शरदराव आणि प्रतिमा यांच्यासारखे अनेक जण आहेत की ज्यांनी आयुष्यभर इमानेइतबारे नोकरी केली. निवृत्तिवेतन आणि ठेवींवरील व्याज यावर सुखासमाधानाने राहू शकू याची त्यांना खात्री होती; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पैशांचे अवमूल्यन ज्या वेगाने होत चालले आहे त्यामुळे ठोकताळे चुकत चालले असून त्याचा ताण नात्यांवर येऊ लागला आहे. अशा वेळी करावी लागत आहे, ‘ते’ आभाळ सांधण्याची किमया!
‘‘आत्तापर्यंत मी तुम्हाला कधीच विचारलं नव्हतं की आपल्याकडे किती पैसे आहेत म्हणून पण आज विचारावंसं वाटतंय.’’
‘‘आहेत पुरेसे.’’
‘‘पुरेसे म्हणजे किती ते नक्की सांगा.’’
‘‘तुला त्या नीलासारखी परदेश ट्रिप कराविशी वाटतेय म्हणून किती आहेत ते विचातेस का?’’
‘‘परदेशी तर राहोच पण भारतात कुठे जा म्हणालात तरी मी जाणार नाही हे तुम्हाला माहितीय. फक्त मला पुरेसे म्हणजे किती हे माहीत हवं. कारण आता पुरेसे या शब्दाची व्याख्या बदलत चालली आहे.’’ असं म्हणून प्रतिमा आत निघून गेली. आपण तिला उगाचच दुखावल्याबद्दल शरदरावांच्या मनाला चुटपुट लागून राहिली. ‘ट्रिप तर राहोच पण चैन ठरावी असा कोणताच आग्रह आणि खर्च तरुण वयातसुद्धा तिनं कधी केला नव्हता. घरच्यांना पसंत नव्हतं म्हणून पळून जाऊन केलेलं लग्न. एका खोलीत मांडलेला संसार. काटकसर तर जन्माला पुजलेली. पण तिनं कधी तक्रार केली नव्हती. छोटय़ा गावात होतो म्हणून आपली हौस म्हणून दोन खोल्यांचं घर बांधता आलं. तेही भविष्यनिधीतील रक्कम उचलून. त्यालाही ती हरकत घेत होती. एक मात्र होतं, तिला चारीधाम यात्रा करायची इच्छा होती, जी अगदीच आपल्या आवाक्याबाहेरची होती अशातला भाग नव्हता. पण काही ना काही कारणानं तो बेत पुढे ढकलला गेला. गेल्या वर्षी सगळं ठरलं आणि अचानक आपलं ह्रदयविकाराचं कारण झालं. बायपास करायला लागली. अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च झाला. अजूनही दिवसातून दोन गोळ्या घ्याव्या लागतात. एकेका गोळीची किंमत सत्तर रुपये. त्या वेळी प्रतिमा काही बोलली नाही. पण म्हणून ती आता पैशाबद्दल विचारत असेल का? का तिच्या मनात गुडघ्याची शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल? तिचे गुडघे आजकाल खूप दुखतात. चार दिवसांपूर्वी सरोज येऊन गेली. तिची बहुधा तशा प्रकारची सर्जरी झाली आहे. त्यामुळे प्रतिमाच्या मनात असं काही आलं असेल का? गुडघ्याची सर्जरी म्हणजे काही लाख रुपयांचा प्रश्न आला. कुठून आणायचे एवढे पैसे?’’ शरदरावांचे विचार वाऱ्याच्या वेगाने धावू लागले आणि पैशाच्या काळजीने ते नेहमीसारखे खूप अस्वस्थ आणि चिडचिडे झाले.
शरदराव आणि प्रतिमा यांच्यासारखे आज अनेक जण आहेत की ज्यांनी आयुष्यभर इमानेइतबारे नोकरी केली. निवृत्तिवेतन आणि ठेवींवरील व्याज यावर आपण सुखासमाधानाने राहू शकू याची त्यांना खात्री होती; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पैशांचे अवमूल्यन ज्या वेगाने होत चालले आहे त्यामुळे अनेक जणांचे सगळे ठोकताळे चुकत चालले आहेत. कुणाच्या बाबत घटत चाललेला व्याजदर कारणीभूत ठरत आहे तर काहींच्या बाबत बँक बुडाल्यामुळे वा कायमस्वरूपी ठेवींच्या संदर्भात फसगत झाल्यामुळे आर्थिक कोंडी झाली आहे. अशा वेळी भविष्यात कधी ना कधी मुद्दल परत मिळण्याची शक्यता अगदीच नसते असं नाही पण एका ठरावीक वयानंतर भविष्यावर भरवसा ठेवायची उमेद हरवून गेली असते. त्यामुळे अनेक वेळा गरजेच्या गोष्टींवर खर्च करतानासुद्धा नको इतका विचार केला जातो. या सगळ्याचा परिणाम एकच असतो; तो म्हणजे सहजीवनात कधी न जाणवलेला ताण.
आज आपल्या सर्वाची जीवनशैली अशी झाली आहे की गरज आणि चैन यामधील सीमारेषा पुसट होत चालली आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे कालपर्यंत अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आता आवाक्यात आल्यासारख्या वाटतात. पण त्याला पैशाची जोड देता येत असेल तरच. म्हणजे शारीरिक व्याधींवर उपाय उपलब्ध आहेत, पण त्यासाठी मोजावे लागणारे पैसे गाठीशी नसल्यामुळे होणारी घुसमट आणि मानसिक वेदना शारीरिक वेदनेपेक्षा अधिक ठरण्याची शक्यता असते.
विमल आणि विवेक यांची हकिगत शरदराव आणि प्रतिमापेक्षा वेगळी आहे. दोघांनी सत्तरी ओलांडली असली तरी सुदैवाने शारीरिक दुखणी त्यांच्या मागे लागलेली नाहीत; परंतु मुलासाठी पैसे खर्च केल्यामुळे आपल्याला आपली हौसमौज बाजूला ठेवावी लागत आहे आणि मुलगा मात्र चैनीत राहत आहे या कल्पनेने त्यांच्या घरात अनेक वेळा समर प्रसंग उभा राहत आहे. त्यांच्या बाबत झालं होतं असं की, त्यांच्या मुलाला नोकरीत कायम होण्यासाठी सात-आठ लाख रुपये भरणे की चारणे आवश्यक होते. विवेकची त्याला तयारी नव्हती. त्यांना वाटत होतं की, मुलाला शिकवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यानं नोकरी आपल्या कर्तृत्वावर मिळवली पाहिजे. कुणालाही पटेल असा हा विचार. पण आजूबाजूची गढूळलेली परिस्थिती पाहता हे किती अवघड आहे हे विमलताई समजून होत्या. मुलाला पैसे देण्यासाठी त्यांनी नवऱ्याची हरप्रकारे मिनतवारी केली. अखेरीस खूप विचार करून विवेकनी आपल्या म्हातारपणाच्या पुंजीतील रक्कम मुलाला कर्ज म्हणून दिली. सुरुवातीला काही महिने मुलाने ठरल्याप्रमाणे पैसे परत दिलेही, पण त्याच्या वाढत्या संसारात दर महिन्याला पैसे देणे त्याला शक्य होईनासे झाले. त्याच्या घरातील फ्रिज आणि वॉशिंग मशीन यांसारख्या गोष्टी गरजेच्या आहेत की चैनीच्या यावर विवेक काथ्याकूट करत बसतात. नुकतीच त्यांच्या मुलानं दुचाकी घेतली. त्यामुळे सतत होणारा रिक्षाचा खर्च वाचतो हे त्याचं म्हणणं विमलताईंना पटलं, पण विवेकनी ऐकूनच घेतलं नाही.
अशा प्रसंगी त्यांना कसं समजावं हे न कळल्यानं विमलताई सैरभैर होऊन जातात. छोटय़ाछोटय़ा गोष्टींसाठी तोंड उघडलं तरी बोलणं कुठल्या कुठे भरकटत जातं आणि दोघंही खट्टू होऊन बसतात. याचं नेमकं कारण काय असतं? पैशांची कमतरता? दोघांमध्ये हरवत चाललेला संवाद? का उतार वयामुळे क्षीण होत चाललेली सहनशक्ती? या प्रश्नांना एकच एक उत्तर नसतं. ते माणसागणिक आणि परिस्थितीगणिक बदलत असतं.
आपण प्रतिमेला दुखावलं या जाणिवेनं अस्वस्थ झालेले शरदराव स्वयंपाकघरात गेले तेव्हा तिच्या डोळ्यात क्वचितच येणारं पाणी पाहून कासावीस झाले. तिच्याशी बोलताना त्यांच्या लक्षात आलं की, घर बांधलं तेव्हाच घरात कुपनलिका असलेली विहीर असावी असं तिनं सुचवलं होतं. मात्र तिच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे आग्रह धरला नव्हता. हळूहळू पाण्याची समस्या गहन बनत गेली. ३-४ दिवसांतून एकदा येणाऱ्या पाण्यामुळे घरातल्या सतेलीपातेलीपासून सर्व भांडय़ांत पाणी साठवून ठेवताना तिचा जीव मेटाकुटीला येत होता. म्हणूनच तिला विहिरीचा पर्याय आवाक्यात आहे का हे अजमावयाचं होतं. पूर्वी काही हजारांत होऊ शकणाऱ्या कामाचा खर्च आता लाखात जाणार हे तिला माहीत होतं. फक्त किती ते जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी स्वत:चे दागिने मोडायची तयारी होती. हे सगळं ऐकल्यावर दागिने मोडायचे का घर मोडून जिथे पाण्याचा प्रश्न कमी आहे अशा घरात राहायला जायचं; अशा वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करायचं दोघांनी मिळून ठरवलं..
प्रतिमा आणि शरदरावांकडे पाहताना मंगेश पाडगावकरांची एक कविता आठवली. त्यातील या काही ओळी.
जेव्हा आपण प्रेम करतो,
तेव्हा आपल्या शर्टाला खिसा नसतो.
आपण असतो कोणी अनोखे
जादूगार, कंडम बरगडय़ांत,
गंध उतू जाणारी फुलबाग फुलविणारे.
मग पुढे जीभ भाजते, ओठ करपतात.
तोंडात दाटून येते कडू द्वेषाची थुंकी,
पण तो थुंकत नाही जगावर.
एकदा तरी गिळून टाकतो समजुतीने.
कारण तिने शिवले असतात तिच्या
राजाचे दोनच फाटलेले शर्ट पुन:पुन्हा
आणि तिच्या ठिगळ लावलेल्या पदराने
त्याने सांधले असते एक आभाळ.
अशी आभाळ सांधण्याची किमया ज्यांना जमते अशी जोडपी लाखात एक असतात. लाखो रुपये असूनही सोडवता येणार नाहीत असे प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकतात. नितळ मनानं आजूबाजूला पाहता आलं तर आपल्यालाही ती भेटतात. त्यांना समजून घेताना संसारात घडोघडी उमटणारे बदसूर विसरून सहजीवनाची सम साधण्याची शक्यता निर्माण होऊ शकते एवढं नक्की.
मृणालिनी चितळे
chitale.mrinalini@gmail.com