कुठलाही उपक्रम मुलांपर्यंत पोहोचवायचा तर त्यांच्या बाईंच्या मध्यस्थीने पोहोचवायला लागणार हे सत्य मी स्वीकारायला लागले आहे. सुरुवातीला वाटणारी खंत आता कमी झाली आहे. त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम लहान मुलांबरोबर त्यांच्या शिक्षिकांसाठीही करता येतील, हे ही लक्षात आलं..
दोन वर्षांपूर्वीची ही आठवण. मी पूर्व प्राथमिक विभागाची प्रमुख म्हणून नुकताच पदभार स्वीकारला होता. दुपारी एकचा सुमार होता. मोठय़ा शिशुचे वर्ग सुरू झाले होते. आजूबाजूच्या वर्गातून मुलांचा चिवचिवाट ऐकू येत होता. ऑफिसमध्ये मी एकटीच निरस असं कार्यालयीन काम करत बसले होते. तेवढय़ात, ‘‘बाई, तुम्ही ऑफिसमध्ये एकटय़ाच काय करताय? कोणी नाही तुमच्याबरोबर?’’ या प्रश्नाने मी चमकून मागे बघितलं. माझ्या ऑफिसमधल्या खुर्चीच्या पाठीमागच्या दारात उभी राहून मोठय़ा शिशुमधली गार्गी मला विचारत होती.
तिचा वर्ग ऑफिसच्या अगदी बाजूचा होता. त्या वर्गातून ऑफिसमध्ये यायला एक दरवाजा आहे. गार्गीच्या बोलण्याने मला एकदम भरून आलं. परंतु माझं एकटेपणाचं दु:ख तिला समजलं याचं थोडं समाधानही वाटलं. मी एकदम तिला जवळ घेऊन म्हटलं, ‘‘खरं ग. कोणी नाही माझ्याबरोबर.’’ त्याच्या आधीच्या वर्षी लहान शिशुला मी गार्गीच्या वर्गाच्या बाई होते. त्यामुळे मोठय़ा शिशुमध्ये आल्यावर ती सगळीच मुलं सुरुवातीला, ऑफिसमध्ये डोकावून डोकावून आपल्या बाई आता इथे बसतात हे बघायला यायची. बाईंबरोबर मुलं नसतात, त्या एकटय़ाच काहीतरी करत असतात हे त्यांच्या लक्षात आलं असावं आणि तो त्यांच्या मनातला विचार बहुतेक गार्गीने बोलून दाखवला. तिच्या या विचारण्याने मला माझीच खूप दया आली. मला जाणवलं, ‘अरे खरंच की मुलांच्या रोजच्या वर्गापासून मी किती दूर गेले आहे. रोज वर्गाच्या दाराशी जाऊन आपल्या मुलांची वाट बघायची, वर्गात जाऊन त्यांच्या गप्पांमध्ये रमायचं, सगळं माझ्यापासून हिरावल्यासारखं झालं होतं. प्रकर्षांनं वाटलं, खरंच कोणी नाही आपल्याबरोबर. आता कोणाला रोज म्हणायचं की, ‘आपण सगळे आता गंमत करणार आहोत.’ गार्गीच्या बोलण्याने मला एकदम माझ्या नवीन भूमिकेमधला रुक्षपणा जाणवला. लक्षात आलं खरंच की आता मला प्रत्येक वर्गशिक्षिकेच्या वर्गात पाहुण्यासारखं वावरायला लागतं. वर्गशिक्षिका काहीही क्रियाकृती घेत असल्या की बाहेरून चाहूल न लागता मला बघायला लागतं. कारण माझी चाहूल लागली की मुलं ‘मोठय़ा बाई’, ‘मोठय़ा बाई’ असं ओरडत राहातात. सगळ्या वर्गात क्रियाकृती बंद होऊन गोंधळाचं वातावरण निर्माण होत होतं. त्यांच्या बाईंनाही वाटतं आपलं निरीक्षण करायला बाई आल्यात, त्याही एकदम सावध होतात. कधी कधी त्यांच्या बाई त्यांना सांगतात, ‘‘मोठय़ा बाई आल्यात, त्यांना नमस्ते करा.’’ मुलं ‘नमस्ते बाई’ एका सुरात म्हणतात. किंवा कधी कधी ‘बाई आल्या’ असा माझा धाक दाखवला जातो. तेव्हा वाटतं, बापरे, खरंच का आपण अशा धाक दाखवावासा वाटणाऱ्या झालोत? मलाच दचकल्यासारखं होतं. माझी रागाची खुर्ची आता मुलांसाठी चिकट खुर्ची झाली आहे. ‘‘एकदा का या खुर्चीत बसलं की त्याच्यातून उठता येत नाही’’, असं मुलांना मी सांगितलंय आणि इथे मग एकटंच बसावं लागतं हेही त्यांना माहितेय. त्यामुळे वर्गात मस्ती करणाऱ्या मुलांना त्यांच्या बाई घेऊन आल्या की ‘माझ्या चिकट खुर्चीत बसायचंय का?’ म्हणून विचारलं की अर्थातच कोणालाही त्याच्यात बसायचं नसतं. ऑफिसमध्ये मुलं गप्पा मारायला आली तरी थोडय़ा वेळात त्यांच्या वर्गात त्यांना घेऊन जायला त्यांच्या बाई येतात. एकूण समोर मुलं दिसत असली तरी आता मी ‘त्यांच्या बाई’ नाही किंबहुना आता मी कोणाच्याही ‘बाई’ नाही तर फक्त ‘मोठय़ा बाई’ आहे हे दु:ख होत होतं.
