रेणू दांडेकर
‘दिगंतर’ नावातच वेगळेपण आहे. दिशांचं अंतर मर्यादा ओलांडून पलीकडे जाणारी दृष्टी. ‘दिगंतर’ म्हणजे आकाश – अवकाश. जिथं ‘स्काय इज लिमिट’ आहे. औपचारिक बंधनाच्या पलीकडे नेणारं शिक्षण हा अर्थ तिथे प्रत्यक्ष अनुभवता येतो.
त्या शाळेविषयी..
जयपूरमधल्या जगतपुरा भागात पोहोचले ते तिथल्या ‘दिगंतर’ या शाळेला भेट देण्यासाठी. शाळेत पोचले. ‘‘रीना दीदी कहाँ रहती है?’’ या प्रश्नाच्या उत्तरादाखल रीना दासजीच समोर आल्या. रीना दास आणि रोहित धनकर यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ‘दिगंतर’ ही संस्था. आता त्यांची मुलगीही हे काम पाहते. सर्व जणच उच्चविद्याविभूषित, समंजस नि साकल्याने विचार करणारे. रीनाजींच्या बोलण्यातून या शाळेसाठीची आर्थिक गरज जशी जाणवली तशीच कामाच्या वेगळेपणाची दिशाही कळली.
‘दिगंतर’ या नावातच वेगळेपण आहे. दिशांचं अंतर वा मर्यादा ओलांडून पलीकडे जाणारी दृष्टी. ‘दिगंतर’ म्हणजे आकाश – अवकाश. जिथं ‘स्काय इज लिमिट’ आहे. औपचारिक बंधनाच्या पलीकडे नेणारं शिक्षण म्हणजे काय हे इथे प्रत्यक्ष अनुभवता येतं. १९७८ मध्ये ‘दिगंतर’ची सुरुवात झाली. इथे सगळ्या आर्थिक स्तरातील मुलं येतात. रचनेपासूनच शाळेचं वेगळेपण सुरू होतं. शाळेचा आकार आयताकृती. तीन भिंती पूर्ण नि वर्गात शिरतानाची भिंत कमरेएवढय़ा उंचीची म्हणजे अडीच ते तीन फूट. कोणत्याच वर्गाला दरवाजे नाहीत. एकमेकांना एकमेकांचे वर्ग दिसतील अशी इमारत. फार चकचकीत नाही. एका भिंतीला कडप्प्याचे रॅक्स. त्यात आणि आजूबाजूलाही भरपूर शैक्षणिक साहित्य. मुलं त्याचा भरपूर वापर करतात हे लक्षात येत होतं. वर्गाबाहेर एक बंद नसलेली पेटी. त्यात त्या दिवसाचं वेळापत्रक. शिक्षक, तासिका, वापरावयाचं साहित्य, नोंद कुणीही समजू शकतं. शाळेच्या प्रवेशद्वारात एका बाजूला विविध उपक्रमांच्या नोंदीचे कागद ठेवलेले.
मला दिसलेलं शाळेतलं वेगळं रूप म्हणजे तिथले फलक, तिथले मूल्यमापनाचे कागद, शिक्षक, विद्यार्थी, इमारतीचं वेगळेपण.. जे जे पाहिलं ते वेगळं होतं एवढं नक्की. ‘बालसभा’ हा त्या शाळेचा विशेष. एका फळ्यावर एका मुलाने बातम्या लिहिल्या होत्या. फळ्याच्या एका भागात शिक्षकांच्या सुट्टीबाबत मुलांनी केलेल्या नोंदी होत्या. म्हणजे काय? तर जे शिक्षक उशिरा येणार असतील, रजेवर असतील ती माहिती फळ्यावर लिहिलेली होती. तेथे कार्यरत हेमंत शर्मा मला माहिती देत असताना एक मुलगा शाळेत जरा उशिरा आलेल्या शिक्षकांना विचारत होता, ‘‘भय्या, आज आपने इन्फॉर्म नहीं किया के आप लेट आनेवाले हो?’’ हेमंतजी स्वातंत्र्याबद्दल बोलत होते नि त्याचा प्रत्यय मला क्षणोक्षणी येत होता. वेगवेगळ्या उपक्रमांचे, चर्चासत्रांचे फोटो त्या फळ्याच्या वरच्या बाजूला होते. वर्गात क्षमतेनुसार वेगवेगळे गट आहेत. प्रत्येक गटात सामान्यत: २०-२५ मुलं आहेत. शाळेचे नऊ गट आहेत. त्यामुळे तीच नावं खोल्यांबाहेर लिहिलेली आहेत. यात गट, गटातील विद्यार्थीसंख्या (मुलं – मुली) गटप्रमुख (दीदी / भैय्या) असा फलक दिसतो. बालसभा गटात होते, गटाचा प्रमुख विद्यार्थी असतो. आणि अशा ५ सभांनंतर महासभा होते. या सगळ्याचं प्रत्येक महिन्याचं नियोजन असून त्या सभा कशा घ्यायच्या याविषयी खूप सविस्तर बोललं जातं. मुलांशी गप्पा मारताना लक्षात आलं, मुलांच्या अनेक समस्या समजण्याबरोबरच त्यांचं निराकरण करण्यासाठी, त्यांना आपल्या अधिकार-कर्तव्याबद्दल जागरूक करण्यासाठी बालसभा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना युनिफॉर्म नाही, पण मुलांना वाटतं आपल्याला युनिफॉर्म असावा. शाळेची स्वच्छतागृहं विद्यार्थी आपणहून स्वच्छ करतात. आपण स्वच्छता करायची तर आपण घाणही नाही करायची. कचरा जर आपण उचलायचा तर कचराच कशाला करायचा! वर्गातली शैक्षणिक साधनं आपल्यासाठी आहेत तर मोडतोड नाही करायची. अशा अनेक जाणिवा मुलांमध्ये रुजलेल्या दिसल्या.
आपल्या महाराष्ट्रात जसं १० वी, १२ वी बोर्ड आहे तसं राजस्थानमध्ये ५ वी, ८ ला ही बोर्ड परीक्षा होते. २०११ पर्यंत ही शाळा स्वत:चं मूल्यमापन स्वत: करायची, त्याचा आराखडा होता, परीक्षा होत नसत. ही संस्थाच शिक्षक प्रशिक्षित करायची, शासकीय शिक्षक प्रशिक्षित असण्याची गरज नव्हती. पण २०११ नंतर त्यांनी यात बदल केला गेला. वेगवेगळ्या कंपन्यांकडून ‘सीएसआर’ मिळत असल्याने त्यामानाने शिक्षकांना मानधन समाधानकारक असावं. इथले शिक्षक रोज चार वाजता शाळा सुटल्यावर पाच वाजेपर्यंत पुढील नियोजन, शैक्षणिक साधनांची, रचनांची तयारी करतात.
इथे प्रत्येक वर्गाचं ‘अॅक्टिव्हिटी कॅलेंडर’ आहे. तसंच महिन्यातल्या विविध कार्यक्रम, उपक्रम, प्रकल्प यांची माहिती प्रत्येकाला असते. एक शिक्षक काय करतोय ते दुसऱ्या शिक्षकाला माहीत असतं. प्रत्येक शिक्षक दर महिन्याला आपल्या गटातल्या मुलांच्या घरी जातो. आणि इथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या मुलांनाही वारंवार निमंत्रित केलं जातं. इथं बहुस्तरावर अध्यापन (मल्टिलेव्हल टीचिंग) केलं जातं. मुलं ज्या टप्प्यावर आहेत त्याच्या वारंवार परीक्षा घेऊन तशा मुलांचा गट केला आहे. मुलांना आपण औपचारिक दृष्टीने कोणत्या इयत्तेत आहोत हे माहीत नसतं. तसंच आपली परीक्षा सुरू आहे अशीही वेगळी जाणीव मुलांना नसते. त्यामुळे आपल्याकडे जो परीक्षेचा ताण मुलांवर असतो तो इथे जाणवला नाही. संकल्पनेवर काम करताना त्या संकल्पनेला पूरक पाठाची रचना केलेली आहे. इथला अभ्यासक्रम वेगळा आहे. तशीच इथली शालेय पुस्तकंही वेगळी आहेत. भाषेची, समाजशास्त्राची पुस्तकं स्वत:ची आहेत तर गणित आणि पर्यावरणाची पुस्तकं एनसीईआरटी, आरईसीआरटीची वापरली जातात. समजा ‘पाणी’ हा विषय घ्यायचा असेल तर शिक्षक अभ्यास करतात, साधनसामग्री जमवतात, स्वत: तयार करतात आणि मुलांनी स्वत: शिकावं म्हणून साधनसामग्रीही देतात. विशेष म्हणजे एका ग्रुपला काम देतात, दुसऱ्या गटाबरोबर स्वत: काम करतात. अशा पद्धतीने काम करायला शिक्षकांची खूप तयारी लागते, वेळ द्यावा लागतो. जो गट आपापलं काम करणार आहे त्यासाठी साहित्य, साधनं तयार ठेवावी लागतात. या गटाने जे काम केलं त्याचं आऊटपुट इव्हॉल्युशन करावं लागतं. इथे ते केलं जातं. सगळ्या वर्गासमोर येऊन व्याख्यान पद्धतीने काम करणं तसं सोपं आहे. या पद्धतीनं काम करायला लागणारी मानसिकता इथल्या शिक्षकांनी अनुभवली. काही वर्गाच्या तासिकांची वेगळेपणाने जाणवलेली निरीक्षणं अशी- हिंदीतील निबंध. निबंध म्हणजे काय यावर मुलांनी आपली मतं मांडली. शिक्षकांनी ती मतं फळ्यावर नोंदवली. विशेष म्हणजे विषय शिक्षकांनी नाही दिला तर विषय निवडण्याचं स्वातंत्र्य मुलांना होतं. आपापल्या विषयावर तयारी करण्यास त्यांना वेळ दिला. मग मुलं मांडणी करत होती. एका वर्गात पोहोचले. इंग्रजीचा तास- लहान मुलांचा गट – मधोमध पेन, पुस्तक, वही, रबर ठेवलेलं. शिक्षिकेने हातात पेन्सिल घेतली आणि म्हणाली, ‘धिस इज अ पेन्सिल.’ समोर पेन्सिलकडे बोट करून शिक्षिका पुन्हा तेच म्हणाली. याची सगळ्यांनी पुनरावृत्ती केली. मग प्रत्येक वस्तू प्रत्येक मुलाने घेऊन वाक्यं तयार केली. गटात मुलं एकमेकांना मदतही करत होती.
दाया बायाची कृती – शिकवणारे शिक्षक वयस्क होते. त्यांनी सगळ्यांना खायला सांगितलं. ज्या हाताने मुलांनी खाल्लं तो उजवा हात. त्या हाताखाली जो पाय तो उजवा. काही मुलं डाव्या हाताने खाणारी होती. सवयीमुळे असं होतं हे स्पष्टीकरण त्यांनी मुलांच्या पातळीवर दिलं. मग प्रत्येक मुलाला कोरा कागद दिला. डाव्या हाताने कागदाच्या कडांना चौकट आखायला सांगितली. उजव्या हातानेही आखायला सांगितली. सोपं काय, अवघड काय यावर गप्पा झाल्या. सगळी मुलं गोलात बसली होती. गणिताचा तास मोठय़ा गटाचा होता नि गटात बसून मुलं कामं करत होती. गणिताच्या तासाला सर्वाच्या गणिताच्या गप्पा हे वेगळेपण लगेच जाणवलं. मुलं अजिबात भित्री नव्हती. जेवणाच्या सुट्टीत आलेले पाहुणे वेगळ्या भागातून आलेले आहेत हे जाणवून प्रश्न विचारत होती. समंजस धीटपणा मुलांमध्ये जाणवला. चित्रकलेच्या तासाला मुलं दंग होऊन कागद-रंगाशी एकजीव झाली होती.
