‘‘मी मुंबईत आहे हे माझं भाग्य. त्यामुळे मला सातत्यानं कर्नाटकी शास्त्रीय संगीत, िहदुस्थानी शैलीतील कंठसंगीत, जाहिराती, चित्रपटगीतं, पाश्चात्त्य संगीत, फ्युजन संगीत, भावसंगीत अशा सर्व क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. आपल्या या देशात कर्नाटकी आणि िहदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बलिष्ठ परंपरा आहेत; पण या दोन्ही शैलींचा उद्देश एकच आहे.
श्रोत्यांच्या कानांना आनंदवून त्यांना या साकार जगात निराकाराचा अनुभव देणं.. मी तेच करतो आहे.. संगीत हेच माझ्या जगण्याचं कारण आहे.’’
मानवी संस्कृतीचा सारांश म्हणजे संगीत! संगीत हेच माझ्या जगण्याचं कारण आहे.
संगीत या गोष्टीचा माझ्या आयुष्यात कधी प्रवेश झाला हे कळलंच नाही. माझी सगळ्यात जुनी आठवण म्हणजे मी अडीच-पावणेतीन वर्षांचा असेन.  कुठून तरी माझ्या कानावर मृदुंगाचा नाद पडला. नादाला भाषा नसते. भाषा फारशी न कळण्याच्या त्या वयात तालाने मला मुग्ध केलं. (आज ते जाणवतंय). मग काय, येता-जाता दिसेल त्या वस्तूमधून मी मृदुंगाच्या बोलांसारखा आवाज काढू लागलो. घरातले कोणीही मला ओरडले नाहीत कधी. कदाचित त्या आवाजात लयही दडलेली असावी!
कोणत्याही दाक्षिणात्य घरात संगीतमय वातावरण असतंच. आमच्याही घरात होतं. एकदा आम्ही सारे चेंबूरमध्ये एका नातेवाइकांकडे गेलो होतो. पोरं-पोरं खेळत होतो. समोरच एक हार्मोनियम ठेवलेली होती. माझं साडेतीन-चार वर्षांचं वय त्याविषयीची उत्सुकता लपवू शकलं नाही. मी हार्मोनियमपर्यंत पोहोचलो. त्याचा अडसर काढला आणि मोठी माणसं हलवतात तसा भाता हलवायला गेलो. पण हात पुरेनात. शेवटी एका स्टुलावर चढलो आणि ओणवा होऊन मी भाता हलवला व पट्टय़ांवरून बोटं फिरवू लागलो. हार्मोनियम सुरेलपणे वाजली. मी वाजवतच राहिलो. हार्मोनियम कोण वाजवतंय हे पाहायला घरातली मोठी माणसं आली आणि पाहत बसली. मी ती हार्मोनियम वाजवतोय हे पाहून त्यांना धन्य वाटलं. कोणतंही स्वरज्ञान नसताना माझ्याकडून ती हार्मोनियम वाजली गेली यात त्यांना ईश्वरी संकेत वाटला असावा. तो संकेत अप्पा-अम्मानं समजून घेतला असावा. माझ्यामध्ये सूर, ताल, लय भरून ईश्वरानं पाठवून दिला आहे हे त्यांना कळलं आणि माझा सुरेल प्रवास सुरू झाला..
संगीताची समज, गायन-वादनाचं कसब ही एक उपजत गोष्ट आहे, असा माझा विश्वास आहे. कलावंत हा जन्मावाच लागतो. मी अत्यंत भाग्यवान की माझी निवड ईश्वरानं केली. हार्मोनिअम वादनाची कला त्याने उपजत दिली. ही जी उपजत कला आहे तिला स्वरज्ञान म्हणावं असं मला वाटतं. हे स्वरज्ञान ज्याला लाभलं त्यानं अर्धी लढाई जिंकली. उरलेली अर्धी लढाई त्याला परिश्रमानं जिंकता येते. सगळ्यांना हे स्वरज्ञान मिळत नाही. त्यासाठी कधी कधी सारं आयुष्य वेचावं लागतं. अशा स्वरज्ञानाला उत्पाद्य प्रतिभा म्हणतात. सहजा प्रतिभा ज्याला लाभलीय त्याच्यापेक्षा पाचपट अधिक मेहनत उत्पाद्य प्रतिभेच्या उपासकाला करावी लागते, असे प्राचीन कलाशास्त्र सांगते. ज्याला ‘सहजा’ लाभली आहे त्यानं नुसते शांत बसून चालत नाही. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. मला सहजा प्रतिभा लाभली हे अम्मानं ओळखलं आणि त्याच वयात मला वीणावादन शिकण्यासाठी के. राजम या गुरूंकडे पाठवलं. त्यांनी वीणावादन शिकवता शिकवता माझं सांगीतिक व्याकरण पक्कं केलं. त्यांच्या मातोश्री ललिता व्यंकटरामन यांनीही मला वीणावादन शिकवलं. दोघीही अतिशय प्रेमळ होत्या. मला शिकायचा कंटाळा यायचा. पोटात दुखतंय वगरे कारणं सांगायचो. पण अम्मा! तिला मी थापा मारतोय हे कळायचंच. ती मला राजम मॅडमकडे पाठवायचीच. नाहीतर खाऊ बंद व्हायचा. खाणं हा माझा लाडका विषय. (गाणं आणि खाणं या दोन्ही गोष्टीवर माझं प्रेम आहे.) माझा दादा-रामचंद्र, त्याला सारे मणी म्हणतात. मणिदादा सायनला टी. आर. बालमणी यांच्याकडे गाणं शिकायला जायचा. पुढे मीही त्यांच्याकडे कर्नाटक शैलीचं गाणं शिकायला गेलो. त्यांनी माझं पायाभूत ज्ञान पक्कं करून घेतलं. इतकं की आजही त्याचा उपयोग होतो. मी िहदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकलो नाही. त्यामुळे मला ख्याल वगरे गाता येत नाही. पण ऐकतो मात्र भरपूर. उस्ताद आमीर खाँसाहेब माझे अत्यंत आवडते गायक आहेत. पं. भीमसेन जोशी, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरीताई आमोणकर, बेगम परवीन सुलताना, गंगूबाई हनगल यांचं गायन मला खूप आवडतं. सुब्बालक्ष्मी यांच्या गाण्यावर माझा िपड पोसला गेलाय.
तर टी. आर. बालमणी मॅडम यांच्या शिकवण्यात जादू होती. त्या एकच एक राग महिनोन् महिने घासून घेत नसत. त्या विशिष्ट रागाचं व्याकरण सांगत आणि मग त्या रागविस्तार स्वत: करायला सांगत. त्या शिष्यांना त्यांची वाट दाखवून देणाऱ्या वेगळ्या गुरू होत्या. त्यांनी व अप्पा-अम्मानं श्रेष्ठ संगीतच ऐकायची कानांना सवय लावली. त्यामुळे माझे मन, कान आणि बुद्धी त्या दृष्टीने तयार झाली. मातृगुरू, पितृगुरू आणि विद्यागुरू या तिन्ही गुरूंनी लोकप्रिय संगीत कसं असतं आणि सर्वश्रेष्ठ संगीत कसं असतं, याची जाण माझ्यात विकसित केली.
आम्ही चेंबूरला राहायचो. साधंसं कुटुंब, साधंसं घर आणि साधी राहणी. आमच्या गरजाही साध्याशाच होत्या आणि आजही आहेत. आमच्या सोसायटीच्या परिसरात अनेक उत्सव होत असत. माझा पहिला जाहीर कार्यक्रम छेडा नगरच्या एका मंदिरात मी केला होता. मी साडेतीन वर्षांचा होतो. तिथे स्टेज नव्हतं. नवरात्रीचे दिवस असावेत. मणिदादाच्या मुंजीत शिवलेला लाल रंगाचा, खांद्यावर दोन सोनेरी बिल्ले असणारा कोट घालून माझी बटूमूर्ती माइकसमोर हार्मोनिअम वाजवत होती. माझा मामा सोबत होता. माझा हात भात्यापर्यंत कसाबसा पोहोचत होता. मी थकलो की मग मामा हार्मोनिअमचा भाता हलवायचा. तासभर मी हार्मोनिअमवर वेगवेगळी गाणी वाजवली. ‘चल चल मेरे साथी’ हे मी वाजवलेलं पहिलं गाणं होतं. त्यातल्या एका गाण्यात घुंगरू वाजायचे. मी पेटीच्या एका बाजूला दोन घुंगरू बांधले होते. घुंगरू वाजायची वेळ आली की मी ते वाजवायचो, खूप कौतुक झालं त्या वेळी.
आमच्या शाळेत स्नेहसंमेलनात कव्वाली होणार होती आणि अचानक त्यातला हार्मोनियम वाजवणारा आला नाही. जॉन नावाच्या माझ्या मित्राने आमच्या सरांना सांगितलं की, ‘‘शंकर हार्मोनिअम वाजवू शकतो.’’ व्हिक्टर सरांनी मला बोलावलं. जॉन अक्षरश: मला ओढून त्यांच्याकडे घेऊन गेला. त्यांनी मला कव्वाली ऐकवली. एकदा ऐकल्यावर मी ‘तालीम करूया’ असे म्हणालो. सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. कव्वाली कशी गायची, कशी समजून घ्यायची याला बराच वेळ लागतो आणि इथं मी एकदा ऐकून रिहर्सल करू या सांगत होतो. सगळे विचित्र नजरेने पाहू लागले, पण आम्ही रिहर्सल केली. मी देवदयेने ती कव्वाली वाजवू शकलो आणि मग शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा अविभाज्य भाग बनलो. कॉलेजात मी अशाच प्रकारे कार्यक्रमांत ओढला गेलो. नंतर मात्र मी जाणीवपूर्वक कार्यक्रमांत सहभाग घेऊ लागलो. मल्हार वगरे स्पर्धात भाग घेऊ लागलो. तिथेच मला केदार पंडित, फझल कुरेशी, तौफिक कुरेशी, रतनमोहन शर्मा, बॉम्बे जयश्री असे सारे संगीतातले नवोदित मुसाफिर भेटले. आम्ही सारे गाणं शिकत होतो. आमच्यात स्पर्धा नव्हती. आम्ही एकमेकांसोबत असायचो. अशा वेळीच तुम्हाला कळतं की तुम्ही किती पाण्यात आहात, अजून तुम्हाला काय करायचं आहे? हे मित्रच तुम्हाला आत्मविश्वास देतात. फझल कुरेशी (उस्ताद झाकीर हुसेन यांचा भाऊ) आणि मी ‘दिव्या’ नावाच्या एका बँडमध्ये गायचो. रात्रभर गाणं, बजावणं सुरू असायचं. श्रीधर पार्थसारथी असायचा. बऱ्याचदा श्रीधर, फझल रात्री दोन वाजता आमच्याकडे यायचे. एका हॉल, बेडरूम व किचनचा छोटासा फ्लॅट होता. आम्ही गाण्यावर चर्चा करायचो. गायनवादन करायचो आणि अप्पा साडेतीनच्या सुमारास आम्हाला कॉफी करून द्यायचे. आमच्याकडे अतिथ्यशीलता खूप होती व आहे. माझे शाळेतले, चेंबूर वाडीतले मित्र उमेश प्रधान, राजेश प्रधान, मनोज सोनाळकर, सुदर्शन राव, मोहन विजपन, सुरेश रामिलगम, मुरली हे सारे आजही टिकून आहेत. मुलंबाळं झाली, संसार वाढले तरी दोस्ती अभंग आहे. या दोस्तीनं मला खूप काही दिलं. संगीता शृंगारपुरे ही त्यापकीच एक होती. ती आठवीत अन् मी अकरावीत. तेव्हापासून जी प्रेमकहाणी सुरू झाली ती आज बत्तीस वर्षे झाली तरी टिकून आहे.. जीव आणि जीवन दोन्हींत संगीत आहे.
