खातील याची चिंता आईला नसते, याउलट आपण मागून आणले नाही तर घरी आल्यावर आई-वडील काय खातील याची काळजी मुलांना करावी लागते. आम्ही ज्या वस्तीत काम करतो त्याच्या जवळच चाळवजा मोठी वस्ती आहे. या चाळी म्हणजे मुंबईच्या गिरगाव, लालबाग, परळ येथल्या चाळींसारख्या इमारती नाहीत. ही एकमजली, एकेक, दोन-दोन खोल्यांची लहान-लहान घरे. त्यात बहुतांश चाकरमानी कुटुंबे किंवा छोटे धंदे करणारे व्यावसायिक. स्थिरावलेले, सर्व सामान्य आयुष्य जगणारी माणसे.
मुले ठरावीक वेळेला या वस्तीत भीक मागायला जातात. प्रत्येकाचा परिसर ठरलेला असतो. केसांच्या झिपऱ्या, मळके कपडे, वाहणारे नाक आणि चिपडे असलेले डोळे हे सगळे जसेच्या तसे ठेवूनच मुले बाहेर पडतात. इतर कुठलीही शिस्त न पाळणारी ही मुले आपापला परिसर सोडून दुसऱ्याच्या परिसरात भीक न मागण्याची रीत मात्र बऱ्यापैकी पाळतात.
आश्चर्य असे वाटते, की रोज ठरावीक वस्तीतून, ठरावीक घरातून, शिळे पाके, आंबलेले किंवा कसेही अन्न पुरेशा प्रमाणात मिळते. पोळ्यांच्या चळतीच्या चळती, कालवण, भाजी, भात असे सगळे पदरात पडते. अगदी तान्ह्य़ा बाळांपासून तर मोठय़ा माणसांपर्यंतचे घरदार हेच अन्न खाऊन राहते. आजूबाजूच्या मच्छी, मटण, चिकन विकणाऱ्या दुकानांतून उरलेसुरलेले सर्व काही मागून आणणे आणि घरी येऊन ते शिजवून किंवा तसेही खाणे हाच रिवाज. बघून डोके चक्रावते. आणखी एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे या अन्नावरही मुले वाढतात. ऊठसूट आजारी पडताना दिसत नाही. काही मुलांना शाळेत दाखलही केले, पण मुलांना शाळेत जाण्याची सवय किंवा गोडी लागली असे झाले नाही. शाळेची सवय तर दूरच, पण आमच्या वर्गातही तास-दोन तास स्थिरपणे बसतील असेही नाही. याचे मुख्य कारण आमचे तिथे नियमित जाणे होत नाही हे आहे. नियमित काम न होण्याचे कारण इथे शिक्षिका टिकत नाहीत. आजूबाजूचे वातावरणच असे आहे, की काम करणारा सोडूून जातो. त्यामुळे साध्या स्वच्छतेच्या सवयीही आम्ही मुलांना लावू शकलो नाही.
या मुलांचा मुख्य प्रश्न एका जागी बसण्याचा आहे. त्यांना स्थिरता नाही. कुठलीही एक क्रिया ही फार वेळ करू शकत नाहीत. गाणी, गोष्टी किंवा चित्रे काढणे वगरेत त्यांचे मन रमते, पण तेही थोडा वेळच. जास्त वेळ झाला की आपसात भांडणे किंवा वर्गातून उठून पळून जाणे, परत थोडा वेळ येऊन बसणे आणि मनात आले की, परत उठून जाणे असा मुलांचा खेळ चालतो. आई-वडिलांना मुलांना शिकवावे असे वाटताना दिसत नाही. कामाच्या चक्रात आणि व्यसनांच्या विळख्यात सर्व जण अडकलेले आहेत. त्यातून त्यांना बाहेर कसे काढायचे आणि मुलांच्या शिक्षणाचा विचार त्यांच्या मनात कसा रुजवायचा हे आम्हाला अजून कळालेले नाही. पालकांशी बोलणे, त्यांना पथनाटय़, पपेट शो करून दाखवणे, गोष्टी सांगणे, सणवार साजरे करणे, यासारखे इतर वस्त्यांतून किंवा गटातून केलेले उपाय इथे आजपर्यंत तरी करता आले नाहीत.
आमचा या वस्तीशी पहिला परिचय झाला त्याला आता दोन-अडीच वर्षे होत आली. इथे पहिले काही दिवस आम्ही ‘स्कूल ऑन व्हील्स’ बसही लावली. बसच्या आकर्षणाने मुले यायलाही लागली. पण ते आकर्षण फार काळ टिकले नाही. मुले शाळेत जावीत म्हणून शाळेतल्या शिक्षिकांनाही वस्तीवर नेले. कोणी नवीन माणूस आले, की मुले, माणसे त्याच्याभोवती गोळा होतात. तसेच आताही झाले. शिक्षिकांचे बोलणे सर्वानी ऐकूनही घेतले. पण तेवढेच. त्यावर काही प्रतिक्रिया नाही की कृतीही नाही.
हे वाचताना कदाचित एखाद्याला असेही वाटेल की, पंधरा-वीस झोपडय़ांसाठी किंवा २५-३० मुलांसाठी एवढा खटाटोप कशाला? पण ही जमात किंवा अशी मुले फक्त इथेच आहेत असे नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातच निरनिराळ्या ठिकाणी अशा छोटय़ा-छोटय़ा वस्त्या असलेल्या आम्हाला माहीत आहेत. जेव्हा यांच्याकडे काही कुळाचार, कुळधर्म असतात, तेव्हा निरनिराळ्या ठिकाणची यांची पाहुणे-मंडळी एके ठिकाणी जमतात. दर वर्षी वर्गणी काढून गावी जत्रेलाही जातात आणि देवधर्माचे सोपस्कार नेमस्तपणे पार पाडतात. तसे न केल्यास देवीचा कोप होईल ही पैकी समजूत.
तेव्हा ही मुले थोडीशीच आहेत असे समजून चालणार नाही. या आणि यांच्यासारख्या इतर मुलांपर्यंत कसे पोहचायचे हा मुख्य प्रश्न. प्रयत्न चालू आहेत आणि ते करायलाच पाहिजेत, कारण ही आपलीच मुले. आपल्याच देशाचे उद्याचे नागरिक-आपले भविष्य आणि आपली आशा याचाच एक अंश- मग तो कितीही लहान का असेना!
rajani@doorstepschool.org