रेणू दांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमृतसरमधली ‘सच की पाठशाला’ ही शिक्षकांविना चालणारी आणि तरीही प्रगतिशील शाळा! इथले शिक्षक असतात तिथल्याच जरा मोठय़ा विद्यार्थिनी. इथल्या सगळ्याच मुली नेहमीच प्रथम वर्गात उत्तीर्ण होणाऱ्या. कारण इथे कुठलीही गोष्ट समजल्याशिवाय पुढे जायचं नाही, असा नियमच आहे. इथे कुणी कॉपी करत नाही, की गृहपाठ केला नाही तर खोटी कारणं सांगत नाही. ग्रंथपाल नसूनही भरपूर वाचलं जाणारं ग्रंथालय आणि अनेक वस्तू मोफत असूनही फक्त गरजूंकडून त्याचा केला जाणारा वापर या गोष्टी मुलींमधले संस्कार दाखवून देतात.
त्या शाळेविषयीचा हा भाग १.
पंजाब राज्यातलं अमृतसर, तिथून ३८ किलोमीटरवरचं बटाला गाव. बटालाहून हरचोवलपर्यंत २७ किलोमीटरचं अंतर आणि हरचोवलपासून ४ किलोमीटरवर असलेलं तुगलवाल हे पाकिस्तान सीमारेषेजवळचं गाव. असाच टप्प्याटप्प्यांचा प्रवास करत निघाले. ‘‘एवढा प्रवास आणि तोही एक शाळा पाहायला?’’ प्रवासात एकानं विचारलंही. ‘सुवर्ण मंदिर बघून या,’ असा सल्लाही दिला. ‘‘बघितलं सुवर्ण मंदिर?’’ परतीच्या प्रवासात दुसऱ्यानं विचारलं. मी म्हटलं, ‘‘हो.’’ मनात म्हटलं, तेवढय़ा तोलामोलाची एक शाळा बघितली. तेच माझ्यासाठी सुवर्ण मंदिर!
त्या दिवशी धोधो पाऊस पडत होता. मी ‘सच की पाठशाला’च्या दारात उभी होते. बाहेर पंजाबी भाषेत लिहिलेले बोर्ड होते ते पाहात होते. इतक्यात पांढऱ्या पंजाबी ड्रेसमधल्या मुलीनेच दरवाजा उघडला. मला आत घेतलं नि दरवाजा मोठा अडसर टाकून बंद झाला. एवढय़ा सुरक्षेचा अर्थ लक्षात लगेचच आला. मोठमोठय़ा जुन्या इमारती, मोठं मैदान, शेती, गोशाळा, पिठाची चक्की, गुऱ्हाळ, भाजीपाला, गोबर गॅस, सोलार पॉवर स्टेशन, फळफळावळ आणि इकडून तिकडे फिरणाऱ्या पांढऱ्या स्वच्छ पंजाबी ड्रेसमधल्या मुली. कुणाच्या डोक्यावर शीख मुलांसारखी पगडी, कमरेला कृपण.. वेगळंच वाटत होतं. अंगावर एकही दागिना नाही. स्वेटरही पांढरे. एरवी पांढऱ्या रंगाचा अर्थ माहीत असतो, इथे तो जाणवला. थोडय़ा फार शिक्षिका, त्याही तशाच पोशाखात.
शाळा समजून घेणारच आहोत तर थोडा इतिहास जाणून घेऊ. कारण ही ४२ वर्षे जुनी शाळा, काही विशिष्ट तत्त्वांवर आणि तत्त्वज्ञानावर चालते.. या शाळेत यायच्या आधी चकचकीत इमारतींच्या भरपूर शाळा दिसत होत्या. खेडय़ात वेगळ्या पद्धतीने चालणारी असूनही ही शाळा टिकून आहे. मुलींची संख्या कमी झाली की वाढली? याचं उत्तर आलं, ‘गुणोत्तरच कमी झालं.’
१९२५ मध्ये बाबा आया सिंग रायरारकी यांनी ही ‘पुत्री की पाठशाला’ सुरू केली. तेव्हा समाजाने ती चालू दिली नाही. बाबा आया सिंग अविवाहित होते. त्यांना वडील मानणारे स्वर्णसिंग यांनी आपलं शिक्षण पूर्ण होताना निर्णय घेतला, की आपण ही शाळा पुन्हा सुरू करायची. त्याआधी १९७६ मध्ये त्यांनी महाविद्यालय सुरू केले. स्वर्ण सिंग यांनी बी.एड. होताना सगळ्यांच्या विचारांचा अभ्यास केला होता. त्यांनी ठरवलं, आपण अशी शिक्षणरचना करायची जी वेगळी असेल. ‘गुरू ग्रंथसाहेब’मधला शिक्षणविषयक विचार त्यांना भावला. जी विद्या समाजासाठी काही करत नाही, ती विद्याच नाही. जी विद्या दुसऱ्यांचे भले करत नाही ती विद्याच नाही. विद्या म्हणजे सत्य, याच विचारातून उभी राहिली, ‘सच की पाठशाला’!
या शाळेत मुलींनी यावे यासाठी स्वर्ण सिंग गावागावांत फिरले. कारण मुलींना शाळेत पाठवत नसत. पहिल्यांदा १४ मुली शाळेत आल्या. बोर्डाच्या परीक्षेत सर्व जणी प्रथम श्रेणीत आल्या. प्राचार्य होते स्वर्ण सिंगजी. आजही प्रत्येक मुलीचं नाव त्यांना माहीत आहे. शाळेत २५०० मुली आणि १००० मुलगे आहेत. मुलांची शाळा वेगळी आहे. मी मुलींच्या शाळेत गेले होते.
शाळा सुरू झाली. पहिला तास गुरू ग्रंथसाहेबाचं पठण. असे वाटेल ही धार्मिक शिक्षण देणारी शाळा आहे, पण तसे नाही. सर्व धर्मग्रंथ इथे आहेत नि या तासाला सर्व धर्मग्रंथांतलं जीवनज्ञान सोप्या भाषेत मुलींना दिलं जातं. रोज सर्व मुलींच्या समोर स्वर्ण सिंग एक विचार मांडतात, चर्चा करतात. मुलीही संस्थाप्रमुखांशी अगदी मोकळेपणानं बोलतात. इथे हे एवढय़ावर थांबत नाही. समजलेल्या विचारांवर मुली काम करतात. चार्ट तयार करतात. सर्व वर्गाच्या मुली हे रोज करतात. इथे अभ्यासक्रम वेगळा नाही, पाठय़पुस्तके शासनाचीच आहेत, पण त्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष कामातून विचार दिला जातो.
संस्थेचा पसारा मोठा आहे. ४ शाखा आहेत. पंजाबी माध्यम नर्सरी ते ५ वी, इंग्रजी माध्यम नर्सरी ते ५ वी ३ शाखा, मुलींची शाळा, सीबीएसई पॅटर्नची शाळा. शासनाचे कोणत्याही स्वरूपाचे अनुदान ही संस्था घेत नाही. दुसरा तास ‘अॅक्टिव्हिटी पीरियड’ असतो. यात वाचनासाठी वेळ दिला जातो. खूप मोठे ग्रंथालय आहे आणि कुणीही ग्रंथपाल नाही. मुली पुस्तकं घेतात, वाचून जागच्या जागी ठेवतात. कोणतंही पुस्तक मुलींनी घ्यावं, वाचावं, नोट्स काढाव्यात. इथे प्रत्येक वर्गात पहिल्या तीनमध्ये येणाऱ्या, काही विशेष काम केलेल्या मुलींसाठी पुस्तक संच भेट दिले जातात. एका रॅकवर अशी पुस्तकं आहेत, आलेल्या पाहुण्यांनी कोणतंही एक पुस्तक भेट म्हणून घेऊन जावं. महाविद्यालयीन मुलींसाठी पुस्तकं मोफत आहेत. ग्रंथालय पुस्तकांनी खचाखच भरलंय नि पुस्तकं पाहून ती नियमित हाताळली जात असल्याचं लक्षात येत होतं.
एक तास वृत्तपत्र वाचणं, वृत्त ऐकणं यासाठी एक नि एक तास ‘बेटर इंग्लिश’साठी. असे रोज ५ तास होतात. मग मुली शिकतात कधी? असा प्रश्न पडला असेल. तर नियोजन करून या सर्व गोष्टी केल्या जातात. शेवटचा एक महिना अभ्यासासाठी दिला जातो नि दहावी, बारावीच्या वर्गाची इमारतही वेगळी आहे. स्वर्ण सिंग म्हणतात, ‘‘बच्चा लायब्ररी से गुजरा है, या लायब्ररी बच्चे से गुजरी है, बच्चा कॉलेजसे गुजरा है, या कॉलेज बच्चे से गुजरा है।’’ हे महत्त्वाचं आहे. मुलांमध्ये शाळा आहे. मुलांमध्ये ग्रंथालय आहे. मुलांमध्ये खेळ आहे. मुलांमध्ये काम करण्याची शक्ती आहे हे जाणवत होतं.
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशांसाठी ग्रंथालयाजवळच्या एका खोलीत गणवेश, गाईचं तूप, पांघरुणं, बॅग्ज, इतर वस्तू ठेवल्या होत्या. ज्यांना गरज असेल त्यांनी त्या घेऊन जाव्यात. इथे प्रामाणिकपणा आहे. कारण ती ‘सच की पाठशाला’ आहे. त्यामुळे ज्यांना गरज आहेत तीच मुले आणि तेवढय़ाच वस्तू नेल्या जातात, शिवाय नेलेल्याचा वा दिलेल्याचा गाजावाजा नाही, नो डोनेशन, नो ग्रॅन्ट!
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविवार सोडून एकही सुट्टी नाही. कोणत्याही सणाला आणि कोणत्याही ऋ तूत, कोणत्याही संकटकाळी सुट्टी नाही. सर्ववेळ सर्वकाळ शिक्षण घेण्याचं व्रतच जणू आहे. गरीब मुलींना सर्व मोफत. तीन प्रकारची फी व्यवस्था आहे. पूर्ण मोफत, अर्ध मोफत, आणि फी देणारे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कोणीही खोटं बोलत नाही. कोणी कॉपी करत नाही. पेपर लिहिताना पर्यवेक्षक बाहेर उभी असते. मुली आत पेपर लिहितात. कारण ‘सच’चा रस्ता.
‘नो कॉपी, नो टय़ुशन’ असं दुसरं तत्त्व आहे. याचाच अर्थ ‘समजल्याशिवाय पुढं जायचं नाही’ आपल्याकडे शिक्षक जेव्हा विचारतात, ‘समजलं का?’ तेव्हा सामुदायिक होकार येतो; पण इथे मात्र खरा होकार येतो, संपूर्ण समजल्याचा. आणि ते दिसतं निकालात. सगळेच जण प्रथम वर्गात येणारे, विशेष प्रावीण्य मिळवणारे. शिक्षक नसूनही मुली प्रथम वर्गात येतात, हे इथंच घडते. समजलं नसलं तर समजेपर्यंत समजून घेणं कसं घडतं? तेच तर इथलं विशेष आहे.
इथे शिक्षकच नाहीत? म्हणजे काय हे जाणून घेणं खरंच महत्त्वाचं आहे. ती रचना नेमकी काय आहे ते पाहायला हवं. ती मी वर्गावर्गात जाऊन पाहिली नि अवाक्च झाले. नर्सरी ते कॉलेजपर्यंतच्या मुली जिथे आहेत तिथे महाविद्यालयातल्या मुली या मुलींना शिकवतात. इथे शिक्षक खरंच विद्यार्थी आहेत. प्रत्यक्ष वयाने मोठे, बी.एड./डी.एड. शिक्षक अगदी कमी आहेत. शिवाय संस्थाच त्यांना वेतन देते. काही जण विनामोबदला काम करतात. कशी आहे रचना ते उदाहरणांवरून समजून घेऊ. इतिहास किंवा राजनीती-विज्ञान विषय घेऊ. एक नेहमीचा (वयाने मोठा असलेला) शिक्षक आणि सोबतीला ८ वीतला एक हुशार जाणकार अभ्यासू मुलगा. समजा, वर्ग चाळीस मुलांचा असेल तर १०-१० चे ४ गट पाडले जातात. प्रत्येक गटासाठी १ असे ४ जण असतात. हा गट सातवीच्या वर्गासाठी असतो. अशी रचना प्रत्येक वर्गासाठी आहे. एक मुख्य शिक्षक ही महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थिनी असते. सकाळी ती विद्यार्थिनी असते आणि दुपारी शिक्षिका होते. म्हणूनच इथे सर्वाची भूमिका खऱ्याखुऱ्या विद्यार्थ्यांची. अशी रचना सगळ्या विषयांची!
महाविद्यालयातही मुलीच शिकवतात. आपल्याला प्रश्न पडेल, मुली कशा शिकवतील? एखादा भाग समजला नाही तर? तर इच वन – टीच वन! जिला येतंय ती मुलगी जिला येत नाही तिला आपल्याजवळ घेऊन बसते. मुलींनी मुलींना शिकवणं ही इथली महत्त्वाची गोष्ट आहे. तिच्या यशस्वितेसाठी अचूक नियोजन आणि व्यवस्थापन आहे. गृहपाठ मुलीच देतात आणि गृहपाठ केला नसेल तर त्याचं खरं कारण मुली आपणहून सांगतात. महाविद्यालयीन मुलींनीच शिकवणं याला पालकही विरोध करत नाहीत, कारण आज ४० वर्षे ही शिक्षणप्रणाली सुरू आहे. मुली त्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये, आध्यात्मिक प्रगतीमध्ये कुठेच कमी नाहीत. उलट अधिकच प्रगती करीत आहेत. नैतिक मूल्ये कृतीतून दिली जातात. ज्यांना हे मान्य आहे त्यांनाच प्रवेश मिळतो. मुली आपणहून इथे प्रवेश घेतात. या शिक्षणावर त्यांची इतकी श्रद्धा आहे की, तीन पिढय़ा इथे शिकलेल्या आहेत – आजी – मुलगी – नात!
मुलांच्या सन्मानाच्या वेळी पालकांना बोलावले जाते. त्या वेळी परिपक्व विचारांची मुलगी तयार झालेली असते..
(उर्वरित भाग ४ मेच्या अंकात)
renudandekar@gmail.com
chaturang@expressindia.com