मुलं स्वत: प्रत्येक क्षणी त्याच्या आजूबाजूला जे काही घडत असतं त्यातून त्यांचे ते अनुभव घेत असतात. त्याच्यावरून त्यांचे त्या प्रत्येक बाबतीतील निष्कर्ष काढत असतात. छोटय़ांचे हे अनुभवाचे बोल ऐकण्यासारखे असतात आणि त्यातून मोठय़ांनाही भरपूर शिकण्यासारखं असतं, याचं भान आपण ठेवलं पाहिजे.

आज एक वेगळा विषय मांडावासा वाटतो आहे. विषय आहे, ‘मुलांचं अनुभवविश्व आणि त्यावरून त्यांचं आपल्याशी संवाद साधणं.’ मुलांचं स्वत:चं असं अनुभवविश्व असतं. जे प्रत्येक मूल आपलं आपण संपन्न करत असतं. त्याच्या रोजच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून आणि त्याच्या नजरेला दिसणाऱ्या गोष्टींमधून. मुलं हे त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत उत्तमरीत्या पोहोचवू शकतात. ते पोहोचवण्याची त्यांची क्षमताही अचंबित करणारी असते. आपण मात्र समजत असतो की, आपण त्यांचं अनुभवविश्व संपन्न करत आहोत. आपण आपल्या अनुभवाने त्यांना शिकवत आहोत. खरं तर आपल्या नजरेस जे दिसत नाही ते मुलांना दिसतं. किंवा असं म्हणता येईल ज्या दृष्टीने एखाद्या घटनेकडे आपण पाहात नाही ती दृष्टी मुलांकडे असते. आपण त्यांच्यात वावरायला लागलो की त्या ‘दिव्य दृष्टी’चा साक्षात्कार आपल्याला होतो. ती दिव्य दृष्टी आपल्याला समजून घेता आली की, एक यशस्वी बालशिक्षिका असल्याची एक पायरी आपण चढलो असं म्हणता येईल. मला माझ्या मुलांकडून त्यांच्या अनुभवाचे काही बोल अशा प्रकारे ‘दिव्य दृष्टी’ देऊन गेले, जे मलाही वेगळा अनुभव देऊन गेले. त्याविषयीच..

Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
vidya balan reveals kartik aaryan love life
कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…
Neelam Kothari
“ती खूप घाबरली…”, समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा; म्हणाला, “तुम्ही विशीत असताना…”
Salman Khan Threatened Indira Krishnan
‘तेरे नाम’ चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने ‘या’ अभिनेत्रीला दिली होती धमकी; म्हणाला, “मी मोठा तमाशा….”
Madhuri Dixit And Kartik Aryan dance at promotion of Bhool Bhulaiyaa 3 movie
Video: ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

‘गुलाब वर्ग’ त्यांच्या बाईंनी दिलेलं चित्र रंगवण्यात मग्न होता. मी वर्गात फेरफटका मारत होते. इकडे तिकडे फिरत प्रत्येकाशी त्याच्या त्याच्या चित्राविषयी बोलत होते. त्यांच्या रंगवण्याचं कौतुक करत होते. त्या वर्गात ऋत्विक नावाचा एक छोटासा, गोरा गोरासा मुलगा आहे. त्यानं मला स्वत:हून त्याचं चित्र दाखवलं. त्याच्या मते ते फारच छान झालं होतं. मला ओढून जवळ बसवून तो त्यातील फुलपाखरू आणि फुलं दाखवत होता. चित्र छान काढलं होतं. कागदाच्या एका कोपऱ्यात खालच्या बाजूला एक छोटंसं फूल आणि त्याच्या वर तेवढंच छोटं फुलपाखरू. ते त्याने रंगवलंही छान होतं. एकूण त्यांच्यासारखंच छोटंसं आणि गोंडस त्याचं फूल आणि फुलपाखरू होतं. मी पण ‘फेथफुली युवर्स’ असल्याप्रमाणे त्याच्या हो ला हो म्हणत होते. तेवढय़ात मला त्याच्या त्या कागदावर कोपऱ्यात एका बाजूला प्रत्येक रंगाची एक एक रेघ मारलेली दिसली. मला कळेना, अशा रेघा का बरं याने मारल्या? मी लगेच त्याला म्हटलं, ‘‘ऋत्विक, पण तू अशा रेघा का मारून ठेवल्यास चित्रावर? एवढं छान तुझं चित्र पण बघ रेघांमुळे ते कसं दिसतय.’’ माझ्या मोठय़ांच्या नजरेतून त्या रेघा तिथे अजिबात शोभत नव्हत्या. त्याने माझ्याकडे बघितलं. ‘तुम्हाला काही कळत नाही’ अशीच त्याची अनुभवी नजर सांगत होती. तो मला म्हणाला, ‘‘अहो बाई, मी ‘हा रंग कुठला’, ‘हा रंग कुठला’ असं प्रत्येक रंग बघत होतो.’’ मी त्याच्या उत्तराने चांगलीच अवाक् झाले. खरे अनुभवाचे बोल होते ते. केवळ नुसता डोळ्यांवर विश्वास न ठेवता प्रत्येक रंगांचा अनुभव घेऊन त्याने त्याचा वापर करून आपलं चित्र रंगवलं होतं. मला एकदम रामायणातील शबरीच आठवली. तिनं जसं प्रत्येक बोर अन् बोर खाऊन त्याच्या गोडीचा अनुभव घेऊनच रामासाठी बोरं ठेवली होती. त्याचप्रमाणे ऋत्विकनं प्रत्येक रंगाचा प्रत्यक्ष अनुभव घेत आपलं चित्र पूर्ण केलं. त्याला शबरीही माहीत नव्हती आणि तिचा अनुभवही माहीत नव्हता. पण रामायणातल्या म्हाताऱ्या शबरीनं आणि लहानग्या ऋत्विकनं आपापलं अनुभवविश्व सारख्याच पद्धतीनं परिपूर्ण केलं असं मला वाटलं.

प्रत्येकानं आपापली कुवत ओळखून त्याप्रमाणेच गोष्टी कराव्यात, मोठय़ांचे हे अनुभवाचे बोल असतात. पण मोठे जेव्हा छोटय़ांकडून अवाजवी अपेक्षा करतात, तेव्हा छोटेच त्याच्या अनुभवाने मोठय़ांना त्या अवाजवी अपेक्षांची जाणीव करून देऊ शकतात, याचाही मला एकदा अनुभव आला. मोठय़ा शिशूचे वर्ग भरले होते. त्यांतील काही जणांचे संस्कृतमधून गीतेच्या बाराव्या अध्यायातील ११ ते २० श्लोक पाठ करवून घेत होतो. आठएक दिवस झाल्यावर त्या श्लोक पाठांतरासाठी निवड केलेल्या आमच्या छोटय़ा दोस्तांचे श्लोक मी माझ्या ऑफिसमध्ये म्हणवून घेत होते. मुले आपापल्या परीने म्हणून दाखवत होती. सईचा नंबर आला. ती माझ्याकडे गप्पपणे बघत होती. बहुधा माझा अंदाज घेत असावी. ती घाबरली आहे असं मला वाटलं. मी तिला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं जवळ घेतलं आणि म्हटलं, ‘‘हं म्हण.’’ पण माझा अनुभव आणि अंदाज एकदम चुकीची ठरला. ती माझ्याकडे बघत एकदम धीटपणे आणि शांतपणे म्हणाली, ‘‘बाई, हे जरा मला म्हणायला जडच जातात. मी आपलं ‘धुवा हात पाय’ म्हणू का?’’ तिच्या अनुभवाच्या बोलातून तिला सांगायचं होतं, ‘आम्हाला झेपेल असंच आमच्यासाठी निवडा.’ आम्हाला जे कठीण जात आहे ते करण्यासाठी केवळ स्पर्धा आहे म्हणून जबरदस्ती करू नका. मोठय़ांच्या खूप उशिरा लक्षात येणारे हे अनुभवाचे शहाणपण सई मला देऊन गेली. आपण जर वेळीसच त्याच्या या अनुभवाचा आदर करून त्यांच्या क्षमतेनुसार स्पर्धा निवडण्याचं आणि पुढे जाऊन असंही म्हणता येईल की मुलांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं तर आजकाल विद्यार्थ्यांना आणि पालकांना लागणाऱ्या समुपदेशनाची गरज बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

एकदा असाच ‘माझ्या अनुभवा’ने मुलांचा ‘भाषाविकास’ करायचा प्रयत्न करत असताना, त्यांचा अनुभव माझाच ‘भाषाविकास’ कसा करून गेला याचा एक गमतीदार प्रसंग आठवतोय. मुलांबरोबर मी आमच्या मदानात होते. सहज वर आकाशात लक्ष गेलं तर बगळ्यांची माळ दिसली. लगेचच ‘बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात’ गाण्याच्या ओळी ओठावर आल्या. मुलांच्या ‘ज्ञानात’ भर घालत त्यांचा ‘भाषाविकास’ साधण्याची उबळ माझ्यातील शिक्षिकेला आली. मी मुलांचे लक्ष वर आकाशाकडे वेधत म्हटलं, ‘‘बघा मुलांनो, आकाशात बगळ्यांची माळ दिसत आहे.’’ मला वाटलं, वा! वा!  ‘बगळ्यांची माळ’ची संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवली. पण माझं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच कानावर खुशबूचं वाक्य आलं, ‘‘आणि बाई ‘बगळ्यांचं कानातलं’ पण चाललं आहे बघा.’’ मी चमकून वर बघितलं, तर माळेपाठोपाठ दोनच बगळे उडत होते. तिच्या अनुभवातून माळ आणि कानातले यांची जोडी तिला बरोबर दिसली होती.

जाड जाड िभगाचा गोल गोल चष्मा घालणारा, तशाच गोल गोल चेहऱ्याचा, प्रत्येक वाक्य खूप विचार करून बोलणारा मागे एका लेखात उल्लेख केलेला आमचा केशव. त्याचे अनुभवाचे बोल तर आम्हाला जीवनाचं मोठं तत्त्वज्ञानच सांगून गेले. एकदा दुपारचा केशव वर्गात आला. चेहऱ्यावर शाळेत यायला लागल्याबद्दलचे कंटाळवाणे भाव स्पष्ट दिसत होते. वर्गाच्या दारात त्याच्या बाई उभ्या होत्या. केशव त्यांच्याजवळ आला आणि जीवनाचं सार सांगितल्याचा भाव चेहऱ्यावर आणत म्हणाला, ‘‘बाई, एकदम म्हातारंच होऊन जावंसं वाटतंय.’’ त्याच्या बाई एकदम चकित झाल्या. असं काय अनुभवलं या पाच-साडेपाच वर्षांच्या जिवाने की त्याला म्हातारंच व्हावंसं वाटलं? पण नंतर आमच्या लक्षात आलं. केशवच्या घरात आजी-आजोबा होते. त्यांना ना आई-बाबांसारखी नोकरीसाठी धावपळ करावी लागत होती ना केशव आणि त्याच्या ताईसारखी शाळा, विविध क्सासेस्, संध्याकाळची क्रीडासंकुल अशी पळापळ. छान घरी राहायचं. आराम करायचा. त्यामुळे आराम हवा असेल तर आपल्याला म्हातारंच व्हावं लागेल हे त्याचे अनुभवाचे बोल काही खोटे नव्हते.

हे काही वर्गात किंवा शाळेत जाणूनबुजून केलेले प्रयोग नाहीत. पण मुलं स्वत: प्रत्येक क्षणी त्यांच्या आजूबाजूला जे काही घडत असतं त्यातून त्यांचे ते अनुभव घेत असतात. त्याच्यावरून त्यांचे त्या प्रत्येक बाबतीतील निष्कर्ष काढत असतात. त्यातून त्यांचे ते ज्ञान मिळवत असतात. या सर्वाचा आपण नीट अभ्यास केला तर बालमानसशास्त्र कसं छान पद्धतीनं अभ्यासता येतं याची गंमत अनुभवण्यासारखी आहे. मुलं त्याच्याशी निगडित प्रत्येक घटनेचा कसा विचार करतात आणि त्यातून ते नेमका कोणता अनुभव घेतात याची मला वाटतं प्रत्येक बालशिक्षिकेनं नोंद केली पाहिजे. कारण प्रत्येक बालशिक्षिका ही चांगली बालमानसतज्ज्ञ असलीच पाहिजे. ऋत्विकने प्रत्येक रंगांचा अनुभव घेत आपलं रंगांचं ज्ञान परिपूर्ण केलं होतं. सईने श्लोक ‘अपने बस की बात नहीं’ हे ओळखून आपल्या दोस्तांच्या कडूनही अवाजवी अपेक्षा करू नका अशी आम्हाला जाणीव करून दिली. बगळ्यांची माळ तर बगळ्यांचं कानातलं असायला काय हरकत आहे. तसंच नुसती धावपळ करत आयुष्य घालवू नका. जरा शांतपणे जगायला वाव द्या, नाही तर आराम करायला आपल्याला म्हातारंच व्हावं लागेल हे केशवचं आपल्या सगळ्यांसाठीच विचार करायला लावणारे बोल! अशा या लगानग्यांच्या अनुभवाने आपण मोठे शहाणे होत जातो. खरं तर अनुभवाने माणूस शहाणा होतो, असं नेहमीच म्हटलं जातं. उगीच काळ्याचे पांढरे झाले नाहीत, अनुभवाचे बोल आहेत वगरे म्हणत मोठी माणसे अशा प्रकारे बोलतात की जसं काही अनुभवाची मक्तेदारी त्यांनीच घेतली आहे आणि त्यांनाच काय ते जीवनाचं सारं सार समजलं आहे! मोठय़ांचे अनुभवाचेच बोल असतीलही आणि असतातही ऐकण्यासाठी. पण छोटय़ांचेही अनुभवाचे बोल ऐकण्यासारखे असतात आणि त्यातून मोठय़ांनाही भरपूर शिकण्यासारखं असतं याचं भान आपण ठेवलं पाहिजे.