माझी भूमिका, कामे बदललेली होती. आता शिक्षिकांच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहचायला लागत होतं आणि त्यामध्ये अजून तरी मुलांबरोबर जी गंमत येत होती ती येत नव्हती. तसंच आता थोडय़ा आवश्यकताही वेगळ्या होत्या. मुलांच्या शिक्षकांसाठी काहीतरी भरीव करायला पाहिजे हेही जाणवत होतं. मनात सारखा शिक्षकवर्गाच्या प्रशिक्षणाचा विचार येत होता. कारण नवीन रुजू झालेल्या शिक्षकांसाठी तर प्रशिक्षण अत्यंत गरजेचं आहे असं वाटायला लागलं होतं आणि त्याचबरोबर इतर शिक्षकांचीही उजळणी होणे आवश्यक वाटत होतं. मध्यंतरी एक पुस्तक वाचनात आलं होतं. त्यात एक विषय घेऊन मुलांना विविध अनुभव-भाषा, गणित, परिसर, कला, विज्ञान, कसे देता येतील हे उदाहरणांसह समजावलं होतं. पुस्तक मला खूपच आवडलं होतं. त्याच क्षणी शिक्षक प्रशिक्षणाच्या दृष्टीने एक स्पर्धात्मक पण हसतखेळत आणि अभ्यासपूर्ण असा स्वयंअनुभवातून स्वयंशिक्षणाचा मार्ग दिसला.
गेल्या नोव्हेंबर महिन्यातील गोष्ट. दिवाळीची सुटी संपून शाळा परत सुरू झाली. दुसऱ्या सत्रातील पहिली पालक सभा होती. शिक्षिका आणि मी पालकसभेत सांगण्याचे मुद्दे ठरवत होतो. मी एकदम म्हटलं, ‘‘दुसऱ्या सत्रात आपण वर्ग सजावटीची स्पर्धा घेऊ या का?’’ तुम्ही तुमच्या पालकांच्या मदतीने मुलांसाठी वर्ग सजावट करा. त्यांना प्रथम वाटलं, ‘हं. नुसता वर्ग सजवायचा आहे.’ पण लगेचच मी त्यांना एक एक कागद दिला ज्यामध्ये त्यांच्या वर्गासाठीचा विषय आणि त्या विषयानुसार कोणकोणते अनुभव देत वर्ग सजावट करायची हे दिलं होतं. पाच वर्गाना मुलांच्या भावविश्वाशी जवळीक साधणारे पाच विषय निवडले होते. जंगलातील प्राणी आवडतात म्हणून जंगल, बागेत जायला आवडतं म्हणून बाग, मासे-पाणी आवडतं म्हणून मत्स्यालय, सर्कस-विदूषक, त्यातील प्राणी आवडीचे म्हणून सर्कस आणि वेगवेगळ्या भाज्या, फुलं, फळं यांची ओळख चालूच असते म्हणून भाजीबाजार असे विषय दिले. प्रत्येक विषयाला अनुसरून आणि आम्ही विभागासाठी ठरवलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने भाषा, गणित, परिसर, विज्ञान व कला अनुभव कसे व कोणते देता येतील याचा प्रत्येक वर्गशिक्षिकेला अभ्यास करून कागदावर मांडणी करण्यास सांगितली. प्रत्येक विषय लहान व मोठय़ा गटात कसा असेल याची मांडणी प्रत्येक वर्गशिक्षिकेला तिच्या वर्गानुसार दिलेल्या विषयातून, त्या त्या गटासाठी करायची होती. मुलांच्या डोळ्यासमोर त्यांचा