वय वाढतं. शरीर थकतं. कालपरवापर्यंत हौसेहौसेनं सजवलेलं घर वादाला कारणीभूत ठरू लागतं. परंतु या वादातही जोवर संवाद असतो आणि मतभेदांमध्ये कडवटपणा नसतो तेव्हा यातूनही मार्ग काढता येतो. जसा सतीश आणि निमा यांनी शंतनूचं घर पाहून आल्यावर काढला. अंथरूण पाहून पाय पसरावेत.. या वाक्प्रचाराचा वेगळाच मथितार्थ त्यांच्यासमोर आला.
सतीश घरात आला तेव्हा दिवाणखान्यात कुणी नव्हतं. टी.व्ही. मात्र चालू होता. रिमोट घेऊन तो सोफ्यावर ऐसपैस पसरला. आपला दुखरा पाय त्यानं टीपॉयवर ठेवला. चॅनल बदलून बातम्या लावल्या. आवाजही वाढवला. आतून निमा बाहेर आली. म्हणाली, ‘‘टी.व्ही. मी लावला आहे. मला मॅच बघायची आहे.’’
‘‘काही अर्थ राहिला आहे का आता क्रिकेटमध्ये? सगळं फिक्स केलेलं. तरी आपण आपलं श्वास रोखून पाहायचं.’’
‘‘बातम्यांमध्ये तरी असं काय घडतं रे. चर्चेच्या नावाखाली नुसती भांडणं लावतात. तुला पाहायच्याच असतील बातम्या तर बेडरूममध्ये जाऊन बघ. इथला टी. व्ही. मी आधी लावला आहे.’’
‘‘निमाताई, आपलं वय किती आहे ते माहीत आहे ना! साठ पूर्ण. तरी अगदी चौथी ‘क’ मध्ये असल्यासारख्या भांडता आहात.’’
‘‘हे बघ मला चौथी ‘क’ म्हण किंवा चौथी ‘फ’मध्ये ढकल. माझ्या वागण्यात आता काही फरक पडणार नाही. दे तो रिमोट.’’
नाईलाजानं उठत तो जिना चढायला लागला. चढताना तो लंगडत असल्याचं तिला जाणवलं. ‘‘काय रे काय झालं?’’
‘‘कुठं काय?’’ असं म्हणत त्यानं भराभर पायऱ्या चढायचा प्रयत्न केला. पण तिनं त्याला काही ढांगात त्याला गाठलं. कॉलेजमध्ये असताना ती उभा खो खो खेळायची. याची त्याला आठवण झाली. ‘‘काय झालंय?’’
‘‘पायाला जरा लागलं आहे. स्कूटर घसरली.’’
‘‘बघू?’’ तिनं त्याला जिन्यातच बसवलं. गुडघा चांगलाच फुटला होता. शिवाय १/२ ठिकाणी काळंनिळं झालं होतं.
‘‘कितीदा तुला सांगितलं की गावात स्कूटर नेत जाऊ नको.’’
‘‘पण माझी काही चूक नव्हती. सायकलवाला मध्येच कलमडला.’’
‘‘असं होणारच. या वयात आपण नको का जपून राहायला?’’
‘‘हे बघ माझं वय काढायचं कारण नाही.’’
‘‘आता का झोंबलं? मघाशी माझं वय काढत होतास तेव्हा बसले नं मी गप्प. आता मुकाटय़ाने वर चल. मला ड्रेसिंग करू दे.’’
खोलीत गेल्यावर तिच्या लक्षात आलं की ड्रेसिंग करण्याचा डबा खाली राहिला आहे. खाली जाऊन ती डबा घेऊन आली. त्यानंतर परत खाली जाऊन
टी. व्ही. पाहायचा तिचा उत्साह मावळला. तिनं स्वयंपाक उरकून टाकायचं ठरवलं. तिथं जाण्यासाठीसुद्धा परत सहा सहा पायऱ्या उतरणं भाग होतं. स्वयंपाक झाल्यावर तिनं तिथंच बसून पेपर चाळला. जेवणाची पानं घेऊन सतीशला हाक मारली. जेवायला सुरुवात करणार तो दाराची बेल वाजली. तिनं सतीशकडे पाह्य़लं. त्यानं पायाकडे बोट केलं. मुकाटय़ानं उठून ती दार उघडायला खाली गेली. हेमंत आला होता.
‘‘सत्या जिममध्ये चष्मा विसरला. तो द्यायला आलोय.’’
‘‘वरच ये.’’
‘‘वरखाली करून तुम्हाला दमायला नाही का रे होत?’’ हेमंतनं सतीशला विचारलं.
‘‘न व्हायला काय झालं! मला तर कधी कधी वाटतं घर बांधताना आम्ही दोघांनी अक्कल गहाण टाकली होती. पंचविशीत नव्हतो रे. चांगली पन्नाशी ओलांडली होती. तरी फारसा विचार केलाच नाही.’’
‘‘तर काय! तो आर्किटेक्ट एकेक भन्नाट आयडिया सुचवत होता आणि आम्ही हुरळून जात होतो. त्यातून माझी नोकरी आणि याची फिरती. दोन्ही मुलं परदेशी. त्यामुळे कुणाला फारसं लक्ष द्यायला झालंच नाही आणि हे असं डय़ुप्लेक्स का ट्रीप्लेक्स घर बांधून ठेवलं.’’
‘‘आम्ही आपलं अंथरूण पाहून पाय पसरायला हवे होते बघ.’’
‘‘सतीश, तू कुठली तरी म्हण कुठे तरी वापरतो आहेस.’’ निमा चिडून म्हणाली, ‘‘एवढं मोठं घर बांधायची आपली ऐपत नव्हती, असं म्हणायचं आहे का तुला?’’
‘‘असं कधी म्हणलं मी?’’
‘‘अंथरूण पाहून.. या म्हणीचा अर्थ तोच होतो.’’
‘‘उगाच शब्दांचा किस पाडत बसू नका रे. घर बांधताना गध्धे पंचविशीत नव्हतात पण अलीकडे भांडता मात्र तसेच. बाय द वे आज संध्याकाळी शंतनूकडे वास्तुशांतीला जायचं लक्षात आहे ना? त्यानं तर म्हणे पाच हजार चौरस फुटांचा बंगला बांधलाय. चला निघतो मी. खूप घाईत आहे.’’
मागचं आवरून निमा खोलीत आली तर फूल स्पीडमध्ये पंखा सुरू होता. ‘‘आज हवा बरी आहे.’’ असं म्हणत तिनं पंखा कमी केला.
‘‘मला उकडतंय.’’
‘‘तर मग ए.सी. लावू या.’’
‘‘तुला माहितीय ए.सी.मुळे माझं नाक चोंदतं.’’
‘‘आणि भन्नाट पंख्यामुळे माझं डोकं दुखतं. बरं दुसऱ्या खोलीत झोपावं म्हणलं तर या घरातील एक खोली वरती तर दुसरी तळ मजल्यावर पार टोकाला. आता भर दुपारी पांघरूण घेऊन झोपते झालं.’’
संध्याकाळी सतीश आणि निमा शंतनूकडे गेले. अगडबंब बंगला पाहून सतीश निमाला म्हणाला, ‘‘घर आहे का राजवाडा! कळेल हळूहळू मजा.’’ घरात गेल्या गेल्या प्रशस्त हॉल होता. एका बाजूला अद्ययावत सुखसोयींनीयुक्त स्वयंपाकघर. दुसऱ्या बाजूला ऐसपैस बेडरूम. ‘‘छान आहे बेडरूम.’’ सतीश शंतनूला म्हणाला. ‘‘थँक्स. पण ही बेडरूम नाही. गेस्ट रूम आहे.’’
‘‘या स्टॅण्डर्डनं तुमची बेडरूम म्हणजे बेडहॉल असणार लेका.’’
परंतु शंतनूची बेडरूम गेस्टरूमच्या निम्मीसुद्धा नव्हती. डबलबेड कपाट. टी. व्ही. कॉम्प्युटरचे टेबल. ‘‘ही माझी खोली आणि शेजारी अगदी अशीच वीणाची. कोपऱ्यातल्या दारानं दोन्ही खोल्या जोडलेल्या आहेत.’’
‘‘म्हणजे?’’ निमानं आश्चर्यानं विचारलं.
‘‘म्हणजे असं की दोन स्वतंत्र बेडरूम्सची सोय करून ठेवली आहे. आजकाल काय होतं मी हवा छान आहे असं म्हटलं की वीणाला उकडत असतं. आणि मला झोप लोटते तेव्हा तिला कपाटं आवरायची हुक्की येते.’’
‘‘शिवाय तिला टी. व्ही. सीरिअल बघायची असते तेव्हा तुला ‘टाइम्स नाऊ’,’’ सतीश म्हणाला.
‘‘करेक्ट, शिवाय बाथरूम ओली का झाली? पहाटेचा गजर साडेपाचचा लावायचा का पावणेसहाचा? असे छोटे-मोठे मुद्दे असतातच. तेव्हा ठरवलं, हवं तेव्हा स्वतंत्र आणि हवं तेव्हा सोबत राहता येईल असंच घर बांधायचं. दोन गेस्टरूम मात्र प्रशस्त बांधल्या. मुलांसाठी. ती आली की त्यांना आरामात राहता यावं म्हणून.’’
‘‘वरच्या मजल्यावर काय आहे?’’
‘‘मोठा हॉल आहे. तिथं जिम करायची कल्पना आहे. त्या निमित्तानं अवतीभोवती तरुणाईचा वावर राहील. त्यावर गच्ची. खूप दिवस बाग करायची इच्छा होती. तीही पूर्ण होईल. घराबाहेरून लिफ्टची सोय केली आहे.’’
निमाच्या डोळ्यांसमोर तिची टेरेस गार्डन उभी राहिली. सुरुवातीला हौसेनं जमवलेली फुलझाडं. वर्मिकल्चर करून पिकवलेला भाजीपाला. पुढे माळ्याच्या दांडय़ा, अजून एक जिना चढायचा येणारा कंटाळा. यापायी हळूहळू कोमेजून गेलेली बाग.
जेवणाचा आस्वाद घेऊन सतीश आणि निमा घरी जायला निघाले. गाडीत दोघंही गप्प होते. निमाला आठवलं दुपारी सतीश म्हणाला होता की अंथरूण पाहून पाय पसरावेत तेव्हा तिनं त्याचं म्हणणं खोडून काढलं होतं. पण आत्ता तिला या वाक्प्रचाराचा मथितार्थ समजला असल्याचं जाणवलं. ठरावीक वयानंतर स्वास्थ्य मिळविण्यासाठी फक्त पुरेसा पैसा उपयोगी ठरत नसतो तर अनेक गोष्टींचा विचार करून पसारा किती वाढवायचा हे ठरवायला लागतं.
‘‘मी तरी ठरवून टाकलंय..’’ सतीशच्या शब्दानं ती भानावर आली.
‘‘काय ठरवलं आहेस?’’
‘‘म्हणजे एकमेकांशी बोलल्यावर.. आपण दोघांनी मिळून ठरवू या..’’
‘‘काय?’’
‘‘हे घर पाडून नव्यानं बांधायचं..’’
‘‘काहीतरी काय?’’
‘‘हे बघ निमा, आत्ताच आपल्याला किती त्रास होतोय. तो कमी करायचा असेल तर आपण घर तरी बदलू या किंवा नव्यानं बांधू या. यापैकी काहीतरी एक करायची आपल्यात अजून धमक आहे. पण अजून दहा वर्षांनी असं काही मनात आणलं तर शक्य होईल? तेव्हा..’’
‘‘तेव्हा तुझ्याच शब्दात सांगायचं तर ‘आहे काय नि नाही काय, अंथरूण पाहून पसरावेत पाय,’’ असं म्हणून दिलखुलासपणे हसत तिनं टाळी देण्यासाठी हात पुढे केला.
chitale.mrinalini@gmail.com