|| रेणू दांडेकर
मुलं सगळीकडे सारखीच. खेळणारी, दंगा-मस्ती-धमाल करणारी, शिकणारी. पण हे सगळ्यांच्या नशिबात नसतं. काही मुलं आपलं हसूच हरवलेली असतात. उमलत्या वयात नको ते पाहावं लागलेली, अकाली प्रौढ झालेली ही मुलं मोठय़ांचं अनुकरण करू लागतात. चोऱ्या करतात. पोलिसांची धरपकड सोसतात. खायला पुरेसं मिळत नाही, मग पळवून आणतात. शिळंपाकं खातात. शिव्या ऐकत मोठी होतात. घाणीत वाढू लागतात. यात त्यांचा काय दोष? तीही निर्मितीक्षम असतात, सर्जनशील असतात. पण त्यांना संधी मिळायला हवी. कोणीतरी त्यांचा विश्वास मिळवून, त्यांच्यातलं होऊन जावं लागतं. इतर मुलांसारखा त्यांच्याही आयुष्यात आनंद भरायला हवा.. तसा आनंद निदान काही मुलांना मिळालाय तो ‘मुस्कान’ शाळेच्या रूपानं! आज इथली मुलं आहेत, शिकणारी, हसणारी, फुलणारी!
शिवानी तलेजा आणि त्यांचे सर्व सहकारी हे काम अविरत करताहेत. आर्थिक निम्नस्तरातल्या या मुलांचे प्रश्न जाणून त्यांना अन्यायाविरुद्ध जागं करण्याचं काम हे कार्यकर्ते करतात. ‘मुस्कान’ शाळा, शिक्षकांची कामाची पद्धत, मुलांना समजून देणं अगदी वेगळं आहे. एरवी जीवन शिक्षण, आदर्श जीवन आदी शब्द शाळेवर कोरलेले असतातच. ‘मुलांनो, तुम्ही उद्याचे नागरिक आहात’, ‘नेहमी खरं बोलावं’, ‘चोरी कधी करू नये’ अशा वाक्यांचा या वयातल्या मुलांच्या जीवनाशी किती अर्थ जुळतो? अशा अनेक वस्त्या असतात, जिथं जायची भीती वाटते नि लाजही. तिथे शाळा असतात, पण ओस पडलेल्या, रिकाम्या. ‘मुस्कान’चं तसं नाही. ‘मुस्कान’नं मुलांच्या हास्यस्रोताचा शोध लावलाय. अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड देणारी ही मुलं त्यांच्यातली ताकद ‘मुस्कान’नं ओळखलीय. मध्य प्रदेशातल्या भोपाळ शहरातील एका शेतात ‘मुस्कान’ आज मुलांना घडवते आहे.
याची सुरुवात कशी झाली? वाडय़ा-वस्त्यावर जिथं शाळा होत्या, पण मुलं नव्हती अशा ठिकाणी काही तासांची शाळा सुरू झाली. मुलांना आवडतील असे पाठ तयार केले गेले. खूप मोकळा वेळ खेळायला दिला गेला. मुलं लिहू लागली. त्यांनी लिहिलेले अनुभव ‘मुस्कान’नं प्रसिद्ध केले. मुलांनी लिहिलेली पुस्तकं इतर मुलं पाहू लागली, वाचू लागली. ‘मुस्कान’ची मुलांनी लिहिलेली २२-२५ पुस्तकं आहेत, त्यावर या मुलांचा परिचय, नाव आहे.
या शाळेला वेगवेगळ्या संस्थांचे आर्थिक योगदान मिळत आहे. मात्र त्यांचा कोणताही एककेंद्री हस्तक्षेप नसतो. सगळे एकत्र येतात. मिळून काम करतात, सर्वाची चर्चा होऊन एक मसुदा तयार होतो. त्याप्रमाणे काम चालतं. मुलं औपचारिक पद्धतीनं शिकतात का? तर नाही. मुळात इथल्या शिक्षणाच्या संदर्भात सामाजिक संदर्भ जास्त आहेत. इथली मुलं वेगळ्या वातावरणातील आहेत. याचे पडसाद ‘मुस्कान’नं लिहिलेल्या ‘कानून के प्रकाश में’ या पुस्तकात वाचायला मिळतात. २३ ते २५ जुलै २०१५ मध्ये पोलिसांकडून मुलांना मारहाण झाली, शिव्या दिल्या गेल्या. याविरोधात ‘मुस्कान’नं एक टीम तयार केली. वाडय़ा-वस्त्यांवर शोध घेतला. सत्य काय ते जाणून घेतलं. प्रत्यक्ष त्या मुलांना हे कार्यकर्ते भेटले. ही मुलं आज या शाळेत आनंदानं शिकत आहेत. तत्पूर्वी हे कार्यकर्ते या मुलांच्या आई-वडिलांना भेटले. त्यांना विश्वास दिला. ही मुलं शाळेतून ‘गळती’ झालेली होती. ही पुन्हा ‘मुस्कान’मध्ये नियमित येऊ लागली, त्याच्या वागण्यात झालेला बदल हे या शाळेच्या गुणवत्तेचं लक्षण आहे. अशा मानसिकतेच्या मुलांना शिकवण्यासाठी वेगळे अभ्यासक्रम तयार केले गेले.
