आज न्यायालयात दाखल झालेल्या प्रौढ वयातील घटस्फोटाच्या केसेस पाहून मनात येतं की या सगळ्या समस्या आज नव्याने निर्माण झाल्या आहेत का? आपल्या मागच्या पिढीत त्या अस्तित्वात नव्हत्या का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अर्थातच नकारार्थी आहेत. समस्या या त्या काळातही होत्याच. सामोपचाराने नाही सुटल्या तर त्यासाठी न्यायालयात जाऊन दादफिर्याद मागता येते ही जाणीव मात्र आज निर्माण झाली आहे.

“खूप सोसलं आत्तापर्यंत. कधी स्वत:च्या पसंतीची साडी घेता आली नाही की कधी मोकळेपणी माझ्या बहिणींना घरी बोलविता आलं नाही. हे कधी कुणाचा अपमान करतील सांगता यायचं नाही. मुलाबाळांची लग्नं झाली. माझी जबाबदारी संपली. मला आता घटस्फोट घ्यायचा आहे.” नीरजा म्हणाली. नीरजा वय वर्षे पासष्ट. एका डॉक्टरची बायको. समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करताना घटस्फोट या शब्दानं धक्का बसावा असं काही नव्हतं. कारण अधूनमधून कुणी ना कुणी असं बोलणारं भेटतंच. तरीही धक्का बसला तो नीरजाचं वय बघून. आत्तापर्यंतचा अनुभव असा होता की या वयातील व्यक्ती समुपदेशनासाठी यायच्या तेव्हा त्यांची गरज आपलं दु:ख दुसऱ्यापाशी बोलून दाखवणं ही असायची. त्यांच्याशी बोलताना जाणवायचं की आहे या परिस्थितीत बदल होणार नाही हे त्यांनी जाणलेलं असायचं आणि स्वीकारलेलंही. जोडीदाराविषयी त्यांच्या अनेक तक्रारी असल्या तरी त्यांची मूळ समस्या असायची ती त्यांचा एकाकीपणा. प्रौढ वयातही साध्यासाध्या गोष्टींसाठी मन मारायला लागल्यामुळे वाटय़ाला आलेलं वैफल्य आणि आपण आपल्या सांसारिक स्थितीत बदल करू शकत नाही या जाणिवेमुळे आलेली अगतिकता. यातून बाहेर पडण्यासाठी नवऱ्यापासून वेगळं राहावं वा न्यायालयात जाऊन घटस्फोट मिळवावा असं सांगणारी व्यक्ती अगदी तुरळक असायची. गेल्या काही वर्षात मात्र घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललं आहे ते फक्त तरुणांमध्ये नाही तर ज्येष्ठ वयातील जोडपीही कायदेशीररीत्या विभक्त होण्यासाठी पुढे येत आहेत. पुण्यातील कुटुंब न्यायालयातील उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांत प्रौढ वयातील एकूण १६४ जणांनी घटस्फोट मिळावा यासाठी अर्ज केला आहे. २९ जणांना परस्पर संमतीने घटस्फोट मिळाला आहे तर ४० जणांना मेंटेनन्स द्यायची अॅर्डर न्यायालयाने काढली आहे. वास्तविक पतीपत्नीमधील नातंच असं आहे की वादसंवाद, मत-मतांतरे सततच होत असतात. त्यातही गंमत असते. त्यामुळे संसाराची रंगत वाढत असते. पण हे कुठवर? जोवर या वादातही संवाद असतो आणि मतभेदांमध्ये कडवटपणा नसतो तोवर. तोवर कितीही भांडणं झाली तरी जुळवून घ्यायची इच्छा असते. ‘आयुष्यभर फक्त मी आणि मीच तडजोड करत आले आहे. आता मला असहय़ झालं आहे. मला घटस्फोट हवा आहे.’ असं जेव्हा एखादी व्यक्ती वकिलाला भेटून सांगायला लागते तेव्हा या विधानामागे वेदना असते आणि नातं मुळापासून उस्कटत चाललं असल्याची भावना. एकमेकांविषयीचा इतका कडवटपणा काही महिन्यात वा काही दिवसांत तयार झालेला नसतो. त्याला मागचे संदर्भ असतात. किती मागचे हे आपल्या कल्पनेपलीकडचे असतात.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना

अॅड्व्होकेट काळे यांच्याकडे मला ८० वर्षांच्या सुलोचनाबाई भेटल्या. डोळ्यात पाणी आणून सांगत होत्या की मला लग्नाच्या वेळी फसवलं गेलं. ‘मुलगा डॉक्टर आहे असं सांगितलं पण तो कंपाउंडर होता. जन्मभर मी सहन केलं. आता मला वेगळं राहायचं आहे. आज ८४ वर्षांच्या आजोबांकडून त्यांना पोटगी हवी आहे. साठ वर्षांच्या शरदनं त्याच्या अठ्ठावन्न वर्षांच्या बायको विरुद्ध ती नांदायला येत नाही म्हणून न्यायालयात दावा दाखल केला आहे हे ऐकून विस्मयचकित व्हायला झालं. त्याची कोकणामध्ये घरगुती स्वरूपाची खानावळ आहे. शेतीवाडी आहे. बऱ्यापैकी उत्पन्न आहे. मुलांच्या शिक्षणासाठी त्याची बायको मुंबईला राहिली. मुलाचं शिक्षण झालं. मुलीचं लग्न झालं. तरीही त्याची बायको कोकणात राहायला यायला तयार नाही. कारण तिला तिथं करमत नाही. अनेकांनी मध्यस्थी करून उपयोग झाला नाही. तेव्हा त्यानं घटस्फोटाचा अर्ज केला. ७७ वर्षांच्या एका आजींनी नवऱ्याची शारीरिक सुखाची मागणी पूर्ण करायला त्या असमर्थ आहेत म्हणून लग्न बंधनातून मुक्त करण्याची न्यायालयाकडे याचना केली आहे. अशी किती तरी कारणं, किती तरी घटना की ज्यामुळे या वयातही एकत्र राहणे असहय़ झालं असल्याचं दिसून येतं.

एकदा या संदर्भात कुटुंब न्यायालयातील न्यायाधीशांशी बोलायची संधी मिळाली असता ते म्हणाले, “अगदी सत्तरी उलटलेले पतीपत्नी एकमेकांवर हिरिरीने आरोप-प्रत्यारोप करत असतात. त्यांची मुलेच येऊन सांगतात की, आमचे आईबाबा घरात एकेका कपाटावरून भांडतात. त्यांना एकदाचा घटस्फोट देऊन मोकळे करा.” मुलं जेव्हा आईवडिलांविषयी असं बोलतात तेव्हा लक्षात येतं की आईवडिलांच्या भांडणापायी तीही पिडली गेली असतात. त्यापायी कित्येक जणांचं लहानपण कोमेजून गेलेलं असतं. त्या वयात निर्णय घेण्याची त्यांची क्षमता नसते म्हणून केवळ ते गप्प बसलेले असतात. कधीकधी असंही घडताना दिसतं की आईवडिलांपैकी एकाच्या स्वभाववैचित्र्यापायी आपल्या आई किंवा वडिलांना कसं आणि किती सोसावं लागलं आहे हे त्यांनी पाहिलं असतं. त्यामुळे उतारवयात तरी त्यांना स्वास्थ्य लाभावं म्हणून त्यांना घटस्फोट मिळावा, कमीत कमी त्यांनी विभक्त राहावं असा आग्रह मुलं धरतात.

चंदा नवाथे यांच्या केसमध्ये त्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांची अमेरिकेत स्थायिक झालेली एकुलती एक मुलगी काही महिने भारतात येऊन राहिली होती. चंदाताइभचे पती ब्रिगेडिअर विनोद नवाथे हे अत्यंत कडक शिस्तीचे. नोकरीत असताना अवतीभोवती भरपूर नोकरचाकर असल्यामुळे त्याची फारशी झळ चंदाताइभना जाणवली नव्हती. उलट ऐषोआरामाची सवय लागली होती. परंतु निवृत्तीनंतर नवाथे यांचा वक्तशीरपणा, पैशांच्या बाबतचा काटेकोरपणा यामुळे त्या रंजीस आल्या. बोलाचाली, शिवीगाळ, कधीकधी तर अंगावर हात उचलला जाऊ  लागला. दिवसेंदिवस नवाथे यांचा हेकटपणा इतका वाढत गेला की एकदा ठरलेल्या वेळी चंदाताई घरी पोहोचल्या नाहीत म्हणून त्यांनी दार उघडलं नाही. रात्रभर त्या जिन्याच्या पायरीवर बसून राहिल्या. चंदाताई पार खचून गेल्या. त्यांच्या भावाच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर त्यानं सामोपचारानं चार गोष्टी सांगून पाहिल्या. परंतु उपयोग झाला नाही. अखेरीस भाऊ आणि मुलगी यांच्या सल्ल्यानं त्यांनी घटस्फोटाची केस केली. त्या न्यायालयात यायच्या त्याही भेदरलेल्या अवस्थेत. चुरगळलेले कपडे. हातातल्या पिशवीत चारदोन कपडे कोंबलेले. घरी गेल्यावर दार उघडलं गेलं नाहीतर काय याची भीती. अखेरीस त्यांना घटस्फोट मिळाला. न्यायालयानं त्यांना महिना पंचवीस हजार पोटगी मंजूर केली.

आज न्यायालयात दाखल झालेल्या प्रौढ वयातील घटस्फोटाची प्रकरणे पाहून मनात येतं की या सगळ्या समस्या आज नव्याने निर्माण झाल्या आहेत का? आपल्या मागच्या पिढीत त्या अस्तित्वात नव्हत्या का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अर्थातच नकारार्थी आहेत. समस्या या त्या काळातही होत्याच. सामोपचाराने नाही सुटल्या तर त्यासाठी न्यायालयात जाऊन दादफिर्याद मागता येते ही जाणीव मात्र आज निर्माण झाली आहे. अर्धंअधिक आयुष्य सोसण्यात गेलं आता न्याय मिळून काय फरक पडणार असा निराशावादी दृष्टिकोन बदलत चालला आहे. ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे. त्यामुळे

चंदा नवाथेसारख्या स्रीला आत्मसन्मानानं जगण्याची वाट खुली होत आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये असंही दिसून येतं की क्षुल्लक कारणांमुळे नातेसंबंधामध्ये निर्माण झालेली तेढ, सूडबुद्धी आणि अहंभाव यापायी न्यायालयाकडे धाव घेतली जात आहे. एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप, कायद्याची किचकट आणि वेळखाऊ  पद्धत याचा परिणाम दोघांना सोसावा लागत आहे. ठरावीक वयानंतर शरीरमनाची ताकद क्षीण होत असते. कोर्टकचेऱयांच्या फेऱ्या मारताना जगण्याची उमेद हरवलेली माणसं जेव्हा भेटतात तेव्हा ‘जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड’ – ‘न्यायाला विलंब म्हणजे न्यायाला नकार’ या उक्तीचा अनुभव घेताना आयुष्य निसटून चालल्याची जाणीव त्यांच्या डोळ्यातून डोकावत असते.

अशा केसेस पाहिल्या की वाटतं परस्परांतील नात्याच्या निरगाठी बसून गुंता घट्ट होण्यापूर्वी काही करता येणं शक्य आहे का? आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर एकमेकांसाठी थांबून आपल्याला एकमेकांमधील नेमकं काय खुपतं/रुततं/दुखतं याबद्दल बोललं गेलं तर? त्यासाठी समुपदेशकाची मदत घेतली तर? वाटतं, त्यामुळे नात्यातील गुंता सुटला नाही तरी निदान वाढत जाणार नाही. भले साठीनंतरचं सहजीवन भक्कम पायावर उभं करता आलं नाही तरी कमीत कमी पडझड होऊन ‘कोर्टाची पायरी’ न चढता विभक्त होण्याचं शहाणपण कमावता येईल. खरंच येईल? तुम्हाला काय वाटतं?

मृणालिनी चितळे

chitale.mrinalini@gmail.com

Story img Loader