पन्नाशीनंतर परस्परांमधील नातं सुदृढ ठेवण्याचे काही पर्याय आहेत, एकत्र कुटुंब, निवृत्तीनंतरचा राजाराणीचा संसार वा वृद्धाश्रम, यातील कोणत्याही पर्यायाचा सहजीवनावर होणारा परिणाम, तो पर्याय कुणी आणि का निवडला यावर अवलंबून असतो. दोन पिढय़ांमधील दुवा बनायचं की स्वत:चं ‘सॅण्डविच’ करून घ्यायचं, हे वेळेतच ठरवायला हवं. ‘सॅण्डविच पिढी’ या लेखाचा (७ मे)हा उत्तरार्ध.

एकोणीसशे त्र्याऐंशीची गोष्ट. माझं लग्न होऊन तीन एक र्वष झाली होती. एक दिवस माझ्या सासूबाईंनी आम्हा दोघांना बोलावून सांगितलं की, आता तुम्ही वेगळं बिऱ्हाड करायचं. ‘‘पण का? आपल्या दोघींचं तर किती छान जमतं.’’ मी भाबडेपणानं विचारलं. त्यावर मंदसं हसत त्या म्हणाल्या, ‘‘अगं, आम्हाला तीन मुलगे झाले तेव्हाच मी आणि तुझ्या सासऱ्यांनी मिळून ठरवलं होतं की, तीनही मुलांना त्यांच्या लग्नानंतर २/३ वर्षांत वेगळं बिऱ्हाड करून द्यायचं. एक तर तरुण वयात स्वतंत्र राहिलं की जबाबदारीची जाणीव पटकन येते. दुसरं म्हणजे एकत्र कुटुंबामुळे घरातील सर्व जण एकमेकांत फार गुंतून पडतात. तुम्हीच नाही तर आम्हीसुद्धा. उद्या माझ्या १०/१५ मैत्रिणींना मी बोलवायचं ठरवलं तर मला तुझासुद्धा विचार घ्यायला पाहिजे की नको. शिवाय हे बघ, तुझ्या आईवडिलांना चार दिवस मुलीकडे येऊन राहावंसं वाटलं तर आपण एकत्र राहात असताना ते विनासंकोच येऊ शकतील?’’ त्यांचं बोलणं ऐकताना सर्वाच्या स्वास्थ्याचा आणि माणसामाणसातील नातेसंबंधांचा त्यांनी किती खोलवर जाऊन विचार केला आहे याची प्रचीती आली.
त्या वेळची आमची आर्थिक परिस्थिती तिन्ही मुलांना वेगळे फ्लॅट्स घेऊन देण्यासारखी नव्हती. आमच्या पन्नास र्वष जुन्या घरात प्रत्येकाच्या वाटय़ाला दोनअडीच खोल्या आल्या. आमचा नवा संसार मांडून देताना पुरेशी भांडीकुंडी, वर्षभराचं धान्य, महिन्याचं वाणसामान आणि आठवडय़ाभराची भाजी आणून देऊन आमच्या घराच्या किल्ल्या त्यांनी आम्हाला सुपूर्द केल्या आणि त्याबरोबर जबाबदारीची जाणीवही. मग एकाच इमारतीत राहात असताना म्हटलं तर आम्ही स्वतंत्र होतो म्हटलं तर एकत्र. कुणाकडे अचानक पाहुणे आले तर पोळ्यांपासून फ्रिजमधल्या पदार्थापर्यंतची देवघेव इतकी बिनबोभाट व्हायची की, कुणालाही वाटावं की आमच्याकडे द्रौपदीची थाळीच आहे. कामानिमित मी घराबाहेर असले की माझ्या मुली आपलं ताट घेऊन आजीकडे जेवायला जायच्या. नावडती भाजी असली की आपल्या नि आजीच्या ताटाची खुशाल अदलाबदल करायच्या. आजी-आजोबांचा पलंग म्हणजे तर ‘नातूकट्टा’ असायचा. आमच्या मागच्या पिढीनं दाखवलेल्या कल्पकतेमुळे आणि दूरदृष्टीमुळे त्यांचं सहजीवन तर समृद्ध झालंच, पण तरुण वयापासून स्वयंपूर्ण सहजीवनाचे धडे आम्हाला गिरवता आले.
अशा प्रकारे स्वतंत्र राहण्याचा आनंद ज्यांना दोन खोल्या घेणंसुद्धा परवडू शकत नाही त्यांना उपभोगता येणार नाही किंवा एकत्र राहणाऱ्या तीन पिढय़ांची नेहमी घुसमट होत असते असंही नाही. पण सर्वाना सांभाळून घेण्याच्या नादात जेव्हा सर्वाची त्रेधातिरपिट उडत असते आणि शक्य असूनही जे नवीन घर घेताना ‘स्वतंत्र तरीही एकत्र’ राहण्याचा पर्याय स्वीकारत नाहीत त्यांच्या वाटय़ाला मात्र सॅण्डविच पिढीची फरफट येते. सॅण्डविच फक्त दोन पिढय़ांमध्ये होत नसतं तर तणावग्रस्त नातेसंबंधांमुळेही होतं. सासू-सुनेचं पटत नसेल तर स्वत:चं मत नसलेला ‘तो’ तर बिच्चारा होतोच पण पतिपत्नींमधील नातंही बिच्चारं होऊन जातं. कधी कधी तर सून आली तरी मधल्या पिढीतील स्त्रीचं सूनपण आणि तिच्या नवऱ्याचं मूलपण संपलेलं नसतं. यातून बाहेर पडण्यासाठी काय मार्ग असतात याचा विचार करताना सुनीता डोळ्यासमोर आली. तिच्या मुलाने तीन बेडरुम्सचा ऐसपैस फ्लॅट घेतल्यावर सगळ्यांनी तिथं राहायला जायचं हे मुलानं गृहीत धरलं. सुनीता नि शेखर तिथे गेलेही पण म्हणून त्यांनी पहिला फ्लॅट काढून टाकला नाही. पंधरा दिवस मुलाबरोबर नि पंधरा दिवस आपल्या पहिल्या जागेत राहण्याचा शिरस्ता त्यांनी पाडला. कुमुद नि सुहासनं मात्र मुलानं ‘रो हाऊस’ घ्यायचं ठरवल्यावर आपला फ्लॅट विकून आलेले पैसे मुलाच्या जागेत गुंतवले. आज ती दोघे ताट द्यावं पण पाट देऊ नये, या उक्तीचा अनुभव घेत हळहळत आहेत. जयंत आणि कल्पनाने अगदी वेगळा पर्याय निवडला. लग्न झालं तेव्हा घरात आईवडील, आजीआजोबा. माणसांचा प्रचंड राबता. लहान असल्यामुळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही नि तुलनेनं जबाबदारीही कमी. त्यामुळे एकत्र राहण्यातील सर्व फायदेतोटे, सुखदु:खं त्यांनी अनुभवली. पण मुलाचं लग्न झाल्यावर हे सगळं असंच चालू राहावं असं त्यांना वाटत नव्हतं नि स्वत: वेगळं राहणंही प्रशस्त वाटत नव्हतं. मग त्यांनी एक छोटा फ्लॅट घेतला. रात्रीची जेवणं झाली की कल्पना आणि जयंत झोपायला तिकडे जातात. सकाळी ब्रेकफास्ट करून परततात. या ‘बेड अ‍ॅण्ड ब्रेकफास्ट’ प्रकरणामुळे थोडी धावपळ वाढली, पण त्याबरोबर मानसिक स्वस्थता नि दोघांमधील ‘बीईंग टुगेदर’ची भावनाही. पंचावन्नच्या पुढचं वय असं असतं की तरुण वयात राहून गेलेल्या अगदी क्षुल्लक गोष्टी, मग त्या सकाळी उठून दोघांनी मिळून फिरायला जायच्या असोत वा अजून काही, त्या पूर्ण करायची आस असते. इथून पुढे किती र्वष आपण शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम राहणार आहोत याची शाश्वती नसते. या वयात सदासर्वकाळ एकमेकांबरोबर गुजगोष्टी करायच्या नसतात. पण दिवसातील काही वेळ एकमेकांसोबत राहून आलतूफालतू गोष्टींवर जरी गप्पा झाल्या तरी नात्याची वीण घट्ट व्हायला मदत होते.
