शिशिरातला वसंतया लेखमालेद्वारे सहजीवनात फुलणारा वसंत तर कधी होणारी पानगळ टिपताना माणसामाणसांतील नातेसंबंध आणि माणसाचे स्वभावविभाव याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला. अनेक वाचकांनी लेखांवर सजग प्रतिक्रिया नोंदवून मला त्या विषयातील बारकावे जाणवून दिले. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांमुळे शहाणीसुरती माणसंपण लग्नच का करतात?’ या प्रश्नाचा मागोवा घेता आला. काहींना उत्तरं मिळाली. काही अनुत्तरित राहिले. परंतु उत्तरं मिळाली नसली तरी उत्तराच्या दिशेनं विचारमंथन मात्र सुरू झालं हे नक्की.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘शहाणीसुरती माणसंपण लग्नच का करतात?’ या प्रश्नाचं बोट धरून पन्नाशीनंतरच्या सहजीवनातील विविध रंग ‘शिशिरातील वसंत’ या लेखमालेतून मांडायचं ठरवलं तेव्हा फक्त ७/८ विषय मनात तयार होते; परंतु वर्षभरात २६ लेख लिहून झाल्यावरही काही विषय जागेअभावी राहून गेल्याचे जाणवतंय. याचं कारण म्हणजे या विषयाची व्यापकता आणि व्यामिश्रता नि त्याबरोबरच या लेखमालेला मिळणारा प्रतिसाद.

लेख वाचल्यावर प्रत्यक्ष भेटून वा इमेलद्वारे अनेक जण त्यांच्या मनात उभे राहणारे प्रश्न, त्यांचे अनुभव माझ्यापर्यंत पोचवत राहिले. त्यामुळे या वयातील सहजीवनाचे वेगवेगळे पैलू जाणवले. येणाऱ्या प्रतिसादामुळे आणखी दोन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे ‘चतुरंग’ पुरवणी किती मोठय़ा प्रमाणात; भारतातच नाही तर परदेशातही वाचली जाते ते! दुसरी गोष्ट म्हणजे विषय जरी पन्नाशीनंतरचा असला तरी तरुणवर्गही लेख वाचत आहे आणि स्वत:विषयी आणि स्वत:च्या आईवडिलांविषयी विचार करत आहे हे विशेष. सौरभनं इमेलमध्ये लिहिलं होतं, ‘मुलगा या नात्याने गेली काही र्वष आईवडिलांमध्ये आलेलं तुटलेपण पाहतोय मी. शरीर धडधाकट असूनही, पुरेसे पैसे गाठीशी असूनही आयुष्याचा आनंद हरवलाय त्यांचा. तुमचा ‘मी आहे आई ..’ हा लेख वाचला आणि वाटलं की आम्हा मुलांना काय म्हणायचंय ते तुम्ही नेमकं पकडलं आहे. आईवडिलांना घेऊन तुम्हाला भेटायला यायची खूप इच्छा आहे.’ असं म्हणून तो थांबला नाही तर प्रत्यक्ष भेटायला आला. त्याचं पत्र वाचताना तरुण पिढीची संवेदनशीलता मनाला स्पर्शून गेली तर ३५ वर्षांच्या मानसीच्या पत्रानं अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडलं. ‘पानगळीनंतरची पालवी’ हा लेख वाचून तिनं लिहिलं होतं, ‘तुम्ही तुमच्या लेखात नवऱ्याशी कोणत्याही प्रकारची भावनिक जवळीक निर्माण न होऊ  शकलेल्या साठी उलटलेल्या प्रौढ स्त्रीची घुसमट दाखवली आहेत. पण ती घुसमट मी तर माझ्याही वयात अनुभवत आहे. दुर्दैवाने ती माझ्या आईबाबांपर्यंत पोचत नाही. त्यांना ती अस्थायी वाटते. माझ्यावरून त्यांच्यात वाद होतात.  आज माझं लग्न मोडण्याच्या नुसत्या विचारानं ते हवालदिल झाले आहेत. आजची तरुण पिढी, विशेषत: मुली छोटय़ाछोटय़ा गोष्टींचं भांडवल करतात असा सरसकट शिक्का माझ्यावर मारला जात आहे.’ तिचं पत्र वाचताना लक्षात येतं की एखादी गोष्ट छोटी आहे का गंभीर हे शेवटी त्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन अजमवावं लागतं. आईवडील मात्र मायाममता, काळजी अशा भावनिक गुंत्यात अडकून आपलं सहजीवन आणि आपल्या मुलांचं रोजचं जगणं दु:सह करत असतात. मुलांमध्ये अतिप्रचंड गुंतवणूक असल्यामुळे मुलांच्या अपयशाला स्वत:ला जबाबदार धरतात किंवा त्याचे खापर जोडीदाराच्या माथी मारत राहतात. काहीही असलं तरी परिणाम एकच – वैवाहिक जीवनात भरून राहिलेलं वैफल्य!

आपल्याकडे विभक्त कुटुंबपद्धती रूढ होऊ  लागली असली तरी काही घरांत आजही तीन पिढय़ा गुण्यागोविंदानं एकत्र नांदताना दिसतात तर काही घरांमध्ये कुणाचं न कुणाचं सॅण्डविच होत असतं. या संदर्भात ५७ वर्षांच्या अनघानं आपली व्यथा मांडताना म्हटलं आहे, ‘तुम्ही ‘सॅण्डविच पिढी’ या लेखात अनेक मुद्दय़ांचा ऊहापोह केला आहे तरी वाटतं की माझ्या मनातील प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. माझ्या मुलीचं लग्न झाल्यामुळे घरात आम्ही तिघेच असतो. मी, नवरा आणि माझ्या ८५ वर्षांच्या सासूबाई. आम्ही दोघीही स्वतंत्र बाण्याच्या आणि माझा नवरा कनवाळू स्वभावाचा. अनेक बाबतींत तो माझ्या पाठीशी उभा राहतो आणि तेवढंच आपल्या आईवर प्रेम करतो. आमच्या घरात सॅण्डविच पिढीचा अनुभव सतत घेत असताना कधी कधी मला कळेनासं होतं की त्यातील मी कोणता भाग आहे? ब्रेड की दोन ब्रेडमध्ये दाबला गेलेला मसाला? कधी कधी मला माझ्या नवऱ्याची कीव येते तर कधी माझ्या भावनांचा उद्रेक मलाच अस होतो. आशा आहे की तुम्ही समजून घ्याल.’ सासू-सून तिढा हा विषय नवीन नाही पण वयाच्या पन्नाशीनंतरही तो सुटत नाही ही गोष्ट नक्कीच अस्वस्थ करणारी आहे. यामध्ये सांकेतिक पद्धतीनं विचार करणारे ‘त्या’ला झुकतं माप देऊन गरीब बिचारं ठरवून टाकतात आणि स्त्रियांना भांडकुदळ आणि असमंजस, असे सरसकट आडाखे बांधणं सर्वावरच अन्याय करणारे आहेत असं नाही वाटत?

कुटुंबपद्धती एकत्र असो वा विभक्त, जोडीदाराची साथ सुटल्यावर अनेकांना आयुष्य अवघड आणि वेदनामय वाटायला लागतं. एकाकीपणा दूर करण्यासाठी समवयस्क जोडीदाराची साथ हवी असेल तर पुनर्विवाह किंवा ‘लिव्ह इन’ हे दोन पर्याय उरतात. त्यावरील लेख वाचून श्री. देवतारे यांना वाटतं की या वयात विवाह ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी आहे. कारण त्यांनी दोन वधुवरसूचक मंडळांमध्ये नाव नोंदविल्यावर एकही जण चौकशीला आलं नाही; त्यामागचं कारण त्यांच्या निवृत्तिवेतनाचा आकडा असावं. पुनर्विवाहाबाबत काहींना आपल्या लग्नाचा प्रस्ताव मुलांसमोर मांडण्याचं धाडस होत नाही तर सरोजच्या डोळ्यासमोर तिच्या सासूबाईंना योग्य अशी व्यक्ती आहे पण सुचवायची हिंमत नाही. नीला काळे यांनी आपल्या बहात्तर वर्षांच्या बॉससाठी जोडीदार पाहून देण्याची विनंती केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रौढांच्या पुनर्विवाहाची संख्या वाढत असली तरी अनुरूप जोडीदार मिळाला नाही तर आयुष्य अजूनच बिकट होईल याची धास्ती अनेकांच्या मनात असल्यामुळे ‘लिव्ह इन’चा पर्याय त्यांना खुणावत आहे. पण ती संकल्पना जनमानसात रुजली नसल्यामुळे फार क्वचित पाऊलं उचललं जात आहे. त्यासाठी वधुवरसूचक  मंडळांप्रमाणे ‘लिव्ह इन’ सूचक मंडळं असावीत आणि त्यासाठी वर्तमानपत्रानेच पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा नाडगौडा यांनी व्यक्त केली.

जोडीदाराची साथ सुटल्यावर काहींना पोकळी जाणवते तर काहीजण आठवणी जागत्या ठेवून समृद्ध आयुष्य कसे जगतात याचं चित्रण ‘कांचनसंध्या’ या लेखात केलं होतं. तो लेख वाचून एकानं कळवलं की जोडीदाराच्या मृत्यूनंतर दोघांपैकी एकाला एकटं राहावं लागणार या वस्तुस्थितीचा स्वीकार आणि सवय व्हावी म्हणून साठी उलटल्यावर पतीपत्नीनं दोन र्वष वेगवेगळ्या गावी राहण्याचा प्रयोग केला. एकमेकांशिवाय जगताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या याची ती जणू रंगीत तालीम होती. दोन वर्षांनंतर त्यांनी परत एकत्र राहायला सुरुवात केली तेव्हा एकमेकांच्या सवयी आणि गुणदोष याकडे पाहायची त्यांची दृष्टी अधिक सकारात्मक आणि सहिष्णू झाल्याचं त्यांना जाणवलं. साठी ओलांडलेली आजची पिढी किती जिद्दी आणि प्रयोगशील आहे याचं हे उदाहरण.

या लेखमालेद्वारे सहजीवनात फुलणारा वसंत तर कधी होणारी पानगळ टिपताना माणसामाणसांतील नातेसंबंध आणि माणसाचे स्वभावविभाव याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला; तो त्यांविषयी माझ्या मनात असलेल्या विलक्षण कुतूहलामुळे. अनेक पत्रलेखकांकडून तुम्ही सायकियाट्रिस्ट आहात की सायकॉलॉजिस्ट? असं विचारलं की यासंबंधी आपण अनेक अंगांनी विचार करू शकतो हा विश्वास दुणावत गेला. थोडासा आत्मप्रौढीचा धोका पत्करून सांगू इच्छिते की ‘नवऱ्याचे सासूसासरे’ हा लेख वाचून अशी विचारणा करणाऱ्यांमध्ये नाशिकचे न्युरोसर्जन डॉ. महेश करंदीकर होते. याशिवाय मला प्रतिसाद देणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती म्हणजे फ्रान्सिस दिब्रिटो, अशोक नायगावकर,

डॉ. रवीन थत्ते, डॉ. अनिल मोकाशी, अवधूत गुप्ते, शेखर ढवळीकर, डॉ. शशी वैद्य. याशिवाय प्रसाद भावे, शिरीष देशपांडे, ऊर्मिला गानू, निवेदिता जोगळेकर, भाग्यश्री देसाई यांनी जवळजवळ प्रत्येक लेखावर सजग प्रतिक्रिया नोंदवून मला त्या विषयातील बारकावे जाणवून दिले. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांमुळे ‘शहाणीसुरती माणसं पण लग्नच का करतात?’ या प्रश्नाचा मागोवा घेता आला. काहींना उत्तरं मिळाली. काही अनुत्तरित राहिले. परंतु उत्तरं मिळाली नसली तरी उत्तराच्या दिशेनं विचारमंथन मात्र सुरू झालं.

या संदर्भात डॉ. उज्ज्वला दळवी यांचा अनुभव सांगून सर्वाचा निरोप घेते. त्या लिहितात, ‘आमच्या वैद्यकीय क्षेत्रात वर्गातल्या वर्गात लग्न झालेल्या काही जोडप्यांमध्ये आत्ताआत्तापर्यंत तीव्र व्यावसायिक चुरस होती. क्वचित मत्सरदेखील. व्यावसायिक उन्हं कलायला लागली आणि एकमेकांची किंमत कळायला सुरुवात झाली.’आता वाटतं, ‘ढळला रे ढळला दिन सखया, संध्याछाया सुखविती हृदया’ हाच अनुभव सर्वाना यावा यासाठी शुभेच्छा!

chitale.mrinalini@gmail.com

(सदर समाप्त)

मराठीतील सर्व शिशिरातला वसंत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article by mrunalinichitale