अभ्यासक्रम हा पाच वेगवेगळ्या विषयांतून ठेवायचा होता. अर्थात ही आखणी व मांडणी वर्गशिक्षिकेची असली तरी प्रत्यक्ष वर्गातील मांडणीसाठी पालकांची मदत घेता येणार होती. नोव्हेंबरच्या सभेत आपापले विषय वर्गातील पालकांनाही पालकसभेत सांगितले आणि त्यांचे आवश्यकतेनुसार गट केले. महिन्याभराच्या अवधीनंतर पुन्हा एकदा पालकसभा झाली त्यात वर्गशिक्षिकांनी स्वत:च्या विषयाचा फ्लोचार्ट तयार करून आपण त्या विषयाला धरून कशाप्रकारे विविध अनुभवांची मांडणी करू शकतो हे पालकांपुढे मांडले. काही शिक्षिकांनी पालकांच्या मदतीने विविध अनुभव देणारे शैक्षणिक खेळ तयार करण्याच्या योजना तयार केल्या. उदाहरणार्थ, बाग हा विषय घेऊन जर भाषा अनुभवात लहान शिशुला अक्षरओळख द्यायची असेल तर घ – घसरगुंडी, म- माती, फ – फुलं, फुलपाखरं अशाप्रकारे द्यायची, किंवा विरुद्धार्थी शब्दांसाठी बागेतील दृष्यांचा वापर करायचा – जसा झोपाळा मागे- झोपाळा पुढे, घसरगुंडी वर घसरगुंडीवरून खाली वगैरे, मोठय़ा शिशुसाठी एकवचन-अनेकवचनसाठी झाड-झाडे, पान-पाने, झोपाळा-झोपाळे, यमक जुळवणाऱ्या शब्दांसाठी पान-मान, दगड-रगड, ससा-बसा, पक्षी-नक्षी अशाप्रकारे शब्दांची गंमत मुलांना द्यायची. बागेची गाणी, बागेच्या गोष्टी, बागेची कोडी, बागेतील प्रसंग वर्णन, बागेतील वस्तू डोळ्यांपुढे ठेवून वस्तू वर्णन, गणितानुभवात मोजणी, अंकओळख, दशक संकल्पना, शून्यसंकल्पना, एकास एक संगती, क्रमवारी, तुलना, विविध गणनपूरक संकल्पना, अर्धाभाग-पावभाग सगळं सगळं फक्त बाग आणि बागेतील साहित्य डोळ्यापुढे ठेवून करायचं, विज्ञानानुभवात सजीव-निर्जीव, तरंगणे-बुडणे, विरघळणे या गोष्टींचा समावेश केला, तर परिसरानुभवात बागेच्या विविध प्रकारांची माहिती चित्ररूपाने देऊन त्यातील वनस्पतींची माहिती, राणीच्या बागेतील प्राण्यांची माहिती, औषधी वनस्पतींच्या बागेतील त्या वनस्पतींपासून तयार होणाऱ्या औषधांची माहिती. हे आणि असे अनेक भाषानुभव, गणितानुभव, परिसरानुभव, कलानुभव फक्त आमच्या शाळेसाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार मांडायचे होते. काही काम मुलांकडूनही करायचे होते. जसे मुलांनी त्यांच्या वर्गाच्या विषयाला धरून अभ्यासक्रमानुसार चित्र काढून त्या चित्रांच्या मांडणीलाही प्राधान्य होतं. हे फक्त बागेचे उदाहरण दिले. असे काम आपापल्या विषयाला धरून प्रत्येक शिक्षिकेला करायचं होतं. एप्रिलमध्ये त्याची मांडणी होणार होती.