पन्नाशीनंतर परस्परांमधील नातं सुदृढ ठेवण्याचे हे काही पर्याय. यामध्ये वृद्धाश्रमाचा पर्याय कुणी स्वखुशीनं निवडत असेल का? एखाद्याचे आईवडील वृद्धाश्रमात राहतात असं ऐकलं की आपल्या भुवया उंचावल्या जातात. त्यांचं आपल्या मुलामुलींशी पटत नसणार हे गृहीत धरलं जातं. परंतु अशीही काही जोडपी आहेत की जी योजनापूर्वक आणि स्वखुशीनं वृद्धाश्रमाचा पर्याय निवडतात. त्यांची मनोभूमिका जाणून घेणं मला अगत्याचं वाटलं. वामन आणि शकुंतला जोग यांच्या रूपानं असं जोडपं मला भेटलंही. त्यांचं वय अनुक्रमे ८६ नि ८१. वामनरावांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर काही र्वष कन्सल्टिंग केलं. त्यानंतर काही र्वष मुलाबरोबर नाशिकला एकत्र राहण्याचा अनुभव घेतला. मुलाकडे राहताना त्यांना स्वतंत्र खोली होती पण शेवटी हॉल एकच. मुला-नातवंडानी सामावून घेण्याचा प्रयत्न केला तरी गप्पांचे विषय वेगळे. त्यामुळे सगळ्यांचीच कुचंबणा. पुण्याला त्यांचा फ्लॅट होता. पत्नीसह ते तिथं राहायला लागले. हाताशी स्कूटर असल्यानं मन:पूत हिंडणं, नाटक, चित्रपट पाहणं, मित्रमंडळींना भेटणं असा दिनक्रम म्हणजे निवृत्तीचं आयुष्य आनंदात व्यतित करणं चालू होतं. पण हळूहळू शरीर थकायला लागलं. घराच्या शंभर पायऱ्या चढणं-उतरणं जड जायला लागलं. विचारांती त्यांनी वृद्धाश्रमाचा पर्याय निवडला. वृद्धाश्रम निवडताना तिथं जेवणघर असणं, प्रत्येकासाठी स्वतंत्र टॉयलेट असणं, खोलीमध्ये फ्रिज, टी.व्ही. इत्यादी वस्तू ठेवायची आणि जुजबी स्वयंपाक करायची परवानगी असणं अशा गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिलं. पुढेमागे आजारपण आलं आणि आया ठेवायची वेळ आली तर अडचण येऊ नये म्हणून दोघांसाठी दोन खोल्या घेतल्या. वृद्धाश्रमातील फायद्यांविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘घरी राहून कामाला बाई ठेवली तरी रोज तिची वेळ सांभाळणं, उरलेल्या अन्नानं फ्रिज भरणं आलं. शिवाय काही आवडलं नाही तर नावं ठेवायची चोरी. काम सोडून जाण्याची टांगती तलवार. या सगळ्या व्यापा-तापातून इथे आल्यावर सुटका झाली. इथे आम्ही कधीही पत्ते वा बुद्धिबळ खेळू शकतो. बाहेरून काहीबाही आणून समवयस्कांबरोबर पार्टी करतो. इथे आल्यामुळे आमच्या मुलानातवंडांसकट आम्हा दोघांना मोकळीक मिळाली. कधी ते आमच्याकडे राहायला येतात. कधी आम्ही त्यांच्याकडे. खऱ्या अर्थानं आम्ही वानप्रस्थाश्रमातील आयुष्य जगत आहोत.’’
एकत्र कुटुंब, निवृत्तीनंतरचा राजाराणीचा संसार वा वृद्धाश्रम यातील कोणत्याही पर्यायाचा सहजीवनावर होणारा परिणाम, तो पर्याय कुणी आणि का निवडला यावर अवलंबून असतो. कुटुंबातील सदस्यांमधील दुजाभाव, कडवटपणा, तिटकारा अशा नकारात्मक भावनेमधून यातील कोणताही पर्याय नाइलाज म्हणून निवडला असेल, कुणावर लादला गेला असेल तर पतीपत्नीच्या नात्यावर त्याचे ओरखडे उमटल्याशिवाय राहात नाहीत. उलट कुटुंबातील सर्वाशी संवाद साधून जर तो प्रत्यक्षात उतरवला असेल तर पतीपत्नीच्या नात्यातील प्रसन्नता तर वाढतेच, पण असं जोडपं खऱ्या अर्थानं दोन पिढय़ांमधील दुवा बनून राहातं.
chitale.mrinalini@gmail.com