‘झाड’ प्रकल्पानंतर साधारणत: एका महिन्यानंतरची गोष्ट. वर्गात शिरले नि बघतच राहिले. ‘ते’ लाकडी झाड सगळ्यांनी मिळून मधोमध ठेवलं होतं. त्याच्या भोवती मुलांनी बडबडगीत म्हणत फेर धरला होता. प्रणवने त्या लाकडी झाडाच्या बुंध्याला डोकं टेकून नमस्कार केला. मी कारण विचारलं तर म्हणाला, ‘‘झाड आपल्याला एवढय़ा गोष्टी देतं म्हणून मी पाया पडलो.’’ त्याचं उत्तर आपण दिलेलं ज्ञान ही मुलं पुढे नेणार आहेत, अशी जाणीव करून देणारं होतं. मला गुरुदक्षिणा मिळाली होती..

 

गुरुपौर्णिमेचा दिवस होता. वर्गात शिरल्याबरोबर मुलांची गुलाबाची फुलं द्यायची गडबड सुरू झाली. त्या दिवशी मुलांना गुरुपौर्णिमेनिमित्त गोष्ट सांगताना विचारलं, ‘‘गुरू म्हणजे कोण रे?’’

‘‘बाई, गुरू म्हणजे आई.’’ एक उत्तर आलं.

‘‘एकदम बरोबर. पण का रे?’’ मी विचारलं.

‘‘कारण ती मला फ्रॉक आणते ना, कारण ती अंघोळ घालते, कारण ती भरवते.’’ अशी भरपूर उत्तरं यायला लागली. मग म्हटलं, ‘‘अजून कोणाला गुरू म्हणायचं?’’

‘‘बाई तुम्हाला.’’ उत्तर तयारच होतं.

‘‘मला का गुरू म्हणायचं?’’ मी परत गुगली टाकली. आता जरा मुलं गोंधळली. ‘‘कारण तुम्ही शिकवता ना म्हणून.’’ मुलांनी गप्प न बसता बॅटिंग चालूच ठेवली. ‘‘हं. म्हणजे प्रत्येक जण आपल्याला काहीतरी शिकवतात, देतात ते गुरू असतात.’’ मी सारांश काढला. सगळ्यांना हायसं वाटलं. चला बाईंना गुरू म्हणजे कोण ते कळलं. जो ज्ञान देतो तो गुरू. लहानपणापासून आपल्या मनात गुरू या शब्दाची ही व्याख्या पक्की झाली आहे. रेडिओवर त्या दिवशी सकाळी सकाळीच गाणं लागलं होतं, ‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा’. तेव्हा वाटलं, गुरूंनी दिलेलं ज्ञान शिष्यांमध्ये खोलवर रुजतं आणि जेव्हा ते पुढच्या पिढीपर्यंत पोहचतं, तेव्हा ती गुरूंसाठी खरी गुरुदक्षिणा असते. असं असेल तर मग आपली चारपाच वर्षांची मुलं आपल्याला कधी ‘आपण त्यांना दिलेलं ज्ञान ती पुढे नेणार आहेत.’ अशी जाणीव करून देऊ  शकतील? अशी गुरुदक्षिणा आपल्याला मिळेल? आणि एकदम लक्षात आलं चुकतोय आपण. आपल्याला अशी गुरुदक्षिणा तर एकदा अचानक मिळाली होती.

आमच्या शाळेत, जून महिन्यापासून मोठय़ा शिशूसाठी झाड प्रकल्प सुरू होतो. वेली, झुडूप, झाड आणि वृक्ष अशा झाडांच्या प्रकारांची ओळख, झाडाचे विविध भाग, त्यांचा झाडाला उपयोग आणि झाडांचा माणसाला उपयोग अशा चार गोष्टींवर भर देत आम्ही मुलांना झाडांची माहिती देतो. महिन्याच्या शेवटी आमच्या शाळेची वृक्षदिंडीही झोकात निघते. त्याच्या आधी आदल्या दिवशी एक झाडांचं छोटसं प्रदर्शनही एका वर्गात भरवलं जातं. त्यासाठी पाच वर्गाना पाच विषय दिलेले असतात. झाडाच्या प्रत्येक भागाचा, म्हणजे मूळ, खोड, पानं, फुलं व फळं यांचा काय उपयोग होतो ते सांगणं असा या प्रदर्शनाचा उद्देश असतो. चित्ररूपाने मुलांच्या समोर झाडाच्या प्रत्येक अवयवाचे कार्य मांडलं जातं. उदाहरणार्थ मुळाचे प्रकार, त्याचा झाडाला होणारा उपयोग, त्यांची पाणी शोषून घेण्याची प्रक्रिया, आपल्याला कोणत्या झाडाच्या मुळाचा काय उपयोग होतो या सगळ्याची ओळख ‘मूळ’ हा विषय ज्या वर्गाला असेल त्यांनी चित्ररूपाने सांगायची असते. पानं, फुलं आणि फळांचंही तसंच, त्यांचे प्रकार, कार्य, उपयोग अशी सगळी माहिती दिली जाते. तर झाडापासून आपल्याला काय काय मिळतं याची एकत्रित मांडणी एका वर्गाला करायची असते. हल्ली आम्ही हा प्रकल्प एकाच वर्गात मांडतो पण उपक्रमाच्या पहिल्या वर्षी आम्ही पाचही वर्गात प्रत्येकाच्या विषयानुसार मांडला होता.