ग्रंथालय भव्य, मैदान भव्य. इथे चार विषयांसाठी रोज नियोजन केलेलं आहे. रोज ४० मिनिटांचा अवधी दिला जातो. शाळेच्या इमारतीशेजारी नवी इमारत अद्ययावत आहे. इथे २० हजार पुस्तकांचं ग्रंथालय, आठवडय़ातून एकदा मुलांसाठी येणाऱ्या डॉक्टरची केबिन, ओपन थिएटर, कॉम्प्युटर रूम, सभाकक्ष, सुतारकामाची खोली आहे. ग्रंथालय, कॉम्प्युटर, हॉकी, शिवणकाम अशा विषयांसाठी रोज ४० मिनिटं दिली जातात.
हेमंत शर्माशी खूप गप्पा झाल्या. यातून शाळानिर्मितीची पार्श्वभूमी लक्षात आली. ‘दिगंतर’च्या आत्ताच्या प्रशिक्षण केंद्राजवळ एक तयार कपडय़ांची फॅक्टरी होती. त्याचे मालक जितेंद्र पाल. ‘स्वतंत्रता’ शब्दाचा अर्थ समजून जगणारे. पाल यांना कर्नाटकात डेव्हिड ऑसबरो हे शिक्षणतज्ज्ञ भेटले. पाल यांना आपल्या मुलांना ऑसबरो यांच्याकडे पाठवायचं होतं. पण त्यांनी यांना सुचवलं, ‘तुम्ही तिथेच वेगळी शाळा सुरू करा. युनिव्हर्सिटीत शिकवणारे रोहित धनकर येथे येतील.’ रोहित धनकर तेथे पोहोचले आणि प्राथमिक शाळेपासून ‘दिगंतर’ची सुरुवात झाली.
ही शाळा राजस्थानातील जयपूरमधील जगतपुरा भागात सुरू झाली तेव्हा तिथे वाडय़ा, वस्त्या होत्या. शाळेत न जाण्याचं प्रमाणच जास्त होतं. स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाण फक्त दोन टक्के होतं. मुलींचा शिक्षणाशी काहीच संबंध नव्हता. ‘दिगंतर’ची नोंदणी झाली. शासकीय शाळेत काहीच शिकवलं जायचं नाही. मुलांना खूप मारलं जायचं. अशा सगळ्या परिस्थितीत ‘दिगंतर’ एका बाभळीच्या झाडाखाली सुरू झाली. लोक गुरं चारायला यायचे. तेव्हा झाडाखालची मुलं कधी नाच, कधी नाटक, कधी भाषण करत असायची. तीन तास शाळा व्हायची नि तिथल्या समाजाबरोबर दोन तास घालवले जायचे. ‘दिगंतर’च्या सर्व व्यवहारात पारदर्शकता होती. एवढं केलं तरी मुली शाळेत येत नव्हत्या. शेवटी एक धोरण तयार केलं गेलं. एक मुलगा शाळेत येणार असेल तर एक मुलगी शाळेत यायला हवी. मुली यायला सुरुवात झाली. ही मुलं-मुली आर्थिकदृष्टय़ा मागास वर्गातील होती. मुस्लीम समाजातलीही होती. समाजाबरोबर नातं निर्माण होऊ लागलं नि लोकांनी जमीन दिली, लोकांनी इमारत बांधून दिली. २००७ मध्ये ही जागाच सरकारने कुणाला तरी दिली. तेव्हा जयपूरमध्ये ही शाळा वाचावी म्हणून लोकांनी रॅलीही काढली. उच्च न्यायालयाकडून आत्ता आहे ती जमीन मिळाली. त्यावर असलेली आत्ताची इमारत २०१० पासून उभी आहे..
(या शाळेच्या अभ्यासक्रमाविषयीचा लेख १ जूनच्या अंकात)
शाळेचा पत्ता – दिगंतर, तोडीराज, रामजानीपुरा, जगतपुरी, अनोखी फार्म के पास, जयपूर ( राजस्थान).
संपर्कासाठी इमेल- reenadasroy@gmail.com.
renudandekar@gmail.com
chaturang@expressindia.com