सुधीर गाडगीळ chaturang@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्या आत्तापर्यंतच्या वाटचालीतल्या साऱ्याचं मूळ ‘माणसं’ – हाच वीक पॉईंट. आकडेवारीच्या नोकरीत अडकण्यापेक्षा माणसांना शब्दबद्ध करत गेलो. चित्रबद्ध करत गेलो आणि अगदी अनोख्या करिअरचा उच्चांक करू शकलो. हे जरी माझे श्रेय असलं तरी मला समजून घेत, संदर्भ देत, वेळ देत, स्वत:चं वलय- पद- सत्ता- संपत्ती विसरून माझ्या सारख्याला सांभाळून घेत सारी मोठी माणसं आपुलकीनं वागली, बोलली म्हणूनच केवळ संवादाचा उच्चांक मी करू शकलो. या आधारवरच गेली पंचेचाळीस वर्षे तीन-साडेतीन हजार ‘व्यक्तिमत्त्वं’, पिंट्र, रेडिओ, टेलिव्हिजन आणि स्टेजच्या माध्यमातून उलगडत गेलो. यातूनच मुलाखती- निवेदनाचं वेगळंच विश्व उभं राहिलं.

‘भेटेल’ तो माणूस आणि ‘दिसेल’ ते पुस्तक वाचणं हे माझ्या दैनंदिनीचं सूत्र आहे. या वाचनानं अनेक विषय, अनेक संदर्भ जमा होत गेले. त्यामुळे माणसांविषयी, घटनांविषयी माहिती मनात साठवण्यात समृद्ध झालो आणि या आधारावरच गेली पंचेचाळीस वर्षे तीन-साडेतीन हजार ‘व्यक्तिमत्त्वं’, प्रिंट, रेडिओ, टेलिव्हिजन आणि स्टेजच्या माध्यमातून उलगडत गेलो. यातूनच मुलाखती- निवेदनाचं वेगळंच विश्व उभं राहिलं.

यासाठी ‘बोलणं’ आणि ‘संवाद साधणं’ हीच करिअरची दिशा ठरली आणि बोलकं करण्यासाठी, मला लहानपणापासून, अगदी शाळेच्या काळापासून ज्या उत्तमोत्तम, नामवंत वक्त्यांना ऐकत गेलो, त्या ज्येष्ठांचे वक्तृत्वाचे संस्कार उपयोगी पडत गेले.

मी टिपिकल सदाशिव पेठी, वाडा संस्कृतीत लहानाचा मोठा झालो. आजोबा दासगणू महाराजांचे शिष्य. त्यांच्यामुळे पुण्यातल्या खुन्या मुरलीधर, भांग्या, पत्र्या, जिलब्या, सोन्या मारुती अशा चित्रविचित्र नावं असलेल्या देवळांतून कथा-कीर्तन ऐकायला शाळेच्या काळात जायचो. प्रवचन-कीर्तन ऐकायचो. त्यामुळे बोलण्याची मांडणी, सूर, अभिनय या कला एकत्र स्वरूपात प्रथम ऐकल्या त्या देवळात, प्रवचनकारांच्या रूपात. या एकत्रित कलाविष्कारानं श्रोत्यांना खिळवून कसं ठेवता येतं, ते त्या मंडळींना ऐकता ऐकता अनुभवत गेलो. घरात ग्रामोफोन होता. त्यामुळे शब्द कळत नसलेल्या वयापासून, दीनानाथ, बालगंधर्वाची गाणी तबकडीवर ऐकत ऐकत सुरांची गोडी लागली. आजोबा-वडिलांबरोबर पुण्यात अनेक सभांना जात होतो. अगदी ना. सी. फडके, प्र. के. अत्रे, पुलं, दत्तो वामन पोतदारांपासून, राजकारणातल्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, जगन्नाथराव जोशी, जॉर्ज फर्नाडिस, यशवंतरावजी चव्हाण अशा विविध मतप्रवाह मांडणाऱ्या राजकारण्यांची भाषणं ऐकली. त्या भाषणांची श्रोत्यांवर होत असलेली जादू अनुभवली आणि त्यातून बोलणं ऐकण्याची नि बोलण्याची ‘गोडी’ निर्माण झाली. शब्दांची निवड, शब्द मांडणी, शब्दांचा नाद, समयसूचकता, उत्स्फूर्तता या शब्दांच्या छटा समजत गेल्या.

त्या वेळी कल्पनाही नव्हती की हा ‘शब्दांचा खेळ’ हीच आपल्या भविष्यकाळातील पूर्ण वेळेचे ‘करिअर’ ठरेल. शाळेच्या काळात संध्याकाळ झाली म्हणजे तिन्हीसांजा झाल्या, की हातपाय धुऊन घरात देवासमोर रामरक्षा, मारुतीस्तोत्र, गीतेचा बारावा- पंधरावा अध्याय, श्लोक म्हणण्याचा कार्यक्रम असे. या संस्कृत पाठांतरामुळे चोख शब्दोच्चाराचं महत्त्व कळलं.

शाळा ‘नूमवि- नूतन मराठी विद्यालय’. तिथे सुट्टीच्या दिवशी ‘चमत्कार मंडळ’ नामक जादूचे प्रयोग शिकवण्याचा उपक्रम असे. जादूच्या ट्रिक्स सोप्या होत्या. त्यापेक्षा जादू पाहणाऱ्या प्रेक्षकांना चतुर बोलण्यात गुंगवावं कसं, याचं मार्गदर्शन कर्नल विजय अधिकारी मंडळात करत. आता मागे वळून पाहताना जाणवतं की श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा जादूच्या प्रयोगातील बोलण्याचा भागच पुढील वक्तृत्वाचा पाया होता. ‘नूमवि’त दिवाळीच्या सुट्टीत ५०१ आणि ७७७ तेल-साबण विक्री स्पर्धा असायची. अनोळखी माणसांकडे जाऊन आपल्या मालाची गुणवत्ता पटवत ‘विक्री कौशल्य’ सिद्ध करण्याची ती संधी असे. संवादातल्या शब्दांचं महत्त्व समजण्याच्या प्रक्रियेला शाळेच्या काळात अनुभवलेल्या स्पर्धातच खरा पाया घातला गेला. शाळेच्या काळातच मी लक्ष्मीकांत जांभोरकरांमुळे थेट संस्कृत नाटकांच्या राज्य स्पर्धेत नववीत असतानाच भाग घेऊ शकलो आणि ‘कर्ण अश्वत्थामनो कलह:’ या नाटकात कृपाचार्याची भूमिका करण्याच्या निमित्ताने तोंडाला प्रथम रंग लावला. दहाव्या इयत्तेत प्रख्यात लेखक वि. वि. बोकील हेच वर्गशिक्षक होते. वर्गात त्यांच्या तोंडून कथा ऐकताना शब्दांची नेमकी मांडणी आणि नाटय़ निर्माण करण्याची क्षमता समजत गेली.

सुदैवानं मार्क मिळविण्याची रेस, क्लासेस याचा ससेमिरा नव्हता. त्यामुळे किमान अभ्यास करता करता शाळेतले हे उपक्रम, वातावरण, संध्याकाळी ऐकलेली व्याख्यानं, कीर्तनं यातून नेमके शब्द मांडण्याच्या दिशेने सुरुवात झाली. पुढे बृहन्महाराष्ट्र कॉमर्स (बीएमसीसी) कॉलेजात गेलो. तिथेही अभ्यासाचे तास कमी असल्याने कॉमर्स असोसिएशन, स्नेहसंमेलन यातून लोकांसमोर जाण्याच्या, व्यक्तित्त्वातल्या वेगळ्या छटा अनुभवता आल्या. ‘बीएमसीसी’त बापट आणि व्ही. ए. जोशी सरांमुळे मुंबईच्या सिस्टाज, हिंदुस्थान, थॉम्प्सन अशा मोठय़ा जाहिरात संस्थांत जाऊन तिथल्या कॉपीरायटर, व्हाईस ओव्हर या वेगळ्या क्षेत्रांची माहिती घेता आली आणि जाहिरातशास्त्र शिकण्यापूर्वीच ‘विद्या’ उपक्रमाच्या माध्यमातून जाहिरातीचं जग समजून घेत गेलो. पुढे टी.व्ही.च्या काळात विनय आपटेंच्या साथीनं, जाहिरातींना आवाज देण्याचा, जाहिरातीच्या कॉप्या लिहिण्याचा उद्योग या कॉलेजच्या उपक्रमांच्या पाश्र्वभूमीमुळे आत्मविश्वासानं करू शकलो. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे चेअरमन डॉ. वसंतराव पटवर्धनांनी ‘दीपमाळ’ हे बोधचिन्ह बदलून ‘मिंटी’ फोकस करताना त्यात सहभागी होण्याची संधी दिली आणि शब्द-आवाजाशी निगडित जाहिरातीचं क्षेत्र पूरक उद्योग म्हणून सुचून गेलं. मुलाखती आणि निवेदन हा वेगळा, पण नवा व्यवसाय असल्याने त्याकाळी कमी पैसे मिळत, पण असे जाहिरातींसारख्या पूरक गोष्टी करत गेल्यानेच कालांतराने रीतसर नोकरीचा राजीनामा देऊन फ्रीलान्स कलावंत म्हणून काम करण्याचं धाडस करू शकलो.

चौगुले आणि किलरेस्कर या दोन उद्योगपतींनी एकत्र येऊन ‘इंडिया टुडे’ येण्याच्या आधी, ‘तेजस्वी’ नावाचं वृत्तविषयक साप्ताहिक काढलं होतं. दीड वर्ष चाललेल्या या साप्ताहिकाची आजच्या बऱ्याच पत्रकारांना कल्पना नसेल. उद्योगपती पाठीशी असल्याने या नवख्या साप्ताहिकात बत्तीस संपादक नेमले होते. पुण्यात आजच्या मोदी बागेशेजारी ‘तेजस्वी’चं कार्यालय होतं. राजकारणाच्या धगधगत्या मुंबई विश्वात ‘पुणं’ सोडून जायला तयार असणारा मी एकटा, केवळ या पात्रतेवर माझी मुंबई प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली. कॉलेजची वर्ष संपली होती. मी मुंबईला गेलो आणि राजकारण, साहित्य, सिनेमा अशा आवडीच्या क्षेत्रात संचार करायला मिळाला आणि मुंबईतलं लोकलमधलं जीवन, मुंबईचा अफाट पाऊस, चाळीतलं कोंदट राहणं (पुण्यातल्या मोकळ्या वाडय़ाच्या पाश्र्वभूमीवर) अनुभवता अनुभवता लालचंद हीराचंद, धीरुभाई अंबानी, देव आनंद, राज कपूर, दिलीपकुमार, बॅ. अंतुले, वसंतदादा, वसंतराव नाईक, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, देवयानी चौबळ अशा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींना भेटून त्यांच्याशी बोलता आलं, ते याच ‘तेजस्वी’ काळात!

‘तेजस्वी’ आणि मुंबई सोडून पुण्यात आलो तोवर किलरेस्करांच्या प्रतिष्ठित मासिकांपैकी ‘मनोहर’ मासिकाचं ‘साप्ताहिका’त रूपांतर करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आणि तरुणांसाठी हे साप्ताहिक मुख्यत्वे प्रकाशित करायचं ठरवल्याने मुकुंदराव किलरेस्करांनी मुख्यत्वे दत्ता सराफांमुळे माझी ‘मनोहर’च्या संपादक खात्यात नेमणूक केली. तिथे पत्रकार म्हणून सराफ साहेबांनी मला खऱ्या अर्थानं मुक्त वाव दिला. पहिल्या वर्षांतल्या ५० अंकांपैकी २४ कव्हर स्टोरीज करण्याची संधी मला मिळाली. मुंबईतल्या डेंटल कॉलेजच्या होस्टेलवर राहून, तिथल्या रॅगिंग प्रश्नाला वाचा फोडण्यापासून मराठवाडा नामांतर आंदोलन, युक्रांद चळवळ, जोशी-अभ्यंकर हत्याकांड अशा कव्हर स्टोरीज गाजल्या. महाराष्ट्रभर भटकता आलं. खूप मुलाखती घेतल्या आणि शब्दबद्ध केल्या.

याच वेळेस नुकतंच सुरू झालेलं (१९७२) ‘दूरदर्शन’ माध्यम स्थिरावत होतं. १९७४ची गोष्ट. टी.व्ही.च्या युवदर्शन कार्यक्रमात एक चर्चा ठेवली होती. त्याचा विषय होता ‘महाविद्यालयीन युवकांच्या नियतकालिकांचं जग’. ‘मनोहर’तर्फे चर्चेत भाग घ्यायला दत्ता सराफांनी मला पाठवलं होतं. तेथे त्या वेळचा आमचा ‘स्टार हीरो पत्रकार अनिल थत्ते’ होता, ‘जिप्सी’ अंक काढणारा श्रीधर माडगूळकर होता. चर्चेचा कार्यक्रम चांगला रंगला. निर्मात्या होत्या विजया जोगळेकर. त्यांना माझा चर्चेतला भाग आवडला आणि अशाच चर्चेत भाग घेण्यासाठी येशील का, असं त्यांनी मला विचारलं. यावर ‘मी कार्यक्रम कंडक्ट करेन’ असं बेधडक म्हटलं आणि तिथून ‘दूरदर्शन’च्या माध्यमातून मुलाखती घ्यायला माझी सुरुवात झाली.

पत्रकारिता करत असल्याने रोज नवनवे विषय सुचत आणि ‘दूरदर्शन’साठी त्यावर कार्यक्रम करता येईल का, असं स्वत:चं सेलिंग मी टीव्ही निर्मात्यांकडे करत असे. उदाहरणार्थ, पत्रकारितेमुळे ज्येष्ठ उद्योजकांकडे गेल्यावर त्यांच्या बोलण्यात त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी डोकावत. यातून टीव्हीसाठी ‘आमची पंचविशी’ कार्यक्रम सुचला आणि लालचंद हिराचंद, शकुंतला परांजपे, बाळासाहेब ठाकरे, व. पु. काळे, आबासाहेब गरवारे,  नानासाहेब गोरे अशा विविध क्षेत्रांच्या नामवंतांचं तरुणपण मुलाखतींच्या माध्यमातून वर्षभर उलगडण्याचा प्रयत्न केला.

ज्येष्ठांच्या घरी गेल्यावर, तिथं भेटणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांशी बोलताना, वडिलांच्या वलयात गुणी तरुण मुलगा झाकोळला जातो, असं लक्षात आलं आणि या तरुण पिढीला बोलकं करणारा ‘वलयांकित’ कार्यक्रम केला. जयंत भीमसेन जोशी, रमेश स्नेहल भाटकर, जान्हवी प्रभाकर पणशीकर, श्रीधर सुधीर फडके असे अनेक जण वर्षभरात बोलके केले.

‘दूरदर्शन’चे निर्माते अरुण काकतकरांमुळे लतादीदी, आशाताई, हृदयनाथ, उषाताई, मीनाताई या पाचही मंगेशकरांची दूरदर्शनवर ‘शब्दांच्या पलीकडले’द्वारे प्रथम मुलाखत घेण्याची संधी मिळाली. आशा भोसलेंशी तर इतके छान सूर जुळले की गेली २९ वर्षे त्यांच्या अनेक प्रकट मुलाखती आणि अनेक गाण्यांचे शोज करण्याचं भाग्य मला लाभले.

मंगेशकरांप्रमाणे अशोक पत्की, यशवंत देव, सुधीर फडके ते प्यारेलाल अशा संगीतकारांशीही संवाद साधला. बाबूजींशी अनेकदा गप्पा झाल्यात. ‘गेट वे ऑफ इंडिया’समोर समुद्रात तासाच्या अंतरावर एका बोटीच्या डेकवर बोटीत चाललेली पार्टी सोडून देऊन मला खळाळत्या लाटांच्या पाश्र्वभूमीवर बाबूजींशी अनेक गाण्यांमागच्या कहाण्या ऐकायला मिळाल्यात. साडेतीन हजार व्यक्तींच्या मुलाखतींच्या गोष्टी सविस्तर सांगण्याइतपत जागा उपलब्ध नाही. म्हणून ठळक मुलाखतींच्या फक्त धावत्या नोंदी करतो. दूरदर्शन मुंबई केंद्रामुळेच ‘मुलखावेगळी माणसं’ भेटली. बल्ब खाणारा कुलकर्णी, शंभरीनंतर उलटी पर्वती चढणारे गोखले काका, ‘गजरा’ कार्यक्रम करता आला. ताज्या घडामोडींवर राजकारण- समाजकारणातल्या माणसांना बोलकं करत ‘महाचर्चा’ घडवता आल्या.  विनय आपटे, किरण चित्रे, सुधीर पाटणकर,जयू भाटकर अशा उत्साही निर्मात्यांमुळे या कार्यक्रमांमधून माझ्या बोलण्याच्या उद्योगाला मागणी येऊ लागली.