याच मुलांच्या अनुभवाच्या बोलांची अजूनही एक महत्त्वाची आणि गंभीर अशी बाजू आहे. मी स्वत: त्याच्या अशा बोलण्याकडे लक्ष देत नाही असं आता कधीच होत नाही. ती जे काही सांगत आहेत ते नक्कीच त्यांना आलेल्या अनुभवामुळेच अशी मला खात्री असते. मुलं कुठलंही वाक्य उगीच बोलत नाहीत ही एवढी र्वष त्यांच्यात वावरल्याने माझ्या अनुभवात पडलेली मोठीच भर आहे. त्यातील अर्थ मात्र आपल्याला प्रयत्नपूर्वक त्यांच्याशी बोलून बोलून शोधून काढावा लागतो. बालशिक्षिका ही तिच्या वर्गातल्या मुलांच्या घराशीही जोडलेली असते. मुलं हमखास आपल्या शिक्षिकेला गप्पांमधून घरातल्या काही गोष्टी सांगत असतात हा प्रत्येक बालशिक्षिकेला अनुभव येतोच. त्यावरून आपल्याला त्यांच्या घरातील वातावरणाचा अंदाज येत असतो. त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी त्याच्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करत आहेत की असुरक्षिततेचे हे त्याच्या गप्पांमधून आपल्याला सहज कळू शकतं. तसंच त्यांना कशाचा त्रास होत आहे का याची जाणीव आपल्याला होऊ शकते.

एक अगदी साधं उदाहरण मला आठवतंय. एक दिवशी छोटी मनाली मला म्हणाली, ‘‘माझ्या पाठीला नं टोक आहे.’’ आधी मी लक्ष दिलं नाही. पण परत येऊन तिनं तेच सांगितलं. मी तिच्या पाठीवरून हात फिरवला, हाताला काहीच लागलं नाही. पण तिच्या बोलण्यात तिला येणारा अनुभव जाणवत होता. म्हणून शिक्षकांच्या खोलीत नेऊन मावशीच्या मदतीनं बघितलं तर तिच्या फ्रॉकला आईने आतून पिन लावली होती. ती उघडली गेल्याने तिला ती टोचत होती. आईने मी तुझ्या फ्रॉकला पिन लावतेय वगरे असं तिला सांगितलं नव्हतं त्यामुळे आपल्या पाठीला टोक आहे असंच तिच्या अनुभवातून तिला उमजत होतं. ते अनुभवाचे बोल तिने बाईंपर्यंत नीट पोहोचवले होते. ‘‘काही तरीच काय बोलतेस! पाठीला कसं टोक येईल. जागेवर बस.’’ असं न बोलता तिच्या बोलण्यावर विचार करणं हे माझं कर्तव्य होतं. ज्यामुळे मी तिला मदत करू शकले होते.

सध्या आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांवरून तर आजच्या प्रत्येक बालशिक्षिकेला आपल्या वर्गातल्या मुला-मुलींच्या अनुभवांबाबत आणि बोलांबाबत सतर्क राहिलं पाहिजे. माझ्या सुदैवाने गंभीर स्वरूपाची मदत करण्याची वेळ माझ्यावर आली नाही आणि भविष्यातही येऊ नये. तरी अशा प्रकारची सजगता बाळगणं ही मुलांबरोबर वावरणाऱ्या सगळ्याच मोठय़ांची जबाबदारी आहे. त्यांच्या अनुभवांच्या बोलांकडे दुर्लक्ष न करता त्याप्रमाणे त्यांना समजून घेणं आपल्याच हातात आहे. नाही का?

रती भोसेकर

ratibjosekar@ymail.com