ही आणखी एक गोष्ट पाण्याचीच. (पहिली जलदिंडीची-११मे) पाणी शहाण्यासारखे वापरणाऱ्या स्त्रियांची. या स्त्रिया कोकणातील ज्या गावात राहतात ते बिबवणे गावच मुळी २०-२२ घरांचे. ही घरं एक तर सावंतांची किंवा कोंडुरकरांची. गावातील माणसं कामासाठी, उपजीविकेसाठी गावाबाहेर पडतच नाहीत. आपापल्या शेती तुकडय़ावर उगवेल ते त्यांचं अन्न. गावात जिल्हा परिषदेने काही वर्षांपूर्वी एक तळं खोदून बांधून दिलं. गावाच्या मानाने चांगलं ऐसपैस २०-२१ फूट खोल आणि सुमारे दहा गुंठे रुंद.
गावकरी ज्याला ‘शिवणीचा घोल’ आणि ‘सडा’ म्हणतात. अशा गावाभोवती असणाऱ्या डोंगरातून फुटणाऱ्या झऱ्यांचं पाणी दहा वाटांनी तळ्यात जमत असल्याने तळं बाराही महिने भरलेले. काही वर्षांपूर्वी कुडाळला गेले होते. तेव्हा जास्वंदी, केळी आणि चहू अंगांनी फोफावलेल्या रानझाडांच्या दाट सावलीत विसावलेलं ते तुडुंब पाणी डोळ्यांना कमालीचं सुखावून गेलेलं अजून आठवतं आहे. पण दाराशी आयतं आलेलं हे नैसर्गिक वैभव गावकऱ्यांच्या नजरेला जणू दिसतच नव्हतं. कारण एकाच तळ्यातून पाणी उपसण्याची आणि सिंचनाची सुविधा नव्हती..! त्यामुळे वर्षांतील शेताच्या एका हंगामावर गावाला समाधान मानावं लागत होतं.
गावातील ‘महालक्ष्मी’ या बचत गटाने हा प्रश्न प्रथम भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसन्न देवधर यांच्यापुढे मांडला. या बचत गटात आठ स्त्रिया आणि चार पुरुष. पण संसाराचे चटके आणि भविष्यातील अनेक प्रश्नांचे भान असणाऱ्या स्त्रियांनी त्यासाठी पुढाकार घेतला. पाणी उपसण्याची, सिंचनाची व्यवस्था, त्यांना गावात हवी होती. डॉ. देवधरांनी ‘भगीरथ’तर्फे अक्षरश: २४ गावांत अकरा हजारांचे पंप दिले. पण पाइपलाइन, विजेची जोडणी आणि अधिक ताकदीच्या, अश्वशक्तीच्या पंपाची गरज भागली असती तर गावातील सर्व शेतांपर्यंत पाणी नेता आलं असतं. हे लक्षात घेऊन महालक्ष्मी गटाच्या या महिलांनी ‘कर्ज प्रकरण’ करायचं ठरवलं आणि त्यांच्या बचत गटाचं ‘ग्रेडेशन’ झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने महालक्ष्मीला तब्बल २ लाख १८ हजाराचं कर्ज मिळालं. पाच अश्वशक्तीचा सबमर्सिबल पंप, जलवाहिनी, विजेची जोडणी, पंप हाऊस अशा प्रकल्प अहवालात नोंदवलेल्या सर्व गोष्टी बघता बघता उभ्या राहत गेल्या आणि दहा वाटांनी तळ्यात जमणारं पाणी तेवढय़ाच दहा वाटांनी शेता-शेतांत जाऊ लागलं.
आता प्रश्न होता या पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाचा आणि न्याय्य वाटपाचा. ते काम या गटातील स्त्रियांनी हातात घेतलं आहे. तळ्याचा वापर होत नव्हता तोपर्यंत त्या पाण्यामुळे घरात येऊ शकणाऱ्या समृद्धीची चाहूल गावाला लागली नव्हती. ही चाहूल लागल्यावर गावात या तळ्यामुळे संघर्ष उभा न राहता फक्त समृद्धी यावी, अशी या स्त्रियांची इच्छा होती. त्यामुळे सगळ्या एकत्र जमल्या आणि त्यांनी आधी पाणीवापराबाबतचे दर निश्चित केले. महालक्ष्मी बचत गटांचे जे सदस्य आहेत त्यांना १० रुपये तासाला या दराने तर गटाबाहेरच्या लोकांना १५ रुपये ताशी या दराने पाणी आकारणी केली जाते. आजघडीला गटाच्या बारा सदस्यांना आणि गटाबाहेर असलेल्या २० लोकांना या तळ्यातून पाणी पुरवलं जातं.
श्रद्धा शरद सावंत, छाया सदानंद सावंत, उज्ज्वला विजय कोंडुरकर, सुनंदा रघुनाथ सावंत, रसिका राघोबा कोंडुरकर, रंजना रमेश कोंडुरकर, रोहिणी चंद्रकांत तुळसकर आणि चारुशीला चंद्रकांत कोंडुरकर या आठ स्त्रिया सध्या तळ्यातून दिल्या जाणाऱ्या पाण्याचे सर्व व्यवहार बघतात. पावसाळा संपल्यावर म्हणजे साधारणत: सप्टेंबर ते मे या दरम्यान रोज किमान तीन तास पंच चालवता येईल एवढं पाणी या तळ्यात असतं. आजही कमीत कमी दहा फूट पाणी त्यात आहे. प्रत्येक सदस्याला घडय़ाळ लावून पाणी दिलं जातं. आणि त्याची नोंद ठेवून त्या बिलाची आकारणी केली जाते. हिशेब ठेवून पैसेवसुली करण्याची जबाबदारी प्राधान्याने या स्त्रियांवर आहेच, पण विजेचं बिल भरणं आणि या प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळेवर भरण्याची जबाबदारीही या स्त्रियांनी घेतली आहे. दर महिन्याला ७ तारखेला पाणी बिलाची वसुली आणि बचत गटाचे पैसे गोळा केले जातात. या प्रकल्पासाठी या गटाने २ लाख १८ हजाराचं कर्ज घेतलं होतं. पण त्यांना एक लाखाचं अनुदान कर्जफेडीनंतर मिळणार होतं. आज प्रकल्प सुरू करून अडीच तीन र्वष होत असताना या गटावरील कर्जाचं ओझं पूर्ण उतरलं आहे. कारण तळ्यातील या पाण्याने गावातील प्रत्येक घराला पाणी मिळालं आहे. आता पावसाळ्यापूर्वी भाताची रोपं तयार करण्यासाठी या स्त्रियांना तळ्यातील पाण्याचा उपयोग होतोच पण भात काढल्यावर त्या नाचणी आणि हंगामी भाज्यांचं उत्पन्न या पाण्यावर घेतात. भाजीपाला किंवा वालासारख्या कडधान्याचं उत्पन्न घरापुरतं काढून कुडावळेच्या बाजारात विक्रीसाठी पाठवलं जातं. तळ्यामुळे प्रत्येक घराचं सरासरी वार्षिक उत्पन्न जवळजवळ दोन लाखांच्या पुढे गेलं आहे. गावातील जनावरांसाठी चारा चांगला मिळू लागल्याने दुग्धोत्पादन वाढलं आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन आणि हातात रोख रक्कम आल्याने डुक्करपालनाचा जोड व्यवसाय काही लोकांनी सुरू केला आहे. राज्यात एकीकडे दुष्काळाने सामान्यांची दैना केली असताना पाण्याच्या व्यवस्थापनाचा हा प्रयत्न कौतुकास्पद वाटतो.
अर्थात समोर येणाऱ्या आकस्मिक अडचणी हाताळण्याइतकी आर्थिक स्वयंपूर्णता अजून या गटाकडे आलेली नाही. त्यामुळे पंप बिघडला. विजेचं बिल एकदम अधिक रकमेचं आलं की त्यांना ‘भगीरथ’कडे धाव घ्यावी लागते. पण ‘भगीरथ’कडून मिळणारी बिनव्याजी रक्कम दरमहा फेडण्याइतका आत्मविश्वास लाख रुपयांचं कर्ज फेडल्यानंतर आता गावकऱ्यांना आणि या स्त्रियांना आला आहे. त्यामुळे आता पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन मोठय़ा बाजारात विक्री करण्याइतका भाजीपाला, धान्य उत्पादनाच्या दृष्टीने स्त्रियांचं नियोजन आणि प्रशिक्षण सुरू आहे. पाण्याचं अधिक सूक्ष्म नियोजन आणि आंबा-काजूसारख्या पिकांसाठी त्याचा उपयोग कसा करता येईल याची आखणी सुरू आहे. गटाचे एक सदस्य विजय सावंत त्यासाठी औरंगाबादच्या ‘वाल्मी’ संस्थेकडे प्रशिक्षण घ्यायला गेले होते.
पाणी किंवा जमिनीसारखं साधन केवळ हातात असणं पुरेसं नाही. त्याचा शहाणपणाने वापर गरजेचा आहे. आणि हे शहाणपण चारचौघी एकत्र आल्या, स्वत:चे प्रश्न मांडू लागल्या, सगळ्यांच्या मदतीने उत्तराची वाट शोधू लागल्या की घडतं. डोंगरातून वेगाने जमिनीकडे धावणारं पाणी जेव्हा अक्कलहुशारीने शेतात खेळतं तेव्हा त्याला समृद्धीची फळं येतात. बिबवणे गावातील स्त्रिया याच फळांची गोडी चाखत आहेत!
तळं राखी, ‘ती’ पाणी चाखी
पाणी किंवा जमिनीसारखं साधन केवळ हातात असणं पुरेसं नाही त्याचा शहाणपणाने वापर गरजेचा आहे. आणि हे शहाणपण चारचौघी एकत्र आल्या, स्वत:चे प्रश्न मांडू लागल्या, सगळ्यांच्या मदतीने उत्तराची वाट शोधू लागल्या की घडतं.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-05-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व आम्ही सा-या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhudurg bibavne village womens successful water project