मंगला गोडबोले
खरेदीचा सोस (विशेषत: स्त्रियांना) उपजतच असतो, असं मानलं जातं. त्यातून ती सोन्याची खरेदी असेल आणि ती लग्नासाठीची असेल तर मग विचारायलाच नको! खरेदी किती यापेक्षा तिचा उत्साहच खूप जास्त असतो. त्यामुळे एका दागिन्यासाठी अनेक जण ‘वेग्गळं’ काहीतरीच्या शोधात दुकानात जमतात. तो दागिना ती नवरीमुलगी किती वेळा आणि कधी घालणार की ‘तुझी माझी धाव आहे लॉकरकडून लॉकरकडे’ असंच हे छोटे मोठे दागिने म्हणणार, हे प्रश्न बाजूला ठेवून खरेदीचा ‘क्षणाचा उत्सव’ साजरा होतो. एका सराफाच्या दुकानातला हा भावनांचा सारा खेळ, सोस लेण्याचा टिपलाय उद्याच्या १ मेच्या ‘जागतिक हास्य दिना’ निमित्तानं..
दुकानातल्या गर्दीमुळे ढकलली जात जात मी एका काऊंटरजवळ पोहोचले, तर त्यातला अर्धा अधिक भाग एका टोळीनं अडवलेला. एक नियोजित वधू, तिची जन्मदाती ‘अगं आई’, तिची नव्यानं होऊ घातलेली ‘अहो आई’, दोन मावशी-काकू गटातल्या रिकामटेकडय़ा पुरंध्री आणि एवढय़ा अबलांसोबत ‘पोलीस’ म्हणून आलेला एक कंटाळलेल्या चेहऱ्याचा बाप्या, एवढी माणसं एका चिमुकल्या मंगळसूत्राच्या खरेदीसाठी आली होती. त्यांना बहुधा एकेकटय़ानं फसवून घ्यायचं नसावं. मी मात्र एकटीच होते. रोज घालायच्या अंगठीतला खडा टपकन् पडल्यामुळे तो बसवून घेण्यासाठी फारफार काळानंतर एखाद्या सराफी दुकानात जाण्याचा प्रसंग माझ्यावर ओढवला होता.
मौलिक धातूंचे वर्तमानपत्रांमध्ये दिसणारे चढते दर आणि बाहेरची वाढती असुरक्षितता बघता या दुकानात एवढय़ा गर्दीची अपेक्षा मी केली नव्हती. पण इथे म्हणजे ‘दोन तोळय़ांचा हार घेतल्यास एक कमनीय मान फ्री’ यासारखी स्कीम चालू असल्यासारखी चेंगराचेंगरी होती. ‘अगंबाई, आज एकाच दिवशी इतक्या लोकांच्या अंगठय़ांमधले खडे पडावेत, अं?’ असा मनोमन अचंबा करत मी विक्रेत्यासमोर माझं गाऱ्हाणं मांडलं. त्यानं माझ्याकडे कहर दुर्लक्ष करत मंगळसूत्रांच्या नमुन्यांवर लक्ष केंद्रित केलं. ज्याला अजिबातच ते घालावं लागणार नव्हतं, त्या पोलीस बाप्यानं ते न्याहाळायला सुरुवात केली. बाकी बायका मात्र प्रथेप्रमाणे ते वगळून दुकानातल्या बाकी सगळय़ा मालावर भाष्य करू लागल्या. ‘‘नथ बघितली ती कोपऱ्यातली? किती गोड आहे नाही? ते लोंबतं कानातलं पेलेल का पण? कुडय़ा अगदी १८५७ सालातल्या वाटताहेत..’’ वगैरे सुरू राहिलं. विक्रेता बिचारा त्यांच्या बोलण्यात चिकाटीनं मंगळसूत्राचा व्यत्यय आणत गेला. एकेक नमुना नजाकतीनं दोन्ही हातांनी वर उचलणं, हवेत हेलकावणं, मध्येच नवरीच्या गळय़ाला अदबीनं लावून दाखवणं, अशी ‘सेल्समनगिरी’ इमानानं करत राहिला. कोणताही मंगळसूत्राचा नमुना गळय़ाच्या जवळपास आला, की नवरी फटाक्कन लाजून घ्यायची. निदान लग्न होईपर्यंत तरी, ‘अ ब्राईड शुड बी शाय अँण्ड कॉय’ अशी गाइडलाइन तिला एखाद्या ‘वेडिंग साईट’वर मिळाली असावी. एरवी असल्या गाइडलायनी तिला ‘कॉयच्या कॉय’ वाटल्या असत्या. पण सध्याच्या नवलग्न मूडमध्ये ती कशावरही हसायला, लाजायला टपलेली होती. त्या भरात शंभरदा बॉबकटचं सेटिंग बिघडवून, केस मागे-पुढे करून मंगळसूत्र ट्राय करायला मागेपुढे बघत नव्हती. ‘‘हा नमुना नक्की शोभेल ताईसाहेबांना,’’ असं म्हणत एक मंगळसूत्र विक्रेत्यानं जरा जास्तच वेळ तिच्या गळय़ाला लावलं तेव्हा मात्र आता खर्च खरंच गळय़ाशी आल्यासारखं जाणवून टोळीतल्या म्होरक्यांनी फाटे फोडायला सुरुवात केली. ‘‘नमुना ठीक वाटतोय. पण महागात जातंय का हे जरा?’’ ‘‘थोडं जाणार, पण शेवटी पिवर आहे ना. २२ कॅरट मॅडम.’’ विक्रेत्यानं कॅरटचं गाजर दाखवत म्हटलं.
‘‘२२ आहे का? पण घडणावळ एवढी जास्त का?’’ यावर लगेच ‘‘आता के.डी.एम. म्हटल्यावर एवढे पडणारच ना.’’ हे स्पष्टीकरण आलं. ‘‘के.डी.एम. म्हणजे प्रश्नच नाही.’’ अशा अर्थानं काही माना हलल्या. खरोखर ‘के.डी.एम.’ म्हणजे काय? त्याऐवजी ‘एम.के.डी.’ असतं तर काय फरक पडला असता? याचा फारसा कोणाला अंदाज असेल असं बघून वाटलं नाही. ‘पिवर’ म्हणजे शुद्ध सोन्यामध्ये शेकडा आठ टक्के कॅडमियम मिसळल्यावर तयार होणारं अॅरलॉय किंवा संयुग वापरण्याचे फायदे, या माहितीचा इथे काही फायदा नव्हता. एवढं खरेदीला आल्यासारखं आपण चांगल्यात चांगला नग कसा स्वस्तात स्वस्त पटकावतोय, हे सिद्ध करण्याची तातडी होती. तिच्यापोटी, काऊंटरवर ठेवलेल्या त्या के.डी.एम. मंगळसूत्राला नाकं चिकटतील एवढं खाली वाकून सर्वानी के.डी.एम. हुंगून पारख करण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ात एकीनं ते छताच्या बाजूनं उंचावर धरून हॅलोजन दिव्याच्या प्रकाशात त्यातून आरपार पाहून ‘‘आहे २२ कॅरटचं’’ अशी ग्वाही दिली! त्या क्षणी त्या हॅलोजनच्या प्रकाशापेक्षा तिच्या आत्मविश्वासानं माझे डोळे दिपले. इतके दिपले, की तेवढय़ात कोणीतरी माझ्या हातातली अंगठीची डबी खसकन् हिसकावून घेतल्याचं मला क्षणभर उशिरानंच कळलं. ती म्हणे दुरुस्तीसाठी रवाना झाली होती. एवढा वेळ मला वाटलं होतं, आज आपल्याला फक्त खडय़ासारखं वगळतात की काय! पण नाही. माझी वर्णी लागत होती. त्या खुशीत मी ‘‘एक वाटी की दोन वाटय़ा?’’ ‘‘दणकट की फॅन्सी?’’ या वळणाची संभाषणं ‘‘अगदी वेगळं, हटके काहीतरी दाखवा बाई!’’पर्यंत पोहोचलेली ऐकली. हे ‘वेगळंच काहीतरी’चं प्रकरण कधीही कुठेही आलं, की दर वेळेला मेंदूला फक्त वेगवेगळय़ा मुंग्या येतात. वेगळं म्हणजे नक्की काय? कसं? हे तर कधीच कोणीच सांगत नसतं. (‘‘रोजच तेच तेच काय जेवायचं? काहीतरी वेग्गळं कर’’ या एका वाक्यावर निम्म्या आयुष्याची हाराकिरी काय उगाच केलीये?) फक्त ‘ग’ची बाधा वाढवून ठेवतात. पण इथेही विक्रेत्यानं बाजी मारली. ‘वेग्गळं’ असं नुसतं म्हणताच त्यानं कलकत्ती वाण, ‘थाली’ पॅटर्न, सिंधी नमुना, असे मंगळसूत्रांचे नमुने मांडताना सगळय़ा भौगोलिक मर्यादा ओलांडल्या. काऊंटर कधीच भरला होता. आता फक्त ग्राहकांच्या मनात एखादं वाण भरणं बाकी होतं. तेवढय़ात ‘‘पैंजण महोत्सवातले ते किल्वर किल्वरचे पैंजण मिळतील का हो?’’ असं विचारत चार-पाच युवतींचा थवा इथवर ठेपला. त्यातली एक नेमकी माझ्या पुढय़ातल्या नवऱ्या मुलीची शाळेतली मैत्रीण वगैरे निघाली आणि खरेदी पुढे सरकण्याऐवजी या तरुणीच एकदम शाळेपर्यंत मागे गेल्या. ‘‘तो पैंजण महोत्सव कधीच संपलाय. आता लवकरच मेखला महोत्सव सुरू होणार आहे’’ असं म्हणून विक्रेत्यानं पोरींना आवरण्याचा प्रयत्न केला, पण पैंजणांच्या नादात त्यांची नाचानाच आणखीच बहरली होती. इतका वेळ कोणतं मंगळसूत्र ‘साडीवर चांगलं जाईल’, ‘ड्रेसवर जाईल की नाही?’, यावर खल सुरू होता. त्याऐवजी आता ‘कोणते पैंजण कशावर चांगले जातील’
या चर्चेत वेळ जाऊ लागला. दोन्ही अलंकारांच्या स्थानात, आकारात, वापरात, किमतीत प्रचंड फरक असला, तरी कीस पाडण्याचा उत्साह कणानंही जात नसावा, हे मला जाणवत होतं आणि मनात येत होतं, पैंजणांचा किंवा मेखलांचा महोत्सव येवो-जावो, या दुकानातला खरेदीचा महोत्सव अजरामर आहे. डोईजड किमती, घोर अज्ञान, त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याची व्यापार तंत्रं हे सगळं एकीकडे आणि एखाद्या क्षणी नेमका हवा तोच अलंकार लेवून त्या ‘क्षणाचा सण’ करण्याची अनिवार ऊर्मी दुसरीकडे. जोवर त्या ऊर्मीचं पारडं जड आहे, तोवर या महोत्सवाची समाप्ती होणं कठीण!
शेवटी एकदाचा मला (अंगठीत) खडा टाकून मिळाला. खडा अंगठीत, अंगठी बोटात, हात पर्समध्ये, चपला पायात असं सगळं जागोजागी बसवत मी दुकानाबाहेर पडले, तरी टोळीमध्ये मंगळसूत्राची पसंती झालेली नव्हती. ती नक्की कधी होईल (की नाही?) या मुख्य प्रश्नाबरोबर अनेक उपप्रश्न माझ्या मनात घोळत होते. साडीवर नक्की ‘जाईल’ असा वाण निवडायला मुळामध्ये ही सुकन्या साडी तरी नक्की किती वेळा नेसेल? फार दणकट, टिकाऊ नमुना घ्यावा, इतका हिचा मंगळसूत्र घालण्याचा उत्साह टिकणार आहे का? असलं घसघशीत, लखलखीत गळय़ातलं खुशाल पदरावर मिरवत गर्दीत जावं, एवढी सुरक्षितता आज बाहेर कुठे आहे? की शेवटी, बहुतेक अलंकारांची होते तशी याचीही रवानगी एखाद्या बँक लॉकरकडेच होईल? ‘तुझी माझी धाव आहे लॉकरकडून लॉकरकडे’ असं आपापसात म्हणणारे अनेक छोटे मोठे दागिने आज सासरच्या, माहेरच्या तिजोरीतून नव्या पोरीबाळींच्या तिजोऱ्यांमध्ये निमूटपणे जाऊन पडताहेत, तसंच इथेही होईल का? माझ्या शालेय जीवनामध्ये कवी बी यांची ‘गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या’ ही कविता बहुतेकांना एका ना एका इयत्तेत असायची. गरिबीमुळे पोटच्या पोरीला कुडी मोत्याची, फूल सुवर्णाचे घेता येत नसल्यानं तिची समजूत काढणाऱ्या एका लाचार बापाचं ते गहिरं वर्णन बहुधा डोळे पुसत वाचलं जाई. त्यामध्ये, ‘नारीमायेचे रूप हे प्रसिद्ध.. सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध’ अशा ओळी होत्या. हे नारीमायेचं कवीचं आकलन सुमारे शंभर वर्षांपूर्वीचं असावं. ते शिकवतानाच ‘शिक्षण किंवा नीतीमत्ता हाच खरा दागिना’ वगैरे शिकवण्याची सावधगिरीही कोणीकोणी बाळगत. काळ पुढे गेला तसतशी सोन्यातली गुंतवणूक ही मृतप्राय आहे, ‘डेड इन्व्हेस्टमेंट’ आहे, त्यापेक्षा सोन्याच्या चिपा घेऊन ठेवाव्यात, ‘गोल्ड बॉण्ड’ तर सर्वात बेस्ट, अशी अर्थशास्त्रीय मार्गदर्शक तत्त्वं जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न झाला. अजूनही जारी आहे. या दुकानात गोळा झालेल्यांपैकी अनेकांच्या कानावरून थोडीफार ती गेली असणारच. तरीही विचारांना जे कळतं ते भावनेला वळत नाही आणि सराफी दुकानांकडे पावलं वळणं संपत नाही. बाकी सोन्याच्या चिपा किंवा गोल्ड बॉण्ड यांच्या खरेदीतून एवढी सामूहिक करमणूक आणि व्यक्तिगत मिरवणूक कशी बरं मिळणार? उगाचच नजरेपुढे चित्र आणून पाहिलं, एखादा विक्रेता एखाद्या भावी नवरीच्या गळय़ाला, कानांना गोल्ड बॉण्ड किंवा ते काय ते ‘डिजिटल गोल्ड’ असेल ते लावून दाखवतोय आणि ती लाजून चूर होत्येय. आणि सोबतच्या खरेदी टोळीतून आज्ञा येत्येय, ‘‘सारखे तेच तेच बॉण्ड नका हो दाखवू.. काहीतरी वेग्गळं दाखवा ना!’’
mangalagodbole@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा