मुलांनी स्वत:च्या गोष्टी लिहून, लिहिण्याचा आणि वाचण्याचाही आनंद लुटला होता, तसंच पुस्तकं लिहिताना आपण एखाद्या पुस्तकाचे लेखक आहोत अशी जाणीव त्यांना देता येईल का? किंवा लेखक असण्याचे महत्त्व त्यांना समजेल का? वेगळ्या प्रकाराने वाचनाचा संस्कारच त्यांच्यामध्ये रुजवणं जमेल का? जसं गोष्ट आवडीने वाचण्यासाठी स्वत:ची गोष्ट, तसंच पुस्तक स्वत:चं, त्याच्या निर्मितीचा आनंद! अशा अनेक विचारांती पुस्तकनिर्मितीचं हे पाऊल टाकावंसं वाटलंच.
‘‘तुमच्या ‘सिंदबादच्या सफरी’ आपल्या चालूच असतात.’’ मागे कोणी तरी आमच्या शाळेतील उपक्रमांना उद्देशून म्हणालं होतं. ऐकून वाटलं, ‘सिंदबादच्या सफरी’ किती अचूक उपमा दिली आहे. त्याच्या गोष्टीत जसं एका सफरी पाठोपाठ दुसरी सफर, तसंच आमच्या शाळेत होतं. एक उपक्रम संपण्याच्या अगोदर दुसऱ्या उपक्रमाची चक्र फिरायला लागतात. असं खरं तर आपल्या सगळ्यांचं असतं. हातातलं एक काम संपलं की वाटतं थोडं थांबावं पण थोडा काळ गेला की अस्वस्थपणा यायला लागतो. रंगदालनाचा उपक्रम अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाला. त्याआधी मुलांनी तयार केलेल्या त्यांच्या गोष्टीही छान रंगल्या होत्या. गोष्टींनंतर मुलांकडून पुस्तकं तयार करून घेण्याचा विचार मनात घोळायला लागला. मुलांच्या स्वत:च्या कृतींना चालना आणि निर्मितीचा आनंद देण्याकरता मला वाटलं मुलांची पुस्तकं लिहिली तर.. कल्पना सुचायला आणि कैवल्य माझ्या ऑफिसमध्ये यायला एकच गाठ पडली.
‘‘कैवल्य, आपण तुझं पुस्तक लिहायचं?’’ ऑफिसमध्ये माझ्याशी गप्पा मारायला आलेल्या आणि शोकेसमधली पुस्तकं बघत उभ्या राहिलेल्या कैवल्यला मी विचारलं. माझ्याकडे न बघताच त्याने विचारलं, ‘‘म्हणजे?’’ मी म्हटलं, ‘‘अरे म्हणजे ही जशी पुस्तकं लिहिलीत की नाही कोणी कोणी. तसं तुझं पुस्तक आपण दोघं मिळून लिहू या का?’’ ‘‘हो, लिहू या की!’’ कैवल्यचा भरघोस होकार आला. ‘‘पण बाई, कशाला हो?’’ लगेच दुसरा स्वाभाविक प्रश्नही आला. मी त्याला समजावत म्हटलं, ‘‘अरे, म्हणजे मी आपल्या ऑफिसच्या शोकेसमध्ये तुझंही पुस्तक ठेवीन. तू लिहिलेलं.’’ स्वारी खुशीत हसली आणि म्हणाली, ‘‘म्हणजे ते माझं असेल?’’ त्याला एक पुस्तक दाखवत म्हटलं, ‘‘हो अगदी तुझं. या पुस्तकावर हे नाव आहे नं, त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. पाठीमागच्या पानावर त्यांचा फोटोही आहे. तुझ्या पुस्तकावर पण तुझं नाव असेल आणि असाच फोटो.’’ आम्हाला दोघांनाही आमची ‘आयडियाची कल्पना’ फारच आवडली.
हल्ली खरं सांगायचं तर मुलांना हाताळायला आकर्षक, वाचनाची आवड निर्माण करणारी रंगीत रंगीत चित्रांची भरपूर पुस्तकं बाजारात असतात. मग हा प्रपंच कशाला असंही वाटू शकतं. मुलांच्या गोष्टी वर्ग पातळीवर ‘मुलांबरोबर मुलांसाठी’ एवढय़ाच मर्यादित होत्या पण पुस्तकांच्या बाबतीत तो उपक्रम शाळा पातळीवर न्यावा, असा विचार केला. मुलांनी स्वत:च्या गोष्टी लिहून लिहिण्याचा आणि वाचण्याचा आनंद लुटला होता, तसंच पुस्तकं लिहिताना आपण एखाद्या पुस्तकाचे लेखक आहोत अशी जाणीव त्यांना देता येईल का? किंवा लेखक असण्याचे महत्त्व त्यांना समजेल का? वेगळ्या प्रकाराने वाचनाचा संस्कारच त्यांच्यामध्ये रुजवणं जमेल का? जसं गोष्ट आवडीने वाचण्यासाठी स्वत:ची गोष्ट, तसंच पुस्तक स्वत:चं, त्याच्या निर्मितीचा आनंद! अशा अनेक विचारांती हे एक पाऊल टाकावंसं वाटलं. मात्र तो अमलात आणण्यासाठी पालकांचा सहभाग आवश्यक वाटला. चाळीस मुलं आणि एक शिक्षिका असा हा उपक्रम करण्यासारखा नक्कीच नव्हता. तसं केलं असतं तर त्याचा उद्देश काही साध्य झाला नसता.
कोणताही उपक्रम मी स्वत: केल्याशिवाय दुसऱ्यांना करायला सांगत नाही. अनायासे कैवल्य समोर आलाच होता. त्याची मदत घ्यायची ठरवली. सुरुवातीचं आमचं संभाषण त्याच अनुषंगानं चाललं होतं. दुसऱ्या दिवशी मी कैवल्यच्या वर्गात जाऊन त्याच्या बाईंच्या परवानगीनं त्याला ऑफिसमध्ये घेऊन आले. तो अर्थातच आनंदाने उडय़ा मारत माझ्या पाठोपाठ आला. कालचाच धागा पकडून मी त्याला विचारलं, ‘‘अरे, आपल्याला पुस्तक लिहायचं आहे नं? विसरलास का?’’ तो जरा विचारात पडलेला वाटला. मग म्हणाला, ‘‘बाई, पण माझी आई नको म्हणाली.’’ मी बुचकळ्यात पडले. ‘‘का बरं? मी विचारलं. ‘‘आई म्हणते, तिला वेळ नाही.’’ असं म्हणत कैवल्य वर्गात पळून गेला. मला आधी काही उलगडा होईना, मग मात्र एकदम प्रकाश पडला. मी पुस्तक लिहायचंय, असं म्हटल्यावर बहुधा त्याला वाटलं असावं, आता बाई आपल्याला काही तरी लिहायला लावणार. त्यामुळे कारण सांगून त्याने सुटका करून घेतली होती. दुसऱ्या दिवशी मी पूर्ण लेआऊट केलेलं कोऱ्या पानांचं एक घरगुती पुस्तक तयार करून आणलं. पण मुद्दामच वर्गात जाऊन त्याला बोलावलं नाही. मला माहीत होतं तो येणारच. ऑफिसमध्ये येऊन नेहमीप्रमाणे त्याच्या गप्पा चालू झाल्या. मी पुस्तकाचा विषय न काढता त्याच्यासमोर ते कोरं पुस्तक ठेवलं. त्याची उत्सुकता ताणली गेली. ‘‘बाई, हे पुस्तक कोरंच कसं? याच्यावर काहीही लिहिलेलं नाही.’’ त्याने विचारलं. मला तो परत पळून जाणार नाही याची काळजी घ्यायची होती. ‘‘अरे, ते तुझं आहे. तुला त्याच्यावर चित्र काढायची आहेत नं. त्या चित्रांची नावं मी लिहीन. तू फक्त चित्र काढ किंवा चिटकव. तूच सांग कसले चित्र काढू या.’’ माझ्या चेहऱ्यावर कसलाही भाव दिसू न देता मी शांतपणे म्हटलं. कैवल्यची चित्रकला छान होती हे मला माहीत होतं. त्यामुळे चित्र काढायचं म्हटल्यावर तो खूश झाला. ‘‘मी कार्टून काढू?’’ त्याने विचारलं. मी लगेच म्हटलं, ‘‘हो, चालेल. आपण कार्टूनचं पुस्तक तयार करू या.’’ एका पानावर एक अशी चित्रं काढायची, असं आम्ही ठरवलं. त्या दिवशी त्याने बेनटेनचं चित्र काढलं. मी चित्राखाली त्या कार्टूनचं नाव लिहिलं आणि त्याला सांगितलं हे बघ आपलं पुस्तकाचं पहिलं पान तयारसुद्धा झालं. त्यालाही जाणवलं की हे पुस्तक लिहिणं म्हणजे आपल्याला काही लिहावं लागणार नाही. रोज एक किंवा दोन कार्टूनची चित्रं काढत एका आठवडय़ात आमचं कार्टून पुस्तक तयार झालं. आमच्या पुस्तकाचा विषय ‘आवडीची कार्टून्स’ असा झाला. शेवटच्या पानावर मी कैवल्यविषयी माहिती लिहिली आणि त्याचा फोटो चिटकवला. दोघांनी मिळून पुस्तकाला नाव दिलं – ‘माझे मित्र’. लेखक – कु. कैवल्य भोसले. त्याच्या हातात पुस्तक देत म्हटलं, ‘‘आता ठेव त्या शोकेसमध्ये. त्या दिवशी तुला सांगितलं होतं नं की, तुझं पुस्तक आपण लिहू. तू पुस्तकाचा लेखक असशील, त्यावर तुझा फोटो असेल, ते पुस्तक आपण शोकेसमध्ये ठेवू, बघ, झालं नं तयार तुझं पुस्तक?’’ आमच्या रोजच्या पुस्तक लेखनाच्या गप्पांमुळे कैवल्यला हे पुस्तक आपलं आहे. आपल्याला बाई त्याचा लेखक असं म्हणतात, हे उमजलं होतं. त्याचा उजळलेला चेहरा मला वाचता येत होता आणि समाधानही देत होता.
आता पालकांच्या हाती ही कल्पना सोपवायला मी तय्यार झाले. पुस्तकं म्हटल्यावर त्यांचे विषय आले. कशावर पुस्तकं लिहायची. मागे म्हटलं तसं आमचा बराचसा पालकवर्ग हा अल्प उत्पन्न गटातला आणि अल्पशिक्षित असल्यामुळे, लेखन वगैरे करण्याचे महत्त्व त्यांना चटकन समजत नाही. त्यांना सोपं जावं याचाही विचार करायला हवा होता. म्हणून मग आमच्या शाळेच्या लहान आणि मोठय़ा शिशुचा संपूर्ण अभ्यासक्रम छोटय़ा छोटय़ा पुस्तकांतून मांडायचा असं ठरवलं. कारण एक तर ते विषय पालकांच्या माहितीचे असल्यामुळे त्यांना समजायला सोपे होते. आणखीही इतर अनेक फायदे त्यामुळे होतील असंही लक्षात आलं. जसं पालकांशी शाळेच्या अभ्यासक्रमाबद्दल विस्ताराने बोलता येईल, ते अभ्यासाची पद्धत समजू शकतील आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे आमच्या अभ्यासक्रमानुसार चित्रांची भरपूर पुस्तकं शाळेतच तयार होतील, जी मुलांना मनसोक्तपणे हाताळायला आणि वाचायला मिळतील.
रंगदालनांनंतर पालकांच्या मदतीने मुलांना निश्चित एक वेगळा अनुभव शाळा देऊ शकते, असा सार्थ विश्वास वाटत होता. त्याचाच धागा पकडून पालक सभेत पुस्तकं तयार करण्याचा विषय पालकांसमोर ठेवला. नवीन कल्पना मांडल्यामुळे पालकांमध्ये एकदम हलचल झाली, गोंधळ सुरू झाला. अनेक शंका, सूचना आणि त्याचबरोबर, ‘‘आम्हाला ‘म’ चं पुस्तक लिहायचं आहे.’’ ‘‘आम्ही ‘एक’चे पुस्तक लिहिणार आहोत.’’ ‘‘मी आणि माझी छकू ‘लहानापासून मोठय़ापर्यंतचे’ लिहिणार आहोत.’’ ‘‘आम्हाला ‘त्रिकोणाचे’ पुस्तक लिहायचं आहे.’’ ‘‘अहो बाई, पण ‘शून्याचं’ पुस्तक कसं करायचं?’’ असेही आवाज उमटले. पण सुरुवात म्हटली की गोंधळ हवाच. त्याशिवाय गंमत नाही आणि यशही नाही.
