स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ३/४ वर्षांनी अविनाशनं १/२ ठिकाणी काम करायचा प्रयत्न करून पाहिला होता. पण एक तर मनासारखं काम नसायचं. शिवाय ज्या वेगानं तंत्रज्ञान बदलत चाललं आहे तो वेग आपल्याला पकडता येईल का याची मनात साशंकता असायची. आत्मविश्वासच हरवत चालल्याचं जाणवायचं.
‘‘हॅलो आई, मी आणि दीदीनं या शनिवार-रविवार महाबळेश्वरला जायचं ठरवलंय. तुम्ही दोघंही चलाना.’’ आरती म्हणत होती.
‘‘आलो असतो गं, पण या सोमवारी आमची डॉक्टर जोश्यांची अपॉइंटमेंट आहे. सकाळी लिपीड प्रोफाइल आणि शुगर टेस्ट करायचीय. म्हणजे चौदा तास फास्टिंग आलं.’’
‘‘मग अपॉइंटमेंट पुढे ढकला. दोघांनाही डायबेटिस नाही की कोलेस्ट्रोल. रुटिन टेस्ट्स तर आहेत.’’
‘‘तुझ्या बाबांना विचारून बघते. पण तुला माहितीय, एकदा ठरलं की त्यांना कशात बदल केलेला आवडत नाही. वर्षांनुवर्षांची सवय.’’
‘‘नोकरी होती तेव्हा ठीक होतं, पण आता व्ही.आर.एस. घेऊन इतकी र्वष झाली तरी त्यांचं ‘वेळच्या वेळीच’ हे पालुपद संपत नाही. तूही त्यांची री ओढत असतेस. विचारून तरी बघ.’’
‘‘बघते.’’ असं म्हणून नीलानं फोन ठेवला.

नीला ‘बघते’ असं म्हणाली असली तरी ती अविनाशला विचारणार नव्हती. कारण तो अपॉइंटमेंट बदलून घेणार नाही याची तिला खात्री होती. इतकी र्वष एकमेकांसोबत राहिल्यावर एवढा अंदाज आला नसता तरच नवल. दुसरं म्हणजे आता या वयात त्याच्याशी वाद घालून एकटीनं जाण्याचा उत्साह तिलाही राहिला नव्हता. ‘या वयात’ या शब्दाशी ती स्वत:शीच अडखळली. नुकतीच त्यानं साठी ओलांडली होती आणि ती त्याहून लहान. आजच्या काळाचा विचार केला तर ‘वय झालं’ असं म्हणण्याचं दोघांचं वय नक्कीच नव्हतं. मुलींना तर वयाचा उल्लेख केलेला अजिबात आवडायचा नाही. त्यांचं आपलं सारखं टुमणं असायचं की तुम्ही हे करून बघा, तो क्लास लावून बघा. एंगेज राहा. दोघीजणी तळमळीनं सांगायच्या तेव्हा आईबाबांना दुखवण्याचा त्यांचा हेतू नसायचा, पण त्या हे विसरायच्या की त्यांच्या आईबाबांनी वयाच्या वीसबाविसाव्या वर्षांपासून अखंड धावपळ केली आहे. अविनाश तर त्या वयात दिवसाचे १२/१४ तास काम करायचा. नोकरी सांभाळून त्यानं एम.बी.ए. केलं. त्याच्या कष्टाचं आणि हुशारीचं चीज होऊन चाळिसाव्या वर्षी तो व्यवस्थापक पदाला पोचला. त्यानंतर मात्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत त्याच्या मल्टीनॅशनल कंपनीतील कामाचं स्वरूप पालटत गेलं. ठरावीक लक्ष्य गाठण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्लृप्त्या, घ्याव्या लागणाऱ्या कोलांटउडय़ा याला कंटाळून त्यानं वयाच्या चोपन्नाव्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घ्यायची ठरवली. ती घेताना हातात भल्यामोठय़ा रकमेचा चेकही पडला. अगदी शंभर र्वष आयुष्य लाभलं तरी पैशाची ददात पडणार नाही एवढा मोठा. दोन्ही मुलींची लग्नं झाल्यामुळे सांसारिक जबाबदाऱ्या संपल्यात जमा होत्या. नोकरी सोडण्याचा निर्णय अविनाशनं अगदी विचारपूर्वक घेतला. ‘पण नोकरी सोडण्यात आपला मात्र थोडा अविचारच झाला का?’ बी.एड. झाल्या झाल्या नोकरी करायला लागल्यामुळे वयाच्या पन्नाशीला तिला मुख्याध्यापक होण्याची संधी चालून आली. पण त्यासाठी बदलीच्या गावी जाणं भाग होतं. छोटं गाव. नवीन माणसं. नवी आव्हानं. त्याच शाळेत राहायचं तर तिच्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं कमी असलेल्या माणसांच्या हाताखाली काम करायला लागणार होतं. मग तिनंही स्वेच्छानिवृत्ती घ्यायची ठरवली. आत्तापर्यंतच्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करायला हे वय कसं योग्य आहे हे अविनाशनंही तिला पटवलं. रोज सकाळी फिरायला जाणं, मनात येईल तेव्हा नाटक-सिनेमा, वर्षांतून दोन सहली. एक भारतात. एक परदेशात. पण काही वर्षांत या सगळ्याचंही रुटीन बनून गेलं. त्यातला उत्साह हरवून गेल्यासारखा वाटायला लागला आणि आता तर साधं महाबळेश्वरला जायचं तर विचार करावासा वाटायला लागला. वेळेआधी निवृत्ती स्वीकारून आपण अवेळीच म्हातारपणही ओढवून घेतलं का?

‘‘कुणाचा फोन होता मघाशी?’’ चहाचा कप पुढे करत अविनाशनं विचारलं.
‘‘आरतीचा. ती आणि मानसी शनिवार-रविवार महाबळेश्वरला जायचं ठरवताहेत. आपल्याला चला म्हणताहेत.’’
‘‘कसं शक्य आहे? तू तिला हो नाहीना म्हणालीस?’’
‘‘म्हणणार होते, पण तुमच्या धाकानं नाही म्हणाले.’’
‘‘माझा धाक? तुझ्यासारख्या शिक्षिकेला कुणाचा धाक असेल असं वाटत नाही.’’
‘‘बाई शिक्षिका असो वा मुख्याध्यापिका. घरात तिला मत असतं? उगाच तुमचं ऐकलं आणि प्रमोशनचा चान्स सोडला.’’
या वाक्यानं व्हायचा तो स्फोट झालाच. शब्दाला शब्द वाढत जाऊन अविनाश बाहेरच्या खोलीत निघून गेला. नीलाला कळत नव्हतं की महाबळेश्वरला जायचं नाही हे आपण मघाशीच ठरवलं तरी आत्ता आपण वाद का घातला? केवळ रिकामपणचा उद्योग म्हणून? का छान काही बोलायला विषय नाही
म्हणून? नोकरी करत होतो तेव्हापेक्षा आपली भांडणं वाढतच चालली आहेत.
थोडय़ा वेळानं ती खोलीत गेली तेव्हा अविनाश फाइलमध्ये डोकं घालून बसला होता. एक कागद दाखवत म्हणाला, ‘‘बघ गेल्या महिन्यात माझं बी.पी. ८५/१३० होतं आणि फास्टिंग शुगर १२०.’’
‘‘पण यात काळजी करण्यासारखं काही नाही असं डॉक्टर म्हणाले होते.’’
‘‘काळजी करण्यासारखं नाही, पण काळजी घेण्यासारखं आहे असं म्हणाले होते. अजयचं माहिती आहे ना, दुर्लक्ष केलं आणि हार्टवर गेलं.’’
‘‘तुम्हाला आजारापेक्षा आजारी पडण्याची भीती जास्त आहे.’’
‘‘मला? आणि तुझं काय? परवा चष्मा सापडत नव्हता तर केवढी अस्वस्थ झाली होतीस? शिवाय संगीताच्या मुलाचं नाव आठवत नव्हतं तर तुला वाटायला लागलं की ही अल्झायमरची सुरुवात.’’
‘‘वाटणारच. संगीता नि मी सारख्या भेटतो तरी..’’
‘‘पण म्हणून लगेच अल्झायमर? लगेच शब्दकोडं काय सोडवायला लागलीस. त्यापायी दर चार दिवसांनी दूध उतू जायला लागलं.’’

‘‘त्याचा नि याचा काही सबंध नाही. पूर्वीही जायचं. आता तुम्ही घरात नको इतकं लक्ष घालता म्हणून लक्षात येतंय.’’
‘‘नको इतकं? तुला मदत व्हावी हा उद्देश असतो. पण तुला त्याची किंमत नाही. उलट माझ्या चुका काढत असतेस. चहासाठी हेच का भांडं वापरलं नि काय? कंपनीत मॅनेजर म्हणून काम केलं. आता कुणी विचारलं काय करता तर सांगतो की घरकाम.’’
खरंतर स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ३/४ वर्षांनी अविनाशनं १/२ ठिकाणी काम करायचा प्रयत्न करून पाहिला होता. पण एकतर मनासारखं काम नसायचं. शिवाय ज्या वेगानं तंत्रज्ञान बदलत चाललं आहे तो वेग आपल्याला पकडता येईल का याची मनात साशंकता असायची. आत्मविश्वासच हरवत चालल्याचं जाणवायचं. कधी कधी वाटायचं की आर्थिक चणचण असती तर जरा हातपाय हलवले असते. पण तोही प्रश्न नव्हता. मग रोज काय करायचं हा प्रश्न उरायचा. त्यांची ही अवस्था बघून आरती, मानसी सुचवायच्या, ‘तुम्ही प्रदीपकाकासारखं काही सोशलवर्क का नाही करत किंवा मीनामावशीकडे बघा, संधिवात असून तिनं तिचे क्लासेस चालू ठेवले आहेत.’ तेव्हा तो काही बोलायचा नाही, पण त्याला सांगायचं असायचं की सोशलवर्क काय किंवा इतर गोष्टी या वेळ आहे म्हणून नाही करता येत. तर वेळात वेळ काढून करण्याचा प्रयत्न केला तर आयुष्याच्या संधिकाली जास्तीचा वेळ मिळाला की अधिक जोमानं करता येतात. त्यासाठी स्वत:ला घडवायला लागतं. त्यांच्या भाषेत बोलायचं तर स्वत:ला ग्रूम करायला लागतं. आयुष्यभर नोकरीच्या चक्रात फिरताना स्वत:ला घडविण्यासाठी वेळ काढायचा राहूनच गेला का? आणि आता वेळ आहे, पण त्याचं काय करायचं हे कळेनासं झालं आहे.

बाहेर मानसीची चाहूल लागली म्हणून अविनाश ताडकन उठला. पायात एक कळ आली. ‘बहुतेक सायटिकाची सुरुवात. एक्स रे. कदाचित ऑपरेशन..’ तो क्षणभर थबकला. मानसी नीलाला सांगत होती. ‘‘तुम्ही येणार नसलात तर आम्ही म्हणतोय मुलांना तुमच्याकडे ठेवून जावं. त्यांनाही इंटरेस्ट नसतोच. शिवाय..’ नातवंडं दोन दिवस राहायला येणार या कल्पनेनं अविनाश सुखावला. पण लगेचच त्यांचा अर्वाच्य दंगा आठवला. त्यांना धाक दाखवायला त्यांच्या आयाही नसणार. नीला हो म्हणतीय का काय या भीतीनं पायातील कळ विसरून तो लगबगीनं दिवाणखान्याकडे निघाला..
(पूर्वार्ध)

Story img Loader