मलिका अमरशेख

बाईचं दु:ख, समाजातले अमानुष नीतीनियम- म्हणजे व्यक्ती ते समष्टी यातले सर्व अंतर्विरोध श्याम बेनेगल आपल्या चित्रपटांतून अत्यंत स्पष्टपणे, तीक्ष्णपणे दाखवतात, त्यातल्या बारीकसारीक तपशिलांसकट. चित्रपट माध्यमाचा इतका धारदार, विधायक आणि बांधिलकी ठेवून एखाद्या हत्यारासारखा वापर फारच कमी लोकांनी केला. ५० वर्षांपूर्वीचा ‘अंकुर’ हा चित्रपटही जातवास्तव नाईलाजानं स्वीकारत सुरू असलेलं बाईचं जगणं दाखवतो. या बाईच्या विश्वात प्रतिकाराचा ‘अंकुर’ फुटण्याची शक्यता नाहीच, असं नाही.. पण तथाकथित उच्चवर्णीय पुरुषांकडून पदोपदी तिचं वापरलं जाणं आणि तेच आपलं प्राक्तन, असं गृहीत धरून तिनं पिचत राहणं, पाहणाऱ्याच्या मनात व्यवस्थेविषयी चीड आणि काही वेळा हतबलताही निर्माण करतो..

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
Raja Ranichi Ga jodi Fame Actress Kelvan
फिश फ्राय, सोलकढी, गोडाचे पदार्थ अन्…; ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्रीचं ‘असं’ पार पडलं केळवण, फोटोंनी वेधलं लक्ष
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”

हिंदी चित्रपटसृष्टीत एक आदरयुक्त दबदबा निर्माण करणारं शक्तीकेंद्र म्हणून श्याम बेनेगल यांचं नाव सर्वप्रथम घ्यावं लागेल. त्यांचे चित्रपट मेंदूला त्रास देतात. विचार करायला भाग पाडतात. चित्रपटामध्ये जी-जी, जेवढी आवश्यक अंगं आहेत, त्या प्रत्येक गोष्टीला त्यांच्या चित्रपटात अर्थ आहे, विचार आहे. त्यात मानवी भावनेपासून समाजातले जटिल प्रश्न, समस्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारी कथानकं आणि थक्क करणारी व्यक्तिचित्रणं आहेत. अगदी निसर्गापासून ते नेपथ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला त्यांच्या चित्रपटांत एक चेहरा असतो, भूमिका असते. त्यातलाच एक चित्रपट ‘अंकुर’.

‘अंकुर’ प्रदर्शित झाला (१९७४) तेव्हा तर तो मी पाहिलाच, पण या लेखानिमित्तानं पुन्हा पाहिला.. आणि त्या वेळी आला, तसाच तो छोटय़ा पडद्यावरही अंगावर आला.  नुकत्याच पास झालेल्या मुलाला पुढे शिकण्याची इच्छा असूनही जमीनदार बाप त्याचं मनात नसताना लग्न लावून देतो. त्याला गावच्या जमिनींवर लक्ष ठेवायला पाठवतो. ते गाव, त्यांच्या रीतीभाती, परंपरा, त्यातली अशिक्षित, पण बेरकी आणि क्रूर माणसं.. विशेष महत्त्वाचं म्हणजे यात कुणीच पूर्ण ‘ब्लॅक’ किंवा ‘व्हाईट’ नाही. वेळप्रसंगी स्खलनशील आणि क्रूर वागणारे पुरुष आहेत. स्त्रिया असहाय्यही आहेत आणि खमक्याही. जमीनदाराचा तरुण पोरगा रगेलगिरी करतोच. जमीनदारीचे तमाम अवगुण, गुर्मी, छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून पुढे येते.. या सर्व नाटय़ात महत्त्वाची भूमिका आहे, ती जमीनदाराच्या घराची झाडलोट करणारी लक्ष्मी आणि तिचा मुका-बहिरा, दारुडा नवरा यांची.

