कधी कधी पालक आपल्या मुलांच्या वर्तमानाचं आणि भविष्यकाळाचं इतकं ओझं वाहायला लागतात की, त्यापेक्षाही वेगळं आपलं जीवन आहे हे त्यांना विसरायला होतं. मोकळेपणानं जगायचं विसरलेल्या आपल्या आई-बाबांना, ‘मी आहे आई आणि..’ असं सांगून त्यांना सेकंड इनिंगसाठी तयार करणाऱ्या मुलीचं पत्र..
प्रिय आई आणि बाबा,
घरातल्या घरात पत्र लिहायची ही पहिलीच वेळ. पण आजकाल होतंय काय की आपण बोलायला लागलो की संवादाची गाडी कुठल्या तरी दिशेला भरकटत जाते आणि वादविवादाच्या स्टेशनला जाऊन कशी थांबते हे तुम्हाला कळत नाही आणि मला नि रेवतीलाही. आता कालचीच गोष्ट घ्या ना. रेवती रात्री दहाच्या सिनेमाला गेली आहे हे ऐकून तुम्ही अस्वस्थ झालात. आईनं तिला परवानगी दिली, असं समजून तिला बोलायला लागलात. आई सांगायचा प्रयत्न करत होती की तिनं फक्त एसएमएस करून कळवलं आहे, ‘जाऊ का?’ असं विचारलेलं नाही. पण तुम्ही काही ऐकून घ्यायच्या मन:स्थितीतच नव्हता. तुमच्या दोघांच्या वादात पडायचं नाही असं मी ठरवलेलं. तरी मला राहावलं नाही म्हणून बोलून गेले, ‘‘बाबा, रेवती दोन वेळा अमेरिकेला एकटी जाऊन आलेली, प्रोजेक्ट लीड म्हणून काम करणारी ३४ वर्षांची हुशार मुलगी आहे.’’ हे ऐकून तुम्ही माझ्यावरच उखडलात. ‘‘तेच म्हणतोय मी. ३४ वर्षांची झाली तरी तिच्या लग्नाचा पत्ता नाही. चुलीत घाला तिची हुशारी.’’ असं म्हणून तुम्ही तरातरा तुमच्या खोलीत निघून गेलात. क्षणभर तुम्हाला थांबवून सांगावंसं वाटलं, हीच रेवती आणि तिची हुशारी हा काही वर्षांपूर्वी तुमचा अभिमानाचा विषय होता. आज मात्र काळजीचा आणि तुमच्या दोघांमधील संघर्षांचा विषय बनून राहिला आहे.
नऊ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग मला आज जसाच्या तसा आठवतोय. माझं लग्न होऊन एक वर्ष झालं असेल. रेवतीनं तिचं आणि सर्वेशचं जमलं असल्याचं सांगितलं. तेव्हा तुम्हा दोघांना केवढा आनंद झाला, पण रेवतीही आता दूर जाणार म्हणून आई, तुझ्या डोळ्यात पाणी आलं. तशी तुझ्या पाठीवर हलकेच थोपटत बाबा म्हणाले, ‘‘मंजू, संसार मांडला तेव्हा आपण दोघंच तर होतो. आपल्या घरातले आपण राजाराणी असलो तरी तेव्हा खूप काही कमवायचं होतं, मिळवायचं होतं. आता आयुष्याच्या सेकंड इनिंगला मात्र आपण राजाराणीसारखं जगायचं. आयुष्य एन्जॉय करायचं.’’ पण पुढच्या सहा महिन्यात सगळं चित्र पालटलं. रेवती आणि सर्वेशचं फिस्कटलं. हा धक्का तुम्ही कसाबसा पचवलात. तेवढय़ात अनिकेतपासून वेगळं व्हायचा निर्णय मी घेतला. त्याचं नि माझं आयुष्यभरासाठी पटणार नाही हे कळल्यावर बाहेर कुठेतरी भाडय़ानं जागा घेऊन राहायचं मी ठरवलेलं. पण तुम्ही मला हट्टानं आपल्या घरी घेऊन आलात. त्याच सुमारास रेवती वर्षभरासाठी अमेरिकेला गेली होती. तुमचा आग्रह मला मोडता आला नाही. त्यावेळी तुमच्या शब्दाबाहेर न जाण्याचा जो कमकुवतपणा मी दाखवला तो तुम्हा दोघांना आणि मला कायम जाचत राहणार आहे याची तेव्हा कुठे कल्पना होती?
मी परत आल्यावर रेवती येईपर्यंत आई तू माझ्यासोबत झोपत होतीस. मला एकटेपणा जाणवू नये ही त्यामागची भावना मी समजून होते गं. पण त्यामध्ये असाही तर भाव नव्हता ना की माझं लग्न, माझं सेक्स लाईफ संपलं असताना आपण आपल्या बेडरूममध्ये झोपणं तुला अपराधी वाटत होतं? एकदा या संबंधी तुझ्याशी मोकळेपणी बोलायचं ठरवलं तर तू कुठली आठवण सांगितलीस आठवतंय? रेवतीच्या जन्माच्या वेळची. तुला दुसरी मुलगीच झाली म्हणून आजी म्हणे रडायला लागली. तेव्हा आजोबा म्हणाले, ‘तू का रडतेस? तुला तर मुलगा आहे ना?’ हे सांगून तू म्हणालीस, ‘आज माझ्या दोन्ही मुली लग्नाशिवाय राहिल्या असताना मी नाही म्हणू शकत तुझं तर लग्न टिकलंय, मग तू का रडतेस?’
आई, लग्न मोडण्याचं दु:ख आम्हालाही आहे. आईबाप या नात्यानं आमचं दु:ख तुम्ही आमच्या बरोबरीनं जगताय. कदाचित तुम्हाला वाटत असेल की ही पिढी किती बिनधास्त आहे. लग्न जुळणं, मोडणं, नव्यानं जुळणं याकडे किती सहजपणे बघते. थोडय़ाफार फरकानं खरं आहे हे. लग्न ही गोष्ट आम्हाला क्षुल्लक वाटत नाही, पण अवघं आयुष्य व्यापून टाकण्याइतकी गहनही वाटत नाही. लग्नामुळे आयुष्याला स्थैर्य येतं हे तुमचे विचार बरोबर असले तरी लग्न मोडलं म्हणजे आयुष्यातील स्वास्थ्य आणि सगळा आनंद संपून जातो असं आम्हाला वाटत नाही. नोकरी, मित्रमैत्रिणी, आपापले छंद यामध्ये आम्ही रमू शकतो. आयुष्य आससून जगू शकतो. आमची पिढी ‘लग्न नाही’ या कारणासाठी भूतकाळात अडकून आणि भविष्याची धास्ती घेऊन आजचा दिवस बिघडू देत नाही. तुम्ही मात्र तुमचं आयुष्य एका जागी ठप्प झाल्यासारखं वागता. एकमेकांसोबत जगण्याचं विसरून कधी एकमेकांना दोष देत राहता तर कधी एकमेकांसोबत रडत राहता. तुम्हीच नाहीत, तुमच्या बरोबरचे कितीतरी जण. परवा संध्यामावशी आणि काका आले होते. काकांची उतरलेली तब्येत पाहून धक्का बसला. ते दोघं मागचंच उगाळत होते. श्रुतीनं त्यांच्या मनाविरुद्ध केलेलं लग्न. सलीलनं तिला केलेली मारहाण. तिचं एकटीनं सोसणं आणि ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवणं. याचा त्यांना बसलेला धक्का. ते सांगत होते आणि तुम्ही नव्यानं ऐकल्यासारखं ऐकत होता. श्रुती ही काय अजाण बालिका आहे का? चांगली डॉक्टर मुलगी. तिनं सोसलं हा तिचा दोष. काका आणि मावशीला वाटतं तिला वाढविताना आपलंच काहीतरी चुकलं. कुणावर अत्याचार करायचा नाही हे संस्कार केले, पण अत्याचार सहन करायचा नाही हे शिकवायला मात्र विसरलो. याचा अर्थ आम्ही पालक म्हणून कमी पडलो..ब्ल, ब्ल, ब्ल. मला कळत नाही की तुमची पिढी असं समजते का की पालक झाल्यावर आपल्यात असा काही दैवी गुण येतो की तुमची मुलं चांगलीच निपजतील. तुम्हाला छान वाटेल अशाच पद्धतीनं वागतील. शेवटी प्रत्येक व्यक्ती हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. त्याच्या घडण्याबिघडण्याला पालक म्हणून मर्यादा असतात हे तुम्ही विसरता आणि तुमचं स्वत:चं नि एकमेकांबरोबरचं आयुष्य दु:सह करून घेता. आज मावशी आणि काका यांचं आयुष्य श्रुती, तिचा यश आणि तिचा घटस्फोट या भोवतीच फिरत राहिलं आहे.
हे सगळं लिहिताना तुमच्या भावना आम्ही समजून घेत नाही असं प्लीज समजू नका. समजून घेऊ शकतोय म्हणूनच लिहू शकतोय. आई आठवतं, लहानपणी मी एक गाणं म्हणायची. ‘मी आहे आई आणि तू आहेस बेबी, बरं का गं आई हे विसरायचं नाही. दुधाचा पेला पाहून रडायचं नाही..’ आज तुमच्या दोघांची आई होऊन सांगतीय की तुमच्या वाटय़ाला जे काय आलं आहे त्याबद्दल अजिबात चिडचिड न करता नि वाईट वाटून घेता पहिल्यासारखं वागायला लागा. एकमेकांना आवडणाऱ्या किती गोष्टी करणं तुम्ही सोडून दिलं आहे हे तुम्हाला जाणवतंय का? आई, बाहेर कुठे जाताना तू तुझ्या साडीला मॅचिंग असा बाबांचा शर्ट काढून ठेवायचीस. लग्नाच्या वाढदिवसाच्या आसपास तुम्ही एक मस्त ट्रीप करून यायचात. अलीकडे सोडूनच दिलं आहे
हे सगळं. गेल्या वर्षी मी विचारलं, ‘‘हनिमूनला कुठे जाणार?’’ तर इतका वाईट चेहरा केलात. त्यामुळे आता तुमच्या वतीनं आम्ही दोघींनी निर्णय घेतला आहे आणि तुमच्यासाठी १४ मे च्या कुलू मनालीच्या ट्रीपचं बुकिंग केलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट. डिसेंबर १६ मध्ये मी आणि रेवती आपापल्या नवीन घरात राहायला जाणार आहोत. तुमच्या आयुष्याची सेकंड इनिंग आमच्या भविष्याचं ओझं न बाळगता तुम्ही सुरू करायची आहे. हे सगळं ठरलंय, कारण आज, ‘मी आहे आई आणि..’ जेव्हा कधी तुम्हाला आमच्या आधाराची गरज भासेल किंवा आम्हाला तुमच्या सल्लय़ाची तेव्हा आपण एकमेकांसाठी असणारच आहोत की. खरं तर असं लिहिण्याची गरजच नाही.
तुमचीच, अदिती
– मृणालिनी चितळे
chitale.mrinalini@gmail.com