रेणू दांडेकर
योगी अरविंद आणि मदर मीरा अल्फासा यांच्या विचारातून साकारलेली दिल्ली येथील योगी अरविंदो मार्ग येथील ‘मीरांबिका.’ या शाळेत मुलांना जाणीवपूर्वक निसर्गाशी समरस करणारं शिक्षण दिलं जातं. ‘मीरांबिका’चा स्वत:चा अभ्यासक्रम आहे. तो जाणीवपूर्वक केलेला. स्वत:ची पुस्तके आहेत. अर्थात शिकण्याच्या पद्धतीही वेगळ्या आहेत. त्यात मुलांना विचार करायला, मुलांना स्वत:चं लिहायला संधी आहे. तीस वर्षे सुरू असणाऱ्या या शाळेविषयी..
दिल्ली येथील योगी अरविंदो मार्ग येथील शाळा ‘मीरांबिका.’ इथे मुलांना जाणिवपूर्वक निसर्गाशी समरस करणारं शिक्षण दिलं जातं. योगी अरविंद आणि मदर मीरा अल्फासा यांच्या विचारातून साकारलेली, त्यांच्या तत्त्वज्ञानाने भारावलेलीच नाही तर जाणीवपूर्वक विचार करून निर्माण झालेली, नाव सार्थ करणारी ‘मीरांबिका’ – ही फ्री प्रोग्रेस स्कूल शाळा प्रत्यक्ष पाहताना जे अनुभवलं, जे जाणवलं त्याविषयी.
मीरांबिका किंवा अशा वेगळ्या विचारांच्या पायावर उभ्या असणाऱ्या शाळा वेगळ्याच राहतात, वेगळ्या अस्तित्वाने! ही शाळा बघत असताना एक गोष्ट लगेच जाणवते की केवळ योगी अरविंद आणि मदर मीरा अल्फासा यांचे फक्त फोटो सगळीकडे नाहीत तर त्यांच्या विचाराने काम करणारे, झपाटून गेलेले इथे दीदी-भय्या (इथं शिक्षकांना सर, मॅडम म्हणत नाहीत. कारण शिक्षकांसारखी त्यांची भूमिका नाही) आहेत.
आज आपण मुलांनी मातीत हात घातला की रागावतो. कपडय़ाला माती लागली की चिडतो कारण ब्रॅण्डेड कपडे खराब होतात. बूट, टाय, इस्त्री यामुळे मातीपासूनच दूर जाऊ लागलो आहोत. माती हे इथे निसर्गाचं प्रतीक आहे. अरविंदांच्या तत्त्वज्ञानानुसार निसर्ग, निसर्गातून घडणं, निसर्गातून शिकणं, याला खूप महत्त्व आहे. यातून घडणारं मूल वेगळ्या जाणिवा, संवेदना, ज्ञान घेऊन घडतं याची प्रचीती इथल्या मुलांमध्ये वावरताना येते. जिथे भीती-दडपण-तणाव नाही तिथे फुलायला वाव जास्त. चित्रातल्या पक्ष्यांचे रंग अनुभवण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातला आनंद महत्त्वाचा म्हणूनच की काय या मुलांसमोर मोर प्रत्यक्ष नाचत असतो.
दिल्लीसारख्या राजधानीच्या शैक्षणिक झगमगाटातल्या शहरात ‘मीरांबिका’ ही आपले वेगळेपण जपणारी शाळा आज तीस-बत्तीस वर्षे सुरू आहे. हे एक आव्हान आहे. शाळेवर लिहिणं, शाळा पाहाणं आणि प्रत्यक्ष आपलं मूल या प्रणालीचा भाग बनवणं वेगळं आहे. म्हणूनच दीदी म्हणाल्या, ‘‘पालकांना आज वेगळ्या शिक्षणाची भुरळ पडलीय. इथे मुलांना दाखल करताना पालकांवर दपडण असतं. आम्ही प्रवेशाच्या वेळी सर्व कल्पना देतो, पालकांना इथल्या प्रणालीबद्दल स्पष्टपणे सांगतो. इथलं तत्त्वज्ञानही समजून द्यायचा प्रयत्न करतो. बैठका होतात. पालकांना पटलं तरच त्यांनी हे धाडस करावं.’’ पण आजच्या स्पर्धेच्या काळात ही संख्या थोडी कमी झालीय. पालकांना मनातून पटत असतं पण निर्णय घ्यायची भीती वाटते.
इथल्या जयंती दीदी भेटल्या आणि मग त्यांचा हात धरूनच शाळेत वावरू लागले. आधी आपोआपच नर्सरीच्या वर्गात गेले. वर्ग मैदानात होता. मैदान छोटंसं, मातीचं होतं. एक-दोन पालक मदत करत होते आणि दीदी मुलांच्या गटाबरोबर स्वत: धावत होत्या. मुलांचे गट लहानच होते, त्यामुळे पकडापकडी सुरूच होती. सकाळच्या उन्हात मुलं हा खेळ अगदी मजेत खेळत होती. बालवाडीच्या वर्गात खूप पुस्तकं होती. मुलं पुस्तकं मनसोक्त हाताळत होती. दीदी गाणं सांगत होत्या. मुलं नाचत होती. कुणीतरी दुसरं गाणं सुचवलं तर त्या गाण्याला सुरुवात झाली. मुलं आई-बाबांचं बोट आनंदाने सोडून आली होती. त्यांच्या बैठका वेगळ्या होत्या. मुलांना सुखकारक वाटतील असे छान रंग शाळाभर होते. कामाची पद्धत नक्कीच वेगळी हेती. दीदींचं नि मुलांचं घट्ट नातं होतं.
या शाळेची कार्यपद्धतीही आगळी आहे. योगी अरविंद आणि मदर मीरा अल्फासा यांचा अभ्यास, त्यावर चिंतन आणि विचार सर्वानी केला होता. ते त्यांच्या कामातून झिरपत होतं. प्रत्येक कामामागचं कारण प्रत्येकाला सांगता येत होतं. जे करतोय त्यावर विश्वास होता. शिक्षक प्रशिक्षणातून एक गट वेगळा निघाला आणि या शाळेचा जन्म झाला. मन, शरीर आणि आत्मा एकत्र आले की वेगळं काम होतं यावरच्या विश्वासामुळे ‘सर्व जण’ योगाभ्यास आणि प्राणायाम करतात. शाळेची सुरुवात इतरत्र योगाने होते, पण ‘मीरांबिका’च्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की मुलांमध्ये असणाऱ्या अधिक ऊर्जेला आधी बाहेर पडू दे, शरीर हलकं होऊ दे. मग मन काम करतं. म्हणून ‘मीरांबिका’त पहिला तास खेळाचा असतो. जवळ जवळ एक तास खेळासाठी. रोज सुरुवातीला सर्व वर्ग बॅडमिंटन, फुटबॉल, टेनिस, व्हॉलीबॉल असे खेळ क्रमाने खेळतात. मुलं स्वच्छ होतात नि नियोजित जागी आपापल्या मॅट्स पसरून योगासनं करतात. या वेळी प्रत्येकाकडे दीदींचं बारकाईने लक्ष असतं.
‘मीरांबिका’चा स्वत:चा अभ्यासक्रम आहे. तो जाणीवपूर्वक केलेला. स्वत:ची पुस्तके आहेत. अर्थात शिकण्याच्या पद्धतीही वेगळ्या आहेत. त्यात मुलांना विचार करायला, मुलांना स्वत:चं लिहायला संधी आहे. मुलं आणि दीदी-भय्या यांच्यात खूपच सुसंवाद होतो, कारण इथे वर्गात आल्यावर कुणी शिकवायला सुरुवात करत नाही. कुणी तरी सांगायचं आणि सगळ्यांनी गुपचुप ऐकायचं, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असं इथं घडत नाही. त्यामुळे ‘दंगा करू नका, गप्प बसा’, असं म्हणावं लागत नसलं तरी वर्गाची अशी शिस्त आहे. मुलं खूप बोलतात, त्या त्या जागी खूप प्रश्न विचारतात पण त्यात क्रम ठरतो. प्रत्येक शंकेचं निरसन होतं याचा अर्थ उत्तर नाही मिळत, दिशा मिळते.
एका वर्गात नियम लावले होते. हे नियम मुलांनी चर्चा करून लावले होते. मुलांनी ठरवलं होतं, की या नियमांप्रमाणेच वागायचं. स्वयंनियमन घडत होतं. शिवाय प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यावर ‘मीरांबिका’ भर देत असल्यानं तशी क्षेत्रं उपलब्ध करून दिली जातात. इथं शाळेत मुलांना परीक्षा नाही,
पण मूल्यमापन करण्याचा लेखी फॉर्म वेगळा आहे. वर्षांतून दोन वेळा हे मूल्यमापन दीदी करत असतात. त्याला ठरावीक वेळ नसते. यात होणाऱ्या नोंदी वैशिष्टय़पूर्ण आणि खऱ्या आणि त्या-त्या वेळेला केलेल्या आहेत. ‘शिकवणार कधी?’ हा प्रश्नच नसल्याने तो तो क्षण टिपता येतो.
आता येऊ या वर्गात. प्रत्येक वर्गात वीस-पंचवीस मुले. काही वर्गात तर तेवढीही नाहीत. मोठय़ा वर्गातील मुलांसाठी बसायला बाकं आहेत, त्यांची रचना गोलाकार आहे. लहान मुलांना बैठे डेस्क आहेत, मुलं गोलात बसतात. लहान मुलांचे वर्ग तळमजल्यावर तर मोठय़ा मुलांचे वर्ग पहिल्या मजल्यावर. इथे मुलं-मुली खूप मोकळेपणाने, एकत्र वावरत होती. पण त्या मोकळेपणात काही वेगळं नव्हतं. वर्गातलं वातावरण, कामाचं स्वरूप, अभ्यासाची पद्धत, पुस्तकं, सगळंच वेगळं. इथून मुलं बाहेर पडतात तेव्हा? थोडा वेळ जातो बाहेरच्या जगाशी जुळतं घेण्यात. कारण इथलं जगच वेगळं आहे. वर्ग सजावट ही केवळ वर्ग सजवायचे म्हणून केली नव्हती. मुलांनी केलेल्या सर्व गोष्टी तिथे होत्या. त्याही वेगळ्याच. खेळाचा तास झाला की संगीत ऐकवलं जातं. सर्वत्र एकच शास्त्रीय संगीतातली रचना सुरू झाली. शिक्षक डोळे मिटून. मुलं त्या प्रयत्नात, ज्यांना करायचं नव्हतं त्यांना सक्ती नव्हती.
प्रोजेक्टचा तास रोज असतो, त्याच पद्धतीतून मुलं शिकतात. म्हणजे काय? विषय निवडणं, तो अभ्यासक्रमाशी संबंधित असतो, त्याचा वेळ ठरवणं, साहित्याची उपलब्धता, मुलांच्या चर्चा, संदर्भ जमवणं, गट पाडणं, सादरीकरण, याचे विशेष नियोजन हा शाळेचा आत्मा म्हणू या. आपापल्या गटाची नावं मुलांनीच ठरवली होती. ती नावं अशी होती – सिन्सिअॅरिटी ग्रुप, इंटिग्रिटी ग्रुप, हार्मनी ग्रुप, एण्डय़ुरन्स ग्रुप, ट्रिनिटी ग्रुप. ही सगळी नावं ग्रंथालयातील कपाटांना लावली होती. त्यात मुलांचं साहित्य होतं. त्या तासाला मुलं आपापलं काम करत होती. गरज लागेल तेव्हा दीदी होत्याच. झालेलं काम दीदी बघत होत्या. इतक्या सुंदर – परिपूर्ण प्रकल्पातून मुलं आपलं आपण शिकत होती. वयानुसार जे गट होते त्यांना रंगांची नावे दिली होती.
शाळेचे वेळापत्रकही वेगळं. नऊ ते दहा खेळ, दहा ते पावणेअकरा रिफ्लेक्शन, पावणेअकरा ते बारा प्रोजेक्ट, बारा ते एक जेवण, एक ते पावणेदोन इंग्लिशचा अभ्यास, पावणेदोन ते अडीच हिंदीचा अभ्यास. या वेळातच विज्ञान, गणित, समाजशास्त्राचेही तास होतात. संस्कृत, इंग्रजी, गणित यांच्या तासिका खूप वेगळ्या पद्धतीने घेतल्या जात होत्या. हे झालं वर्ग, विषय, रचना याबद्दल. दीदी-भय्या यांना इथे पगार नाही. खूप तज्ज्ञ व्यक्ती इथे येऊन ते आपलंच काम समजून काम करतात. बरेचसे योगी अरविंदांच्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी आहेत म्हणू या. साधनसामग्रीचा खर्च म्हणून मुलांकडून शुल्क घेतले जातं ते त्यावरच खर्च होतं. इतर गोष्टींसाठीचे पैसे अरविंद आश्रमाकडून येतात.
दीदी-भय्यांची जडणघडणच वेगळी आहे. मुलांसाठी काय-काय करता येईल यासाठी ते झटताना दिसतात. अंतर्गत विकासाला इथे महत्त्व आहे कारण तोच उद्देश आहे. त्यासाठीच तशा कृती कार्यक्रम बनवल्या जातात. गरजेनुसार ध्येयांमध्ये बदलही होतो. स्वमताने कृती कार्यक्रम घेण्याचे स्वातंत्र्य दीदी-भय्यांना असल्यामुळे मुलांच्या वर्तमानाचा खूप अभ्यास होतो. इतरत्र दिसणारी मुलांमधली अस्थिरता, चंचलता, हाव नष्ट होऊन मुलं शांत, स्थिर, आनंदी व्हायला हवीत. सामाजिक भान मुलांना येईल म्हणूनच पाचवीपर्यंत प्रकल्प गटात होतात. तोपर्यंत एकमेकांना मदत करणं, समजून घेणं, मतं ऐकणं- स्वीकारणं याची सवय झाली की सहावीनंतर वैयक्तिक प्रकल्प केले जातात. मुलं याच पद्धतीनं अनेक गोष्टी आपल्या आपण शिकतात. वर्षभरात प्रत्येक विषयाचे सहा-सात प्रकल्प होतात. यातूनच ठरवल्याप्रमाणे मोठय़ा प्रमाणात अभ्यासक्रम पूर्ण होतो. अर्थात गृहपाठही त्याच्याशी निगडित असतो. मुलांच्या पातळीवर येऊन मुलांबरोबर काम करणं काय असतं हे इथे प्रत्येक वर्गात पाहायला मिळालं.
‘मीरांबिका’चं ‘लर्निग थ्रू प्रोजेक्टस’ हे पुस्तक आपण प्रकल्प करणाऱ्या प्रत्येकानं वाचावं- अभ्यासावं. इथं शिकण्याची ती पद्धती आहे. या पद्धतीनं काम करताना आलेले अनुभव, अभ्यासक्रम आणि त्यातील घटक -त्यानुसार प्रोजेक्टची रचना- निष्पत्ती असं याचं स्वरूप आहे. प्रत्येक विषयच जर या पद्धतीनं शिकला जातो तर प्रोजेक्ट डिझाइन करणं किती विचारपूर्वक करावं लागत असेल हे या पुस्तकातून जाणवतं. दुसरं पुस्तक आहे ‘फिजिकल एज्युकेशन : द ‘मीरांबिका वे’ यात मांडलाय एकात्म शारीरिक दृष्टिकोन. शरीरसंस्कृतीचा यात अभ्यास आहे, अन्न, सवयी, स्वच्छता, विश्रांती आणि आराम यांची मांडणी यात केलीय. ‘फिजिकल ऑर्गनायझेशन’ या दुसऱ्या भागात ‘मटेरियल अॅण्ड टीम ऑर्गनायझेशन’बद्दल लिहिलंय. ‘शारीरिक कौशल्या’मध्ये स्किपिंग, सायकलिंग, लक्ष्य वेधणे, फेकणे, एकमेकांकडे देणे अशा नऊ विषयांचा ऊहापोह आहे. तर चौथ्या भागात म्हणजे शारीरिक क्षमता यात स्ट्रेंट, ताकद, क्षमता, तोल साधणे, सहनशक्ती, लवचीकता या विषयाची मांडणी आहे.
शिवाय योगी अरविंद आणि मदर मीरा अल्फासा यांची पुस्तके अर्थात त्यातला विचार हा इथल्या शिक्षण रचनेचा पाया आहे. इथल्या माणसांनी हे तत्त्वज्ञान समजून घ्यायचा प्रयत्न करून त्यातून या रचनेची उभारणी केली आहे. हे जरी शाळेबद्दल असलं तरी हे का याचा अभ्यास केल्याशिवाय या शिक्षण रचनेचे आकलन कसं होईल? जीवनमूल्य अंगीकारून वेगळ्या सामाजिक जाणिवेने इथले विद्यार्थी घडतायत हे नक्की!
renudandekar@gmail.com
chaturang@expressindia.com