‘विषयानुरूप अभ्यासक्रम प्रकल्प मांडणी’ असं आम्ही त्याचं जड नाव ठेवलं होतं. बाहेरचे खास परीक्षक बोलावले होते. अधूनमधून प्रत्येक शिक्षिकेचा मी अंदाज घेत होते, पण प्रत्यक्ष मदत मात्र करत नव्हते. कारण अर्थात ती एक स्पर्धा होती. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात चार दिवस पालक व शिक्षिकांनी अहोरात्र खपून वर्ग सजवला. त्यात भाषा, गणित, परिसर, कला, विज्ञान, वाचन, संचय असे वेगवेगळे कोपरे करून त्या त्या अनुभवांच्या शैक्षणिक खेळांची, प्रत्यक्ष वस्तूंची, मोठय़ा चित्रतक्त्यांची मांडणी केली होती. प्रत्येक वर्गात त्या त्या ठिकाणीच आपण आहोत असा अनुभव वर्गात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकालाच येत होता.
या प्रकल्पाचा खरोखरच छान उपयोग शिक्षकवर्गाला झालेला जाणवला. अभ्यासक्रमानुसार करायला सांगितलेल्या या मांडणीमुळे प्रत्येक शिक्षिकेचा आपल्या गटाच्या अभ्यासक्रमाचा बारकाईने अभ्यास झालेला दिसला आणि स्पर्धा असल्याने इतरांपेक्षा काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न दिसला. जसं काहीजणींनी विषयाच्या अनुषंगाने एखादे नाटुकले भाषानुभवासाठी बसवले होते, कलानुभवासाठी मुलांच्या चित्रांची दिनदर्शिका केली होती. काहींनी स्थळभेट देऊन तिथले फोटो वर्गात लावले होते. शिक्षिकांच्या प्रशिक्षणाच्या अंगाने या प्रकल्पाचा खूप मोठा फायदा (चांगल्या अर्थाने) झाला होता. प्रत्येक शिक्षिकेने आपला अभ्यासक्रम दिलेल्या विषयानुरूप मांडण्याचा मनापासून प्रयत्न केला होता. एकमेकींच्या वर्गातील मांडणीमुळे आपले काही राहिले का किंवा अजून वेगळ्या पद्धतीने तो अनुभव कसा दिला आहे हे त्यांना कळले. त्याचप्रमाणे ज्या वर्गात अभ्यासक्रमातील मांडणीमध्ये काही कमतरता जाणवल्या, त्या संबंधित शिक्षिकांना आपसूकच इतरांच्या वर्गात बघून लक्षात आल्या. त्याच्यावर आमच्या चर्चा झाल्या. प्रकल्पानंतरही गप्पांमधून आणखी कशा प्रकारे अभ्यासक्रमाची मांडणी होऊ शकली असती हे त्यांना जाणवलेले दिसले. एकूण भाषणबाजी न करता किंवा इतरत्र प्रशिक्षण न शोधता शिक्षकांचे ज्ञानरचनावादाच्या मार्गाने आपले आपणच प्रशिक्षण झाले होते. दरम्यान ‘शिक्षणवेध’ या मासिकाचा एक अंक आमच्या प्रकल्पावर काढण्याची संधी उपलब्ध झाली. त्यासाठी परत एकदा सगळ्यांनाच आपापल्या विषयाचे अभ्यासक्रमानुसार लेखन करावे लागले. प्रकल्प मांडणीला सविस्तर लेखनाची व सखोल चिंतनाची बैठक मिळाली. याच वर्षांत रुजू झालेल्या, मांडणीच्या वेळेस जरा गोंधळलेल्या एका शिक्षिकेचे लिखाण मला शिक्षक प्रशिक्षणाचा हा प्रयोग नक्कीच १०० टक्के यशस्वी झाला आहे असा विश्वास देऊन गेला.
कुठलाही उपक्रम मुलांपर्यंत पोहोचवायचा तर आता त्यांच्या बाईंच्या मध्यस्थीने पोहचवायला लागणार हे सत्य मी स्वीकारायला लागले आहे. सुरुवातीला वाटणारी खंत आता कमी झाली आहे. कारण पूर्वी कुठलाही उपक्रम हा एका माझ्या वर्गापुरता होता, तो आता सगळ्या वर्गासाठी करता येईल हा साक्षात्कार मला झाला आहे. पण त्याचबरोबर अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम लहान मुलांबरोबर लहान मुलांच्या शिक्षिकांसाठीही करता येतील आणि त्याच्यातही आता गंमत येणार आहे हे उमजलं. एकटेपणाचं माझं दु:ख थोडं हलकं झालं. लहान मुलांबरोबर लहान मुलांच्या शिक्षिकांसाठीही उपक्रम हा माझ्या उपक्रमांचा आता अविभाज्य भाग बनला आहे.
ratibhosekar@ymail.com
रती भोसेकर