बोलणं आणि ऐकणं या दोन्ही क्रिया एकाच माध्यमातून होणं ही मुलांच्या भाषाविकासासाठी महत्त्वाची गोष्ट असते. मुलांना बोलतं करायचं असेल तर वर्गात बालकवितांचा मुक्त हस्ते वापर केला पाहिजे. उदा. सरिता पदकी यांच्या ‘गुटर्रगूं गुटर्रगूं’ कवितेचं उदाहरण द्यायचं तर- ‘कावळ्या कावळ्या का का का/ मावशीकडे जा जा जा/ मावशीला सांग ये ये ये/ बाळाला खाऊ दे, दे, दे.. मुलांच्या भाषाविकासासाठी साहाय्यभूत ठरू शकते. उद्याच्या जागतिक मातृभाषा दिनानिमित्त खास लेख.
मराठी माध्यमाच्या शाळेतल्या शिशू वर्गातल्या मुलांना एक मोठाच फायदा असतो. आपल्या वर्गशिक्षिकेशी त्यांना त्यांच्या स्वत:च्या भाषेत बोलता येतं. तिला काहीबाही सांगता येतं आणि ती काय म्हणते आहे ते आपल्या परीने समजून घेता येतं. परस्पर संवादामध्ये परक्या भाषेचा अडथळा नसतो. सांगता येत नाही, समजत नाही म्हणून येणारा न्यूनगंड नसतो. मुक्त मोकळ्या संवादाला वाव असतो. यामुळेच मुलं आणि त्यांच्या बाई यांचं अगदी गूळपीठ जमू शकतं आणि परिणामी दोघांचाही विकास होतो..
बोलणं आणि ऐकणं या दोन्ही क्रिया एकाच माध्यमातून होणं ही मुलांच्या भाषाविकासासाठी महत्त्वाची गोष्ट असते. इतर भाषेतून घेतलेल्या शिक्षणापेक्षा मातृभाषेतून झालेलं शिक्षण मुलांच्या भाषाविकासाला खूप साहाय्य करतं याबद्दल तज्ज्ञांमधेही दुमत नाही. मुलांचा भाषाविकास साध्य करताना चार गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो- श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन. त्यातले श्रवणकौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना छोटय़ा छोटय़ा दोन किंवा तीन शब्दांत सूचना देणं, छोटय़ा गोष्टी सांगणं किंवा अशा प्रकारच्या बऱ्याच क्रियाकृती करवून घेता येतात. त्यातूनच पुढे तीन ते चार ओळींच्या बडबड गीतांपासून, साखळी गीतांपर्यंत प्रवास करायचा असतो. संभाषणकौशल्य वाढविण्यासाठी मुलांना गोष्ट स्वत:च्या शब्दात सांगता येणं, प्रसंगवर्णन करता येणं, वेगवेगळी गाणी म्हणून दाखवता येणं अशा अनेक गोष्टी करावयाच्या असतात. कुठल्याही मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांचे श्रवण आणि संभाषणकौशल्य विकसित करण्यासाठी भरपूर वाव असतो. खूपसे सण साजरे होत असतात, त्यानिमित्ताने अनेक गाणी आणि गोष्टी यांची रेलचेल असते. प्रत्येक सण आणि उपक्रम अनुरूप गाण्यांनी दणाणून जातो.
मराठी माध्यमातल्या मुलांना आता इतकी वर्षे शिकवण्याच्या अनुभवामुळे मला असं वाटतं की त्यांचा भाषाविकास साध्य करणं आम्हाला अधिक सोपं असतं. त्यातून तो विकास आणखी प्रभावीपणे साध्य करायचा असेल, मुलांना बोलतं करायचं असेल तर वर्गात बालकवितांचा मुक्त हस्ते वापर केला पाहिजे. मराठीतल्या बालकवितांच्या खजिन्याचा वापर केला तर अलिबाबाची गुहाच उघडली जाते. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत, सरिता पदकी यांच्या बालकवितांचा आधार घेतला तर बालवाडीतील भाषा, म्हणजे ग ग रे गणपतीचा एव्हढीच मर्यादित न राहता त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने वाढते.
इंदिरा संतांच्या ‘अंगतपंगत’मध्ये बाईंच्या बालगीतांविषयी कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे की, ‘इंदिराबाईंच्या कविता मुलांना आपल्यासाठी मुद्दाम लिहिलेली नव्हे, तर आपल्याच मनात उद्भवलेली कविता आहे असं वाटेल’. ‘पिशी मावशी’, ‘सशाचे कान’, ‘परीचा पडला दगडावर पाय’, ‘खुर्ची म्हणाली टेबलाला’.. मराठी बालकवितांचं दालन इतकं समृद्ध आहे की कुसुमग्रजांचं म्हणणं या प्रत्येक कवितेच्या बाबतीत खरं आहे. मुलांना अनुभवताना मला असं वाटायला लागलं की, मुलांच्या मनात उद्भवणाऱ्या या कविता दोहोंमधला दुवा बनून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायलाच हव्यात. शिशुवर्गात बालकवितांची ओळख करून देण्यापूर्वी मी उन्हाळी शिबिरात आठ ते १२ वयोगटांतील मुलांसाठी म्हणजे जरा मोठय़ा मुलांसाठी बालकविता पाठ करण्याचा कार्यक्रम आखत असे. मला जाणवायचं की शिबिरातली मुलं केव्हाही कविता म्हणायला सांगितल्या की, त्याच त्याच इंग्रजी कविता म्हणून दाखवत. मनात विचार येई, ‘गवतफुला रे गवतफुला’, ‘लाडकी बाहुली होती माझी एक’, ‘अक्कूबक्कूची दिवाळी’; या कविता ही मुलं म्हणू शकत नाहीत ही एक प्रकारे आपली मोठय़ांचीच हार आहे. प्रत्येक वेळी एक काहीशी अपराधीपणाची भावना येई. त्या कविता, त्यातील भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविणं ही सामाजिक जबाबदारी आहे आणि एक बालशिक्षिका म्हणून ती पार पाडायलाच हवी असं माझ्या मनानं घेतलं. शिबीर पंधरा दिवसांचं असे पण त्यात किमान दोन-तीन तरी मराठी बालकविता मुलांकडून पाठ करवून घ्यायच्याच असा नेम मी सुरू केला.
पहिल्याच वर्षी विंदांची ‘पिशीमावशी आणि तिची भुतावळ’मधील ‘किर्र रात्री..’ कविता पाठ करवून घेतली तर लगेचच दुसऱ्या दिवशी शिबिरातल्या एका मुलाची आई आली आणि तक्रारीच्या सुरात म्हणाली, ‘तुम्ही ती काय भुताची गाणी वगैरे घेता, त्यामुळे मुले घाबरतात.’ मी जरा संभ्रमात पडले पण मग लक्षात आलं की, त्या कवितेतली गंमत या बाईंनाच समजलेली नाही, आपण आपला परिपाठ चालू ठेवावा. मी कवितांचं पाठांतर चालूच ठेवलं. नंतर ‘किर्र रात्री..’ मी वर्गात घ्यायला लागले. प्रत्येक वर्षी वर्गातली ‘पिशीमावशी’ मी आणि समोर बसलेली मुलं, माझी भुतावळ. मग एक एक पात्र निवडीला सुरुवात होत असे. मस्तीखोर मुलगा असेल तर तो वर्गातला आग्या वेताळ, उंच मुलगा, महासमंध; जो वर्गात नखे खात असेल, तो आमचा थातूमातू, ‘हे भूत आहे मूत्रे’, ही तर सगळ्यांची आवडीची ओळ. दरवर्षी सगळा वर्ग त्या ओळीला खदखदून हसत असे. पोथी वाचन तर एका सुरात छान होत असे. तेव्हा तर त्या कवितांना चालीही लावलेल्या नव्हत्या, पण आमच्या आमच्या चालीत आणि आमच्या सुरात, वर्गात काव्यवाचन चालू असे. आमच्या शाळेतल्या मुलांचा बराचसा पालकवर्ग हा भाजी विकणारे, घरकाम करणारे किंवा शारीरिक श्रमांची कामं करणारे असल्याने त्या मुलांना हे सगळं फार वेगळंच ऐकत असल्यासारखं वाटे, तर पांढरपेशा जागरूक पालकांच्या मुलांना या कविता थोडय़ाफार तरी माहीत असत. राहुल नावाचा एक मस्तीखोर मुलगा वर्गात होता. त्याचे बाबा व्यसनाधीन, आई जेमतेम वीस-बावीस वर्षांची, सतत गांगरलेली. त्या वर्षीच्या भुतावळीमध्ये तो आग्या वेताळ होता. कवितेतील आग्या वेताळचे कडवे चालू झाले की, राहुल डोक्यावर जाळ असल्याचा हावभाव करी आणि बाकीची भुतं त्याच्या डोक्यावर कढई धरून स्वयंपाक केल्यासारखं करत. त्याच्या डोक्यावर कढई धरल्यासारखे करायला खरंच सगळ्यांची दाटी होई आणि राहुल त्यामुळे खूपच खूष होत असे. त्याच्या एरवीच्या खिन्न आयुष्याला या कवितेमुळे उजळपणा येई. विंदांची भुतावळ जेव्हा जेव्हा मी राहुलकडून हावभावासह ऐकत असे तेव्हा मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं होई.
हे मात्र खरंच की कवितांची निवड आपल्याला डोळसपणाने करावी लागते. लहान शिशुच्या वर्गात शरीराची स्वच्छता हा पाठ घेताना, बाहुलीची आंघोळ करताना सरिता पदकी यांच्या ‘गुटर्रगूं गुटर्रगूं’मधले अंघोळीचे स्तोत्र- ‘ओम् अंघोळ कराय नम:, कपडे काढाय नम:..’ म्हटलं की एका दिवसात सगळ्यांचं तोंडपाठ होतं. त्यानंतर दरवर्षी आमच्या स्वच्छतेच्या पाठासाठी ती बालकविता एकदम हिट होत असे. वर्षांच्या सुरुवातीला सोप्या सोप्या जसं ‘गुटर्रगूं गुटर्रगूं’मधलंच उदाहरण द्यायचं तर- ‘कावळ्या कावळ्या का का का/ मावशीकडे जा जा जा/ मावशीला सांग ये ये ये/ बाळाला खाऊ दे, दे, दे/ बाळाचा पापा घे, घे, घे/ बाळाला भूर ने ने ने/’ अशा कविता निवडाव्या लागतात आणि विविध संकल्पना परिचयाशी त्यांचा मेळ घालावा लागतो. जसा या कवितेतून एकच शब्द परत परत उच्चारला गेला की कशी गंमत येते, शब्द किंवा अक्षराचा गमतशीर वापर कसा होऊ शकतो, हे त्यांना कळू शकतं.
प्राणी ओळख घेताना, सरिता पदकी यांचीच ‘ओळखा कोण’ –
‘उंचाडी मान, फत्ताडे पाय,
वाकडी पाठ, डुगुडुगु जाय,
तुडवित जातो वाळवंट, कोण ते सांगा – उंट’
या कवितेचा वापर केला तर ‘कोडं घालणं’ या अजून एका भाषाविकासाच्या टप्प्यावर मुलांना आपण नेऊ शकतो. अशा प्रकारची कोडी सोडविण्याचा त्यांना सराव होतो, यात भाषिक गंमत तर आहेच पण विचारांनाही चालना आहे. शांता शेळक्यांच्या ‘वाऱ्याचा रंग’मधली पहिली कविता ‘तू आणि मी’, गरिबी आणि श्रीमंतीतील फरक सहजपणे मुलांना सांगून जाते आणि गरीब असण्यात काहीही कमीपणा नाही हेही जाणवून देते. जी भावनिक वाढ साधणं एरवी आपल्याला सहज शक्य नाही ती या कवितेनं आपल्यासाठी एकदम सोपी केली आहे. इंदिरा संतांच्या अक्कू बक्कू लहान असून किती समंजस. मोठय़ा शिशुत अर्थासहित ही कविता दिवाळीच्या आधी सांगितली की, मस्ती करणारी मुलंही शांतपणे ऐकतात हे पाहून मलाच उगीच भरून येई. यातून अशीही दिवाळी असते आणि हट्टीपणा करायचा नसतो ही भावनिक आणि मानसिक जडणघडण नक्कीच होत असते.
कदाचित मी बालकविता वर्गात घेण्याला एक वैयक्तिक कारणही असेल असं मला आता वाटतं. माझे वडील, रवींद्र दुर्वे हे बालकविता लिहीत असत. त्यांच्या सगळ्या कविता मला लहानपणापासून पाठ होत्या. त्यांच्याचमुळे विंदांच्या, पाडगावकरांच्या, शांता शेळकेंच्या किती तरी बालकविता तोंडपाठ होत्या. किंबहुना त्या बालवयात सर्व कविता माझ्या वडिलांच्याच आहेत असं वाटायचं. नंतर जरी त्या त्या कवींची नावं कळली तरी त्या कवितांशी असलेलं माझं नातं काही बदललं नाही. अलीकडे, पाडगावकर गेल्यावर परत एकदा प्रकर्षांनं जाणवलं की, बालवाडी वयापासून बालकवितांचा भाषासमृद्धीसाठी वापर करणं हीच त्या थोर व्यक्तींना खऱ्या अर्थाने आदरांजली असेल. भाषा दिनाच्या निमित्ताने आजचा हा मुलांबरोबर आपलाही भाषाविकास.
ratibhosekar@ymail.com