निवेदक म्हणून स्थान मिळालं ते मात्र ग. दि. माडगूळकर, फडकेसाहेबांच्या गाण्यांच्या ‘चैत्रबन’ कार्यक्रमामुळे! मी अनुक्रमणिका वाचन न करता, खुद्द गदिमा, बाबूजी, राजा परांजपे यांच्याशी थेट गप्पा करून गीतांमागच्या जन्मकथा, स्वररचनांमागच्या गोष्टी आणि गाण्यांच्या चित्रीकरणाच्या वेळच्या गमती जाणून घेतल्या आणि त्या मांडत गेल्याने गाण्यांची उत्सुकता अधिक वाढत गेली. ‘चैत्रबन’च्या यशामुळे मातब्बरांच्या संगीत कार्यक्रमांचे सूत्रसंचालन माझ्याकडे सोपवलं जाऊ लागलं आणि ‘मत्स्यगंधा’ ते ‘महानंदा’ हा जितेंद्र अभिषेकी बुवांच्या नाटय़गीतांचा कार्यक्रम, ‘सौभद्र’ ते ‘मानापमान’ ते ‘लेकुरे उदंड’पर्यंत मराठी नाटय़संगीताचा प्रवास ‘नमन नटवरा’, डॉ. वसंतराव देशपांडेंवरचं ‘नक्षत्राचे देणे’, पं. भीमसेन जोशींची ‘संतवाणी’, गजानन वाटवे, मालती पांडे, ज्योत्स्ना भोळे ते श्रीधर फडके, रवी साठे इत्यादी असा भावगीतांचा प्रवास, जयमाला- जयराम- कीर्ती- लताची ‘गंधर्वसुरांची शिलेदारी’ अशा अनेक कार्यक्रमांचं सूत्र सांभाळण्याचा योग आला.

सिनेमाच्या जगातल्या देव-दिलीप-राज कपूर ते रणबीर कपूपर्यंत, मराठी चित्रपटातील ललिता पवार, चंद्रकांत- सूर्यकांत, डॉ. श्रीराम लागू, जयश्री गडकर, सुलोचनादीदी ते मुक्ता बर्वे अशा प्रत्येक क्षेत्रातल्या तीन-तीन पिढय़ांना मला बोलकं करायला मिळालं.

पुलं, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्रमोद महाजन, शंतनुराव किलरेस्कर अशांच्या मुलाखती संस्मरणीय ठल्या. सर्वानी गप्पाष्टक सविस्तर मांडणं शक्यच नाही; पण मी यावर या माणसांचं मुलखावेगळंपण मांडणारा एकपात्री कार्यक्रम करत असतो. त्यामुळे मला सिलोन, दुबई, आफ्रिका, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, जपान, हाँगकाँग, अमेरिका, युरोप, चीन अशा सर्व देशांतल्या मराठी माणसांपुढे किस्से कथन करत सादर होण्याची संधी मिळाली.

बाळासाहेब ठाकरेंनी चौदा वेळा भरभरून गप्पा मारत प्रबोधनकारांच्या संस्कारांपासून, स्केचेसच्या जगापासून, शिवसेनेच्या वाटचालीपर्यंत अनेक विषय खटय़ाळ विनोद सांगत खुलवले आहेत. २४ एप्रिल २०१२ रोजी झालेल्या शेवटच्या सार्वजनिक भाषणात (षण्मुखानंद-दीनानाथ पुण्यतिथी) त्यांना धाप लागत असल्यामुळे मला थेट त्यांचंच भाषण मध्ये मध्ये निम्मं सादर करण्याची संधी लता मंगेशकरांच्या साथीनं दिलीय. शिवाय माझ्या करिअरला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यावर माझा स्वत: उपस्थित राहून विशेष सन्मान करत मानपत्र दिलंय आणि मराठी मध्यमवर्गीय घरातल्या मुलाला नोकरी सोडून देऊन निवेदन- मुलाखतीच्या बेभरवशी क्षेत्रात व्यवसाय करायला प्रोत्साहित करणाऱ्या माझ्या आई-वडिलांचासुद्धा त्यांनी सन्मान केलाय. त्यांना विसरणं शक्यच नाही.

पुलंनी लेखणी-वाणीतून मिळवलेले पूर्णत: ‘प्युअर’ पैसे, बाबा आमटेंचं आनंदवन,

डॉ. अनिल अवचट यांचं मुक्तांगण, जयंत नारळीकरांची विज्ञान संशोधन संस्था, अनाथ विद्यार्थी गृह अशा सामाजिक- शैक्षणिक संस्थांना दान केल्याचं मी विसरूच शकत नाही. डेक्कन क्वीनमध्ये त्यांच्याशी गप्पा मारत असताना हे सगळं सुनीताच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

गोविंदराव तळवलकर, कुमार केतकर, डॉ. अरुण  टिकेकर, गिरीश कुबेर या संपादकांशी थेट संवाद साधता आला, तर विजय कुवळेकर मित्रच असल्याने त्यांनी संपादक पद सोडल्यानंतर त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारता आल्या. कुवळेकरांमुळेच आणि दिनकर गांगल यांच्यामुळे वृत्तपत्रीय स्तंभलेखन करू शकलो आणि त्या स्तंभाची पुस्तकं प्रकाशित होऊ शकली. (१) मुक्काम (भेट दिलेली अनुभवलेली गावं), (२) लाइफस्टाइल (शंतनुराव किलरेस्कर ते शांता शेळके ते बाबामहाराज सातारकर यांच्याबरोबर एक दिवस, मान्यवरांची जीवनशैली), ३) मुद्रा (जिद्दीनं जगणारी जगावेगळी सामान्य माणसं), ४) ताजंतवानं (फ्रेश करणारे क्षण), ५) झगमगत्या दुनियेत (विनय आपटे, आनंद मोडक ते मधुर भांडारकर – ३४ व्यक्तिचित्रे), ६) मानाचं पान (कलावंतांचं खाणं-पिणं), ७) तो-ती (नात्यांच्या गुंत्यांचा कानोसा), ८) शाहू मोडक चरित्र आणि आता ‘राजहंस प्रकाशन’तर्फे विविध क्षेत्रांतील ‘टॉप टू’ अशा वीस जणांच्या मुलाखती प्रसिद्ध होतायेत.

जाता जाता माझेच दोन पैलू सांगतो; फार कुणाला माहिती नसलेले. निवेदक म्हणून काम करताना अनेकदा भाषण खूप लांबण्याचा कंटाळा येत असतो. अशा वेळी मी भाषण चालू असताना समोरच्या कागदावर स्टेजवरच्या माणसांचे चेहरे स्केच करत बसतो. जवळजवळ सातशे स्केचेस झाली आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे भेटलेल्या माणसांनी बोलताना सांगितलेल्या गोष्टी रोजच्या रोज डायरीत लिहितो. पुस्तक लिहिताना डायरी उपयोगी पडते.

अकाऊंट्स- कॉस्टिंग असे अभ्यासाचे आरंभीचे विषय बाजूला ठेवून मी पत्रकारितेत येतो काय, तऱ्हेतऱ्हेच्या माणसांना भेटतो काय, आकाशवाणी पुणे केंद्रावर सकाळी सातच्या बातम्या देताना माझा लागलेला उत्तम आवाज आणि शब्दांचे नेमकेपण यातून जाहिरातीच्या व्हॉइस ओव्हरच्या क्षेत्रात काम मिळवतो काय, ‘चैत्रबन’चं निवेदन करण्याच्या निमित्ताने निवेदन- सूत्रसंचालन हा पूर्णवेळ व्यवसाय सुरू करतो काय.. माझा जुना वाडा पाडला जात असताना, तो मनात डोळ्यासमोर जपण्यासाठी त्याचं चित्रण करतो काय आणि साठी- पंचाहत्तरीला आई-वडिलांच्या वाढदिवसांना जेवणावळीवर पैसे खर्च करण्यापेक्षा त्यांना चालतेबोलते अर्काइव्ह करून ठेवा, असे आवाहन, घरापासून दूर परदेशात स्थायिक झालेल्या मुलांना करून सव्वाशे आजी-आजोबांच्या फिल्म्स करून अग्रलेखातून दाद मिळवतो काय?..

साऱ्याचं मूळ ‘माणसं’ हा वीक पॉइंट. आकडेवारीच्या नोकरीत अडकण्यापेक्षा माणसांना शब्दबद्ध करत गेलो, चित्रबद्ध करत गेलो आणि अगदी अनोखं करिअरचा उच्चांक करू शकलो. हे जरी माझे श्रेय असलं तरी मला समजून घेत, संदर्भ देत, वेळ देत, स्वत:चं वलय- पद- सत्ता- संपत्ती विसरून माझ्यासारख्याला सांभाळून घेत सारी मोठी माणसं आपुलकीनं वागली, बोलली म्हणूनच केवळ संवादाचा उच्चांक मी करू शकलो.

रामसेतू बांधण्यात छोटा वाटा उचलणाऱ्या खारीला शाबासकीची चार बोटं पाठीवर मिळाली. मलाही वर उल्लेखलेल्या, जागेअभावी उल्लेख करू न शकलेल्या किमान चार हजार व्यक्तींच्या हाताचा स्पर्श पाठीवर दाद मिळत झालेला आहे. कृतार्थ हातांचा तो स्पर्श. मी कृतज्ञ आहे.

मराठीतील सर्व श्रेयस आणि प्रेयस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on sudhir gadgil life journey