भोपाळमधल्या छोटय़ा छोटय़ा वस्त्यांत ‘मुस्कान’ची सुरुवात झाली. या शाळांचे स्वरूप अगदी अनौपचारिक होतं. ४० वस्त्यांवर काम सुरू झालं. कामात सातत्य आल्यावर मग ‘मुस्कान’ची इमारत झाली. या शाळेत आदिवासी जमातीतील मुलं येतात (यात गौड, पारधी, ओझा, मुस्लीम व गुजराती यातील काही जमाती आहेत). त्यांच्या वयानुसार त्यांना त्या त्या गटात बसवले जाते. मुळात त्यांच्या ज्या भाषा आहेत त्यात त्यांनी व्यक्त होण्याची पुरेपूर संधी दिली जाते. एका मुलाला इमारतीबद्दल विचारलं तर म्हणाला, ‘हम तो महल में आये है!’
सामान्यत: २५ मुलांसाठी एक शिक्षक आहे. वेगवेगळ्या हस्तपत्रिका बनवलेल्या आहेत. ‘मुस्कान’ची स्वत:ची शिक्षणपद्धती आहे. मुलं आणि शिक्षक यांचं नातं एवढं वेगळं की खूप मोठय़ा प्रमाणावर गळती थांबल्याचं सिद्ध झालंय. याही शाळेत शिक्षकांना वारंवार प्रशिक्षण दिलं जातं. शिक्षकांना इथल्या वातावरणात राहायचं नसेल तर सक्ती केली जात नाही. बरेचसे विद्यार्थीच शिक्षक आहेत. त्यामुळेच नेमकं काय केलं पाहिजे याचं त्यांना भान आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईनं अभ्यासली जाते. मुलांना कोणत्या गोष्टी सांगायच्या, कशा सांगायच्या, त्यावर कसं बोलायचं, मुलं बोलतील ते कसं आजमावायचं याची ‘मुस्कान’ची वेगळी रचना आहे. मुळात मुलांमध्ये शाळेबद्दल इतकी आत्मीयता आहे की मुलं इथं मोकळी होतात. आर्थिक दुर्बलतेचा, सामाजिक शोषणाचा जो ताण असतो तो इथे नष्ट केला जातो. एवढंच नाही तर मुलं शाळेतून जेव्हा वस्त्यांवर जातात तेव्हा घरांतल्या लोकांनाही आवाज उठवण्यासाठी प्रेरित करतात. आपण आपल्यासाठी लढलं पाहिजे, असं मुलांना वाटणं ही केवढी मोठी प्राप्ती आहे.
शिक्षकांचं विशेष आहे. शिकवून ‘टाकलं’ की झालं असं नाही तर शिक्षक स्वत: वाडय़ा-वस्त्यांवर जातात, तिथल्या तरुणांना एकत्र करतात, त्यांच्या समस्या केवळ ऐकत नाहीत तर सरकारदप्तरी जाऊन सोडवण्यासाठी आटापिटा करतात. पोटापाण्याच्या चिंतेत बुडालेल्या पालकांकडे जसे या शिक्षकांचे लक्ष असते तसेच तरुणाईलाही वेगळं घेऊन शारीरिक समस्या, मुलांची विक्री, लैंगिक शोषण याविषयी चर्चासत्रं घेतली जातात. आज या वस्तीतली माणसं आणि ‘मुस्कान’मधला प्रत्येक जण यांच्यात आत्मीयतेचं नातं आहे.
‘मुस्कान’च्या विचारानं भारावलेले (ही विचारप्रणाली आहे) कार्यकर्ते वाडय़ा-वस्त्यांवर सतत फिरायचे, प्रश्न जाणून घ्यायचे, त्याची उत्तरं सहज मिळायची नाहीत, मग अस्वस्थ व्हायचे, एकत्र यायचे. त्यातून ठरवून कामाला वेगळी दिशा दिली गेली. ‘मुस्कान’ आणि शासनाच्या शाळांचा तुलनात्मक अभ्यास केला गेला. इथल्या पूरक शाळेत मुलं येतात पण नेहमीच्या शाळेत मुलं का जात नाहीत? याचा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं, तिथं त्यांना मान नाही. टोचून बोललं जातं, भाषेवरून डिवचलं जातं, माणूस म्हणून कोणतीच प्रतिष्ठा नाही. हे बदलायला हवं होतं. विविध भाषेच्या मुलांना एका सूत्रात बांधण्याचं काम ‘मुस्कान’नं स्वत:च्या पद्धतीनं केलंय. सुरुवातीला जी ४० केंद्रे वाडय़ा-वस्त्यांवर सुरू झाली. तिथे अगदी वेगळे उपक्रम ‘मुस्कान’नं सुरू केलं. जी मुलं कमी पडत होती त्यांच्यासाठी वेगळी पद्धती वापरली. जागा नसेल तिथं मुलं बागेत जमू लागली. तिथे तिथे ग्रंथालयं सुरू झाली. मुलांना खाऊ मिळू लागला. आपल्याला कोणी तरी विचारतंय, समजून घेतंय यातून मुलं ‘मुस्कान’ची झाली. हे केंद्राकेंद्रावर झालं.
आजच्या ‘मुस्कान’ (इमारतीमुळे) मुळे काम एके ठिकाणी सुरू झाले. त्यामुळे कामाला गती आली. ‘मुस्कान’नं भाषेवर विशेष काम सुरू केलं. ‘मुस्कान’नं तयार केलेले लहान लहान पाठ मुलांच्या जगण्यातले आहेत. इतर विषयात (गणित, विज्ञान, समाजशास्त्र) प्रत्यक्ष कृती करून घेण्यावर जास्त भर असतो. शिक्षकांच्या कामाचे, अनुभवांचे, प्रयोगाचं एकीकरण होते. अपेक्षित यश ठरवलं जातं. मुलांचे मूल्यमापन काटेकोरपणे, योग्य तेच नोंदवलं जातं. जेव्हा कमतरता जाणवते तेव्हा सगळ्या टीमचं पुन्हा प्रशिक्षण होतं. इथे आता ४०/४५ जण कार्यरत आहेत. इथली ही शाळा झोपडपट्टीतल्या सर्व घटकांशी जोडली गेल्यामुळे इथल्या शिक्षकांच्या भूमिकेतले कार्यकर्ते हिंसाचार, सरकारी कागदपत्रांची पूर्तता यावरही काम करत.
चार पारधी वस्त्यांवर खूप मारामारी व्हायची, पोलिसांकडून धरपकड व्हायची, यात मुलं भरडली जायची. यावर ‘मुस्कान’नं अहवालवजा पुस्तक लिहिलंय. ‘मुस्कान’ने सरकारी यंत्रणा कॉपरेरेट, सरपंच यांच्याबरोबरही काम सुरू केलं आहे. शाळा किती पैलूंनी आकार घेते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही शिक्षणप्रणाली आहे. ‘मुस्कान’च्या बालवाडय़ाही आहेत. तिथले ताई-दादा दर शनिवारी एकत्र जमतात. इथे मुलांना गृहपाठ दिला जातो. इथे परीक्षा नाहीत हे सांगायला नकोच. प्रत्येक मुलाच्या गुणवत्तेसाठी वेगळं नियोजन केलं जातं, हेअभ्यासण्यासारखं आहे.
शाळेत मी अनेक विषयांच्या तासिका पाहिल्या, कार्यालयीन काम पाहिलं, नि मुलंमुलंच करत असलेलं काम पाहिलं. सगळीकडे जवळीक, आपुलकी जाणवली. ‘मुस्कान’चं साहित्य हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अनुभवाची मांडणी किती निर्भीडपणे करतात हे ‘मुस्कान’नं प्रकाशित केलेल्या मुलांच्या जवळजवळ २२-२५ पुस्तकांतून स्पष्ट होते.
भोपाळमधील गंगानगर वस्तीतल्या १० वर्षांचा मुलानं लिहिलंय, ‘बारिश का एक दिन’ -सातवीत शिकणाऱ्या या मुलानं बाजारात लिंबू विकत हे पुस्तक लिहिलं. ‘नया स्वेटर’ पुस्तक पपतू धुर्वे नावाच्या मुलीनं लिहिलंय. ही मुलगी भंगार जमवते. पण स्वतंत्र वृत्तीनं जगते, येणाऱ्या समस्यांना निर्भयतेने तोंड देते. तिचे अनुभव तिची ताकद दाखवतात. याशिवाय ‘थाना’, ‘घर बनाया’, ‘आज क्या किया’, ‘चिडियाँ और चित्र’, ‘बरसात की तैयारी’, ‘लट्ट ही लट्ट’, ‘गब्बू की बकरी’, ‘सुअर का दोस्त’, ‘राजू की भैंस’, ‘चटनी’, ‘मधुमख्खी’, ‘गन्ने का बटवारा’, ‘बैल की सवारी’, ‘नान’, ‘कार’, ‘योगिता का भूत’, ‘पानी बेचती है’, ‘बेर खाने है’, ‘सोहेल की पिली चड्डी’ एवढय़ा लहान वयातल्या मुलांनी अशा जगात राहूनही आपल्या अनुभवांची मांडणी अशा नेमक्या शब्दात केलीय हे पाहून आश्चर्य वाटतं.
ही मुलं असं खूप काही लिहितात. जगण्यातलं दु:ख विसरतात नि मुक्तपणे हसतात, ते मात्र ‘मुस्कान’मुळे!
renudandekar@gmail.com