रेणू दांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जे. कृष्णमूर्ती, विवेकानंद यांच्या विचारांना आधुनिक पद्धतीने मांडणी करणारे शिक्षणतज्ज्ञ आज निर्माण झालेत. भारताच्या खेडय़ापाडय़ांत तशा शाळा तयार झाल्यात. कौसानीची ‘लक्ष्मी आश्रम’, अमृतसरजवळची ‘सच की पाठशाला’, राजस्थानातील ‘दिगंतर – शिक्षांतर’, भोपाळमधली ‘मुस्कान’, तमिळनाडूतली ‘पूर्वीधाम’, ‘विद्यावनम्:’ असे अनेक आशाकिरण. इथलं सर्वच वेगळं आहे. काय वेगळेपण आहे या शाळांमध्ये?, त्यात शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासामध्ये? आणि काय अनुकरणीय आहे त्यात? या शाळांमधील  ‘सृजनाच्या नव्या वाटा’ सांगणारं हे सदर दर पंधरवडय़ाने.

कौशल्यपूर्ण, प्रकल्पाधारित शिक्षणातून उत्तम विद्यार्थी घडवणाऱ्या चिखलगाव इथल्या लोकमान्य टिळक विद्यामंदिर या शाळेत रेणू दांडेकर १९८४ पासून मुख्याध्यापक आहेत. प्रयोगशील शिक्षण देता देता त्यांनी आपल्या अनुभवांवर अनेक पुस्तकं लिहिली. यात ‘रुजवा’, ‘कणवू’, ‘मुलांशी बोलताना’, ‘गाणी मुलांची झाडांची’, ‘तुला आई आहे?’, ‘फुलोरा’, ‘गोष्टी घरटय़ांच्या’ अशा लेखसंग्रह, कथासंग्रह, काव्यसंग्रहाचा त्यात समावेश आहे. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक महामंडळ, पुणे (बालभारती), बालचित्रवाणी कार्यकारी समिती अशा अनेक संस्थांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या लेखनकार्याची आणि प्रयोगशील कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

आजचं शिक्षण म्हणजे फॅक्टरीसारखं झालंय. एका बाजूला सरकारी शाळा ओस पडतायत. दुसऱ्या बाजूला पालक इंग्रजी माध्यमावरच्या विळख्यात अडकलेत. परिणामत: गल्लोगल्ली इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. त्यांच्या दर्जाकडे, गुणवत्तेकडे अजून कुणी बघितलंच नाही. उलट ते गृहीत धरलंय. कितीही फी, कितीही देणगी. तिथे परीक्षा, मार्क्‍स, दप्तरं यांचं ओझं जड होतंय. घरातलं मूल एकदम जगाच्या व्यासपीठावर नेण्याचा हव्यास. गोंधळ! पण हे चित्र बदलू शकतं.

काय करावं? तत्त्वत: शिकणं हे करत करत घडलं पाहिजे असं मानताना ‘मुलांना काम नाही सांगायचं’ कारण ती गुलामगिरी मानली जाते, पण आपण काम ज्ञानाशी जोडू शकलो नाही. परिणामत: श्रमाचं मोल कमी झालं. ‘बिनभिंतीची शाळा’ फक्त कवितेत राहिली. उलट इमारती चकचकीत होऊ लागल्या. नुसत्या शैक्षणिक साधनांनी गच्च भरल्या. टाय आला. बूट आले. कारण मराठी शाळांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या अनुकरणाचा हव्यास. या सगळ्यात मूल्यांचं काय? ज्या शैक्षणिक विचारांचा पाया आपल्या शिक्षणरचनेला मिळाला ते विचार पटताहेत, पण प्रत्यक्षात वेगळं घडू लागलं. मुक्तता, स्वातंत्र्य शब्दांचा अर्थ काय?  शिक्षण व्यवस्थेत आहेत हे शब्द. अशा सगळ्या अवस्थेत संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी आशेचे किरण दिसतात. सुदैवाने रमेशभाई कचुरिया यांच्या मदतीमुळे या अशा किरणांचा प्रकाश मी अनुभवला. फक्त भारावून नाही गेले तर हा प्रकाश सर्वांपर्यंत पोचावा, अनेकांना यात भागीदार करून घ्यावे असे वाटले. म्हणून हे सदर.

हे लिहून काय होणार? लोक वाचणार नि सोडून देणार. पण असं नाही. या आशाकिरणांकडे पाहून तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांचा विश्वास दृढ होईल, आपल्याला वेगळं करता येतं. आहे त्या व्यवस्थेत वेगळं करता येतं हा आत्मविश्वास वाढेल. शेवटी मी एक शिक्षक म्हणून, पालक म्हणून मुलांबरोबर असताना दर वेळी कुणी निरीक्षक, परीक्षक, अधिकारी नसतो. असला तरी कागदाचा भुकेला. ते कागद भरून दिले की आपण मोकळेपणाने काय करू याची दिशा या भारतभरातील शाळांकडून आपल्याला नक्की मिळेल.

महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जे. कृष्णमूर्ती, विवेकानंद यांच्यापुढे यांच्या विचारांना आधुनिक पद्धतीने मांडणी करणारे शिक्षणतज्ज्ञही निर्माण झालेत. खेडय़ापाडय़ांत, स्वत:च्या हिमतीवर तर कधी मोठमोठय़ा कंपन्यांकडून निधी घेऊन. शिकण्याची वेगळी रचना झाली आहे. ही व्यवस्था नाही, रचना आहे. इथलं मूलभूत तत्त्व समजून घेतलं तर सगळ्या व्याख्या राहणार नाहीत. तत्त्वाची अनुभूती जो तो आपापल्या शोधातून अनुभवातून देईल. ज्यामुळे आपल्या प्रत्येकाला शिक्षण व्यवस्था बांधील वाटते, ओझं वाटतं नि मग ती यंत्रवत होते. त्या त्या सर्व गोष्टींना या शाळांनी छेद दिला आहे. गरज म्हणून शाळा, शासन देतंय म्हणून शाळा, प्रसार म्हणून शाळा नि सक्ती म्हणून येणारी मुलं असं यातल्या कोणत्याच शाळेचं स्वरूप नाही. इथे मुलं धावत येतायत. इथे मुलं शाळा सुटल्यावर रेंगाळतायत. इथे मुलं अनेक गोष्टी हाताने स्वत:च्या विचारांनी करून पाहतायत. इथे मुलांच्या हातात सर्वासाठी एक पुस्तक नाही. इथे मुलांना सरधोपट गृहपाठ नाही. इथे मुलांच्या पाठीवर हलकंफुलकं दप्तर आहे. इथे परीक्षा नाहीत. गुणांत मोजणारं मूल्यमापन नाही, तरी मुलांचा दर्जा, गुणवत्ता वेगळी आहे. इथे अभ्यासक्रम प्रत्येकाने तयार केलाय. त्यात सर्वाचा सहभाग आहे. मुलं स्वच्छतागृह समजून साफ करतायत तरी पालकांची तक्रार नाही. शिक्षक नाहीत तर दीदी, भय्या, अक्का-अण्णा, आई-बहन आहेत जे सरकारी पगार नसताना मनापासून, मनातल्या आशयाला व्यक्त करत, विचारपूर्वक अधिक काम करतायत. शाळेपूर्वी – सुटल्यावर शिक्षक शाळेबाहेर नाही दिसणार. संस्थाचालक मुलांबरोबर शिकतायत. थोडक्यात, सर्वच वेगळं आहे. विचारांचा पाया वेगळा आहे नि स्वत:च्या निरीक्षणाचा, समाजाच्या अभ्यासाचा, मुलांच्या मन:स्थितीचा, परिस्थितीचा विचार करून रचना करण्याचं स्वातंत्र्य त्यांनी घेतल्याने मुलांची मुक्त जीवनपद्धती तयार झालीय. शिस्तीचा कोरडा, रूक्ष, आरडाओरडा करणारा धाक नाही म्हणून शिक्षाही दुखावणारी हिंसक नाही.

खरंच असं आपल्याच देशात घडून शकतं. कारण आपल्या घटनेचा अर्थ त्यांना समजलाय. आपण या शाळा पाहाव्या. पाहायला जमल्या नाहीत तर वाचून त्यांचा अनुभव घ्यावा. भारताच्या चारी दिशांत या वेगळ्या शाळा आहेत. दक्षिणेत, उत्तरेत आहेत, पूर्वेला आहेत, पश्चिमेला आहेत. मग ती कौसानीची ‘लक्ष्मी आश्रम’, अमृतसरजवळची ‘सच की पाठशाला’, राजस्थानातील ‘दिगंतर – शिक्षांतर’, भोपाळमधली ‘मुस्कान’, तामिळनाडूतली ‘पूर्वीधाम’, ‘विद्यावनम्:’ आणि इतर राज्यांत त्या या शाळांमध्ये गेल्यावर ऊर्जा मिळते. तिथला उत्साह पाहिल्यावर आलेली मरगळ दूर होते. आपणच ठरवूया यातलं काय काय नि कसं कसं आपण आपल्या विचारातून स्वीकारू या. केवळ पाश्चात्त्यांच्या विचारांचं भाषांतर करून नाही थांबून चालणार हे सर्वत्र किती नि कसं जाईल याचाही प्रत्येकाला स्वत:च्या पातळीवर विचार करता येईल. इथली मुलंही वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतील आहेत. इथे सर्वत्र लोकशाही मूल्ये खऱ्या अर्थाने रुजतायत. मुलांना छान लिहिता-वाचता येतेय. या सर्वानी आपलं साहित्य निर्माण केलंय. मूल्यमापनपद्धती तयार केलीय. त्या त्या लेखात सर्व मांडण्याचा आटापिटा केलाय. पण शेवटी लेख म्हणून मर्यादा आहेत. मीनाक्षी आक्का, रीना दास, योगेंद्र भूषण, निधी जैन, मनीष जैन, शिवानी तनेजा, वांगछूक, प्रेमा रंगाचार्य अशी अनेक माणसं आपल्याला भेटतील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामातून आपण शिक्षणात वेगळे विचार मांडलेल्या आपल्याच पूर्वजांचा अनुभव घेऊ शकू. हे केवळ भारतीयच नाही तर जगात वेगळे प्रयोग करणारे!

मला कल्पना आहे हे लेख म्हणजे जे दिसलं, अनुभवलं, वेगळं जाणवलं ते तसंच मांडलंय. साहित्याचा थोडक्यात आढावा घेतलाय नि नोंदही केलीय. मला वाटतं चला आपणही हे आशाकिरण आपल्यात सामावून प्रकाशदीप होऊया. शिकण्याला नवा अर्थ देऊया. आणि हो जिथे काही जाणवेल, वाटेल तिथे संवादही साधूया.

renudandekar@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrujanachya navya vatta article by renu dandekar