आम्ही सगळे मिळून आमच्या लहानग्यांना लेखक बनवायच्या तयारीला लागलो. आमचे एकूण वर्ग दहा – पाच लहान शिशुचे व पाच मोठय़ा शिशुचे. प्रत्येक वर्गात चाळीस मुले. म्हणजे चारशे मुलांची चारशे पुस्तकं! एक डोंगर चढण्याएवढं अवघड काम. एक मात्र निश्चित की त्यासाठी पालकांची मानसिकताही बदलणं आवश्यक होतं. पहिल्यांदा त्यांना सांगितलं तेव्हा बऱ्याच जणांनी ते फारसं मनावर घेतलं नाही. तर काहींना ते शाळेत मागवतात त्या तक्त्यांप्रमाणे काही तरी करून द्यायचं असं वाटलं. मग मात्र पुस्तक करण्याचा हेतू आणि त्यामुळे मुलाला आपण कोणता अनुभव देऊ शकतो यासाठी परत एक सभा घेतली. अगदी मुखपृष्ठापासून लेखकाचं मनोगत किंवा मागच्या पानावर लेखकाची ओळख अशा प्रकारे पुस्तकाची रचना असावी असं सांगितलं. आपल्या छोटय़ा छोटय़ा बाळांना एक लेखक म्हणून ओळख मिळणार, ही कल्पना पालकांना आवडली. सगळे पालक या उपक्रमात मनापासून सहभागी झाले. त्यांना म्हटलं मुलाला तू एक पुस्तक लिहिणार आहेस याचं महत्त्वही पटवून द्यायचं आहे. म्हणजे त्याच्या मनात आपल्याकडून एका पुस्तकाची निर्मिती होत आहे ही जाणीव निर्माण होईल.
शिक्षकवर्गाला चाळीस मुलांच्या पालकांना वेगवेगळे चाळीस विषय वाटून द्यायला सांगितले. त्यासाठी आमच्या अभ्यासक्रमाचे लहान लहान भाग केले. जसं भाषेच्या पुस्तकांसाठी अ ते अ: स्वरांची आणि क ते ज्ञ व्यंजनांची चित्रपुस्तकं. ‘अ’पासून ते अ: पर्यंत शब्दांची चित्रपुस्तकं. जोडीच्या शब्दांचं पुस्तक, एकवचन व अनेकवचनाचं पुस्तक हे आणि अशा प्रकारे अनेक विषय. तशाच पद्धतीनं गणित, परिसर वाचन, हस्तकला अशा सगळ्या विषयांची पुस्तकं तयार करण्यासाठी विषय वाटून दिले आणि दोन महिन्यांचा अवधी दिला. दरम्यान, ज्या पालकांना विषय आणि पुस्तक कसं करायचं हे समजत नव्हतं, ते येऊन आपापल्या वर्ग शिक्षिकांकडून किंवा माझ्याकडून समजावून घेत होते.
दोन महिन्यांनंतरच्या ठरलेल्या दिवशी प्रत्येक वर्गातून किमान तीस ते पस्तीस लेखक, अशा प्रकारे दहा वर्गाचे जवळजवळ तीनशे पन्नास लेखक, आपापली पुस्तकं घेऊन शाळेत दाखल झाले.
‘माझ्या शाळेसाठी माझं पुस्तक’ ही निर्मिती प्रत्येक मुलाला लेखक असण्याचा एक सुंदर आणि समृद्ध अनुभव देऊन गेली. भविष्यात या मुलांपैकी कोणी लेखक झालेच तर त्यांना आपल्या पहिल्यावहिल्या पुस्तकावरचे नाव आणि मागच्या पानावरचा फोटो निश्चितच आठवेल हे मात्र नक्की.
– रती भोसेकर
ratibhosekar@ymail.com