उमेश आणि राजेशच्या घरी त्यांच्या आत्याचे यजमान यायचे. ते संगीतकार होते. त्या वेळी ते एक अल्बम करत होते आणि त्यांना एका वीणावादकाची गरज होती. राजेश म्हणाला, ‘‘माझा एक दोस्त वीणावादन करतो.’’ अकरा वर्षांच्या मला काकांनी काही ओळी गुणगुणून दाखवल्या. मी वीणेवर त्या वाजवल्या. त्यांनी आणखी काही ओळी ऐकवल्या, मी जशाच्या तशा वाजवल्या. त्यांना आश्चर्य वाटलं व मग दुसऱ्या दिवशी सरळ रेकॉर्डिगला बोलावलं. मी गेलो, वीणावादन केलं. नंतर कळलं की ते श्रीनिवास खळे होते आणि पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर या दोन भारतरत्नांनी गायलेल्या ‘राम शाम गुण गान’साठी मला वीणावादनाची संधी मिळाली होती. ईश्वरी कृपाप्रसाद, दुसरं काय? खळेकाका हे एक अद्भुत व्यक्तिमत्त्व होतं. खळेकाका संगीतरचना तयार करताना मी अवतीभवती असायचो. ते अनेकदा मला चालीतल्या जागा लक्षात ठेवायला सांगायचे, मीही टिपकागदासारख्या त्या जागा लक्षात ठेवायचो व त्यांनी विचारलं की सांगायचो. त्यांच्याबरोबर खूप फिरण्याचं भाग्य मला लाभलं. एकदा आम्ही शिर्डीला साईबाबांसमोर सेवा करायला निघालो होतो. गाडीमध्ये खळेकाकांनी मला एक नवी चाल ऐकवली आणि शिकवली, म्हणाले, ‘‘हे भजन तू साईबाबांसमोर सादर कर.’’ आज्ञा प्रमाण मानून मी गायलो.
खळेकाकांसोबत माझं हे अनौपचारिक शिक्षण सुरू असताना मी सॉफ्टवेअर इंजिनीअर झालो. ओरॅकलवर काम करत होतो. आमचं घर मध्यमवर्गीय. भविष्यातील सुरक्षितता हा महत्त्वाचा विचार. पण माझ्या मनात गाण्यातच करिअर करावं असं येऊ लागलं. अम्मा-अप्पा आणि संगीताशी बोलून मी आठ महिन्यांची नोकरी सोडून दिली आणि संगीत व्यवसायात स्वत:ला झोकून दिलं. त्या वेळीही मला अशी माणसं भेटली की त्यांच्या भेटीमुळे आयुष्यात बदल घडले. अशोक पत्कीसाहेबांकडे गेलो. त्यांनी दुसऱ्या दिवशी मला रेकॉìडगला बोलावलं. ‘कमांडर’ सीरिअलचा टायटल ट्रॅक मी केला. आयुष्याला वेगळं वळण मिळालं. रणजित बारोट यांच्याकडे गेलो तर ‘पेप्सी’ची ‘यही है राइट चॉइस बेबी’ जाहिरात केली. नवं वळण मिळालं. लुई बँक्स यांच्याकडे गेलो. ते म्हणजे भारतीय जाझ संगीताचे राजे! माझा आवाज ऐकून ते म्हणाले ‘‘आमच्या बँडमध्ये गाशील का?’’ माझा मुंबईतल्या एका वेगळ्या जगात प्रवेश झाला. एहसानबरोबर एक जिंगल केली आणि जन्मभराचा सोबती लाभला, आणि मग एक आवडती, अविश्रांत धावपळ सुरू झाली. आजही ती धावपळ सुरूच आहे. या धावपळीतच मी, एहसान कुरेशी व लॉय मेंडोसा- आमचं त्रिकूट जमलं आणि आम्ही मुकुल आनंद यांच्या विनंतीवरून त्यांच्या अप्रकाशित ‘दस’ चित्रपटाला संगीत दिलं. चित्रपट पूर्ण नाही झाला, पण ‘सुनो गौर से दुनियावालों’ हे गाणं हिट झालं. आम्ही अनेक चित्रपट केले. प्रत्येक चित्रपट वेगळा, त्याची मजा वेगळी. त्याचं संगीत वेगळं. आम्ही तिघांनी पारितोषिकांसाठी कामं केली नाहीत, पण पारितोषिके मिळत गेली. चंचल अशा सिनेमाच्या जगात आम्ही प्रयोगशीलतेची कास सोडली नाही. प्रयोगशीलता ही कलेला विकासाच्या दिशेने नेते, असं मला वाटतं. जावेद अख्तरांसोबत मी ‘ब्रेथलेस’ केला होता. एका श्वासात आपण आख्खं गाणं म्हणतो आहोत, असा आभास आम्हाला निर्माण करायचा होता. एकही गाणं आम्ही एका श्वासात गायलो नाही; पण तंत्रज्ञान व कला यांच्या अजोड कामगिरीमुळे ‘ब्रेथलेस’ वेगळा बनला.
एकदा मी कुठल्यातरी दौऱ्यावरून परतत होतो. विमानतळावर मला तौफिक कुरेशी भेटला. तो म्हणाला, ‘‘तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे. तुला ‘शक्ती’बरोबर कदाचित काम करावं लागणार आहे.’’ तो मजेत ‘वाईट’ बातमी म्हणाला; पण माझ्यावर मात्र ताण आला होता. झाकीर भाई, जॉन मॅकलाफलीन, सेल्वा गणेश, ई. श्रीनिवासन अशा दिग्गजांबरोबर मला संधी मिळणार होती. ही स्वप्नवत बाब होती. मी ‘तोडी’ रागात काही गाऊन त्याची सीडी ‘शक्ती’कडे पाठवली होती. जॉन मॅकलाफलीनना माझं सादरीकरण आवडलं असावं. आम्ही एक रिहर्सल केली. संध्याकाळी ‘रिमेंबरिंग शक्ती’ हा कार्यक्रम झाला. झाकीरभाईंनी उत्साह दिला आणि कार्यक्रम संपल्यावर सारे म्हणाले, ‘‘तुझ्याशिवाय कार्यक्रम ही संकल्पनाच आता आम्ही करू शकत नाही.’’ जिवंतपणी आख्यायिका बनलेल्या महान कलावंतांचा तो चांगुलपणा होता. गेल्या बारा वर्षांत त्यांच्याबरोबर जगभर फिरलो. ‘शक्ती’सोबत कार्यक्रम करणे म्हणजे तारेवरची कसरत. शंभर फूट उंचावर बांधलेल्या तारेवरून आधार न घेता चालण्यासारखी कसरत! देवदेयेने ती कसरत निभावता येतेय.