माझ्या वर्गासाठी तेव्हा अख्ख्या झाडापासून आपल्याला काय काय मिळतं असा विषय होता. जून महिन्यापासून झाडांविषयी माहितीची भरपूर देवाणघेवाण चालू होती. प्रकल्प मांडणीसाठी मला फक्त झाडापासून आपल्याला काय मिळतं या एकाच गोष्टीवर विचार करायचा होता. प्रकल्प मांडणीला जवळपास महिना दीड महिन्याचा अवधी होता. एरवी फक्त तोंडीच गप्पांतून झाडाचे आपल्याला होणारे फायदे सांगत माझा विषय संपत असे. त्यावर्षी अर्थातच प्रकल्प मांडणी असल्याने प्रत्यक्ष वस्तू घेऊन येण्याचं ठरवलं. प्रत्येक दिवशी पाच ते सहाच गोष्टी दाखवायच्या असं ठरवलं होतं. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गोष्टींपासून सुरुवात केली. माझ्या स्वयंपाक घरातल्याच गोष्टी मी जमा करायला लागले. स्वयंपाकासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला झाडापासूनच मिळते हा जणू मला नव्यानेच शोध लागला होता. पोळीला लागणारे गहू, भाताला लागणारे तांदूळ, भाकरीसाठीची वेगवेगळी धान्यं, कांदे, मुलांच्या आवडीचे बटाटे, भाज्या, तेल, हळद, तिखट, मोहरी, जिरे, विविध मसाल्याचे पदार्थ, चणे, दाणे, साखर, गूळ, सगळी कडधान्यं, वेगवेगळ्या डाळी. मग झाली उपवासाच्या पदार्थाची सुरुवात साबुदाणा, भगर, शिंगाडय़ाचे पीठ, लाडूचा राजगिरा. भाज्यामधे सगळ्या कंदभाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, कोशिंबिरीच्यासाठीचे काकडी, टोमॅटो, टोमॅटो सॉस, लोणची, पापड. यादी संपेचना. पाचसहा गोष्टींऐवजी मी शाळेत रोज चौदा-पंधरा गोष्टी न्यायला लागले. जवळजवळ आठवडाभर मी वस्तू नेत होते आणि मुलं त्या वस्तू हाताळत होती. त्यांच्याही घरात या अशाच वस्तू असतात हे मला उत्साहाने सांगत होती. एखाद्या वस्तूची माहिती दिल्यानंतर आपल्या आई, आजीकडून ती पडताळून बघत होती.

जेवताना लागणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला झाडापासूनच कशी मिळते याची यादी झाली, मग औषधांकडे वळलो. वेगवेगळ्या वनस्पती, त्यांचा उपयोग आणि त्यांच्यापासून तयार होणारी औषधं अशी माहिती जमा केली. फळं, त्यांच्यापासूनचे वेगवेगळे पदार्थ; जाम, सरबत, फुलं आणि त्यांपासून तयार होणारे साबण, शांपू, अत्तरं, मध, कागद, लाकडी फर्निचर, कापूस, कापड, नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाच्या उपयोगाची चित्रं. थोडय़ा दिवसांत माझ्यासकट सगळ्यांच्या मनावर हे पूर्णपणे ठसलं की झाडांशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. आमच्या नकळतच झाडाचं महत्त्व आमच्या मनावर बिंबलं गेलं होतं.

आमच्या वर्गात एक लाकडी झाड होतं, त्याच्या पायाशी आम्ही या सगळ्या वस्तू मांडत असू आणि मांडताना आमचं एक बडबडगीत आम्ही तयार केलं होतं ते म्हणत असू.

झाड आपल्याला काय काय देतं,

पोळी देतं आणि भात देतं,

भाजी देतं आणि कोशिंबीर देतं

सॉस देतं आणि जाम देतं

रोज झाडाच्या पायाशी जमणाऱ्या वस्तूंमध्ये भर पडत होती. तसं आमचं बडबडगीतही मोठ्ठं मोठ्ठं होत होतं. वर्गातलं ते झाड आमचं श्रद्धास्थान झालं होतं. रोज त्याच्यापासून मिळणाऱ्या वस्तू बघून झाल्या की मोजत असू. मग त्या आम्ही एका तक्त्यावर लिहायला घेतल्या. मला आठवतंय, जवळजवळ शंभरावर वस्तूंची यादी आम्ही केली होती. रोजचा आमचा शेवटचा अर्धा तास जमा केलेल्या सगळ्या वस्तू लाकडी झाडाच्या पायाशी मांडण्यात जायचा. झाडापासून आपल्याला मिळणाऱ्या सगळ्या वस्तूंची नावं मुलांना पाठ झाली होती. झाडापासून कोणत्या वस्तू मिळतात आणि कोणत्या मिळत नाहीत याचं वर्गीकरण ती सहजतेनं करायला लागली होती. या सगळ्या आमच्या रोजच्या दिनक्रमात माझ्या मनात कुठेही त्यांच्या मनात झाडाला देवपण निर्माण करून देणं वगैरे असा अजिबात उद्देश नव्हता. किंबहुना कधी गमतीनंही मी त्यांना, ‘‘बघा झाडापासून आपल्याला किती गोष्टी मिळतात. चला झाडाला नमस्कार करा.’’ असं काहीही म्हणत नव्हते. खरं सांगायचं तर मी स्वत: सुद्धा त्यांच्याबरोबर झाड आपल्याला काय काय देतं याचा नव्यानं अनुभव घेत होते. मला वाटतं, चौथीच्या किंवा पाचवीच्या माझ्या वेळच्या भूगोलाच्या पुस्तकात, ‘जंगलाचे फायदे’ असा ‘टिपा द्या’ मध्ये प्रश्न असे. ज्याचं उत्तर मी रट्टा मारून पाठ केलं होतं. त्यात झाडापासून मिळणाऱ्या वस्तूंची यादी होती, पण ती आमच्या यादी इतकी नक्कीच परिपूर्ण नव्हती. ज्या सहजतेनं ही मुलं झाडापासून आपल्याला काय मिळतं हे सांगत होती, त्या वस्तू हाताळत होती, अनुभवत होती, त्या सगळ्याचा परिणाम मुलांच्या मनावर खोलवर झाला आहे याची प्रचीती मात्र मला नंतर आली.

यथावकाश आमचं प्रदर्शन झालं. वर्ग भरून झाडापासून मिळणाऱ्या वस्तू आम्ही सगळ्यांनी जमा केल्या, त्या मांडल्या. दोन महिने सुरू असलेल्या ‘झाड’ प्रकल्पाची सांगता वृक्षदिंडीने झाली. वर्गात पुढचा प्रकल्प ‘पाणी’ सुरू झाला. वर्गातील लाकडाचं झाड आता मागे पडलं. माझ्या दृष्टीनेही तो विषय संपला होता. पण माझ्यासाठी. मुलांसाठी नाही हे अचानक त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं. ‘झाड’ प्रकल्पानंतर साधारणत: एका महिन्यानंतरची गोष्ट. वर्गात शिरले तो आश्चर्य चकित होऊन बघतच राहिले. वर्गातील ते लाकडी झाड सगळ्यांनी मिळून मधोमध ठेवलं होतं. त्याच्या भोवती मुलांनी आमचं बडबडगीत म्हणत फेर धरला होता. माझ्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. मीही न बोलता दारातून त्यांचं काय चाललंय हे बघत होते. नंतर प्रणव नावाच्या मुलाने त्या लाकडी झाडाच्या बुंध्याला डोकं टेकवून नमस्कार केला. त्याच्या कृतीचं अनुकरण बाकीच्यांनी केलं. ते झाड त्यांना देवच वाटत होतं. मी प्रणवकडे गेले. त्याला म्हटलं, ‘‘तुला कोणी रे झाडाला नमस्कार करायला शिकवलं. का केलास त्याला नमस्कार?’’ त्याने सहज सांगितलं, ‘‘कोणी नाही बाई. झाड आपल्याला एवढय़ा गोष्टी देतं म्हणून मी पाया पडलो.’’ त्याचं उत्तर अचंबित करणारं होतं. आपण म्हणतो देव आपल्याला सगळं देतो तसंच झाडसुद्धा करतं, असंच त्याला म्हणायचं होतं का?

हिरवी हिरवी हिरवीगार। चला, झाडे लावू चार।

चला, झाडे लावू चार। उठा, झाडे लावू चार।।

हिरवी हिरवी हिरवीगार। चला, झाडे लावू चार।

झाडे लावू सुंदर छान। त्यांना मानू आपण प्राण।।

देतील छाया थंडगार। होऊ  देबाजीला प्यार।।

हिरवी हिरवी मंदिरे। चला लावू सुंदरें।

पाहून झाडे हिरवीगार। वरून येईल मेघधार।।

साने गुरुजींच्या ‘धडपडणारी मुले’ मधल्या गाण्यातील हिरव्या मंदिरांचं महत्त्व त्याच्यापर्यंत पोहचवण्यात मला यश आलं होतं. किंबहुना हा वारसा पुढे पोचवण्यात मी यशस्वी झाले, असं म्हणण्याचा आत्मविश्वास मुलांच्या कृतीमुळे मला मिळाला. त्यांच्या पुढच्या आयुष्यात नक्कीच ही सगळी मुलं झाडांवर प्रेम करतील आणि वृक्षसंवर्धनाचा वारसा पुढे नेतील याची मला खात्री आहे.

रती भोसेकर    

ratibhosekar@ymail.com

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”

Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…

Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल

heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच

black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…

Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन

Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत