– डॉ. मनीषा सबनीस

‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करणे जरी १९७५ नंतर सुरू झाले असले, तरी परदेशात स्त्रीवादाच्या विविध ‘लाटा’ येणे खूप आधीपासून सुरू झाले होते. त्यामागे होत्या विविध विचारवंत, काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या आणि ते ठामपणे मांडणाऱ्या स्त्रिया. त्यातल्याच एक सिमॉन-द-बोव्हार. १९४९ मध्ये त्यांनी लिहिलेला, स्त्रीवादाचा पायाभूत मानला गेलेला ‘द सेकंड सेक्स’ हा अग्रगण्य ग्रंथ म्हणजे जगातल्या तमाम स्त्रियांना स्वत:च्या स्त्रीत्वाबद्दलची आणि भोगाव्या लागणाऱ्या दुय्यमत्वाबद्दलची करून दिलेली लख्ख जाणीव!

काही विचारवंत समाजातील वंचित गटाचा, त्या गटातील माणसांच्या दुर्लक्षित क्षमतांचा, त्यांच्या स्वातंत्र्यावर येणाऱ्या बंधनांचा डोळस अभ्यास करतात. त्यामागील अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय आदी प्रश्नांकडे विविध अंगाने बघतात, अभ्यास करतात. त्यामागची कारणे शोधतात. त्या कारणांचा सर्वांगाने सखोल अभ्यास करून, त्या गटाचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आणि त्यानुसार उपाय शोधण्यासाठी एक नवीन विचार पद्धत अस्तित्वात येते. ती त्या कारणांवरचे उपाय प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न करते. त्या विचार पद्धतीनुसार काम करण्यासाठी सर्वसामान्य जनता एकत्र येते, चळवळ करते, बंड करते, लढाही देते. ते विचार आणि त्यानुसार केलेली कृती जगभर पसरते. त्यालाच आपण ‘इझम’ किंवा ‘वाद’ म्हणतो.

‘स्त्रीवाद’ हा त्यापैकीच एक. जिथे संपूर्ण जगाचा, तिथल्या अनेक व्यवस्थांचा, परस्परांमधल्या नात्यांचा, कायदे, व्यापार, सत्ता, आदी सगळ्याचा विचार स्त्रीच्या परिप्रेक्ष्यातून केला जातो. स्त्रीच्या नजरेतून तिच्या क्षमतांचा पुरेपूर वापर तिला करता यावा, तिला स्वतंत्र, सक्षम व्यक्ती, स्वतंत्र माणूस म्हणून वाढण्यावर घालण्यात येणाऱ्या बंधनांपासून मुक्त करता यावे यासाठी जी विचारसरणी अवलंबिली जाते, कामे/ कृती/ वैचारिक अभिसरण केलं जातं तो स्त्रीवाद.

आजच्या स्त्रीवादामध्ये अनेक व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे आहे. मेरी वूलस्टोन क्राफ्ट, वर्जिनिया वूल्फ, जेन ऑस्टिन, बेटी फ्रीडम, इत्यादीपासून ग्लोरिया स्टाइनेम आदी स्त्रीवादी कार्यकर्त्या/ लेखिकांपर्यंत स्त्रीवादाचा हा वारसा सांगता येतो. पण स्त्रीच्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी स्त्रीचे समाजातील स्थान समजणे महत्त्वाचे आहे. हे स्थान सिमॉन-द-बोव्हार यांनी दाखवून दिले.

‘स्त्री ही जगाच्या व्यवस्थेमध्ये दुय्यम मानली जाते आणि हे जग पुरुषप्रधानतेने चालवले जाते.’ हे त्यांनी खणखणीत पुराव्यांसकट मांडले. ‘स्त्रीवादी साहित्य’ असा प्रकार अस्तित्वात येण्यापूर्वी ८०० पानांचा त्यांचा ग्रंथ ‘द सेकंड सेक्स’ हा या अर्थाने स्त्रीवादी विचारवंतांचे अग्रगण्य पुस्तक ठरले.

सिमॉन ९ जानेवारी १९०८ मध्ये फ्रान्समधील पॅरिस येथे मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मल्या. त्या लहानपणापासूनच स्वतंत्र विचार करणाऱ्या होत्या. लहान असल्यापासूनच त्यांनी आपल्या घरातच नव्हे तर इतरांच्या घरांत, त्यातल्या स्वयंपाकघरांमध्ये काम करणाऱ्या, भांडी घासणाऱ्या, स्वच्छता करणाऱ्या, मुलांना सांभाळणाऱ्या अनेक स्त्रिया बघितल्या आणि मनोमन ठरवले की, ‘मी या सगळ्या बंधनांमध्ये अडकणार नाही. मला स्वतंत्रपणे जगता येईल अशा पद्धतीने मी माझे आयुष्य आखेन. ही माझी कथा आहे आणि ती मीच लिहीन.’ वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी इतकी स्पष्ट जाणीव असणारी स्त्री त्या काळात विरळा होती. सिमॉन बुद्धिमान होत्या. ‘सरबॉन’ या विद्यापीठातून त्यांनी उच्चशिक्षण घेतले. लेखिका आणि प्रोफेसर म्हणून ७८ वर्षांचे एक स्वतंत्र संपन्न आयुष्य त्या जगल्या. लग्न, मुले, संसार, घर या कशातही न गुंतण्याचे त्यांनी स्वत:हून ठरवले आणि अखेरपर्यंत निभावले.

सिमॉन यांनी साधारण पंचवीसपेक्षा अधिक पुस्तकं लिहिली. ललित, कादंबरीपासून ‘ओल्डेज’ या ग्रंथापर्यंत विविध प्रकारचे त्यांचे लेखन होते. त्या पेशाने शिक्षक, प्रोफेसर असल्यामुळे अभ्यास आणि लिखाण त्यांच्यासाठी आवश्यक आणि आवडीचा भाग होता. त्यांचे सर्वात गाजलेले आणि ज्याच्यामुळे त्यांना जगभर ओळख मिळाली असे पुस्तक म्हणजे ‘द सेकंड सेक्स’. हे पुस्तक म्हणजे स्त्रीवादाचा पायाभूत ग्रंथ मानला जातो.

नर आणि मादी या दोन्ही गटांचा सर्व प्रकारे, सर्व अंगांनी शारीरिक, जीवशास्त्रीय, राजकीय, मानसिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, इत्यादींचा ऊहापोह त्यांनी या ग्रंथात केला. सिमॉन यांच्या आधीही ‘स्त्री’चा विचार केला गेला होता. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात स्त्रियांच्या हक्कांविषयी चळवळी झाल्या. त्या मुख्यत्वे वाढत्या औद्याोगिकीकरणाशी संबंधित होत्या. समान वेतन, कामाचे बाराऐवजी दहा तास, कामकाजासाठी सुरक्षित जागा, बाळंतपण आणि आजारपणाच्या रजा, आदी प्रामुख्याने अर्थार्जनाशी निगडित असणाऱ्या होत्या. स्त्रीला मतदानाचा हक्क मिळावा यासाठीही चळवळी झाल्या. या चळवळींमध्ये स्त्रीचा विचार केला गेला होताच.

पण ‘द सेकंड सेक्स’मध्ये सिमॉन यांनी स्त्रीच्या ‘स्त्रीत्वा’वर अधिक लक्ष केंद्रित केले. जगातल्या सर्व स्त्रियांना स्वत:च्या स्त्रीत्वाबद्दल आणि त्याच्या दुय्यमत्वाबद्दलची लख्ख जाणीव त्यांनी करून दिली. स्त्रीच्या स्पष्ट दुय्यम दर्जाची एवढी विस्तृत कारणमीमांसा याआधी कोणी केली नव्हती. तिच्यावरील कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक संस्कार, लहानपणापासूनच तिच्यात रुजवली गेलेली परावलंबित्वाची, असहायतेची भावना, शारीरिक सौंदर्याला दिले जाणारे महत्त्व आणि शारीरिक क्षमतांकडे केले जाणारे दुर्लक्ष, तिच्या बौद्धिक विकासाकडे जाणीवपूर्वक फिरवलेली पाठ, लैंगिक देहधर्मात तिला जखडून ठेवणे,आदी मुद्द्यांचा सविस्तर समाचार त्यांनी यात घेतला. त्यांनी सप्रमाण दाखवून दिलं की, स्त्री निसर्गत: पुरुषापेक्षा वेगळी असते, पण अबला नसते. तिला अबला बनविली जाते.

स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक फरकांना, शारीरिक, मानसिक क्षमतांना, चुकीच्या पद्धतीने मांडून त्यांच्या सामाजिक स्तरांमध्ये दरी निर्माण केली गेली, ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. ‘स्त्री अशी जन्माला येत नाही तर ती घडवली जाते’ हे त्यांचे विधान अजरामर झाले.

सिमॉन यांनी बाईच्या मनोव्यापारांची मांडणी केली. स्त्रीत्व अधिक अभ्यासले. ते जगातल्या सगळ्या स्त्रियांना स्वत:चे चित्र वाटले. स्त्रीच्या समस्या या त्या व्यक्तीच्या जरी मानल्या जात असल्या तरी त्या खरे तर एक स्त्री असल्यामुळे असतात, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या अनेक वाक्यांतूनही हे अगदी स्पष्ट होते. ‘विवाह आणि मातृत्वाचा निर्णय स्त्रीने विचारपूर्वक घ्यावा, अनिच्छेने त्याचे जोखड आयुष्यभर बाळगू नये.’ ‘सुखापेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचे’, ‘परावलंबन, लग्न, मातृत्व आणि घरकाम स्त्रियांच्या गुलामगिरीच्या बेड्या आहेत’, ‘स्वत:चा शोध लागला की आपण सुखी होतो असे नाही, पण सुखी होण्यासाठी स्वत:चा शोध लागणं नक्कीच आवश्यक आहे’, ‘घर सांभाळणे, बालसंगोपन करणे, कलाकुसर करणे, या सबबींखाली स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत: न घेणे, आर्थिक अवलंबनापासून जवळजवळ अनेक गोष्टींमध्ये पूर्ण परावलंबित्व स्वीकारणे आणि या सगळ्याला स्त्रीचे गुण आहेत असे मानून त्याला बळी पडणे, हे स्त्रियांनी टाळावे.’ असे त्यांनी केव्हाच म्हणून ठेवले आहे. ‘परावलंबन, पुढाकाराचा अभाव, स्वत:च्या भविष्याबद्दलचे नसलेले नियोजन, घाबरटपणा, सौंदर्याला अतिरेकी महत्त्व, न्यूनगंडाची भावना अशा अनेक गोष्टी स्त्रीच्या वैयक्तिक ऱ्हासाला कारणीभूत आहेत,’ असे त्यांनी ठामपणे सांगितले.