आजवर अक्षरश: शेकडो मफिली केल्या. घरगुती मफिलींपासून लाखालाखांच्या रसिक समुदायांपर्यंत. प्रत्येक मफल लक्षणीय होती. आपण स्वत:च मफिलीचा आनंद घेतला नाही तर दुसऱ्यांना तो कसा देणार? आमच्या किंवा कोणा मित्राच्या घरी बसल्यानंतर मी ज्या प्रेमाने ‘बाजे मुरलिया’ गातो तितक्याच प्रेमाने मोठय़ा मफिलीत गात असतो. सुदैवाने न रंगलेली अशी एकही मफल मला आठवत नाही. उलट एक चिरस्मरणीय मैफिल आठवतेय. पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वी अमेंदू नावाच्या एका तरुणानं आमचा कार्यक्रम आयोजित केला होता. डिसेंबरच्या महिन्यात आणि ओपन स्टेडिअममध्ये होता तो कार्यक्रम. आम्ही भरपूर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरतो. त्या दिवशी पस्तीस हजार लोक तरी आले असणार. पंचेचाळीस मिनिटे कार्यक्रम झाल्यानंतर अवकाळी पाऊस आला. पंधरा मिनिटे त्याने गारपीट केली. साऱ्यांची अक्षरश: पळापळ झाली. सारं सामान हलवलं गेलं. स्टेज अस्ताव्यस्त झालं. कार्यक्रम सुरू करणं अवघड होतं. मी रंगमंचावर गेलो आणि श्रोत्यांना हात जोडून विनंती केली. पण कोणीही जागचे हलेनात. पस्तीस हजार श्वासांमधून मला जाणवलं यांना काहीतरी ऐकायचंच आहे. मग मी त्यांना विचारलं, ‘‘बिनासाथीचं गाऊ का?’’ श्रोत्यांच्या तोंडातून एकमुखानं ‘हो’कार आला आणि मी माइक हातात घेऊन ब्रेथलेस गायला सुरुवात केली. ओपन स्टेडियम, पागोळ्या गळताहेत, माझ्या मागे झाडलोट करणारी माणसं आवराआवर करत आहेत अन् मी गातोय. माझ्यासोबत हजारो रसिक गात, ताल देत होते. एहसान गिटार घेऊन आला. एक माइक सुरू झाला. मग लॉयने टँबोरीन घेऊन आम्हाला साथ दिली. आणखी एक माइक सुरू झाला आणि पुढची ९०-१०० मिनिटे गिटार, टँबोरिन, श्रोते आणि मी! एक अविस्मरणीय मफल जमली. त्या आठवणीने आजही अंगावर रोमांच उभे राहतात.
रसिक किती प्रेम करतात कलावंतावर? हे प्रेम टिकवण्यासाठी आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे. नव-नवं दिलं पाहिजे या विचारांतून आपल्या महान गायकांनी गायलेली गाणी पुन्हा गाण्याचा मी प्रयत्न करतो. ही गीते गाताना मी त्यामध्ये माझी काहीतरी भर घालण्याचा प्रयत्न करतोच. नुकतंच मी हृदयनाथ मंगेशकरांसाठी आशाताईंनी गायलेलं ‘तरुण आहे रात्र अजूनी’ पुन्हा गायलोय. मी-एहसान-लॉय आम्ही तिघांनी त्याचं संगीत रि-अ‍ॅरेंज केलंय. हृदयनाथजींना ते खूप आवडलं. सुबोध भावे हा ‘कटय़ार काळजात घुसली’ या संगीत नाटकावर मराठी चित्रपट करतोय आणि आम्ही त्या चित्रपटाचं संगीत करतोय. पूर्णपणे वेगळा अनुभव आहे तो. पंडित जितेंद्र अभिषेकींनी संगीत दिलेल्या या नाटकाचे चित्रपटात रूपांतरण करणे ही अवघड गोष्ट आणि तितकीच अवघड गोष्ट त्याच्यासाठी संगीत तयार करणं. आयुष्य समृद्ध करून टाकणारा अनुभव आहे हा.
