राष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक १०६ राष्ट्रीय कबड्डी सामने खेळण्याचा विक्रम असणाऱ्या शकुंतला. चपळाई, जोश, भेदक नजर, राकट पंजा ही त्यांच्या खेळाची मुख्य अस्त्रे. आज ७४व्या वर्षी त्यांचा खेळ थांबला असला तरी पुढची पिढी घडवण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. प्रशिक्षक आणि पंच म्हणून आजही कार्यरत असणाऱ्या शकुंतला यांना यंदा राज्य शासनाने ‘शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित केले असून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या स्त्री खेळाडू आहेत. त्यांच्याविषयी…

खाद्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळेल सांगता येत नाही. आयुष्यात असे काही क्षण येतात, की त्यामुळे तुमचे आयुष्यच बदलून जाते. साताऱ्याच्या पुसेगाव या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातील गावात राहणाऱ्या शकुंतला खटावकर यांच्या बाबतीत असेच काहीसे घडले. गावातील एका शिक्षकाने शकुंतला यांना पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात पाठविण्याची सूचना त्यांच्या वडिलांना केली. त्याला मान्यता देताना त्यांच्या वडिलांनी व्यक्त केलेला आशावाद मार्मिक आणि मुलीवर विश्वास दर्शविणारा होता. तिचे वडील म्हणाले, ‘‘मला मुलीला डबक्यात नाही, तर अथांग सागरात पोहायला पाठवायचे आहे.’’ त्याप्रमाणे शकुंतला पुसेगाव सोडून पुण्यात आल्या आणि पुणेकर झाल्या. आणि वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत त्यांनी आपले शिक्षण तर पूर्ण केलेच, शिवाय क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला इतका की, ‘अर्जुन पुरस्कारा’सह अनेक पुरस्कारांबरोबरच यंदा राज्य शासनाने ‘शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित केले आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या स्त्री खेळाडू आहेत.

शकुंतला खटावकर यांना खरे तर ‘अॅथलेटिक्स’ खेळाडूच व्हायचं होतं. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात फिरण्याची सवय असल्यामुळे त्यांचे शरीरही दणकट झाले होते, त्या मूळच्या गिर्यारोहक. सह्याद्री ‘माउंटेनिअरिंग क्लब’च्या त्या सदस्य होत्या. त्या गरवारे महाविद्यालयातून ‘खो-खो’ आणि ‘अॅथलेटिक्स क्रीडा’ प्रकारांत सहभागी होऊ लागल्या. शकुंतला यांची देहयष्टी पाहून दामले सरांनी त्यांना ‘थ्रो’ प्रकारात भाग घेण्यास सांगितले. तेव्हा ‘गरवारे नॉयलॉन कंपनी’च्या ‘अॅथलेटिक्स क्लब’कड़ून १०० मीटर, २०० मीटर ‘रिले’ आणि ‘थ्रो’ प्रकारांत शकुंतला सहभागी व्हायच्या. दामले सरांच्या निधनानंतर हे सगळे थांबले. पण, कदाचित कबड्डीचे मैदान जणू त्यांचीच वाट पाहत होते. त्यामुळेच, चंद्रकांत केळकर सरांच्या ‘‘कबड्डी खेळणार का?’’, या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देऊन शकुंतला कबड्डीच्या मैदानावर उतरल्या. गावाकडे खो-खो, लंगडी खेळातील सहभाग, जोडीला गिर्यारोहणाची साथ आणि ‘अॅथलेटिक्स’चा झालेला सराव याचा शकुंतला यांना कबड्डीच्या मैदानात खूप फायदा झाला. आज ७४व्या वर्षीदेखील त्यांच्याशी गप्पा मारताना त्या आवर्जून याचा उल्लेख करतात. ‘सागरात पोहण्याची वडिलांची इच्छा आणि मिळविलेले यश टिकविण्याचा मावशीने दिलेला सल्ला माझ्या मनात आजही जशाच्या तसा कोरला गेला आहे. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत मजल मारू शकले’, असे सांगताना शकुंतला आजही भावुक होतात.

प्रचंड ताकद आणि चपळता यामुळे शकुंतला यांनी कबड्डीत आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. डावा मध्य रक्षक म्हणून खेळणाऱ्या शकुंतला चढाईदेखील उत्तम करायच्या. त्यांच्याकडूनच त्यांचा हा सगळा प्रवास ऐकताना सत्तरचे दशक डोळ्यांसमोर उभे राहते. त्यांचा सुरुवातीचा खेळ पाहण्याची संधी मला स्वत:ला फार कमी मिळाली. शाळेत असताना १९८० ते ८२ अशी जेमतेम दोन वर्षे मी त्यांचा खेळ पाहिला होता. पण, त्यांच्या एकेक आठवणी ऐकल्यावर त्यांचा खेळ पाहिल्याचे समाधान मनाने करून घेतले. कबड्डीच्या मैदानावरील पहिल्या स्पर्धेची आठवण सांगताना त्या आजही मैदानावर खेळत असल्याचा भास होतो. पहिलीच स्पर्धा त्यांना मुंबईत खेळावी लागली. तेव्हा मुंबईत ‘विश्वशांती’ हा संघ दमदार होता. त्या संघाची शैला रायकर ही खेळाडू म्हणजे ‘बचावातील चीनची भिंतच’ असे वर्णन शकुंतला करतात. शैलांच्या पकडीतून कुणी सुटत नसे. तोपर्यंत शैला यांची पाठ कधीही मैदानाला टेकली नव्हती. अशा शैला यांच्यासमोर शकुंतलांनी पहिली चढाई केली. शकुंतला चढाईला आल्यावर त्यांची पकड घेण्यासाठी शैला नेहमीच्या शैलीत सरसावल्या. पण, शकुंतला यांनी अशी काही फिरकी घेतली, की शैलांची पाठ मैदानाला टेकली आणि शकुंतला सुरक्षित आपल्या अंगणात परतल्या. त्या क्षणी शैला यांनी शकुंतला यांची पाठ मैदानातच थोपटली आणि सामन्यानंतर केळकर सरांना म्हणाल्या, ‘‘तुम्ही एक गुणी अष्टपैलू खेळाडू घडवलात.’’ लौकिक मिळविलेल्या खेळाडूची थाप पाठीवर पडली आणि शकुंतला अवघ्या कबड्डीविश्वाची ‘शकुताई’ बनली.
शकुंतला आजही ती कौतुकाची थाप आपल्यासाठी मोलाची होती, असे आवर्जून सांगतात. कबड्डीच्या मैदानात पुढे ‘विश्वशांती’ आणि शकुंतला यांचा ‘महाराणा प्रताप’ संघ हे जणू पारंपरिक प्रतिस्पर्धी ठरले. या दोन संघांतील लढत म्हणजे तेव्हा कबड्डी चाहत्यांसाठी सर्वोत्तम खेळाची पर्वणी ठरायची. स्टेडियम तुडुंब भरायचे आणि दोघींच्या कामगिरीविषयी पैजा लागायच्या. ‘विश्वशांती’बरोबर असलेल्या मैदानावरील वर्चस्वाची आणखी एक आठवण सांगताना शकुताई विदर्भात यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय स्तरावरील उपांत्य सामन्याचा उल्लेख करतात. ‘महाराणा प्रताप संघ’ त्या वेळी अखेरपर्यंत मागे होता. पण, शकुंतला यांच्या संघाने तो सामना पाच गुणांनी जिंकला. पुढे अकोल्यातील स्पर्धेत पुन्हा एकदा या सामन्याचा जणू ‘अॅक्शन रिप्ले’ झाला. शेवटच्या मिनिटाला ‘विश्वशांती’कडे दोन गुणांची आघाडी होती. त्या वेळी अखेरची चढाई शकुंतला यांच्याकडे होती. खोलवर चढाई करून परत येत असताना त्यांनी एका वेळी चार खेळाडूंना ‘टिपले’. त्या सांगतात, ‘‘अचानक मी मैदानावर पडले की काय झाले ते कळले नाही. मला मैदानातून बाहेर नेण्यात आले. उपचार झाले आणि सर्वांनी सांगितले, आपण सामना जिंकलो. डॉक्टरांनीदेखील तेच सांगितल्यावर विजयाची खात्री पटली. हा सामना मी कधीही विसरणार नाही.’’

अर्थात, स्थानिक पातळीवर शकुंतला खटावकर आणि शैला रायकर या प्रतिस्पर्धी असल्या, तरी राष्ट्रीय स्तरावर त्या संघाच्या आधारस्तंभ होत्या. या दोघींनी देशपातळीवर महाराष्ट्राची पताका कायम फडकवत ठेवली. राष्ट्रीय स्तरावर तेव्हा पश्चिम बंगालची मोनिका नाथ जोशात होती. तिची पकड करणाऱ्यांसाठी अक्षरश: बक्षिसे जाहीर व्हायची. जयपूर येथील पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत ती शकुंतला यांच्या समोर आली. तेव्हा संघ प्रशिक्षक नाना बापट यांनी सांगितले, ‘‘जर तुम्ही मोनिकाला पकडले, तर तुम्हाला कॅडबरी चॉकलेट देणार,’’ पहिल्याच प्रयत्नात शकुंतला आणि शैला या जोडगोळीने मोनिकाची पकड करून दाखवली आणि त्यानंतर तब्बल २७ वेळा मोनिकाची पकड केल्याची आठवण शकुंतला खटावकर आजही अभिमानाने सांगतात. या स्पर्धेतील यशानंतर ‘महाराष्ट्र संघा’ला एका समारंभात यशवंतराव चव्हाण यांना भेटण्याची संधी मिळाली. त्याच समारंभात कवयित्री शांता शेळके याही उपस्थित होत्या. सर्व खेळाडूंनी त्यांच्या सह्या घेतल्या. शकुंतला यांनीही वही-पेन शांता शेळके यांच्यासमोर धरले आणि ‘‘सहीबरोबर काही तरी मार्गदर्शन करा’’, असे सांगितले. शकुंतला सांगतात, ‘‘तो क्षण आणि त्यांनी दिलेली शिकवण कधीच विसरणार नाही. शांता शेळके यांनी डोक्यावरील पदर नीट करून माझ्याकडे नखशिखांत पाहिले आणि एका क्षणात म्हणाल्या, ‘पराजयाची न लगे भीती… विनय असावा परी विजया अंती…’ या ओळी मनात इतक्या खोलवर कोरल्या गेल्या, की आजही मी त्या विसरू शकलेले नाही. आजही मी तितक्याच विनयाने आयुष्य जगते.’’
अंगातील राकटपणाचा शकुंतला यांनी मैदानात योग्य उपयोग करून घेतला. त्यांचा स्वभाव तसा आक्रमक आणि आपले विचार स्पष्टपणे मांडताना कधी न घाबरणारा असा आहे. इचलकरंजी येथे राज्य स्पर्धा सुरू असताना खेळाडू राहत असलेल्या खोलीत चोरी झाली. तेव्हाचा एक किस्सा शकुंतला यांचे समकालीन खेळाडू आवर्जून सांगतात. शकुंतला यांनी खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा खोलीत सगळे सामान अस्ताव्यस्त पसरलेले होते. समोरची खिडकी उघडी होती. त्या खिडकीत गेल्या. काही तरी हालचाल जाणवली तेव्हा खिडकीतून खाली १५ फूट उंचावरून उडी मारलीआणि जवळपास दीड किलोमीटर धावत जाऊन त्यांनी चोराला पकडले.

सुरेख पदलालित्य, चपळाई, जोश, भेदक नजर, राकट पंजा ही शकुंतला यांच्या खेळाची मुख्य अस्त्रे आहेत. या खेळाचा धसका तेव्हा सगळ्यांनीच घेतला होता. प्रतिस्पर्धी संघातून शकुंतला मैदानात दिसताक्षणीच समोरच्या संघाचे निम्मे अवसान गळून जायचे. शकुंतला यांना आव्हान देणारे खेळाडू तेव्हा थोडेच होते. मोनिका नाथसारखे खेळाडू शकुंतला यांनी निष्प्रभ केले होते. राष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक १०६ राष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत पुरस्कारांचीही त्यांनी रांग लावली. घरातील भिंत, कपाटे पुरस्कारांनी भरलेली होते. महाराष्ट्र शासनाने शकुंतला यांना ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारा’ने गौरवले आणि दोन वर्षांनी केंद्र सरकारने त्यांचा ‘अर्जुन पुरस्कारा’ने सन्मान केला. देशातील हा सर्वोच्च क्रीडा बहुमान मिळविणाऱ्या शकुंतला खटावकर या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या. त्यांची बहरलेली कारकीर्द कधी संपू नये असेच वाटत होते. पण, शकुंतला यांनी १९८२ मध्ये केरळमधील राष्ट्रीय स्पर्धेनंतर थांबण्याचा निर्णय घेतला. अर्थात, त्यांचा फक्त खेळ थांबला. कबड्डी सुटली नाही. ‘राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थे’तून शकुंतला ‘एनआयएस’ प्रशिक्षित प्रशिक्षक झाल्या. पंच परीक्षाही पास झाल्या. खेळ सोडल्यानंतर प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेक खेळाडूंना घडवले. पंच म्हणून मैदानात उभ्या राहिल्या. ‘क्रीडा भारती’ या ‘क्रीडा प्रसारक संस्थे’शी जोडल्या गेल्या. कबड्डीची मैदाने स्त्रिया गाजवू शकतात, तर त्या संघटक, पंच म्हणूनही उभ्या राहू शकतात, अशी भूमिका त्यांनी घेतली. संघटनेत स्त्रियांना स्थान मिळावे यासाठी त्यांनी लढा दिला आणि शकुंतला ‘पुणे जिल्हा’ आणि ‘महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटने’च्या उपाध्यक्ष झाल्या. ‘क्रीडा भारती’ या संस्थेच्यादेखील त्या आता प्रांत उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या या सगळ्याच प्रवासाचा महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा गौरव केला आणि ‘शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार’ मिळविणाऱ्या त्या पहिल्या स्त्री खेळाडू ठरल्या. वयाच्या ७४व्या वर्षीदेखील त्या थांबलेल्या नाहीत.

पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहून शकुंतला लागलीच ‘क्रीडा भारती’च्या कार्यक्रमाला रवाना झाल्या. त्यांच्याशी बोलण्याची मला नेहमीच संधी लाभली. या वेळी बोलताना पुन्हा एकदा त्यांनी उलगडलेला जीवनप्रवास प्रचंड मेहनत, निर्णयक्षमता, योग्य सर्वेक्षण, दांडगा जनसंपर्क, तल्लख बुद्धिमत्ता याची जाणीव करून देणारा होता.

आपल्या अजोड कर्तृत्वाने शकुंतला खटावकर यांनी कबड्डी आणि शकुंतला असे जणू समीकरण तयार केले. शासनाने केलेला ‘जीवन गौरव’ हा थांबण्यासाठी नाही, तर आणखी काम करण्यासाठी दिला आहे, अशी शकुंतला यांची भावना आहे. त्या म्हणतात, ‘वयाची शंभरी गाठायची आहे आणि तोपर्यंत कबड्डीसाठी काम करत राहायचे आहे…’
त्यांचा हा मनोदय पूर्ण होवो, हीच शुभेच्छा!

dnyanesh.bhure@expressindia.com