आज नवऱ्याचे सासूसासरे आणि त्यामुळे निर्माण होणारा ताण या नव्यानं निर्माण झालेल्या समस्येला सरसकट सगळ्यांना नसलं तरी काहींना मात्र सामोरी जावं लागत आहे. सुनेचं आपल्या सासूसासऱ्यांशी न पटल्यामुळे सर्वाच्या नातेसंबंधांमध्ये पडणारे तिढे आणि जावयाचे आपल्या सासूसासऱ्यांशी न पटल्यामुळे मनात निर्माण होणारी तेढ याच्या कारणांमागे काही महत्त्वाचे फरक आहेत.

संध्या आणि मी आज खूप दिवसांनी भेटत होतो. चार-दोन वाक्यांमध्येच तिचा नेहमीचा मूड नसल्याचं माझ्या लक्षात आलं. ‘‘का गं, बरं वाटत नाही का?’’ मी विचारलं मात्र, तिचे डोळे भरून आले. ‘‘गेले चार दिवस झाले मी आणि राघव एकमेकांशी बोलत नाही आहोत आणि कारण काय तर माझे आईबाबा. तुला माहितीय ते आमच्याकडे राहायला येण्यापूर्वी राघवच्या मनात त्यांच्याविषयी किती आदर होता तो. त्यांनाही त्याचं कौतुक होतं. पण बाबांचं हृदयरोगाचं दुखणं सुरू झालं. मलाही सारखंसारखं मुंबई हैदराबाद प्रवास करणं शक्य नव्हतं. तेव्हा राघवनंच दोघांनी मुंबईला राहायला यावं म्हणून आग्रह धरला. पण आता त्यांच्या अनेक गोष्टी त्याला आवडत नाहीत आणि त्याचा राग माझ्यावर काढत असतो.

Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
Image of Laurene Powell Jobs Maha Kumbh 2025 preparations
Steve Jobs’ Wife : “यापूर्वी इतक्या गर्दीच्या ठिकाणी…” महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीला ऍलर्जी
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”

परवाचीच गोष्ट. आईबाबा पहाटे पाच वाजता ताईशी फोनवर बोलत होते. आता तिकडच्या वेळेनुसार ताईला हीच वेळ सोयीची असते. यांनाही लवकर उठायची सवय. तर ते मोठय़ांदा बोलत असल्यामुळे याची झोपमोड झाली म्हणून इतका चिडला ना. मी सांगायचा प्रयत्न केला की, ‘अरे आईला कमी ऐकायला येतं शिवाय दारं बंद करून बोलायचं त्यांच्या लक्षात राहात नाही.’ तर मी त्यांची बाजू घेते असं म्हणून माझ्यावरच उखडला. मी त्यांच्या खोलीत जाऊन हळू बोला म्हणून सांगितलं तर ते दिवसभर चेहरा पाडून बसले आणि हा फुरंगटून बसला. आईबाबा आमच्याकडे आल्यामुळे आम्ही एकमेकांजवळ फक्त राहायला लागलो; मनानं मात्र दुरावत चाललो आहोत.