मी मुंबईत आहे हे माझं भाग्य. त्यामुळे मला सातत्यानं कर्नाटकी शास्त्रीय संगीत, िहदुस्थानी शैलीतील कंठसंगीत, जाहिराती, चित्रपटगीतं, पाश्चात्त्य संगीत, फ्युजन संगीत, भावसंगीत अशा सर्व क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. आपल्या या देशात कर्नाटकी आणि िहदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बलिष्ठ परंपरा आहेत. दोन्ही संगीतात मूळ स्वर बाराच आहेत, तरीही त्यात केवढी तरी विविधता आहे, केवढा तरी फरक आहे. याचं कारण, दोन्ही संगीत पद्धतींमध्ये अर्थ लावण्याच्या पद्धतीतील भिन्नता, शैलीभिन्नता, संवेदना आणि दृष्टिकोनातील फरक. पण या दोन्ही शैलींचा उद्देश एकच आहे. श्रोत्यांच्या कानांना आनंदवून त्यांना या साकार जगात निराकाराचा अनुभव देणं. आपल्या या पुरातन संगीत परंपरेत कितीतरी घराणी आहेत. त्यांनी आपापल्या पद्धतींनी भारतीय रसिकमन समृद्ध केलंय. पण खूपसं लोकसंगीत असं आहे की जे अजून सर्वाना माहिती नाही. मला हे लोकसंगीत सर्वपरिचित करण्याचा प्रयत्न करायचाय. भारतीय संगीतातील वैश्विकता अद्यापही जगात सर्वदूर पसरलेली नाही. मनात विचार आहे की भारताच्या कानाकोपऱ्यात फिरावं, त्यात दडलेलं लोकसंगीत शोधावं आणि उच्च स्वरात जगाला ओरडून सांगावं- ‘पाहा, आमच्या देशाचा हा संपन्न वारसा!’
जेव्हा जेव्हा मी फ्युजन संगीत गातो तेव्हा तेव्हा मला संगीत सागराच्या खोलपणाचा नव्याने प्रत्यय येत असतो. पंडित रवी शंकरजींनी सुरू केलेली ही परंपरा पौर्वात्त्य व पाश्चिमात्य अशा दोन भिंती पाडून नवं संगीत घडवते आहे. झाकीरभाईंनी ती परंपरा बलिष्ठ केली. आज अनेक नवनवे संगीतकार त्यात भर घालत आहेत. हा आनंदाचा भाग वाटतो. मीही त्याचा एक पाइक आहे. ही संगीत परंपरा सर्वांपर्यंत पोहोचताना अनेक अडचणी जाणवतात. अनेकजण स्वत:पुरते गातात, त्यांचे आवाज छान असतात. पण त्यांना वळण नसते. ही उणीव दूर करण्यासाठी आम्ही ‘शंकर महादेवन अ‍ॅकॅडमी’ ही ऑनलाइन संगीत शिकवणारी अ‍ॅकॅडमी सुरू केली आहे. जगभरातून हजारो लोक इथे शिकतात. त्यात मला प्रचंड आनंद मिळतो. अनौपचारिक संगीत शिक्षणाला व्यवस्थित रूप देण्याचा आमचा तो प्रयत्न आहे. आज वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षांपासून सुरू झालेली ही जगण्याची आनंदयात्रा सुरू आहे. संगीताच्या दुनियेत वावरत असताना अनेक लोकांचे अनेक चेहरे दिसतात. पंचखंडात्मक पृथ्वीवर सर्वदूर भटकलोय मी. पण माणूस मला सर्वत्र सारखाच दिसला. साऱ्यांनाच जगायचं असतं! पण जगताना ते आनंद शोधत असतात. जगातलं दु:ख मोठं, ताप मोठा. पण या तापातून मुक्ती देतं ते संगीत! ‘सा’कारातून निराकार निरामय आनंदाची जाणीव देतं ते संगीत! त्या संगीताचा मी साधासा साधक! मला तो निराकार, निरामय आनंद लाभतो, तोच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न यशस्वी की अयशस्वी, हे तुम्ही ठरवायचं!               
(शब्दांकन – नीतिन आरेकर)   
nitinarekar@yahoo.co.in
‘चतुरंग मैफल’ मध्ये
पुढील शनिवारी (२३ नोव्हेंबर)
ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा