|| सुरेश खरे
आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा मनात विचार येतो, मला कोण व्हायचं होतं, मी कोण झालो? हे ठरवून झालं का? मी कविता केल्या पण मी कवी झालो नाही. मी अभिनय केला, दिग्दर्शन केलं, पण अभिनय किंवा दिग्दर्शन यात मी करिअर केलं नाही. चांगला शिक्षक असूनही मी शिक्षकी पेशा पत्करला नाही. केवळ अपघातानं नाटककार झालो आणि ३२ नाटकं लिहिली. माझ्यासमोर जे जे करण्यासारखं आलं ते ते मी करीत गेलो काहीही न ठरवता. मात्र यातली प्रत्येक गोष्ट करताना मला असीम आनंद झाला, समाधान मिळालं. यशापयशाचा विचारच कधी आला नाही..
माझा जन्म मुंबईतला. माझं सारं आयुष्य मुंबईत गेलं. माझे वडील शाळेत शिक्षक होते. अर्थातच आम्ही श्रीमंत नव्हतो, पण आमची परिस्थिती हलाखीची वगरे नव्हती. खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय! माझे वडील रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये इंग्रजी हा विषय शिकवत. वकिलीचा अभ्यास अर्धवट सोडून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला होता, ध्येयवादानं प्रेरित होऊन!
वडिलांचं इंग्रजी अतिशय चांगलं होतं. ते स्वत: मला इंग्रजी विषय शिकवत. त्यामुळे शाळेत असताना माझी उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुटी तर्खडकरांचं भाषांतर आणि काळेज् ट्रान्सलेशन खाऊन टाकत असे. माझी आई त्या काळातली व्हर्नाक्युलर फायनल होती. तिला वाचनाची अतिशय आवड होती. गिरगावातल्या गोखरकर वाचनालयाची ती वर्गणीदार होती. त्यामुळे शाळेत असतानाच मी फडके, खांडेकर आणि माडखोलकर वाचून संपवले होते. फारशी काही जाण नव्हती, पण तरीही माडखोलकर मला अतिशय आवडत असत. फडक्यांच्या कादंबरीतल्या वर्णनांप्रमाणे कुठे काही पाहायला मिळत नसल्यामुळे असेल, पण ते फारसे आवडले नाहीत. माझे वडील अतिशय चांगले शिक्षक होते. वडिलांकडे शिकवणीसाठी मुलं येत असत. मी त्यांचं शिकवणं मनापासून पाहात असे. शिकवतानाचा त्यांचा विलक्षण संयम पाहून मला राग यायचा. मी एकदा त्यांना विचारलं, ‘‘तुम्हाला एक एक गोष्ट दहा दहा वेळा सांगावी लागते, तुम्हाला राग नाही येत त्यांचा?’’ बापू म्हणाले, ‘‘अरे राग येऊन कसं चालेल? त्यांना समजत नाही म्हणून तर ते माझ्याकडे शिकायला येतात ना?’’ माझ्यातल्या चांगल्या शिक्षकाचा पाया बापूंच्या त्या वाक्यानं घातला. होय. मी एक चांगला शिक्षक आहे, असं मला प्रामाणिकपणानं वाटतं.
माझं वाचन जरी खूप चांगलं होतं तरी माझा ओढा मात्र होता नाटकाकडे. वयाच्या दहाव्या वर्षी मी मामा वरेरकरांच्या ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकात मरतडरावाची तिसरी बायको ही भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण का कायससं म्हणतात ते केलं. स्त्रीच्या वेशात मी (त्या वेळी) गोड दिसलो, असं म्हणतात. नाटकाच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरा झेलताना मी खूश झालो. त्या दिवशी मी ठरवलं, आपण नट व्हायचं. (पन्नास-साठ वर्षांपूर्वी नटांना नट आणि नटीला नटी म्हणत असत. अभिनेता, अभिनेत्री ही अभिधानं नंतर आली.) तोपर्यंत दरवर्षी शाळेत, ‘मी कोण होणार?’ या निबंधात माझी मजल बस कंडक्टर, बँडवाला याच्यापुढे गेली नव्हती. शाळेत आणि गणेशोत्सवात मी माझी नाटकाची हौस जेवढी भागवून घेता येईल तेवढी घेतली.
मॅट्रिक पास झाल्यानंतर मी पोदार वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला. आम्हाला इंटर कॉमर्सला पन्नास मार्काचा मराठीचा पेपर असायचा. शिकवायला प्रा द.के. केळकर होते. पाठय़पुस्तकं अत्यंत रूक्ष होती. मी मराठीच्या तासाला दांडी मारून जिमखान्यात टेबल टेनिस खेळत असे. सहामाहीची परीक्षा झाली आणि माझं नाव नोटीस बोर्डावर लागलं. केळकर सरांनी भेटायला बोलावलं होतं. मनाशी म्हटलं, आता काही खरं नाही. सर बहुतेक आपली खरडपट्टी काढणार. त्या तयारीनंच गेलो.
‘‘तुम्ही खरे ना?’’
‘‘हो.’’
‘‘तुम्हाला वर्गात पाहिल्याचं आठवत नाही.’’
‘‘सर, मी शेवटच्या बाकावर बसतो. पुढे बसलं की मुलं पाठीमागून बाण मारतात.’’
‘‘तुमचा पेपर मी काल वर्गात वाचून दाखवला. तुम्हाला मी पन्नासापकी अडतीस मार्क दिले आहेत. इतके मार्क मी आतापर्यंत कोणत्याच कॉमर्सच्या विद्यार्थ्यांला दिले नाहीत. तुमचं मराठी खूप चांगलं आहे. तुमची लाइन चुकली. कॉमर्स सोडून द्या आणि आर्टस्ला अॅडमिशन घ्या. मराठी घेऊन एम.ए. करा.’’
मी वडिलांना सांगितलं, ‘‘केळकर सर म्हणतात तुझी लाइन चुकली, तू कॉमर्स सोडून दे आणि आर्टस्जॉइन कर.’’ वडिलांनी साफ सांगितलं, ‘‘आधी बी.कॉम. पूर्ण कर आणि मग काय ते बी.ए.,एम.ए. कर.’’ मी माझं कॉमर्स कॉलेज चालू ठेवलं पण डोक्यात घेतलं, आपली लाइन चुकली. माझं अभ्यासावरचं लक्ष उडालं. परिणामी, नेहमी प्रथम वर्गात येणारा मी बी.कॉम.ला पास झालो ते पास क्लासमध्ये. पोदार कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करणं चालूच होतं. कारण मला नट व्हायचं होतं. पण कसा केव्हा कोण जाणे मी कविता करायला लागलो. पोदारमध्ये कविता-बिविता यांना पोषक वातावरण नव्हतं, समविचाराची कंपनीही नव्हती. पण तरीही माझा कविता करण्याचा वेग आठवडय़ाला सरासरी दोन होता, कधी कधी तीनही होत असत. माझ्या कविता कॉलेजच्या वॉल पेपरवर आणि वार्षकिात प्रसिद्ध होत असत. त्यामुळे मी एक चांगला कवी आहे असा माझा समज झाला. त्या काळी तुमची कविता ‘सत्यकथा’त छापून आली की तुम्हाला कवी म्हणून मान्यता मिळत असे. मी माझ्या दोन चांगल्या कविता (माझ्या दृष्टीने) ‘सत्यकथा’कडे पाठवल्या आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहात बसलो. कविता साभार परत (साभार नाही, नुसत्याच परत) आल्या आणि माझं विमान जमिनीवर उतरलं. मी नाउमेद झालो. माझा कवितांचा वेग मंदावला. ‘सत्यकथा’मुळे एका उदयोन्मुख कवीचा उदय होण्याआधीच अस्त झाला. (अरेरे!)
काही दिवसांनी माझ्या हातात साप्ताहिक ‘विविध वृत्त’चा अंक पडला. त्यात एक कविता छापून आली होती. कविता विनोदी होती, पण काही खास नव्हती. त्याच्या पुढचा अंक मी पाहिला. त्यात पण अशीच एक विनोदी कविता छापून आली होती. मनात आलं, इथे प्रयत्न करून पाहू या. म्हणून एक विनोदी कविता लिहिली. लिहिली म्हणण्यापेक्षा एक बऱ्यापकी विनोद मीटरमध्ये बसवला. काव्यगुण शून्य. मी ती कविता घेऊन ‘विविध वृत्त’च्या ऑफिसमध्ये पोहोचलो. संपादक होते चं.वि. बावडेकर. त्यांच्या टेबलापाशी गेलो आणि त्यांच्यासमोर कविता ठेवली. ‘‘काय आहे?’’ बावडेकर सरांनी विचारलं. ‘‘कविता आणलीये ‘विविध वृत्ता’त छापण्यासाठी.’’ चष्म्याची काच पुसून बावडेकर सरांनी कविता वाचली आणि बाजूला ठेवली. ते काहीच बोलेनात. शेवटी मी धीर करून विचारलं, ‘‘कशी वाटली?’’ ‘‘काही खास नाही, सामान्य आहे.’’, बावडेकर सर म्हणाले. ‘‘मला माहीत आहे.’’ मी असं म्हटल्यावर बावडेकर सर दचकले. ‘‘तुमची कविता सामान्य आहे हे माहीत असूनही तुम्ही ती आमच्याकडे छापायला घेऊन आलात?’’ ‘‘हो, कारण मागच्या दोन अंकांतल्या कविता मी वाचल्या. त्या दोन्ही सामान्य होत्या. मग म्हटलं आपली कविता छापून यायला हरकत नाही.’’ मी बोलून गेलो आणि माझ्या लक्षात आलं, आपण आगाऊपणा केला. पण बोलून चुकलो होतो. माझं उत्तर ऐकून बावडेकरसर गंभीर झाले. ते आता आपली कविता छापणार नाहीत, हे माझ्या लक्षात आलं. भीतभीतच मी त्यांना विचारलं, ‘‘माझी कविता परत देता का?’’ बावडेकर सर शांतपणे म्हणाले, ‘‘नाही! मी ती छापणार आहे. एवीतेवी आम्ही छापलेल्या कविता सामान्य असतात ना? मग तुमचीही छापतो. काय फरक पडणाराय? बसा. दोन गोष्टी तुम्हाला सांगतो. तुमच्या कविता सामान्य आहेत, हे तुम्ही आपल्या तोंडानं सांगितलंत. तुमचा हा प्रामाणिकपणा मला आवडला. माझ्याकडे येणारा प्रत्येक नवोदित लेखक आपलं लेखन कसं असामान्य आहे, हे मला सांगत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमची कविता छापून आली म्हणजे तुम्ही लेखक झालात असं समजू नका. आणि यापुढे कुणीतरी आपलं लेखन छापेल म्हणून सामान्य लेखन घेऊन कुठे जाऊ नका.’’ माझी कविता छापून आली. मला त्याचं काही विशेष वाटलं नाही. पण बावडेकर सरांनी दिलेला सल्ला लेखक म्हणून पुढे आयुष्यभर मला उपयोगी पडला.
महाविद्यालयात असताना माझ्यातल्या शिक्षकाला एक छान संधी चालून आली. मला एका कुटुंबानं खासगी शिकवणीसाठी विचारणा केली. त्यांच्या दोन मुलांना शिकवायचं. सर्व विषय. दोन्ही मुलं सामान्य होती, हे त्यांनी आधी सांगूनही मी ती शिकवणी पत्करली. कारण पगार होता, पंचवीस रुपये. साठ वर्षांपूर्वीचे पंचवीस रुपये. मी त्या मुलांना मनापासून शिकवलं, न कंटाळता, न चिडता. माझ्यासमोर माझ्या वडिलांचा आदर्श होता. ती दोन्ही मुलं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. मी चांगलं शिकवतो, चांगला शिक्षक आहे अशी माझी प्रसिद्धी झाली. मला एकामागून एक शिकवण्या मिळत गेल्या. शिकवणं मला आवडायला लागलं, मला त्यात आनंद मिळायला लागला. पुढेपुढे तर मठ्ठ मुलं, वाया गेलेली मुलं यांच्या शिकवण्या माझ्याकडे यायला लागल्या. मी कोणतीच शिकवणी नाकारली नाही. तथाकथित फुकट गेलेल्या मुलांना ताळ्यावर आणण्यात, त्यांना सुधारण्यात काय आनंद असतो, त्याचा अनुभव मी पुरेपूर घेतला.
महाविद्यालय संपून बी.कॉमची पदवी पदरात पडल्यावर मी इन्शुअरन्स कंपनीत नोकरी करायला सुरुवात केली. नोकरी करीत असताना, मी ज्या शाळेत शिकलो होतो त्या शाळेच्या नाइट हायस्कूलमध्ये मला शिकवण्यासाठी विचारण्यात आलं. मी ही नोकरी स्वीकारली. हे शिकवणं म्हणजे कसोटी होती. दिवसभर कष्ट करून रात्रीच्या शाळेत शिकण्याकरता येणारी ती मुलं, त्यांना फार जड जात असे. काही तर चक्क झोपत असत. मला त्यांची कीव यायची. त्यांच्यावर रागावणं मला जमत नसे. मी प्रयत्नांची पराकाष्ठा करून, दांडगा संयम दाखवून त्यांना शिकवत असे. मी वर्षभरच शिकवलं पण तो अनुभव वेगळा होता. कायम जपून ठेवावा असा. शिकवणं हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. इतका की पुढे नाटय़ व्यवसायात शिरल्यावर आणि ‘दूरदर्शन’वर सूत्रसंचालनाचा अनुभव गाठीशी आल्यावर मी नाटय़लेखन, अभिनय, सूत्रसंचालन यांच्या मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बारामती अमरावतीपासून इंदूर, गोव्यापर्यंत शेकडो कार्यशाळा घेतल्या. आजही घेतो आहे. केळकर सरांनी सांगितल्यामुळे मराठी घेऊन एम.ए करायचं कुठंतरी डोक्यात होतं. पण नवीन नियमांनुसार ज्या विषयात तुम्ही बी.ए केलं असेल त्याच विषयात तुम्हाला एम. ए. करता येतं. मी एम.ए.चा नाद सोडून दिला कारण पुन्हा बी.ए. करता दोन र्वष खर्च करणं मला शक्य नव्हतं.
माझ्यातल्या लेखकाची जाणीव मला पहिल्यांदा करून दिली ती बबन प्रभूनं. त्याचं असं झालं, आमचा सिद्धार्थ कॉलेजमधला मित्रांचा ग्रुप गिरगावातल्या ‘व्हाइसरॉय ऑफ इंडिया’ या हॉटेलमध्ये संध्याकाळी जमत असे. बबन आमच्या ग्रुपमध्ये नव्हता तरी तो त्याच्या ग्रुपमधल्या मित्रांना भेटण्यासाठी तिथे येत असे. एकदा मी एकटाच माझ्या मित्रांची वाट पाहात असताना बबन आला. बबन माझा चांगला मित्र होता. माझी वही बाजूच्या खुर्चीवर होती. बबननं विचारलं, ‘‘काय आहे?’’ ‘‘काही नाही एक गोष्ट खरडलीय.’’ ‘‘बघू?’’ ‘‘बघ की.’’ बबननं ती कथा वाचली. मी संपूर्णपणे फक्त संवाद असलेली, ‘तो’ आणि ‘ती’ची गोष्ट लिहिली होती. ‘‘तुला माहीत आहे तू काय लिहिलायस ते?’’, बबननं विचारलं. ‘‘अरे, तू एक छान नभोनाटय़ लिहिलयस. तुझे संवाद तर अप्रतिम आहेत. माझ्याकडे दे. मी पुढच्या आठवडय़ात आकाशवाणीवरून प्रसारित करतो.’’ आकाशवाणीवर नाटय़निर्माता असलेला बबन माझी ती कथा घेऊन गेला आणि म्हटल्याप्रमाणे त्यांनं ती शुक्रवारी प्रसारित केली. त्यानंतर झपाटल्यासारखं मी लिहीत गेलो आणि वर्ष दीड वर्षांत माझी दहा-बारा नभोनाटय़ं ‘आकाशवाणी’वरून प्रसारित झाली. मी नाटकात कामं करीतच होतो, नभोनाटय़ातल्या माझ्या संवादांची स्तुती होत होती. तरीही नाटक का लिहावंसं वाटलं नाही, हे मला कोडं आहे. ती वेळ यायची होती.
