तृणधान्ये. बापरे! नावच किती अवघड आणि समोर पाच-सहा वर्षे वयोगटातील बागडणारी मुले. अनेक वर्षांचा अनुभव होता की कितीही वेळा आणि कसेही समजावून, दाखवून सांगितले तरी ते ऐकण्यात किंवा लक्षात ठेवण्यास त्यांना अजिबात रस नसतो. पण त्यांची माहिती त्यांना करून द्यायला हवी होतीच आणि ती कायमची लक्षात राहावी
म्हणून एक प्रयोग केला आणि मुलं शिकली..
वर्गात शिरले तर रिया आणि श्रीराम एकमेकांशी काहीतरी मोठमोठय़ाने बोलत होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी माझे काम करायला लागले. आजपासून ‘आहार सप्ताह’ सुरू झाला होता. आहार सप्ताहात आम्ही लहान गटाला फळभाज्या, पालेभाज्या यांची ओळख करून देतो. मोठय़ा गटाला तृणधान्ये, डाळी, कडधान्ये यांची ओळख करून देतो आणि आधी शिकलेल्या फळभाज्या, पालेभाज्या यांची उजळणी करून घेतो. सप्ताहात रोज एक तृणधान्य, एक डाळ व एक कडधान्य मुलांकडून घरून मागवले जाते. आज तृणधान्यांत बाजरी आणायची होती. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर माझा स्वत:चाच ज्वारी-बाजरी ओळखताना जरा गोंधळ होतो. त्यामुळे मी माझ्या स्वत:च्या सोयीसाठी शाळेत येतानाच वाण्याकडून बाजरी आणली होती.
रिया आणि श्रीरामची झकाझकी अजून चालूच होती. म्हणून जरा कान देऊन ऐकले. ‘‘अगं, आज बाजरी आणायला सांगितली आहे बाईंनी. ही बाजरी नाही. ज्वारी आणली आहेस तू.’’ श्रीराम म्हणाला. रियाला बहुतेक तो आपल्या आईचा अपमान वाटला असावा, कारण ती कसे चुकीचे देईल? रिया म्हणाली, ‘‘चल, ही बाजरीच आहे, आईने दिली आहे.’’ ‘आईने’ या शब्दावर विशेष जोर दिला होता. दोघेही हार मानायला तयार नव्हते. एकूण समस्या काय आहे हे माझ्या लक्षात आले. रियाच्या हातात तिने आणलेली छोटी प्लॅस्टिकची पिशवी होती आणि आज बाजरी आणायची होती, तर श्रीरामच्या मते ती ज्वारी घेऊन आली होती!
आता ती दोघे माझ्या दिशेने येऊ लागली. कारण आपल्या आईपाठोपाठ, बाईंना सगळे माहीत; यावर या वयोगटातील मंडळींची नितांत श्रद्धा असते. माझ्या पोटात गोळा उठला. त्यांना काय माहीत आपल्या बाईही ज्वारी-बाजरीमध्ये गडबड करतात ते! तेव्हढय़ात आठवले, अरे, आपण तर वाण्याकडूनच बाजरी आणली आहे. मी लगेच माझी पुडी बाहेर काढली. त्यांच्या ज्वारी-बाजरी गोंधळाचा न्यायनिवाडा केला आणि स्वत:ची फजिती टाळली.
तृणधान्ये. बापरे! नावच किती अवघड आणि समोर पाच-सहा वर्षे वयोगटातील बागडणारी मुले. अनेक वर्षांचा अनुभव होता की कितीही वेळा आणि कसेही समजावून, दाखवून सांगितले की, ही ज्वारी, ही बाजरी, हे गहू, हे तांदूळ, ही नाचणी. या सर्वाना तृणधान्ये म्हणतात. रोज आपण पोळी खातो, भात खातो, भाकरी खातो ते सर्व तृणधान्यांपासून केलेले असते. पण ते ऐकण्यात किंवा लक्षात ठेवण्यास त्यांना अजिबात रस नसतो. त्यांचे जाऊ द्या ती तर लहान, माझा स्वत:चाही ज्वारी-बाजरीत गोंधळ आणि त्यामुळे मीही कधीकधी पटकन् विषय संपवून टाकत असे. काहीतरी ठोस उपाय करणे गरजेचे होते.
मग पुढचा सगळा आठवडा फक्त तृणधान्यांवर लक्ष केंद्रित करायचे असे ठरवले. म्हणजे नेमके काय करायचे हे मात्र मुद्दामच माझ्या दोस्तांना सांगितले नाही. सुरुवात गव्हापासून केली. दुसऱ्या दिवशी वर्गात पोळपाट लाटणे, तवा, गव्हाचे पीठ, अख्खे गहू व छोटी गॅसची शेगडी असे घेऊन मी प्रवेश केला. वर्गात नेहमीप्रमाणे गडबड चालू होती, ती एकदम शांत झाली. आईच्या रोजच्या वापरातील वस्तू बाई शाळेत का घेऊन आल्या याचे कोडे सर्वाच्या चेहऱ्यावर होते. बरं, एरवी एखादा प्रयोग (त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर गंमत) करताना, त्याविषयी मी भरपूर गप्पा मारलेल्या असायच्या आणि काय करायचे आहे याची त्यांना कल्पनाही दिलेली असे. पण या वेळेस मुद्दामच तसं काहीच केलं नव्हतं. अर्थातच त्यामुळे विविध तर्काना सुरुवात झाली.
‘अरे, चपाती करायची आहे वाटतंय’, एका हुशार डोक्याने, ओमने, ओळखलं. ‘‘अरे ओम, तू कसं काय ओळखलंस,’’ मी कुतूहल दाखवत म्हटलं. ओमने थोडा विचार केला आणि म्हणाला ‘‘बाई, मी आपले आपलेच ओळखले,’’ स्वयंअनुभवाने मुलांचे स्वयंशिक्षण होते हे बालशिक्षणातील तत्त्व. बालशिक्षणातील या तत्त्वाचा वापर केला की न बोलता मुलांना खूप काही माहीत असतं हे जाणवतं. सर्वाना शांत करून आधी मी काय काय घेऊन आले आहे याची ओळख विचारली. पोळपाट, लाटणे, तवा, गहू, गव्हाचे पीठ अशी पटापट उत्तरं येत होती. मुलांचे स्वयंअवलोकन कामास येत होतं आणि माझ्यातल्या शिक्षिकेला कळत होतं की मी सांगितल्याशिवाय यांना कळणार नाही, हा माझा मोठा भ्रम आहे.
स्वत:चा पराभव आनंदाने मान्य करून म्हटलं, ‘‘ओमने अगदी बरोबर ओळखलं आहे. आज आपल्याला वर्गात पोळी करून खायची आहे.’’ एकदम हलचल झाली. वर्गात पोळी करायची आणि खायची. मुलांनाच काय पण मलापण खूप मजा वाटत होती. माझ्या प्रयोगानुसार पुढचे चार दिवस वेगवेगळ्या भाकऱ्याही करायच्या होत्या, पण पुढचा प्लान काय तो मलाच माहीत होता. तेवढय़ात आमच्या मावशी परात आणि पाणी घेऊन आल्या. सगळ्यांना गोलाकार बसवल्यावर पोळी करायला सुरुवात केली. प्रथम परातीत नुसतेच अख्खे गहू घेतले आणि विचारलं की हे भिजवून करू या का पोळी करायला?
‘नाही, नाही’ एकच गोंधळ झाला. ‘त्याची कशी पोळी होईल’, सगळ्यांचे एकमत झाले. ‘बाई त्यासाठी गव्हाचे पीठ करावे लागेल. तेच भिजवावे लागेल.’ एकाची निरीक्षणशक्ती कामास आली. मग गव्हापासून तयार झालेले पीठ म्हणजे कणीक दाखवली. ते कसे तयार होते, कुठे व कसे मिळते याबद्दल गप्पा झाल्या. कणीक परातीत काढून ठेवली. या गव्हाचे असे पीठ तयार होते आणि ते आपल्याला उपयोगी पडेल याची सर्वाना जाणीव झाली. नंतर कणीक भिजवली आणि भिजवलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे प्रत्येकाच्या हातात दिले. सर्वानी आपापले गोळे मनसोक्त मळले. त्या मळलेल्या कणकेच्या छान गरमागरम दोन पोळ्या वर्गात तयार केल्या. तयार झालेल्या पोळीचा एक तुकडा बाजूला ठेवून बाकीच्या पोळीचा सगळ्यांनी मिळून एक एक छोटा तुकडा वाटून खाल्ला. मग एक मोठा चार्ट पेपर घेतला. तो होता आमच्या वर्गाचा तृणधान्य चार्ट. त्याचे पाच भाग केले होते-तृणधान्य व त्याचा रंग, त्याचे पीठ व पिठाचा रंग, त्याचा पदार्थ व त्याचा रंग, त्याची चव, ही गंमत आणणाऱ्याचे नाव. जसे – (सोबतचा तक्ता पहावा)
पहिल्या दिवशीच्या नोंदी याप्रमाणे तयार झाल्या. प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या पिशव्यांत गहू, गव्हाचे पीठ व पोळीचा बाजूला ठेवलेला तुकडा ठेवला व त्या त्या रकान्यात तो स्टॅपलरने लावून टाकला. पहिल्या दिवशीचे आमचे काम पूर्ण झाले. एकत्रितपणे तक्त्याचे वाचन झाले.
शिशुवर्गात पालकांचा सहभाग जास्तीतजास्त घेणे, हे त्या मुलांच्या भावनिक वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. आपले आई-बाबा आपल्या वर्गशिक्षिकेच्या संपर्कात असतात, त्यांच्याशी आपल्या बाईंचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ही जाणीव त्यांना शाळेबद्दल आत्मीयता निर्माण करते. आपण आणि आपले पालक आपल्या वर्गासाठी काहीतरी आणतो किंवा उपयोगी पडत आहोत याचा एक वेगळाच आनंद आणि अभिमान या लहानग्यांना वाटत असतो. त्यामुळे रोज मुलांना आणण्यास व सोडण्यास येणाऱ्या पालकांना मदत करण्यास सांगितले. चौघीजणींना, त्यांच्या मुलांबरोबर दुसऱ्या दिवशीपासून चार दिवस वेगवेगळी तृणधान्ये व त्यांची पिठे आणण्यास सांगितली.
दुसऱ्या दिवशी सिद्धेश ज्वारी आणि ज्वारीचे पीठ घेऊन ऐटीत आला. आल्याबरोबर मोठय़ा हुशारीने, ‘‘बाई, मी पीठ आणलंय!’’ हे सांगूनच जागेवर बसला. आदल्या दिवशीप्रमाणेच गोलाकार बसवून भाकरीचा छान कार्यक्रम झाला. आज पोळपाट-लाटणे लागले नाही तर थापून भाकरी केली गेली याची नोंद घेतली गेली. भाकरी भाजून झाल्यावर सगळ्यांनी परत तुकडा तुकडा वाटून खाल्ली आणि एक तुकडा चार्टसाठी ठेवला. पुढचे चार दिवस चार तृणधान्ये व त्यांच्या चार प्रकारच्या भाकऱ्या वर्गात करून खाल्ल्या आणि तक्त्यात त्याच्या नोंदी करत गेलो. जो मुलगा किंवा मुलगी तृणधान्ये आणि त्याचे पीठ आणत होते त्यांचीही नावे तक्त्यात झळकत होती. त्यामुळे रोज आपले वर्गात लागलेले नाव बघण्याची व इतरांना दाखवण्याची उत्सुकताही त्यांना वाटत होती. पाच दिवसांनी एक परिपूर्ण असा मोठा तृणधान्यांचा तक्ता तयार झाला.
या तक्त्यामुळे प्रत्येक तृणधान्य त्याचा रंग, त्याचे पीठ झाले की त्या पिठाचा रंग, त्या पिठाचा पदार्थ केला की त्याचा रंग, त्याची चव जी फक्त मुद्दामहून आवडणारी व न आवडणारी अशीच होती, एवढय़ा सगळ्या गोष्टींचा ऊहापोह मुलांबरोबर माझाही झाला. बरं तो तक्ता सतत डोळ्यासमोर असल्याने त्याची आपोआप आमची सहज उजळणीही होत होती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमामुळे
माझाही ज्वारी आणि बाजरीचा गोंधळ बऱ्यापैकी दूर झाला आहे.
– रती भोसेकर