लक्ष्मी जमीनदाराच्या घरापासून काही अंतरावर, झोपडीत राहते. मूल होत नसल्यानं ती दु:खी असते आणि तिचा नवराही त्याच दु:खातून दारुडा होऊन झोकांडय़ा खात रोज घरी येत असतो. लक्ष्मी त्याला बोल लावत कपाळाला हात लावून बसते. त्या रागात एकदा ती त्याचं दारूचं मडकं फोडते. वैतागून तिचा नवरा ताडीच्या झाडावर चढून तिथल्या मडक्यातली ताडी पितो. ही झाडं जमीनदाराची. एक मुलगा हे पाहतो न् ही गोष्ट जमीनदाराच्या मुलाला सांगतो. तो पोलीस पाटलाला बोलावतो आणि या चोरीबद्दल त्याचं डोकं भादरून, गाढवावर उलटं बसवून गावातून त्याची धिंड काढली जाते. लक्ष्मी या प्रकारानं हादरून जाते. या प्रकारानंतर तिचा नवरा गावातून निघून जातो. आता लक्ष्मीचा घरातला वावर जमीनदाराच्या मुलाला चाळवू लागतो. तो तिच्याशी लगट करू लागतो. नाराज होऊन लक्ष्मी वाडय़ावर जात नाही, तर तो तिला घरी जाऊन बोलावतो. ती दुसऱ्या दिवसापासून पुन्हा वाडय़ावर जाऊन काम करते. तो तिची विचारपूस करतो. ‘नवरा कधीच येणार नाही, तेव्हा मी तुझी देखभाल करतो,’ असं आश्वासन देतो. मूक संमतीनं ती त्याच्याजवळ येते.

एका प्रसंगात गावातल्या एका स्त्रीला बळजबरीने नेलं जात असतानाचं चित्र दिसतं. पंचायत बसते. यात ती स्त्री नवरा ‘पुरुष’ नसल्यानं त्याच्याकडे राहणार नाही म्हणते. पण पंच निर्णय देतात, ‘‘पती हा परमेश्वर. तुला तिथेच राहायला हवं.’’ दुसऱ्याच दृश्यात तिचं प्रेत जाताना लक्ष्मी बघते. हे सर्व बघत असताना लक्ष्मीची घालमेल, द्विधा मन:स्थिती प्रत्येक फ्रेममध्ये दिसत राहते. एका दिवाळीत जमीनदाराच्या मुलाचे मित्र दारूची पार्टी करतात. पत्ते खेळताना दारूच्या नशेत सर्व पैसे हरल्यावर एकजण आपल्या बायकोला पणाला लावतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या बायकोला घेऊन जाण्यासाठी मित्र येतो. तेव्हा बायको त्या दोघांनाही चांगलंच सुनावते. हे त्याच समाजातलं दुसरं चित्र, बदललेलं!

 दरम्यान, लक्ष्मी गर्भवती राहते न् अशातच जमीनदार परत येतो. मुलाला सुनावतो. त्या मुलाची नवथर, तरुण पत्नी लक्ष्मीला तिथे राहू वा थांबू देत नाही. दरम्यान, लक्ष्मीचा नवराही परत येतो. गर्भवती बायकोला पाहून आनंदित होऊन सकाळीच जमीनदाराच्या वाडय़ावर काम मागायला येतो. त्याला येताना पाहून जमीनदाराच्या मुलाला वाटतं, की हा लक्ष्मी आणि आपल्या संबंधांबद्दल समजल्यामुळे आपल्याला मारायला आलाय. जमीनदाराचा मुलगा चाबूक घेऊन बाहेर येतो आणि लक्ष्मीच्या नवऱ्याला चाबकानं मारू लागतो. लक्ष्मी येऊन त्याच्या अंगावर पडते आणि जमीनदाराच्या मुलाला शिव्याशाप देत नवऱ्याला घेऊन जाते. जमीनदाराचा मुलगा दार बंद करून रडत असताना बाहेर हे सगळं पाहणारा ६-७ वर्षांचा एक मुलगा दगड उचलतो न् जमीनदाराच्या वाडय़ाच्या खिडकीवर जोरात भिरकावतो! खळ्ळ खट् होऊन काच फुटते.. मुलगा पळत जाताना ज्याप्रमाणे इब्सेनची नोरा ( हेन्रिक इब्सेन लिखित ‘अ डॉल्स हाऊस’ (१८७९) या प्रसिद्ध नाटकातली नायिका नोरा हेलमर.) दार आपटून जाते तो आवाज जगभरात ऐकू गेला म्हणतात.. तसा हा क्लायमॅक्सचा खळ्ळ खटाक आवाजही सर्वत्रिक आहे. 

त्या लहान मुलाच्या हातातला दगड म्हणजे निषेधाचा तीव्र स्वर होता. ‘शोषक विरुद्ध शोषित’.. ‘आहे रे आणि नाही रे’ यांमधला हा संघर्ष, पण तो अधिक तीव्र होतो बाईच्या लैंगिक शोषणामुळे. स्त्रियांचं बळी जाणं, तिचं वापरलं जाणं, तिचा आक्रोश, आकांत- समाजपुरुष ऐकत नाही. पंच स्वत:ला परमेश्वर म्हणवतात, मायबाप म्हणवतात, पण तेही स्त्रीला न्याय देत नाहीत. आजही गावात जुगारात बायकोला पणाला लावणारे लोक आहेत. छोटय़ा चुकीसाठी मुंडण करून धिंड काढली जाण्याची विकृत, भयप्रद, अमानुष प्रथा आहे. हे सगळे प्रसंग अंगावर काटा येणारे. मेंदू सुन्न करणारे.

यात सर्वात श्याम बेनेगल विषय, पात्रयोजना, व्यक्तिचित्रण, सगळय़ामध्ये त्यांची ठसठशीत सही ठोकतात. शबाना आझमीनं पूर्ण न्याय दिलाय लक्ष्मीला; म्हणण्यापेक्षा ती ते जगणं जगलीय! तिची असहाय्यता, दु:ख, घालमेल, तगमग, तिची देहबोली- तिथली बोलीभाषा.. एवढंच काय, तिचं चालणं न् जमिनीवर गावच्या बायांसारखं उकिडवं बसणं, सारं सारंच अफलातून! आजवरच्या तिच्या प्रवासातला अभिनयाचा ‘मास्टरपीस’च म्हणावा लागेल.  अनंत नाग यानं जमीनदाराच्या मुलाचा रगेल स्वभाव, वरवर मग्रूर, माजोरी, पण नुसत्या सापाच्या दर्शनानं दातखिळी बसून चिरकलेल्या आवाजात लक्ष्मीला बोलावणं, हे उत्तम दाखवलंय. त्याच्या नवपरिणीत वधूची भूमिका केलीय प्रिया तेंडुलकरनं. या छोटय़ा भूमिकेतही तिनं संवाद, नजर, यातून ‘सरू’ लक्षणीय उभी केलीय.

पोलीस पाटील असो, नाही तर गावातली लहान मुलं, तिथल्या स्त्रिया, या बारीक व्यक्तिरेखाही इतक्या चपखल आहेत, की ते अभिनय करतात किंवा संहितेमध्ये संवाद बोलतायत असं वाटतच नाही. या सगळय़ात विशेष कौतुक करावं लागेल ते लक्ष्मीच्या पतीची भूमिका केलेल्या साधू मेहेरचं! एकही शब्द नसताना नुसत्या नजरेनं तो या चित्रपटातून जे काही दर्शवतो, ते खरोखरच अविस्मरणीय. एवढय़ा गुणी नटाचं चीज झालं नाही, हे दुर्दैव प्रेक्षकांचं, त्याचं नाही.

‘अंकुर’च काय, पण श्याम बेनेगल यांच्या सर्वच चित्रपटांची शीर्षकं मला कलात्मकपणे वैचारिक वाटतात. ‘अंकुर’ हे शीर्षक लक्ष्मीच्या गर्भावस्थेमुळे, इतक्या सरधोपटपणे आलेलं नाहीच. ‘क्लायमॅक्स’मध्ये लहान मुलानं फेकलेला दगड ही एक ठिणगी आहे. एका बंडाची सुरूवात.. प्रतिकाराची, निषेधाची लहानशी क्रियासुद्धा पुढील संघर्षांची नांदी असते. हे संघर्षांचं बीज पुढे बंडाचा वणवा ठरू शकतं. अंकुर खूप छोटा.. बीज खूप लहान.. पण त्यातून मोठय़ा झाडाची संभाव्यता, शक्यता असते. या चित्रपटानंतरच्या ‘निशांत’मध्ये तर शेवटाला हे चित्र पूर्णच होतं. जुलमी जमीनदाराच्या विरोधात पूर्ण गाव एकवटून त्याला मारायला जातं. जीव वाचवून पळणारे जमीनदार.. क्रांतीचा, बंडाचा वणवा त्या छोटय़ा गावात पेटतो. श्याम बेनेगलांच्या सगळ्या चित्रपटांतून त्यांची भूमिका स्पष्ट दिसते. खरं तर चित्रपटातून दिग्दर्शकाला काय म्हणायचंय, हे कळलंच पाहिजे. पण आजकाल कुठल्याच दिग्दर्शकाला फारसं काही म्हणायचं नसतं, काही अपवाद वगळता.

 जेव्हा आपल्या क्षमतेबद्दल, विचारांबद्दल प्रचंड स्पष्टता आणि आत्मविश्वास असतो, तेव्हाच हे ‘म्हणणं’ शक्य होतं. तसंही ‘अंकुर’ काय, ‘निशांत’ काय, की ‘मंडी’.. श्याम बेनेगलांच्या चित्रपटातली प्रत्येक फ्रेम अभ्यासपूर्ण, अर्थपूर्ण न् त्याचवेळी ती भयप्रद सुंदर असते! कारण ती आपल्या मेंदूला नंतरही कुरतडत राहते..

Story img Loader