रंग ओळखीच्या उद्देशाने साजरा केलेल्या रंगसप्ताहामुळे मुलं नुसतेच रंग ओळखायला शिकली नाहीत तर त्या त्या रंगाच्या वस्तूंची नावं सांगायला लागली, वाचायला लागली. वस्तू मोजायला लागली. त्या त्या रंगांची गाणी म्हणायला लागली, गोष्टी सांगायला लागली. त्यामुळे त्यांच्यासाठी त्या त्या रंगाची ओळख आता कायमसाठी पक्की झाली होती. रंगसप्ताहाची भूमिका आणि प्रत्यक्ष अनुभव सांगणाऱ्या लेखाचा हा भाग पहिला.

‘‘बाई, उद्या कोणता रंग आहे हो?’’ एक तरुण आई उत्साहानं मला विचारत होती. मी रंगाचं नाव सांगितलं. तेवढय़ात आयांचा एक घोळका आला, काही आजी-आजोबा त्यात अंग चोरून उभे होते, रंगाचं नाव कळल्याबरोबर मुलांइतकाच गलका त्या घोळक्यात सुरू झाला. मला स्वत:लाच गंमत वाटली, मी वळले आणि कामाला लागले.

खरं तर रंगसप्ताह अनेक पूर्व प्राथमिक शाळांमधून साजरा होत असतो. आम्ही ही कल्पना दुसरीकडून उचलली आहे, मात्र तिला आमचं असं खास रूप दिलं आहे. मी शाळेत रुजू झाले त्या वर्षीची गंमत. तेव्हा ग्राममंगलच्या बालवाडी शिक्षकांकरिता असलेल्या एक-एक दिवसाच्या विविध विषयांच्या कार्यशाळा करण्यासाठी दोन-तीन वेळा गेले होते. तेव्हा तिथे रंगसप्ताहाची कल्पना कळली आणि भावली. एका रंगाचा एक दिवस ठरवून सगळ्या मुलांनी त्याच रंगाचे कपडे घालून आणि त्या रंगाची वस्तू बरोबर घेऊन शाळेत यायचं, अशी ती रंग ओळखीची कल्पना होती, एवढंच ढोबळपणे कळलं होतं. नंतर वर्गात मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती करायच्या आणि त्यासाठी पालकांबरोबर नियोजन काय करायचं याची काहीही माहिती नव्हती. किंबहुना अशा गोष्टीसाठी आपलं स्वत:चं आणि पालकांबरोबरचं नियोजन वगैरे गरजेचं असतं याचीही माहिती नव्हती. पण आपल्या वर्गातही रंग ओळखीसाठी रंगसप्ताह साजरा करायचा असं मात्र मनात पक्कं केलं होतं. माझं ते पहिलंच वर्ष असल्यामुळे मुलांशी त्या विषयाच्या गप्पा, पालकांशी आधी संवाद या सर्व गोष्टी केल्याच नव्हत्या हे आता कळतंय. मला आठवतंय की तेव्हा मी रोज पालकांना दुसऱ्या दिवशी कोणत्या रंगाची ओळख होणार आहे हे सांगत होते आणि आठवडाभर रोज आमच्यात वर उल्लेख केलेला संवाद होत असे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

रंगसप्ताह सुरू होण्याच्या आदल्या शुक्रवारी मात्र मी पालकांना पुढच्या आठवडय़ात वर्गात रंगओळखीसाठी रंगसप्ताह साजरा होणार आहे हे सांगितलं होतं. ‘‘रोज मी सांगीन त्या रंगाचे कपडे व त्याच रंगाची एखादी घरातील वस्तू शाळेत आणायची. सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे आणि पांढऱ्या रंगाची घरातील कोणतीही वस्तू घेऊन शाळेत मुलांना पाठवा,’’ अशा स्वरूपाची सूचना केली. आमच्याकडे रंगीबेरंगी कपडे हाच आमचा गणवेश असल्याने मुलांना त्या त्या रंगाचे कपडे घालणं सोपं होणार होतं. ‘‘मात्र समजा त्या रंगाचे घरात कपडे नसले तर मुद्दाम विकत आणायचे नाहीत.’’ हे मात्र बजावून सांगितलं होतं.

झालं, सोमवारपासून आमचा रंगसप्ताह सुरू झाला. वर्गात बहुतेक सगळेजण आणि मी स्वत: असे आम्ही छान पांढरे कपडे घातले होते. प्रत्येकाने एक पांढऱ्या रंगाची वस्तू आणली होती. मी पांढऱ्या रंगाच्या चित्रांचा एक चार्ट तयार करून आणला होता. वर्गात गेल्यावर तो चार्ट फळ्याखाली लावला आणि मुलांना त्याच्या समोर त्यांनी आणलेल्या वस्तू ठेवायला सांगितल्या. सगळा वर्ग पांढराशुभ्र दिसत होता. आता मला आणि मुलांना जाणवायला लागलं की आपण सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घातले आहेत. आपल्या समोर वस्तूही त्याच रंगाच्या आहेत आणि खरोखरीच त्याची खूप गंमत त्यांना आणि मलाही वाटायला लागली. मुलांना हेही कळलं की या रंगाला आपल्या बाई पांढरा रंग म्हणत आहेत. म्हणजे हा रंग पांढरा, अशी पांढऱ्या रंगाची ओळख न सांगताच पांढरा रंग त्यांच्या आणि माझ्यात झिरपायला लागला. खरं सांगायचं तर हा सप्ताह चालू करताना त्यातून मुलं रंग ओळख शिकणार असं मला वाटत होतं. पण हळूहळू जाणवायला लागलं की याचे तर अनेक फायदे होत आहेत आणि होणार आहेत. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं ही मला बालशिक्षिका म्हणून घडवणारी खूप मोठी प्रक्रिया होत होती. मग मात्र आम्ही सगळे त्या त्या रंगात अगदी न्हाऊन निघालो. सर्वात आधी पांढऱ्या रंगांच्या चित्रांच्या चार्ट समोरच्या वस्तू सगळ्यांना दाखवून कोण कोण काय काय पांढरं घेऊन आलंय याची माहिती करून घेतली. गंधारनं पांढरा ससू आणला होता. मग मी त्या पांढऱ्या ससूची गोष्ट सांगितली. पांढऱ्या ससुल्याचं गाणंही सगळ्यांनी ओरडून ओरडून म्हटलं, पांढऱ्या चांदोबाची गाणी म्हटली. मग एक एक त्रिकोणी कागद मुलांना दिला आणि तो पांढऱ्या रंगानी रंगवला. मावशींनी त्या कागदांच्या पताका केल्या आणि आमच्या वर्गात त्या दिवसाच्या पताका लागल्या. आता आमचं वर्गातलं काम झालं होतं, ‘‘आता तो रंग बाहेर कुठे सापडतोय हे बघायचं का?’’ असं मी मुलांना विचारलं. वर्गाच्या बाहेर जायचं म्हटल्यावर सगळी मुलं एका पायावर तयार होतीच. त्यांना थांबवत म्हटलं, ‘‘आपण आज जो रंग घातला आहे तो पांढरा रंग, बाहेर कुठे कुठे दिसतोय ते शोधायचं आहे व त्या वस्तू माझ्याकडे ही जी परडी आहे त्यात ठेवायच्या आहेत.’’ आम्ही सगळे ‘पांढरे’ शाळेच्या शेडमध्ये आलो आणि आमच्यासारखंच काय काय पांढरं आहे हे शोधू लागलो. बराच वेळ कोणाला काही सापडेना. खूप वेळाने मंदारला एक छोटासा पांढरा दगड मिळाला. त्याला एकदम ऐवज सापडल्याचा आनंद झाला. दगड परडीत जमा झाला. मग परत बराच वेळ काही मिळेना. तेवढय़ात एकाला तगरीची फुलं दिसली. आमची सगळ्या पांढऱ्यांची पलटण पांढरी फुलं घ्यायला गेली. परडीत पांढरं फूल जमा झालं. तेवढय़ात दीपेशला पांढरा खडू मिळाला. पांढऱ्या रंगाच्या वस्तू शोधण्यासाठी सगळ्यांची एकच गडबड उडाली होती. अस्मिताला पांढरं कबुतर दिसलं, पण ते काही परडीत टाकणं शक्य नाही हे सगळ्यांनी मान्य केलं. जेमतेम तीन वस्तू घेऊन आमचा पांढरा घोळका (तेव्हा आम्ही नेहमी घोळक्यानेच फिरायचो. एका रांगेत चालणे वगैरे गोष्टी आम्हाला झेपत नव्हत्या.) वर्गात परत आला. परडीतल्या जमा केलेल्या वस्तू परत एकदा गोलात बसून बघितल्या. मग आमच्या पांढऱ्या चित्रांच्या चार्ट पेपरवर त्या वस्तू चिकटवल्या आणि वरती त्या रंगाचे नाव मोठय़ा अक्षरात लिहिलं ‘पांढरा’.

आमचा रोजचा दिवस असा फक्त त्या रंगाचाच होत गेला. त्या रंगाचे कपडे, त्या रंगाच्या वस्तू, त्या रंगाची मी चार्टवर काढलेली चित्रं, त्या रंगाने वर्गात कागद रंगवून त्यांच्या पताका लावणं, त्या रंगाची एखादी गोष्ट किंवा गाणं जसं लाल रंगाचं ‘लाला टांगेवाला’, निळ्या रंगाचं ‘निळ्या निळ्या आभाळात चला जाऊ उडत’ आणि निळ्या कोल्ह्य़ाची गोष्ट, पिवळ्या रंगासाठी पिवळ्या बेडकाची गोष्ट तर हिरव्या रंगाच्या दिवशी हिरव्या टोळाची गोष्ट आणि सगळ्यात शेवटी आवारात फेरफटका मारून त्या दिवशीच्या रंगाच्या काय काय गोष्टी सापडतात त्या शोधून परडीत जमा करायच्या. जमा झालेल्या वस्तू आमच्या त्या रंगाच्या चार्टवर लावायच्या. आठवडा कसा संपला ते आम्हाला कळलंसुद्धा नाही. रंगसप्ताहाची उजळणी म्हणून तयार झालेले सहा चार्ट, जे वर्गात लावले होते, त्यांचं वाचन सुरू झालं. जमवलेल्या वस्तूंची आणि चित्रातल्या वस्तूंची नावं मुलांसमोर चार्टवर लिहिली.

साइट रीडिंगनी मुलं त्या रंगाच्या त्या वस्तूंची नावं पण वाचायला लागली. थोडय़ा दिवसांनी म्हटलं, ‘चला, आपल्याला कोणत्या रंगाच्या वस्तू सगळ्यात जास्त मिळाल्या आहेत ते बघू या.’ प्रत्येक रंगाच्या वस्तू मोजल्या तर लक्षात आलं की काळ्या रंगाच्या वस्तू सगळ्यात जास्त होत्या, त्यानंतर लाल, हिरव्या, पिवळ्या, निळ्या वस्तू मिळाल्या होत्या तर पांढऱ्या रंगाच्या सगळ्यात कमी.
म्हणजे रंग ओळखीच्या उद्देशाने साजरा केलेल्या रंगसप्ताहामुळे मुलं नुसतेच रंग ओळखायला शिकली नाहीत तर त्या त्या रंगाच्या वस्तूंची नावं सांगायला लागली, वाचायला लागली. कोणत्या रंगाच्या वस्तू खूप आणि पटकन् सापडतात आणि कोणत्या रंगाच्या वस्तू सापडायला कठीण जातं हे सांगू लागली. वस्तू मोजायला लागली. त्या त्या रंगांची गाणी म्हणायला लागली, गोष्टी सांगायला लागली. त्यांनी रंगाचे कागद रंगवून वर्गासाठी सजावट केली. फक्त रंगांच्या ओळखीसाठी केलेल्या रंगसप्ताहामुळे त्या त्या रंगाच्या विश्वात आमची छान सफर झाली.
खरं सांगायचं तर रंगसप्ताहातील रंग ओळख हा काही माझ्या वर्गासाठी मी नव्याने शोधून काढलेला उपक्रम किंवा प्रयोग अजिबात नाही. पण तरीसुद्धा त्या सप्ताहात नेमकं काय काय करायचं हे माहीतही नसताना मुलांबरोबरची ही रंगांची सफर मलाही रंगांची नव्याने ओळख देऊन गेली.

– रती भोसेकर
ratibhosekar@ymail.com
(रंगसप्ताहाचा भाग दुसरा २५ जूनच्या अंकात)

 

Story img Loader