प्रतिभा वाघ

plwagh55@gmail.com

Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
How the practice of removing shirts in Kerala temples began
Temple dress code reform: केरळच्या मंदिरात शर्ट काढण्याची प्रथा कशी सुरू झाली?

ललिता वकील यांनी ‘चंबा रुमाल’ कला परंपरा टिकविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. डोंगराळ भागातील घराघरात जाऊन या कलेचे महत्त्व पटवून तेथील स्त्रिया आणि मुलींना प्रशिक्षण देऊन, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आणि उदरनिर्वाहासाठी एक साधन मिळवून दिले. त्यांना आतापर्यंत राज्य आणि राष्ट्रपातळीवरील ‘उत्कृष्ट स्त्री कारागीर’, ‘कलारतन’,‘शिल्प गुरु’,‘नारी शक्ती’ पुरस्कार मिळाले असून आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कामाची प्रशंसा झालेली आहे.

हातावर पोट असणाऱ्या गरीब, काबाडकष्ट करणाऱ्या स्त्रियांना आजचा दिवस कसा जाईल? दोन वेळची भाकरी मिळेल की नाही? ही भ्रांत असते तर उच्चवर्गातील सुखवस्तू स्त्रियांना पैसा कसा खर्च करायचा याची चिंता असते. खरेदीसाठी कुठे जायचं? सुंदर दिसण्यासाठी काय करायचे? हे प्रश्न त्यांना भेडसावत असतात. पण सुखवस्तू घरातील ललिता वकील मात्र याला अपवाद आहेत. हिमाचल प्रदेशातील चंबा त्या शहरात त्यांचे वास्तव्य आहे. रात्रीची तीन तासांची झोप एवढीच विश्रांतीसाठी राखून ठेवलेली वेळ, दिवसभर घर, संसार, पै पाहुणा, समारंभ या बरोबर आपली पारंपरिक ‘चंबा रुमाल’ कला जिवंत ठेवण्याकरिता, त्या अविरत झटत असतात.

‘चंबा रुमाल’ हा पारंपरिक भरतकाम हस्तकलेचा नमुना आहे ‘रुमाल’ हा मूळचा पर्शियन शब्द असून याचा अर्थ ‘कापडाचा चौकोनी तुकडा’ जो त्रिकोणावर दुमडून डोक्यावर अथवा मानेवर गुंडाळला जातो. हिमाचल प्रदेशातील लग्नसमारंभात घरचे पुरुष हा ‘चंबा रुमाल’ खांद्यावर टाकून मिरवतांना दिसतात. मग तो लग्नसमारंभ कोणत्याही आर्थिक स्तरातला असो. या ‘चंबा रुमाल’चे एक खास वैशिष्टय़ आहे. ते म्हणजे या वरील भरतकाम कापडाच्या दोन्ही बाजूचे हुबेहूब सारखे दिसते. त्यामुळे ते दोन्ही बाजूने पाहाता येते. त्याला ‘दोरुखा’ असे म्हणतात. हा जगातील भरतकामाचा एकमेव नमुना आहे. या भरतकामात गाठ कुठेही दिसत नाही. ‘चंबा रुमाला’त दोन प्रकारचे भरतकामाचे नमुने आढळतात; एक म्हणजे राजघराण्यातील, उच्चभ्रू स्त्रियांनी केलेले आणि दुसरे सर्वसामान्य वर्गातील स्त्रियांनी केलेले भरतकाम. लघुचित्रशैलीतील चित्रकारांच्या मार्गदर्शनाखाली केलेले राजघराण्यातील स्त्रियांचे काम त्यांच्या अभिरुचीकडे जाणारे दिसते तर लोककलेप्रमाणे ठसठशीत, भडक रंगाचा वापर सर्वसामान्य स्त्रियांनी केलेला दिसतो. गुरू नानकजी यांच्या भगिनी बेबनानकी यांनी १६ व्या शतकात भरतकाम केलेला ‘चंबा रुमाल’ गुरू नानकजींना भेट दिला होता. तो आजही चंडीगड येथील होशिअरापुरामधील गुरुद्वारा येथे काचेच्या पेटीत जपून ठेवला आहे. तसेच १८८३ मध्ये चंबाचा राजा गोपालसिंग यांनी ब्रिटिशांना ‘चंबा रुमाल’ भेट दिला होता. ‘कुरुक्षेत्रावरील युद्धप्रसंग’ त्यावर असून, तो रुमाल लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम’मध्ये आहे.

१८ वे शतक ते २० व्या शतकाच्या प्रारंभीचा काळ, या कालावधीतही कला बहरास आली आणि चंबा खोऱ्यातील राजकर्त्यांनी तिला उत्तेजन दिले. १९१६ पासून दिल्ली क्राफ्ट कौन्सिल (डीसीसी) ची स्थापना ही खास ‘जुन्या पारंपरिक कलांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झाली. त्यामुळे ‘चंबा रुमाल’ ही कला टिकून राहिली आणि त्याकरिता ललिता वकील, तसेच महेशी देवी, चिम्बी देवी यांसारख्या ‘राष्ट्रीय सन्मान’ मिळविलेल्या स्त्री कलाकारांनी प्रयत्न केले. या संदर्भात कमलादेवी चटोपाध्याय यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या स्वातंत्र्यसैनिक, विदुषी आणि हस्तकलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष कार्य करणाऱ्या म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘चंबा रुमाल’ कला जिवंत ठेवण्याची जबाबदारी घेतली आणि आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले. राज्य शासनाच्या शास्त्र आणि तंत्र विभागातर्फे चंबा रुमालाला पेटंट मिळाले आहे.

हे रुमाल प्रामुख्याने लग्नात भेट दिले जात. चौकोनी किंवा आयताकृती आकाराचे हे रुमाल, छोटय़ा हातरुमालापासून मोठय़ा चादरीएवढे असतात. इतिहासकार आणि कलातज्ज्ञ या रुमालावरील भरतकामाला ‘सुईने केलेले पेंटिंग’ असे म्हणतात. कारण अनेकदा पहाडी लघुचित्रशैलीतील पेंटिंग हे रंग, कुंचला याऐवजी सुई दोऱ्याचा वापर करून हुबेहूब तयार केलेले दिसतात. ‘चंबा रुमाल’साठी चित्राचा विषय निश्चित करून लघुचित्र काढणाऱ्या चित्रकाराकडून काजळ आणि बाभळीचा गोंद याचे मिश्रण करून तयार केलेला काळा रंग किंवा चारकोल (द्राक्षवेली जाळून केलेल्या कोळशाच्या कांडय़ा) याच्या साह्य़ाने चित्र काढून घेतले जाई. या भरतकामात जांभळा, तेजस्वी गुलाबी, नारिंगी, गडद गुलाबी, तपकिरी, लिंबासारखा पिवळा रंग, हळदीसारखा पिवळा रंग, गडद  हिरवा, पोपटी, गडद निळा, काळपट निळा, काळा-पांढरा हे रंग वापरले जात. रेशमी धाग्यांचा रंग पक्का आहे का, ही खात्री करून घेण्यासाठी, ते धागे थोडय़ा वेळ पाण्यात बुडवून ठेवत. हे चित्रकार रंगसंगती कोणती घ्यावी यासंबंधीही मार्गदर्शन करीत.

रामायण, महाभारत, कथा, भागवत पुराण, कृष्णलीला कृष्ण-गोपी रासमंडल, हे विषय आढळतात कधी कधी समोरासमोर समांतर पद्धतीने उभ्या रेषेत ‘कृष्ण गोपी’ दाखवितात. एकाच रुमालात चार ते पाच दृश्येही चित्रित केली जातात. राजाच्या जीवनावरील चित्रांचे विषय हे राजाचा विवाहसोहळा, शिकारीची दृश्ये, हत्तीवरील स्वारी, नायकनायिका भेद अशा प्रकारचे असत. लग्नसमारंभातील चित्राचा विषय लग्नसमारंभ असाच असे. नवरीकडील लोकांनी रुमालाची भेट दिल्याशिवाय विवाहविधी पूर्ण होत नसे. हा रुमाल वधूने स्वत: भरतकाम केलेला असावा लागे. हुंडय़ांमध्ये तो महत्त्वाचा समजला जाई. तो द्यावाच लागे. वधूकडे विशेष कलागुण असल्याचे ते द्योतक समजले जाई. पहाडी लघुचित्रात जशी काळ्या रंगाची नाजूक सुस्पष्ट रेषा तयार करतात, त्याप्रमाणे ‘चंबा रुमाल’ काळ्या रंगाच्या दोऱ्याने ‘दांडी टाका’ पद्धतीचा विशिष्ट टाका वापरून चित्राची बाह्य़रेषा करतात. बाह्य़रेषा पूर्वी थेट रंगाने चित्रित करीत, पुढे पुढे लाकडी ठसे वापरले जाऊ लागले. आता ट्रेसिंग करतात. ही ‘चंबा रुमाल’ शैली उच्चवर्गीय स्त्रियांनी विकसित केली. निवांतपणे आयुष्याचे क्षण जगणारे स्त्री पुरुष- हुक्का ओढणारे पुरुष, पिंजऱ्यातील पोपटाशी बोलणाऱ्या स्त्रिया, संगीताचा आनंद घेणाऱ्या, चेंडूने खेळणाऱ्या स्त्रिया अशा विषयांवरील चित्रे आढळतात. पूर्वीच्या उत्कृष्ट चित्रांची, कारागिरांकडून हुबेहूब नक्कल करून ती पुन्हा बनवून घेतली जातात. चित्रात रुमालावरील मोर, बगळे, पोपट, चिमण्या, गायी, हत्ती, घोडे, हरिणे, जंगली रानडुकरे, शिकारी कुत्रे, केळी, सुरु, विलो वृक्ष, झुडपे, कळ्या, फुले यांचे निरीक्षणपूर्वक चित्रण करून ती भरतकामात हुबेहूब उतरवलेली दिसतात.

शिकारी दृश्यात घोडे, हत्ती, रानडुक्कर, वाघ सिंह, तर कृष्णलीला चित्रात गायींचे सुंदर चित्रण दिसते, रिकाम्या जागेत बुट्टे आणि फुलांचे भरतकाम होई. यातही विविधता दिसते. स्त्रियांचे दागिने दाखविण्यासाठी सोनेरी धागा वापरला जाई. सर्व चित्रांच्या बाजूने (फुलांच्या पट्टय़ा) फुलपट्टी असे आणि रुमालाची कडा, विशिष्ट टाका वापरून, दुमडून घेतली जाई; जेणेकरून ती मजबूत होई.

प्रसन्न चेहऱ्याच्या ललिताजी आता ६५ वर्षे वयाच्या आहेत. चंबा शहरात त्यांचं नाव कुणालाही विचारलं तरी घरचा पत्ता मिळतो. इतक्या त्या प्रसिद्ध आहेत त्या त्यांच्या कलाविषयक कार्यामुळेच! सासरच्या मंडळींनी फावल्या वेळात तुझी आवड जोपास असे सांगितल्यामुळे, ललिताबाईंनी आपली भरतकामाची आवड जोपासली. त्यांना १९७५ मध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून ‘उत्कृष्ट स्त्री कारागीर’ सन्मान मिळाला. १९९७ मध्ये त्यांनी मांडलेल्या स्वत:च्या ‘चंबा रुमाल’ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. २००० मध्ये लोककला संस्कृतीच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना सरकारतर्फे रुमानियाला पाठविण्यात आले. २००६ मध्ये सुरजकुंड मेलामध्ये ‘कलारतन’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. याच वर्षी भारत सरकारच्या हस्तकला विभागातर्फे ‘चंबा रुमाला’चे प्रात्यक्षिक दाखविण्याकरिता त्यांना जर्मनीला पाठविण्यात आले. मार्च २०११ मध्ये कॅनडातील ‘टय़ुलिप फेस्टिवल’मध्ये ‘चंबा रुमाला’ला व्यासपीठ मिळावे याकरिता त्या उपस्थित राहिल्या. २००९ मध्ये भूतपूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘शिल्प गुरू’ पुरस्कार ललिताताईना प्रदान करण्यात आला. ‘हस्तकला फेडरेशन ऑफ नेपाळ’ यांच्या २०१२ मधील दहाव्या ‘हिंदी क्राफ्ट फेस्टिवल’मध्ये आपल्या वस्त्र मंत्रालयातर्फे ललिताताई उपस्थित होत्या, तर २०१७ मध्ये ‘चंबा रुमाल कला आणि तंत्र’ या प्रकल्पात ‘तज्ज्ञ कारागीर’ म्हणून त्यांचा सहभाग होता. याच वर्षी आंतरदेशीय पातळीवरील स्त्री कारागिरांसाठी असलेला हस्तकलेचा पुरस्कार मिळाला आणि २०१८ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मिळालेल्या सर्वोच्च मानाचा ‘नारी शक्ती’ पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या. हा पुरस्कार ‘चंबा रुमाल’ या कलेसाठी त्यांच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी देण्यात आला.

ललिता वकील यांनी ‘चंबा रुमाल’ कला परंपरा टिकविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. डोंगराळ भागातील घराघरात जाऊन या कलेचे महत्त्व पटवून तेथील स्त्रिया आणि मुलींना प्रशिक्षण देऊन, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आणि उदरनिर्वाहासाठी एक साधन दिले, ज्यात गुंतवणुकीसाठी फारसा पैसा लागत नाही. राज्य आणि केंद्रशासनातर्फे स्वत:च्या जागेत प्रशिक्षण वर्ग सुरू केले. एक हजारहून अधिक विद्यार्थिनींना याचा फायदा झाला. अनेकांनी स्पर्धामधून पारितोषिके मिळविली. अनेक आपल्या कुटुंबांना आर्थिक मदत करीत आहेत. ललिताताईने कधी स्वखर्चाने तर कधी सरकारी अनुदानाने ही कला शिकवून तिचा प्रसार, प्रचार केला. ती लोकप्रिय झाली.

पारंपरिक कलेला एक नवे समकालीन रूप देण्याचे विशेष कौशल्य ललिताताईकडे निश्चितच आहे. पारंपरिक पद्धतीत फक्त ‘मलमल’ हा वस्त्रप्रकार प्रामुख्याने वापरत ललिताजींनी सिल्क, टसर, वॉयल या विविध पोत असलेल्या वस्त्रावर हे काम करण्यास सुरुवात केली आणि ‘चंबा रुमाला’ने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले. पूर्वी हात पंखे आणि टोप्या यावर काम केले जाई. ललिताताईंनी दुपट्टा, शाल, ब्लाऊज, यावर काम केले. त्यांनी गृहसजावटीसाठी याचा उपयोग वेगळ्या पद्धतीने केला. एका मोठय़ा दालनाचे दोन विभाग करण्यासाठी पडदे तयार करून त्यावर भरतकाम केले आणि लाकडी चौकटीत त्यांना फ्रेम केले. दोन्ही बाजूने हे भरतकामसारखे होत असल्यामुळे हा प्रकार खूप लोकप्रिय झाला. पूर्वी शक्यतो पांढऱ्या कपडय़ावर हे काम होई. आता ललिताताई रंगीत पाश्र्वभूमी असलेले कापडही वापरतात. विविध प्रयोग मौल्यवान मार्गदर्शन, जुन्या संकल्पांना दिलेले नवे कलात्मक रूप यामुळे ललिताजींनी ही लयाला जाणाऱ्या या कलेला नवजीवनच दिले.

उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या ललिताताईंना समाजभानही आहे. अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. केवळ आर्थिक मदत न करता, शाळेत जाऊन त्यांच्या प्रगतीचीही चौकशी करतात. विनामूल्य चंबा रुमालाचे प्रशिक्षण अनेक मुलींना देतात. त्यांना साहित्यही मोफत देतात. आज ललिताताईंना एकच चिंता सतावते आहे; ती म्हणजे आपल्या पश्चात ही परंपरा सुस्थितीत राहील ना? त्या आपल्या मिळकतीचा वापर त्या ‘चंबा रुमाल’ कला परंपरा शिकविण्यासाठी आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी करतात. मुंबईसारख्या शहरात जर ‘चंबा रुमाला’ंचे प्रदर्शन भरविले तर ही कला अनेक लोकांना पाहायला मिळेल. शिवाय जर हे रुमाल संग्रहासाठी घेतले तर त्या निधीतून कायमस्वरूपी निधी उभारून त्यांचा उपयोग ‘चंबा रुमाल’ कलापरंपरा जोपासण्यासाठीच करता येईल अशी आपली इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांची ही इच्छा निश्चितच पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करू या!

विशेष आभार – सौरभ सेठ (महाड)

Story img Loader