प्रौढ वयात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चा पर्याय किती जण अमलात आणू शकतील? त्यांची मुलं आईचा मित्र वा वडिलांची मैत्रीण यांचा स्वीकार करू शकतील का? घरगुती कार्यक्रम, लग्नकार्य यांमध्ये त्यांना सामावून घेतले जाऊ शकेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काळच देऊ शकेल.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे लग्न न करता एकत्र राहणं. पाश्चात्त्य समाजाच्या अंगवळणी पडलेली व आपल्याकडील तरुणवर्गात हळूहळू रुळत चाललेली पद्धती. त्या विषयीचे समज-गैरसमज, फायदे आणि त्रुटी याविषयी चर्चा करण्यासाठी एक परिसंवाद आयोजित केला होता. त्यामध्ये ३० ते ४० वयोगटांतील तरुण अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र ७० टक्क्यांपेक्षा अधिक व्यक्ती पन्नाशी ओलांडलेल्या पाहून आश्चर्य वाटलं. त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की प्रौढ व्यक्तींनाही त्याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे; फक्त जाणून घ्यायची नाही तर अमलात आणता येईल की नाही हे अजमावून पाहायचीही. प्रौढ वयात ‘लिव्ह इन’मध्ये राहणारी एकही जोडी तिथे उपस्थित नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवाची देवाणघेवाण झाली नसली तरी चर्चा भरपूर झाली. त्याचा हा वृतांत देताना ‘लिव्ह इन’चा विचार फक्त प्रौढांच्या नजरेतून केला आहे.
‘लिव्ह इन’च्या आवश्यकतेविषयी बोलताना माधुरीताई म्हणाल्या, ‘‘आजकाल माणसाचं आयुर्मान वाढलं आहे. परंतु दुर्दैवानं साठीच्या आतबाहेर जोडीदाराची साथ सुटली तर फार एकाकी वाटू लागतं. पुनर्विवाहाचा विचार मनात येतो खरा पण वाटतं, की समोरच्या माणसाला पारखून घेऊन विवाह केला पण त्याच्याशी नाही पटलं तर विनाकारण सुखाचं आयुष्य आपल्याच हातानं दु:खात लोटल्यासारखं होईल. दुसरं लग्न करून निराश झालेली वा घटस्फोटाचे व्याप-ताप सहन करणारी मंडळी मी पाहते तेव्हा सोबतीच्या गरजेसाठी ‘लिव्ह इन’ चा पर्याय सुखकर होईल असं वाटायला लागतं.’’ म्हणजे जोडीदाराशी पटेल की नाही या शंकेमुळे तरुणांच्या मनात जशी लग्न संकल्पनेविषयी धास्ती आहे तीच धास्ती प्रौढांनाही वाटत आहे.
वास्तविक पन्नाशीच्या पुढील व्यक्तींनी संसार करताना फक्त जोडीदाराचा नाही तर घरातल्या इतरांचा विचार करून अनेक तडजोडी स्वीकारत स्वत:मध्ये बदल घडवून आणले असतात. परंतु आता नवा डाव मांडताना अशा तडजोडी नको वाटतात. ठरावीक वयानंतर मनाची लवचीकता, बदल स्वीकारायची क्षमता कमी झाली असते. त्यामुळे ‘लिव्ह इन’चा पर्याय स्वीकारला तर निदान कुटुंबातल्या इतरांच्या अपेक्षा आपोआप कमी होतील, अशी आशा अनेकांनी बोलून दाखवली. हाच धागा पकडून सुमित्रा म्हणाली की, ‘‘लग्न केलं की चोवीस तास एकत्र राहणं, पतीच्या घरी जाणं गृहीत धरलं असतं. कोणत्याही वयात कायम एकत्र राहताना कुरबुरी या होतातच. त्या टाळण्यासाठी लग्न न करता दोघांच्या संमतीनं आणि खुशीनं पाहिजे तितके दिवस एकत्र आणि अधूनमधून आपापल्या घरी राहायचं ठरवलं तर अशा नात्याची गणना ‘लफडं’ या सदरात होण्याची शक्यता जास्त. अशा परिस्थितीत ‘लिव्ह इन’कडे लग्न आणि लफडं या दोन्हीला पर्याय म्हणून पाहता येईल का?’’ त्यांचाच विचार उचलून धरत अॅड्व्होकेट चांदगुडे म्हणाले की, ‘‘विवाह केला की अपेक्षा, कर्तव्य आणि हक्क या गोष्टींबाबत जे रूढ संकेत आहेत त्या पलीकडे जाऊन या वयातील स्त्री-पुरुषांना एकत्र राहण्यासाठी ‘लिव्ह इन’ पद्धती उपयुक्त ठरू शकेल. या वयात लग्न केल्यानंतर किती काळ आपण शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम राहू याची शाश्वती नसते. आपल्याला वा आपल्या जोडीदाराला अर्धागवायू, पार्किन्सन, अल्झायमर यांसारखा आजार जडला तर तो निभावून न्यायला आपण पुरे पडू शकू का, याबद्दल मनात साशंकता असते. आधीच्या जोडीदाराबरोबर या जबाबदाऱ्या निभावून नेणे तुलनेने काहीसे सुलभ असते, कारण सहवासामुळे त्याच्या बरोबरचं नातं दृढ झालं असतं. स्वभावातील कंगोरे परिचित असतात. परंतु नव्यानं लग्न केल्यावर अशी संकटं आली की भांबावून गेलेल्या काही व्यक्ती मी पाहिल्या आहेत.’’
‘‘याचा अर्थ ‘लिव्ह इन’ म्हणजे फक्त मौजमजा करण्यासाठी एकत्र यायचं आणि जबाबदारीची वेळ आली की हात झटकून मोकळं व्हायचं?’’ अशोकनं विचारलं. ‘‘अजिबात नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की लग्न झाल्यावर पती-पत्नीनं रात्रंदिवस एकमेकांची जबाबदारी घेऊन कर्तव्य बुद्धीनं निभावली पाहिजे, असं गृहीत धरलं जातं. याउलट ‘लिव्ह इन’मध्ये राहायला लागण्यापूर्वी काय काय जबाबदारी कुणी उचलावी याचा शांतपणे विचार करणं शक्य होऊ शकेल. शक्य असेल तर परस्परांमध्ये जे ठरेल ते शपथपत्र म्हणजे एमओयू पद्धतीनं लिहून काढलं तर त्यांच्यातील नात्याबाबत पुरेशी स्पष्टता येईलच, शिवाय स्वत:च्या मुलांशी असलेलं नातं, आपल्या होणाऱ्या जोडीदाराचं त्याच्याशी जोडलं जाणारं नातं आणि एकमेकांच्या मुलामुलींचं परस्परांबरोबरचं नातं अधिक पारदर्शी होण्यास मदत होईल. उदाहरणार्थ दोघांनी आपल्या स्थावर जंगम मालमत्तेविषयी घेतलेले निर्णय, आजारपण आले तर त्यासंबंधी केलेली व्यवस्था, त्याबाबतही फक्त पैशांची व्यवस्था नाही तर त्यातील कोणती जबाबदारी मुलांनी स्वीकारणं अपेक्षित आहे आणि कोणती गोष्ट आयुष्यात नव्यानं आलेल्या जोडीदारानं अशा विषयांवर मुलांना विश्वासात घेऊन त्याची नोंद करून ठेवली तर अवास्तव अपेक्षा आणि नात्यातील गुंतागुंत कमी व्हायला मदत होईल. थोडक्यात छोटय़ा-मोठय़ा गोष्टी व्यवहाराच्या निकषावर पडताळून पाहून, गरज पडली तर वकिलाचा सल्ला घेऊन एकत्र राहायचा निर्णय घेणं ‘लिव्ह इन’मुळे शक्य होऊ शकेल. एवढी काळजी घेऊनही परस्परांचं पटलं नाही तर कमीत कमी कटुता ठेवून विभक्त कसं व्हायचं याचा विचार करून ठेवता येईल. थोडक्यात, विवाह केल्यामुळे ज्या गोष्टी गृहीत धरल्या जातात आणि त्या निभावता आल्या नाहीत तर काय याविषयी मनात जी संदिग्धता राहते ती दूर व्हायला ‘लिव्ह इन’मुळे काही प्रमाणात मदत होऊ शकेल.’’
अॅड्व्होकेट चांदगुडे मांडत असलेले मुद्दे तर्कशुद्ध असले तरी अशा नातेसंबंधांना पुनर्विवाहित जोडप्याएवढी समाजात प्रतिष्ठा लाभेल का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. हा प्रश्न उपस्थित करताना मला आठवण झाली ती डॉ. रमेश देसाई आणि डॉ. ज्योती ठाकूर यांची. रमेश यांचं लग्न झाल्यावर त्यांच्या तरुण वयात त्यांना ज्योती भेटली. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांचे संबंध रमेश यांच्या घरी माहीत होते. त्यांच्या बायकोला आणि मुलांनाही ते स्वीकारावे लागले. रमेश ऐंशीच्या घरात पोचल्यावर त्यांच्या बायकोचे निधन झाले. त्यानंतर ज्योतीच्या आग्रहासाठी त्यांनी तिच्याशी विधीपूर्वक लग्न केले. या वयात लग्न करण्यामागचा उद्देश मूल होऊ देणं हा नक्कीच नव्हता. केवळ आपल्या मैत्रीला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्यांना लग्नाची गरज वाटली. या पाश्र्वभूमीवर मनात येतं की प्रौढ वयात ‘लिव्ह इन’चा पर्याय किती जण अमलात आणू शकतील? त्यांची मुलं आईचा मित्र वा वडिलांची मैत्रीण यांचा स्वीकार करू शकतील का? घरगुती कार्यक्रम, लग्नकार्य यांमध्ये त्यांना सामावून घेतले जाऊ शकेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काळच देऊ शकेल.
‘लिव्ह इन’संबंधीची चर्चा अनेक पातळ्यांवर होत असताना अशा नातेसंबंधांविषयी अनेकांच्या मनात कशा भ्रामक कल्पना असतात याचा प्रत्यय सारंग यांनी विचारलेल्या शंकेतून आला. त्यांच्या मित्राची पत्नी गेली दहा वर्षे अंथरुणाला खिळून आहे. मित्राचं वय आहे ६२. अशा अवस्थेत तिला सोडून द्यायची त्याची इच्छा नाही. परंतु कधी पार्टीला वा प्रवासाला जाण्यासाठी त्यांच्या ‘इभ्रतीला शोभेल’ अशा स्त्रीबरोबर त्यांना ‘लिव्ह इन’मध्ये राहता येईल का? हा विचार कुणालाच पटला नाही. जोडीदार जिवंत असेल वा कायदेशीररीत्या त्याच्याशी घटस्फोट घेतला नसेल तर अशा संबंधांना ‘लिव्ह इन’चं लेबल लावलं म्हणून त्याला नैतिक अधिष्ठान वा सामाजिक प्रतिष्ठा मिळू शकेल, ही अपेक्षा बाळगणं पूर्णपणे चुकीचं आहे. आज समाजात अशा काही व्यक्ती आहेत की ज्या वैवाहिक जीवनात सुखी-समाधानी नाहीत परंतु घटस्फोट घेण्यासारखी परिस्थिती नाही वा त्यांच्यात हिंमत नाही अशा व्यक्तींना ‘लिव्ह इन’चा पर्याय खुणावत आहे. परंतु तो पूर्णपणे गैरसमजांच्या निकषावर आधारित आहे.
थोडक्यात, चर्चेचा निष्कर्ष निघाला तो असा की ‘लिव्ह इन’ म्हणजे केवळ मौजमजा करण्यासाठी जोडीदार आणि जबाबदारी पडली तर त्यातून पळवाट काढण्याची मुभा असं नाही. तर ‘लिव्ह इन’ म्हणजे आयुष्यात नव्यानं आलेल्या जोडीदारासोबत केलेले वानप्रस्थाश्रमातील सहजीवनाचे अर्थपूर्ण नियोजन आणि नात्याचं ओझं न बाळगता एकमेकांच्या सोबत केलेली वाटचाल.
मृणालिनी चितळे
chitale.mrinalini@gmail.com