रजनी परांजपे

पुण्यातच चिंचवड आणि रावेत परिसरातील ती तीस-चाळीस घरांची वस्ती, तीही नंदीबैलवाले आणि उंटवाल्यांची. त्यांची २५-३० मुलं.. पण शिक्षणाविनाच वाढणारी. ना त्याची कुणाला खंत ना काळजी. त्यांना शिकवायला हवं होतं, पण ते त्यांच्या पालकांनी मनावर घ्यायला हवं होतं, त्यांना तयार करणं ही अडथळ्यांची शर्यतच ठरली.

तीस-चाळीस घरांची ही वस्ती. चिंचवड आणि रावेत याच्या मधल्या मोकळ्या जागेवर वसलेली. तीस-चाळीस घरे म्हणजे लहान लहान खोपटीच, पण त्यातही दोन भाग. अर्धा भाग नंदीबैलवाल्यांचा आणि अर्धा उंटवाल्यांचा. यांच्या मुलांना शिकवायचे होते पण, आमच्यासाठी ती अडथळ्यांची शर्यतच ठरली..

नंदीवाले म्हणजे नंदीबल घेऊन गावोगाव फिरणे, ठिकठिकाणच्या जत्रेत जाणे आणि त्यावर गुजराण करणे हा पारंपरिक व्यवसाय असणारा समाज. आजही वस्तीत तीनचार घरे नंदीबल बाळगून आहेत. पण आता तेवढय़ावरच त्यांचा संसार चालू शकत नाही. त्यातून मिळणारे उत्पन्न मीठ-मिरची पुरतेच. त्यातच जनावर बाळगायचे म्हणजे त्याच्याही चारापाण्याचा खर्च आलाच. तेव्हा पोटापाण्यासाठी दुसरे काहीतरी करणे आलेच. त्यासाठी तर शहरात यायचे. तशीच आलेली ही कुटुंबे. शिक्षण नाही की पंरपरेने आलेले किंवा मुद्दाम शिकलेले कुठलेही कसब हातात नाही. मग सहज मिळणारे काम उरते ते एकच. कचरा गोळा करणे आणि विकणे किंवा मिळाले तर कचऱ्याच्या घंटागाडीवर काम करणे. येथील नंदीवाले ही तेच करतात. नाही म्हणायला यांच्या बायका गोधडय़ा शिवतात आणि घर संसाराला हातभार लावतात.

दुसरा गट उंटवाल्यांचा. रस्त्यातून जाता-येताना कधीतरी एखादा उंट संथगतीने लांब लांब टांगा टाकीत, गळ्यातील घंटा वाजवीत,  कुणाच्या तरी हातात आपल्या नाकातील वेसण देऊन त्याच्या पाठोपाठ चालताना दिसतो. वेसण धरणारा केवढासा आणि ज्याच्या नाकात वेसण घातली आहे तो प्राणी केवढा. पण तरीही पोटापाण्यासाठी म्हणा किंवा सवयीने मजबूर म्हणून म्हणा प्राणी काय किंवा माणसेही काय अशा आपल्यापेक्षा कमजोर, कमी शक्तीच्या असणाऱ्या आणि दिसणाऱ्याच्या आधिपत्याखाली जातात हे आपण रोज पाहतो. उंटावरून लोकांना फिरवून त्यावर कमाई करणे हा उंटवाल्यांचा इथला व्यवसाय. वस्तीत एक दोन उंट आहेतही. पण तेवढेच. खरे काम कचरा वेचण्याचे किंवा कचऱ्याच्या घंटागाडीवर जाण्याचे. बायका, पुरुष दोघेही हेच काम करतात. सकाळ, दुपार दोन्ही वेळेला घंटागाडीचे काम केले तर महिन्याला बारा-पंधरा हजारांची कमाई होते. मुले घरीच असतात. शाळा वगरेचा विचार करायला वेळ नसतो. अनुभव नसतो आणि शिक्षण हक्क कायदा वगरेबद्दल ऐकलेलेही नसते.

ही वस्ती आम्हाला प्रथम दिसली ती आमच्या ‘एकेक मूल मोलचे’ या अभियानात! तेंव्हा तेथे तीन-चारच घरे होती. मध्यप्रदेशातून आलेली! गावाकडे यांची ‘इंदिरा आवास’ योजनेत मिळालेली घरेही आहेत. पण व्यवसाय नाही म्हणून शहरात आलेली. इथे घर म्हणजे एक खोपट. त्यासाठी म्हणजे ते ज्या जमिनीवर उभारले आहे त्यासाठीसुद्धा भक्कम भाडे भरावे लागते. तीन-चार वर्षांपासून आमचे या वस्तीत जाणे-येणे आहे. हळूहळू करत करत वस्ती वाढली. पालकांना मुलांना शाळेत घालण्याचा फारसा उत्साहही नाही आणि विरोधही नाही. मुलांना एका जागी बसण्याची सवय लागावी, मुलांची शाळापूर्व तयारी करून घ्यावी, शाळेत जात असतील त्यांचा अभ्यास करून घ्यावा वगरे उद्देशांनी येथे ‘बस’ उभी करायला सुरुवात केली त्याला आता वर्ष होत आले. शाळेच्या वयाची मुले साधारण २५-३०. बाकीच्या ठिकाणी जसे विविध प्रयत्नांनी मुले गोळा करावी लागतात तसेच इथेही. पण इथला एक अनुभव सांगण्यासारखा, थोडासा नवीन!

मुले बसमध्ये येऊ लागली, पण सात-आठ मुली मात्र प्रयत्न करूनही येईनात. त्यांची कारणे नेहमीचीच. घर सांभाळणे, मुले सांभाळणे आणि इथले वेगळे म्हणजे शेळ्या सांभाळणे. सुरुवातीलाच नाट लागावा तसे झाले. आमच्या शिक्षिकेने एक दिवस गोड बोलून, निरनिराळ्या गोष्टी सांगून, थोडा वेळ तरी चला म्हणून मुलींना बसपर्यंत आणले आणि तेवढय़ात मोठा कालवा झाला. कुत्र्याने एक शेळीचे करडू पळवले आणि मग काय मुलींना बोलवायची सोयच राहिली नाही. शेळीचे करडू तर जीवानीशी गेलेच. शिवाय मुलीला मार पडला तो निराळाच. मग आधीच फारसे अनुकूल नसलेले पालक विरोधातच गेले. तेव्हा काही दिवस तरी गप्प बसण्याखेरीज आमच्याकडे काहीच उपाय उरला नाही.

पण कधी कधी आपण सोडून द्यायचे म्हटले तरी शिक्षिकाच जिद्दीला पेटतात. मुलांना शिकवायचे, लिहिते-वाचते करायचे त्यांनी जणू काही व्रतच घेतलेले असते. एखाद्या व्रताप्रमाणे तितक्याच निष्ठेने, कडकपणाने आणि समोरच्या अडीअडचणींना न जुमानता त्या हे काम चालू ठेवतात. ज्या जमान्यात शिक्षक म्हणून प्रशिक्षण घेतलेले, चांगली सुरक्षित नोकरी असलेले, शाळांच्या सुसज्ज इमारती आणि इतर साधनसामुग्री असलेले शिक्षकही आपल्या व्यवसायाकडे इतक्या निष्ठेने पाहताना आपल्याला दिसत नाहीत त्याच जमान्यात दहावी, बारावी शिकलेल्या, घरची परिस्थिती बेताची असलेल्या मुली, तुटपुंज्या पगाराची, आजूबाजूच्या प्रतिकूल वातावरणाची, पालकांनी केलेल्या उपेक्षेची पर्वा न करता मुलांनी शिकावे यासाठी निरनिराळे प्रयत्न करतात हे पाहून आश्चर्य तर वाटतेच पण अजून सर्वच काही विझले नाही, आजूबाजूला अंधार आहे पण कुठेतरी मिणमिणत्या पणत्याही आहेत हे पाहून दिलासाही मिळतो.

.. तर या शिक्षिकेने धीर सोडला नाही. आम्हीही तिला साथ दिली. तेथे दोन शिक्षिका होत्या. एक शिक्षिका बसमधल्या मुलांना शिकवेल आणि दुसरी त्याच वेळेला वस्तीमधे जाऊन शिकवेल अशी योजना केली. आधी या मुलींना आपलेसे करून घ्यायचे आणि पालकांचा रोष घालवायचा. शिकवणे वगरे नंतर असे ठरवले. मग शिक्षिका या मुलींच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलू लागली. त्यांच्या कामांबद्दल, त्यांना शिकावेसे वाटते किंवा नाही याबद्दल विचारू लागली. मुली कधी कपडे धुताना भेटत तर कधी भांडी घासताना. बोलता बोलता अधूनमधून त्यांच्या कामाला हातभार लावणे, कधी गाणी, गोष्टी सांगून रमवणे असे चालू होते.

चारसहा महिन्यांच्या सतत प्रयत्नांनंतर मुलींना शिकण्यात गोडी वाटू लागली आणि मुख्य म्हणजे ‘ताईंवर’ लोभ जडला. पालकही निवळले. कारण तेही ‘ताईंची’ तळमळ बघतच होते. शिवाय बसमध्ये नियमित येणारी मुले हळूहळू पुस्तक हातात धरून र ट प करीत का होईना वाचत होती, कोणी कविता, गाणी म्हणत होती तर कोणी चित्रे काढीत होती. दिवसेंदिवस नीटनेटकी, स्वच्छ राहात होती. शाळेत जाता-येताना आरशात डोकावून बघायला विसरत नव्हती.

आणि एक दिवस आश्चर्यच घडले. ताई आणि बस जागेवर पोहचते तो इतर मुलांबरोबर या मुलींचाही घोळका उभा. ताईंना बघून धावत धावत मुली ताईंकडे आल्या. ‘‘ताई, आम्ही आळीपाळीने शिकायला येऊ. चालेल? कधी ही घरी राहील तर कधी मी. बाकीच्या शिकायला येतील. चालेल? चालेल ना बाई?’’ असा प्रश्न. आणि ‘चालेल काय धावेलच,’ असे आमचे उत्तर!

सध्या असे शिकणे चालू आहे. खऱ्याखुऱ्या शाळेत जाणे अजूनही जमलेले नाही. ते अर्थातच अजून खूप दूर.  शाळेत दाखल करण्याची औपचारिकता पार पाडलेली. पण या मुली रोज शाळेत जाण्याची शक्यता फारच कमी. बसमधे यायला मिळते हे काय थोडे झाले? त्याचाच केवढा आनंद. तुरुंगाच्या खिडकीतून आभाळाचा टीचभर तुकडा जरी दिसला तरी माणसाचे मन सुखावते. हाही तसाच अनुभव. किती निराळा, किती सुखद! मला वाटतं या मुलींना ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ असे वाटत नसेल. याउलट त्यांचे गाणे ‘शाळा भरली, चूल सरली, तहानभूकही विसरून गेली’- असेच असत असेल.

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com

Story img Loader