प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक आलाच पाहिजे, विणकाम, भरतकामात रस वाटलाच पाहिजे, आणि मातृत्वाची ओढ तर अनिवार्यच आहे, असा समाजाचा समज असतो ज्यामुळे तिला त्यापेक्षा वेगळ्या काही गोष्टी आवडल्या तर ती स्त्री विक्षिप्त मानली जाते. कारण मातृत्व, स्वयंपाक, घरकाम, सेवा, त्याग, प्रेम या गोष्टी असल्या तरच ती खऱ्या अर्थाने ‘स्त्री’ आहे, हे पुरुषप्रधान समाज व्यवस्थेने तिच्यावर बिंबवलेले आहे. पुरुषांमध्ये रुजवले जाणारे स्वातंत्र्य, निर्णयक्षमता, तर्कनिष्ठता, आत्मविश्वास हे गुण स्त्रीमध्ये रुजवले जात नाहीत. त्यामुळे ती रोजच्या रहाटगाडग्यात अडकून राहते. पुरुषाने जगण्यातली सगळी सर्जनशील बाजू फक्त स्वत:कडेच ठेवली आणि कंटाळवाणी नित्यकर्मे स्त्रीकडे ढकलली. परिणामी, स्त्रीने काही भव्यदिव्य करण्याची शक्यता संपुष्टात आली. स्त्रीच्या दुय्यम दर्जाची अशी बिनतोड मांडणी त्यांनी इतक्या वर्षं आधीच करून ठेवली.

त्यांनी भाषेसंदर्भातही अभ्यास करून असे स्पष्ट करून दाखवले की, आपल्या बोलीभाषेपासून, उदाहरणार्थ, शिव्यांमध्ये वापरली जाणारी भाषापासून कायद्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेपर्यंत पुरुषप्रधानता खोलवर पसरलेली आहे. लैंगिकतेपासून भाषेपर्यंत स्त्रीचे दुय्यमत्व त्यांनी परखडपणे मांडले. स्त्री म्हणजे पुरुषाची जन्मभर सेवा करणारी सेविका आणि पुरुष म्हणजे तिला जन्मभर पोसणारा तारणहार नाही, हे ज्या दिवशी दोघांना कळेल त्या दिवशी स्त्री-पुरुष समानतेचे पहिले पाऊल पडेल असे त्या म्हणतात. वर असेही म्हणतात की, फक्त सामाजिक किंवा राजकीय बदल स्त्रीचे प्रश्न सोडवू शकणार नाही तर प्रत्येक स्त्रीला व्यक्ती पातळीवरसुद्धा सतर्क राहून चतुराईने, बुद्धिमत्तेने स्वत:चे प्रश्न सोडवावे लागतील. अशा पद्धतीचे विचार, वाक्य आणि त्याला तगड्या अभ्यासाची जोड हे सिमॉन यांनी स्त्रीवादाला दिलेले भरभक्कम योगदान आहे.

त्यांचे ‘अभ्यासोनी प्रकटावे’ पद्धतीचे विचार स्त्रीवादासाठी म्हणूनच पायाभूत ठरले. विविध अंगाने केलेला अभ्यास, स्त्रीच्या दुय्यमत्वाची कारणे, त्यावरचे उपाय हे तर त्यांनी मांडलेच, पण प्रत्यक्षातसुद्धा त्या बहुतांश तशाच जगल्यादेखील. प्रत्यक्ष चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला. अर्थात लगभन, संसार अपत्य संगोपन न करता पुरुषासारख्या स्वयंपूर्ण जगण्याबद्दल झालेली टीका त्यांनाही भोगावी लागलीच. स्वयंपूर्णतेने, स्वनिर्णयावर जगणाऱ्या अनेक स्त्रियांना आजही अशा टीकेला सामोरे जावे लागते.

स्त्रीवादासाठी स्त्रीत्वाचा, तिच्या मनोव्यापाऱ्यांचा अभ्यास, प्रत्यक्षात तसे जगणे, चळवळीत सहभागी होणे आणि टीकेला दिलेले तोंड हे आज आधुनिक, तंत्रसज्ज, वैद्याकीय आणि इतर अनेक क्षेत्रातील देदीप्यमान प्रगतीच्या जगात जवळजवळ पाऊणशे वर्षांनंतरही लागू होते.

सिमॉन-द-बोव्हार या स्त्रीवादाच्या एक अध्वर्यू होत्या, याचा यापेक्षा मोठा पुरावा तो कोणता!

msabnis@yahoo.com