पठडीबद्ध शिकवण्यातून बाहेर पडायला लावणारा भुंगा सजग शिक्षकाच्या डोक्याभोवती गुं गुं करत राहिलाच पाहिजे. तो नसेल तर समोर असणाऱ्या चैतन्य सागराकडून काहीही करून घेऊ शकणार नाही. त्यांची निर्मितीक्षमता केवळ हाताची घडी तोंडावर बोट यातच बंद होऊन जाईल.. तशाच एका भुंगाच्या विचारातून तयार झालं मुलांनी तयार केलेलं ‘बालनिर्णय’ ..
मार्च महिना चालू झाला की शाळेमध्ये मोठय़ा शिशूची ‘बालनिर्णय’साठी जोरात तयारी चालू होते. एव्हाना मुलं आकडे लिहायला शिकलेली असतात. बहुतेक सगळेच जण शब्द वाचू शकतात, सोपे शब्द लिहूही शकतात. त्यातल्या काही जणांचं अक्षर खरोखरीच सुवाच्य असतं. सगळ्या वर्गातून चांगली चित्रं काढणारी मुलंही माहीत झालेली असतात. सुवाच्य अक्षर असलेली आणि छान चित्र काढणारी मुलं म्हणजे आमच्या ‘बालनिर्णय’ची टीम असते. ‘बालनिर्णय’ म्हणजे आमच्या शाळेचे कार्यक्रम दाखवणारं आणि शाळेच्या भिंतीवर मानाचं स्थान पटकावणारं असं खास मुलांनी शाळेसाठी तयार केलेलं कॅलेंडर आहे. बहुतेक वेळेला एखादा विषय ठरवून पण काही वेळेला फक्त छान छान चित्र एवढीच निवड पातळी ठरवून गेली दहा वर्षे शाळेच्या ऑफिसमध्ये भिंतीवर हे आमचं ‘बालनिर्णय’ लावलं जात आहे. ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’, तसं आमच्यासाठी-‘शाळेमध्ये ‘बालनिर्णय’ असावे’, हे आता पक्कं झालं आहे.
आता शाळा पातळीवर होणाऱ्या या ‘बालनिर्णय’ची सुरुवात मात्र वर्ग पातळीवर झाली होती. ‘बालनिर्णय’ला ‘बालनिर्णय’ हे नाव दिलं नव्हतं तेव्हाची गोष्ट. जानेवारी महिन्याचे दिवस होते. मोठय़ा शिशूचा ‘शेवंती’ वर्ग माझ्याकडे होता. ‘वर्षांऽऽचे महिऽऽने?’ ‘बाऽऽरा’. ‘जानेऽऽवारी, फेब्रुऽऽवारी, मार्च, एप्रिऽऽल, मेऽऽ..’ एकासुरात आमची घोकंपट्टी चालू होती. नंतर आले ‘आठवडय़ाचे वार?’ ‘साऽऽत, सोमऽऽवार, मंगळऽऽवार, बुधऽऽवार..’ पाठांतर अगदी छान झालं होतं. महिन्यांची, वारांची नावं मुलं धडाधड सांगत होती, पण याच्या पुढे जाऊन काही होऊ शकेल का हा भुंगा होताच. तो काही स्वस्थ बसू देईना. खरं सांगायचं तर हा भुंगा एका शिक्षकासाठी फार उपयुक्त आणि आवश्यक आहे. मुलांमधल्या आणि आपल्यामधल्या सर्जनशीलतेला वाट दाखवणारा, नवीन उपक्रम शोधून काढणारा भुंगा. एका पठडीबद्ध शिकवण्यातून आपल्याला बाहेर पडायला लावणारा असा हा भुंगा एका सजग शिक्षकाच्या डोक्याभोवती गुं गुं करत राहिलाच पाहिजे. तो नसेल तर मात्र समोर असणाऱ्या चैतन्य सागराकडून आपण काहीही करून घेऊ शकणार नाही. त्यांची निर्मितीक्षमता केवळ हाताची घडी तोंडावर बोट यातच बंद होऊन जाईल. तसं होऊ देणं म्हणजे निव्वळ करंटेपणा!
सात दिवसांचा एक आठवडा होतो आणि चार ते साडेचार आठवडय़ांचा एक महिना होतो. अशा बारा महिन्यांचं होतं एक वर्ष असा प्रवास करून एक कॅलेंडर करू या का. भुंग्याने कानाशी भुणभुण केली. त्यावेळी संगणकावर पेज डिझाइन वगैरे तंत्र मला अवगत नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी वर्गात हाताने डिझाइन केलेलं कॅलेंडरचं पान घेऊन गेले. मुलं काही त्या पानावर नीट लिहू शकतील असा तेव्हा खरंच विश्वास नव्हता. त्यामुळे लेखनाचं काम मीच करणार हे डोक्यात पक्कं. वर्षांची सुरुवात करायची म्हणजे अर्थातच जानेवारीपासून सुरुवात करून त्या दिवशी जानेवारी महिना लिहिण्यास घेणार होते. पण वर्गात चाळीस मुले होती. त्या छोटय़ाशा कागदावर त्यांना काय दिसणार आणि काय समजणार. हे जरा उशिराच म्हणजे सगळीच्या सगळी मुलं भोवती एकदम जमा झाल्यावर लक्षात आलं. लगेच तोडगा काढला, म्हणण्यापेक्षा काढावाच लागला. मी कागदावर जसं डिझाइन केलं होतं तसं मोठं कॅलेंडरच्या तारखेच्या पानासारखं पान फळ्यावर काढलं. नववर्षांच्या एका कॅलेंडरचं निरीक्षण करून आम्ही आमचा महिना लिहायला घेतला. आधी सगळ्यात वर महिना लिहिला. जानेवारी, मग वर्ष लिहिलं २००४. सात रकान्यांत सात वारांची नावं लिहिली. मला एकदम जाणवलं आपणसुद्धा आपल्या आजवरच्या आयुष्यात पहिल्यांदाच असं कॅलेंडर लिहीत आहोत. वर्गात ज्यांचे वाढदिवस जानेवारीचे होते, त्यांना तर त्या महिन्याचं लेखन म्हणजे जणू काही वाढदिवस साजरा करण्यासारखंच वाटत होतं. या वयात मुलांच्या वाढदिवसाची गंमतच असते. काहीजणांना वाटतं रोज आपला वाढदिवस, तर काहीजणांना आपला वाढदिवस कधी आहे हे रोज सांगायला आवडतं. एकूण काय तो दिवस त्यांच्यासाठी एखाद्या सणापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. आता तारखा लिहिताना म्हटलं ज्याचा वाढदिवस ज्या तारखेला आहे त्याचं नांव त्या दिवसावर लिहिणार आहे. असं सांगितल्यावर थोडय़ा वेळाने सगळीच मुलं आपापला वाढदिवस जानेवारीतलाच आहे असं सांगू लागली. झाला.. वर्गात हलकल्लोळ झाला. मी शेवटी हजेरीचं रजिस्टर काढलं. म्हटलं, आता याच्यामध्ये तुमचे वाढदिवस लिहिलेले आहेत त्यामुळे मी बरोबर सगळ्यांचे वाढदिवस लिहिणार आहे. वाढदिवस आम्ही वेगळ्या रंगाच्या खडूने लिहिले. त्या तारखेखाली त्या मुलाचे किंवा मुलीचे नाव लिहिले. शनिवार, रविवार आणि महिन्यातील इतर सुट्टय़ा आणखी वेगळ्या रंगाच्या खडूने लिहिले. जानेवारी महिना तय्यार झाला. कॅलेंडरचं एवढं फळाभर पान आम्ही सगळेजण आश्चर्यचकित होऊन बघत होतो. आता एक एक गोष्टींचं निरीक्षण सुरू झालं. शिवानीनं लाल खडूतल्या सुट्टय़ा मोजल्या. मग आता शाळेत किती दिवस यायचं आहे ते मोजलं. दोन्ही गोष्टींची नोंद उरलेल्या जागेत केली. शिवानीनं मला क्ल्यू दिला होता. मी म्हटलं, ‘‘चला, आता जानेवारीतले सोमवार मोजू या.’’ ते मोजून त्याची नोंद केली. अशा प्रकारे सगळेच वार त्या महिन्यात किती वेळा येणार याची नोंद केली. जसे सोमवार-४ वेळा, मंगळवार-४ वेळा, बुधवार – ४ वेळा याप्रमाणे. जे वार ५ वेळा आले, तेव्हा इतर वारांपेक्षा ते जास्त वेळा आले आहेत हे मुलांच्या लक्षात आलं. ते फळाभर पान खरोखरीच खूप छान आणि भव्य दिसत होतं. मग घरचा अभ्यास असायचा तो म्हणजे फळ्यावरचं मोठ्ठं पान घरी जाऊन जसंच्या तसं कागदावर तयार करायचं. रोज एक महिना याप्रमाणे बरोबर शाळेचे बारा दिवस आम्हाला हे लेखन पुरलं. पहिल्या तीन-चार महिन्यांनंतर मात्र मुलं पटापट नोंदी सांगायला लागली. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या सुट्टय़ा, किती दिवस शाळेत यायचे आहे. किती वेळा कुठले वार सगळ्या नोंदी झटपट व्हायला लागल्या. शिवाय वाढदिवसाच्या नोंदींची उत्सुकता होतीच. डिसेंबपर्यंत आमची गाडी आलीसुद्धा. जो महिना फळ्यावर पूर्ण होत होता, तो दुसऱ्या दिवशी मी करून आणत होते. बारा महिन्यांचे लेखन पूर्ण झाल्यावर सगळी पाने दाखवली आणि म्हटलं, ‘‘बघा, एक वर्ष आपलं पूर्ण झालं सुद्धा!’’ आता या एका वर्षांत जानेवारी किती वेळा आला आहे पाहू या. प्रत्येक महिना मोठय़ाने वाचून एकेका मुलाकडे देत गेले. बारा मुले बारा महिने घेऊन उभी होती. आता यांच्यात जानेवारी किती जणांकडे आहे तर एकाकडे, फेब्रुवारी किती जणांकडे आहे तर एकेकाकडेच एक महिना अशा नोंदी फळ्यावर केल्या. त्या पानांतून आम्हाला किती गोष्टी समजण्यास मदत झाली होती. एका आठवडय़ाचे सातच असलेले वार एका महिन्यात मात्र एकापेक्षा जास्त वेळा येतात हे प्रत्येक महिन्यातील वार मोजल्यानं कळलं होतं. तसंच वार जरी सारखे सारखे खूप वेळा येत असले तरी महिने मात्र वर्षांतून एकदाच येतात. आम्हाला हवी असलेली माहिती (आम्हाला सुट्टय़ा कधी आणि किती आहेत) व आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या नोंदी (वाढदिवसाच्या) असलेली अशी ती कॅलेंडरची पानं, जी फक्त आम्हीच करू शकलो असतो, अशी तयार झाली होती. अजून एक फायदा असा की सारखे सारखे वार मोजून वारांची नावे न लक्षात राहणाऱ्या मुलांनाही ती तोंडपाठ झाली होती. आता चित्रं मात्र काढणं बाकी होतं. ते काम मी त्यावर्षी पालकांकडे सोपवलं. फक्त मुलांनी काढलेलीच चित्रं हवीत हे निक्षून सांगितलं. आठवडाभरात मुलांची चित्र आली. आलेल्या चित्रातील बारा चित्रं कॅलेंडरसाठी वापरली आणि उरलेली वर्गात लावली. त्यामुळे सगळ्यांचीच चित्रं वापरली गेली याचं मुलांना समाधान मिळालं. चित्राखाली ज्याने ते काढलं होतं त्याचं नाव लिहिलं. एक सुंदर चित्रांचं, आकर्षक असं आमच्या वर्गाचं कॅलेंडर तयार झालं होतं. त्यावर्षी खरं म्हणजे त्याला लगेच काही नाव मिळालं नाही किंबहुना सुचलंच नाही. पण आम्हाला काहीही फरक पडत नव्हता. कारण त्याचं नाव होतं शेवंती वर्गाचं कॅलेंडर. प्रत्येकजण आला की म्हणायचा बघू ते शेवंती वर्गाचं कॅलेंडर.
पुढच्या वर्षी मात्र सगळ्या वर्गातल्या मुलांना एकत्र घेऊन शाळेचं कॅलेंडर करायचं असं ठरलं तेव्हापासून प्रत्येकाच्या कल्पनेनुसार त्यात दरवर्षी बदल होत गेला. संगणकाच्या वापराने पानं प्रोफेशनली डिझाइन करून येऊ लागली. वर्ष जानेवारी ते डिसेंबर असं न करता जून ते मे असं केलं. ज्या मुलांचं अक्षर छान असतं अशी मुलं आता स्वत:च्या अक्षरात लिहिलेली तारखेची पानं आणायला लागली. सगळ्या वर्गातून, म्हणजे दोनशे मुलांतून ज्यांची चित्रकला छान अशी मुलंच निवडक चित्रं काढून आणू लागली आहेत. एका आजोबांनी त्याला ‘बालनिर्णय’ असं समर्पक नाव दिलं आहे. एकूण काय आता एकदम प्रोफेशनल लेव्हलवर आमचं ‘बालनिर्णय’ तयार होऊ लागलं आहे. पण वर्गात तयार झालेल्या त्या पहिल्यावहिल्या ‘बालनिर्णय’ची गंमत आणि त्याचा झालेला उपयोग मात्र निश्चितच आगळा-वेगळा आणि कायम स्मरणात राहणारा ठरला.
– रती भोसेकर