मी केवळ अपघातानं नाटककार झालो. ज्या नाटय़संस्थेत मी नाटकांतून कामं करीत होतो त्या आमच्या ‘ललित कला साधना’ या संस्थेनं महाराष्ट्र राज्य नाटय़स्पध्रेत नवीन नाटक घेऊन उतरायचं ठरवलं. आम्ही त्यावेळचे यशस्वी नाटककार वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर यांना विनंती केली. त्यांना इतकी मागणी होती की त्यांना वेळ नव्हता. संस्थेपुढे प्रश्न पडला. शेवटी दिग्दर्शक नंदकुमार रावतेनी विचारलं, ‘‘तू आकाशवाणीसाठी श्रुतिका लिहितोस, संवादांचं तंत्र तुला माहीत आहे. तूच का नाही नाटक लिहीत?’’ मला प्रश्न पडला. खरंच मी का नाटक लिहू नये? सुदैवानं नुकत्याच पाहलेल्या ‘फॅनी’ या चित्रपटाच्या कथेनं माझ्यावर मोहिनी घातली होती. मी हो म्हटलं, नाटक लिहून पूर्ण केलं आणि माझं पहिलं नाटक ‘सागर माझा प्राण’ रंगभूमीवर आलं. ‘सागर माझा प्राण’ला स्पध्रेत यश मिळालं. पण मला माझ्यातला नाटककार सापडला तो ‘काचेचा चंद्र’ या नाटकानंतर. वर्षभरानंतर जेव्हा ‘काचेचा चंद्र’ रंगमंचावर आलं, ते गाजलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं, माझ्यातला नाटककार माझ्यातल्या नटापेक्षा जास्त चांगला आहे. अभिनयाची जरी मला आवड होती तरी माझी ती महत्त्वाकांक्षा वगरे नव्हती. माझं लक्ष आपोआप अभिनयावरून उडालं. मला एकामागून एक विषय सुचत गेले, काही माझ्याकडे आपणहून चालत आले आणि १९६६ ते २०१६ पन्नास वर्षांत माझ्याकडून ३२ नाटकं लिहिली गेली.
आज जेव्हा मी मागे वळून पहातो, तेव्हा मनात विचार येतो, मला कोण व्हायचं होतं. मी कोण झालो? हे ठरवून झालं का? मी कविता केल्या पण मी कवी झालो नाही. मी अभिनय केला, दिग्दर्शन केलं पण अभिनय किंवा दिग्दर्शन यात मी करिअर केलं नाही. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून मी (चांगल्या अर्थानं) शिकवत राहिलो. चांगला शिक्षक असूनही मी शिक्षकी पेशा पत्करला नाही. नाटककार होणं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. मी केवळ अपघातानं नाटककार झालो आणि एक-दोन नाही तर बत्तीस नाटकं लिहिली. आणि माझ्या लक्षात येतं, मला काय व्हायचंय हे मी कधीच ठरवलं नव्हतं. माझ्यासमोर जे जे करण्यासारखं आलं ते ते मी करीत गेलो. काहीही न ठरवता मी शिक्षक झालो, कवी झालो, अभिनेता झालो, दिग्दर्शक झालो आणि नाटककार झालो. यातली प्रत्येक गोष्ट करताना मला त्या त्या वेळी असीम आनंद झाला, समाधान मिळालं. अमुक एक व्हायचं आहे किंवा अमुक एक करायचं आहे असं विशिष्ट ध्येय, आकांक्षा नसल्यामुळे यशापयशाचा विचारच कधी आला नाही. त्यामुळे दु:ख किंवा अपयशाचा सल वगरेचा प्रश्नच नव्हता. शिक्षक, कवी, अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार.. मी कोण? एका चेहऱ्यामागे अनेक चेहरे असतात. पण जो चेहरा सातत्यानं नजरेसमोर येतो तो चेहरा त्या माणसाची ओळख ठरते. मला लोक नाटककार म्हणून ओळखतात त्याचं कारण हे!
khare.suresh@gmail.com
chaturang@expressindia.com