संध्याचं बोलणं ऐकताना जाणवलं की आज नवऱ्याचे सासूसासरे आणि त्यामुळे निर्माण होणारा ताण या नव्यानं निर्माण झालेल्या समस्येला सरसकट सगळ्यांना नसलं तरी काहींना मात्र सामोरी जावं लागत आहे. ज्यांना याचा अनुभव नसेल त्यांना हे विधान कदाचित चमत्कारिक वाटेल पण प्रत्यक्षात हे घडत आहे. पिढय़ान्पिढय़ा सासू-सून नात्यामध्ये पडलेला तिढा आपल्याला परिचयाचा आहे. सासूनं सुनेला त्रास देणं वा कधी सुनेनं वरचढ होऊन सासूला पिडणं किंवा उघडउघड काही बिनसलेलं नसलं तरी दोघींमध्ये चालू असलेलं शीतयुद्ध आणि त्यामुळे पतीपत्नीच्या नात्यावर होणारे परिणाम यावर खूप लिहिलं/बोललं गेलं आहे. परंतु सुनेचं आपल्या सासूसासऱ्यांशी न पटल्यामुळे सर्वाच्या नातेसंबंधांमध्ये पडणारे तिढे आणि जावयाचे आपल्या सासूसासऱ्यांशी न पटल्यामुळे मनात निर्माण होणारी तेढ याच्या कारणांमागे काही महत्त्वाचे फरक आहेत. ज्या घरात विभक्त कुटुंबपद्धती नाही त्या घरातील सुनांना लग्न झाल्यानंतर सासूसासऱ्यांबरोबर राहायची वेळ येते तेव्हा अनेक तडजोडी कराव्या लागतात. परंतु तरुण वय असल्यामुळे शरीरमनाची उभारी असते. एकमेकांशी सूर जमले नाहीत तर स्वत: बदलायची वा दुसऱ्याला बदलायला लावायची मानसिकता असते. तेही जमलं नाही तर वेगळं राहण्याचा पर्याय खुला असतो. आजच्या काळातील सुनेच्या सासू-सासऱ्यांचाही सर्वसाधारण दृष्टिकोन असा असतो की आपल्यातील मतभेदांमुळे आपला मुलगा आणि सून यामध्ये वितुष्ट येऊन त्यांचं लग्न मोडण्याची वेळ येण्यापेक्षा त्यांनी वेगळं राहणं हिताचं. मुलग्यांना मात्र आपल्या सासू-सासऱ्यांबरोबर राहायची वेळ सहसा लग्न झाल्या झाल्या येत नाही. त्यांची बायको आईवडिलांची एकुलती एक मुलगी असेल किंवा तिला भाऊ  नसेल तर त्यांच्या वृद्धापकाळात आपल्याला सासू-सासऱ्यांची जबाबदारी घ्यायला हवी याची जाणीव मुलांना असते. परंतु प्रत्यक्ष जबाबदारी घ्यायची वेळ येते तेव्हा जावई प्रौढ वयात पोचलेले असतात. ते घरातले कर्ते पुरुष झालेले असतात. आपल्याच घरात आपल्याला काही गोष्टींशी तडजोडी करायला लागणार आहेत, त्याही थोडे दिवसांसाठी नाही तर कायमसाठी याची त्यांनी कल्पना केलेली नसते. संध्याच्या नवऱ्याप्रमाणे त्यांनीच अगत्यानं बोलावून घेतलेल्या आपल्या सासू-सासऱ्यांच्या छोटय़ाछोटय़ा गोष्टी त्यांना मग खटकायला लागतात.

या परिस्थितीला प्रत्येक वेळी प्रौढ मुलगा जबाबदार असतो असं नाही तर वृद्ध सासू-सासरेही असतात. आजकाल वयाची सत्तरी किंवा अगदी ऐंशी र्वष पार केलेली वृद्ध माणसंही शारीरिक आणि बौद्धिकदृष्टय़ा सक्षम असतात. आर्थिकदृष्टय़ा कुणावर अवलंबून नसतात. एकमेकांना आधार होईल या भावनेनं ते मुलीकडे राहायला येतात तेव्हा मिंधेपणाची भावना त्यांच्या मनात असण्याचं कारण नसतं. ते आपल्या पद्धतीनं जगायला बघतात. कधीकधी तर शुभाच्या आईप्रमाणे आपण टिपिकल ‘सासुगिरी’ करत असल्याची त्यांना जाणीवही नसते. शुभाची आई अति शिस्तप्रिय आणि तेवढीच स्पष्टवक्ती. शुभाच्या वडिलांच्या पश्चात ती हक्काने शुभाकडे राहायला आली. शुभाच्या घरातला प्रचंड पसारा, सगळ्यांचं ऐसपैस वागणं, वस्तूंवर चढलेली धुळीची पुटं तिच्या सहनशक्तीच्या पलीकडची होती. तिची सततची झाडपूस आणि इथेतिथे पडलेल्या वस्तू पाहून ती काढत असलेली खरडपट्टी यातून मुलगी आणि नातवंडंच नाहीत तर जावईबापूसुद्धा सुटू शकत नसत. सुरुवातीला सगळ्यांनी या गोष्टी हसण्यावारी नेल्या परंतु एकदा बोलताबोलता ती शुभाला म्हणाली, ‘‘कसं काय तुम्ही एवढय़ा उकिरडय़ात राहता कुणास ठाऊक?’’ हे शब्द नेमके जावयानं ऐकले आणि तो ताडकन म्हणाला, ‘‘मग आलात कशाला इथे. राहायचं होतंत आपल्या राजवाडय़ात.’’ अशा प्रकारच्या संवादांमुळे, खरं तर विसंवादांमुळे घरादाराची शांती ढळत चालली आहे हे शुभाला पटतंय पण दिवसेंदिवस थकत चाललेल्या आपल्या आईला आता नव्यानं घरसंसार मांडणं झेपणारं नाही हेही दिसतंय. थोडीथोडकी नाही लग्न झाल्यापासून चोवीस र्वष तिच्या सासूच्या न आवडणाऱ्या असंख्य गोष्टी तिनं सहन केल्या होत्या. तीच सहनशीलता तिच्या नवऱ्यानं त्याच्या सासूच्या बाबतीत दाखवावी ही तिची अपेक्षा आहे. त्याची सहनशक्ती कमी पडण्यामागचं कारण आजच्या काळात स्वत:ला आधुनिक म्हणवून घेणाऱ्या पुरुषांच्याही मनात वर्षांनुर्वष रुजलेली पितृसत्ताक पद्धती आहे का, हा तिचा प्रश्न आहे.

खरं तर पितृसत्ताक विचारपद्धती फक्त मुलग्यांच्या मनात घर करून आहे अशातला भाग नाही तर अनेक स्त्रियांच्या मनावरही तिचा पगडा आहे. कायद्यानं जरी मुलीला आईवडिलांच्या संपत्तीमध्ये समान हक्क दिले असले तरी आपल्याकडे फार क्वचित मुलगा आणि मुलीला समान वाटा दिला जातो. याबाबत असा युक्तिवाद केला जातो की आईवडिलांची समान जबाबदारी मुलगी कुठे घेते? खूप वेळा मुलीची तयारी असली तरी आईवडिलांना जावयाकडे जाऊन राहणे प्रशस्त वाटत नसते. पण जे आईवडील किंवा दोघांपैकी एक जण जावयाकडे राहात असतील त्यांचीही मुलीला समान वाटा द्यायची तयारी असतेच असं नाही. मालनच्या आईनं तर कहर केला. नवऱ्याच्या पश्चात त्यांचं घर मालनच्या आईच्या नावावर झालं होतं. शिवाय मालनची आई तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे ते घरही आईला मिळालं. मालनचा भाऊ  परदेशात स्थायिक झाला आहे. आईचं वय झाल्यामुळे ती सध्या मालनकडे राहात आहे. नुकतंच तिनं इच्छापत्र करून आपली दोन्ही घरं मालनच्या भावाच्या नावावर केली. मालनच्या नवऱ्याला ही गोष्ट कळल्यावर तो मालनला पावलोपावली टोकतो आहे. परदेशी असलेला भाऊ  वर्षांतून दोन-तीन आठवडे भारतात येतो. मालनच्या घरी हक्काने राहतो. आईच्या इच्छापत्रासंबंधी मालन दोघांशी बोलली. तेव्हा आईनं दुर्लक्ष केलं तर भावाशी बोलल्यावर ‘आईची इच्छा’ असं म्हणून त्यानं फक्त नाइलाज व्यक्त केला. मालनच्या नवऱ्यानं अलीकडे मालनच्या मागे लकडा लावला आहे की आईकडून राहाण्या-जेवणाचे पैसे घे म्हणून. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे मालन आणि तिच्या नवऱ्याला आर्थिक विवंचना नाहीत परंतु व्यवहाराच्या निकषावर नाती कठोर होत जातात आणि रक्ताची नातीही पातळ होत जातात.

आजच्या काळात मुलग्यांना सासूसासऱ्यांचा जाच वाटण्याची आणि त्यांच्याशी जुळवून घेताना पतीपत्नीच्या नात्यामध्ये तेढ निर्माण होण्याची ही काही उदाहरणे वास्तवातील असली तरी सार्वत्रिक नाहीत. काही नवरा-बायको दोघांच्या सासूसासऱ्यांची काळजी घेताना दिसतात. त्यांच्या आवडीनिवडी जपतात. त्यामुळे ‘जावई माझा भला’ असं म्हणत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळणारेही असतात. बहुतेक वेळा या नात्यामध्ये तिढा पडतो ते एकत्र राहायची वेळ आल्यावर. एकमेकांविषयीच्या अपेक्षा आणि अपेक्षापूर्ती यामधील दरी वाढत चालल्यावर. हे अंतर असंच वाढत जाणार की कधी ना कधी कमी होणार, या प्रश्नाचा मागोवा घेताना जाणवलं की जेव्हा मुलींप्रमाणे मुलांमध्येही आपल्या सासूसासऱ्यांची जबाबदारी पेलली पाहिजे ही मानसिकता रुजेल आणि प्रत्येक आईवडील, फक्त कायदा आहे म्हणून नाही तर मनानं आणि मानानं आपला मुलगा आणि मुलगीकडे समान दृष्टीनं पाहतील, तेव्हा कदाचित हे अंतर संपू शकेल. कदाचितच.

मृणालिनी चितळे

chitale.mrinalini@gmail.com

Story img Loader