‘‘भैरवीची फर्माईश आल्यानंतर गायकाच्या मनात आपण समर्थपणे तीन तासाची मैफल रंगवल्याचा आनंद, समाधान असतं, पण एक अतृप्तीदेखील असते. तसंच मला हा शेवटचा लेख लिहितानाही वाटतंय! आणि आजच्या या सदराच्या मैफलीची भैरवी गाताना वाटतंय, की अजून खूप काही सांगायचं राहून गेलंय..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे सदर लिहिता लिहिता वर्ष संपत आल्याचं लक्षातही नाही आलं. वर्षभरात २५ लेख लिहूनही झाले. मैफल संपताना, भैरवी गाताना जे भाव मनात येतात अगदी तसंच वाटतं आहे! गाण्याची मैफल सुरु होण्याआधी थोडी बेचैनी, थोडी अगतिकता, काहीशी उत्सुकता हे भाव दाटलेले असतात मनामध्ये. जशी मैफल सुरु होते, आवाज आणि मन-गळा यांच्या सुसंवादानं गाणं हळूहळू उलगडू लागतं.. मन स्थिर होतं.. गळा तापतो.. मनाबरोबर जाऊ लागतो.. रंगांची उधळण सुरु होते.. मंद्र सप्तकातून मध्य सप्तकात. मध्य सप्तकानंतर तार सप्तकात. आवाज खुलतो, मन मुक्तपणे संचार करू लागतं, मारूबिहागात!

एक राग संपतो दुसरा राग सुरू होतो, गाणं अधिकाधिक खुलू लागतं. श्रोते गाण्यात गुंग होतात. मैफलीला उत्तरोत्तर रंग चढू लागतो आणि भैरवी गाण्याची वेळ येते. गायकाकडे आणखी खूप काही सांगण्यासारखं असतं. त्याच्या भात्यात अनेक तीर शिल्लक असतात, पण मैफलीची वेळ संपत आल्यामुळे भैरवी गाणं प्राप्तच असतं. जितकी मैफल रंगू लागते तितका गायक साक्षीभावानं गाऊ लागतो. त्या गायकामार्फत जणू निसर्गच गातोय असं काहीसं होतं. असंच काहीसं माझ्या या स्तंभ लेखनाच्या प्रवासाबद्दल झालं.

पहिल्या लेखाआधी संपूर्ण वर्ष डोळयासमोर दिसत होतं. मी लिहू शकेन, की नाही असंही वाटत होतं. परीक्षेच्या सकाळी जसं वाटतं ना तसं! पेपर हातात आल्यावर उत्तरं आठवतील की नाही? – अगदी तसंच. मी लिहू लागले.. मनातले विचार जसेच्या तसे कागदावर उतरवू लागले.. एक-एक विषय सुचू लागला आणि मन मोकळं करू लागले वाचकांसमोर! अगदी पहिल्या लेखापासूनच अनेक वाचकांचे इमेल्स यायला लागले.

मैफलीत जशी आवर्तनांना श्रोत्यांची दाद मिळते ना, अगदी तेच काम या इमेल्सनी केलं! माझा उत्साह थोडा वाढला, आत्मविश्वासही. मी लिहिते आहे ते वाचकांपर्यंत पोहोचतंय हा दिलासा, ही दाद मला आणखी लिहिण्यासाठी प्रोत्साहित करू लागली. मनातले भाव प्रकट करण्यासाठी माध्यमावर पकड असल्यास भाव समर्थपणे प्रगट होतात. किशोरीताईंबरोबरचा एक प्रसंग आठवतो. आजच्या शास्त्रीय संगीताच्या प्रस्तुतीबद्दल चर्चा सुरु होती. ताई म्हणाल्या, ‘‘आजची पिढी माध्यम गाते. आपल्या माध्यमावर, आपल्या गळयाच्या तयारीवर, त्याच्या व्याकरणावर पकड असणं म्हणजे भाव प्रकट होणं असं नव्हे! तिथे माध्यम गायलं जातं. तुम्ही माध्यम गाऊ नका, परंतु गाण्यातले भाव समजून घ्या.’’ त्या चर्चेच्या वेळी ताईंनी सांगितलेली वाक्यं ऐकू आली होती, पण त्या क्षणी त्यांना जे म्हणायचं होतं ते पूर्णत: समजलं असं नक्कीच नव्हतं. मात्र त्या विचारांनी मेंदूत प्रवेश केला आणि मेंदू त्यावर काम करु लागला. शब्दाचंही असंच आहे की! लिहायला सुरुवात केली तेव्हा अनेक विचारांसाठी शब्दच मिळेनात. शब्द तोकडे पडू लागले. शब्दसंपदा कमी पडू लागली. जे म्हणायचं होतं ते तसंच्या तसं कागदावर उतरतंय असं वाटत नव्हतं, पण तेव्हा ताईंचे हे उद्गार मनात आले! आणि ठरवलं, जसा विचार मनात येतोय तसा लिहू.

माझ्या जीवनात घडलेल्या घटना, प्रसंग याबद्दल लिहिणं त्या मानाने सोपं होतं. डोळे मिटले आणि आपल्या जीवनपाटावर जर लक्ष केंद्रित केलं तर आपोआप एक चित्रपट डोळयासमोर तरळू लागतो. पाहिजे तो प्रसंग डोळयांसमोर येऊ लागतो. जो हवा, तो! त्याचं वर्णन करणं सगळयांत सोपी गोष्ट. काही तांत्रिक बाबींबद्दल लिहिताना जसं तानपुरा, मेंदूच्या पसाऱ्यात असलेले तानपुऱ्याचे विचार एकत्र करून लिहिणं, तेही लिहिणं सोपं होतं. रियाजाबद्दल जे मी अनुभवलं, जसं मी केलं, काही सहकलाकारांचं ऐकलं, मोठया गुरुजनांनी सांगितलं ते लिहिलं.

लिहायला सुरुवात केली तेव्हा अनेक वाचकांचे अभिप्राय यायला सुरुवात झाली. ई-मेल द्वारे. बहुतेक वाचकांनी लिहिलं होतं, की त्यांनी अनेक वेळा माझं गाणं ऐकलं होतं, पण माझे कागदावर उतरवले विचार ऐकलेले नव्हते आणि तो त्यांना एक सुखद धक्का होता! मैफलीला जाण्याआधीच्या मनोवस्थेबद्दल मी लिहिलं, त्याबद्दलही अनेक वाचकांची पत्रं आली. गायकाच्या एखाद्या कार्यक्रमाला जाऊन गाण्याचा आनंद घेणारे अनेक श्रोते असतात, परंतु इतकं प्रभावी गाणं सादर करणाऱ्या गायकाच्या प्रस्तुतीकरणामागे असलेला त्याचा विचार, कार्यक्रमाआधी येण्याची त्याची अवस्था, त्याची तयारी, ग्रीन रूममध्ये तो करत असलेली तयारी, एकाग्र होण्याचा प्रयत्न, याबद्दल मी लिहिलेला लेखही अनेक वाचकांना आवडला. रियाजाबद्दल लिहावं असं सांगणारे अनेक मेल्स आले. त्यात अनेक विद्यार्थी, अनेक श्रोते होते. किशोरीताईंबद्दल लिहिलेल्या लेखाचं खास कौतुक झालं. मला असं वाटतं, की ताईंबद्दल मी लिहिलेला लेख हा अनेक श्रोत्यांच्या मनाला स्पर्शून गेला याचं कारण हे असावं, की मी ताईंच्या शब्दांमार्फत चितारलेच्या चित्रानं श्रोत्यांच्या मनात असलेल्या ताईंचं चित्र आणखी गडद झालं, सुस्पष्ट झालं. आणि ताईंच्या स्वरांनी श्रोत्यांच्या ज्या हळव्या मनाला स्पर्श केला आहे ते मनाचे कोपरे परत उजळून निघाले.

तशीच दाद तानपुऱ्याबद्दल लिहिलेल्या लेखाला मिळाली. रंगमंचावर वाजणाऱ्या तानपुऱ्याच्या मागे इतक्या तांत्रिक बाबी असतात, याची माहिती अनेक श्रोत्यांना आवडली! माझे इतर गुरुजनांचे अनुभव, इतर अनेक दिग्गज कलाकारांबरोबरचा सहवास, त्याच्या हृद्य आठवणी देखील आवडल्या. अगदी सुरुवातीच्या लेखात मला जिच्याकडून प्रेरणा मिळाली त्या साधना घाणेकर, आजच्या साधना सरगम यांचा उल्लेख असलेल्या लेखानंतर खुद्द साधनाचाच मला फोन आला.

एका कलाविष्कारामागे असलेला कलाकाराचा विचार, त्याच्या भावना, याबद्दल लिहिलेले लेख वाचून अनेक गायक कलाकार तसंच अनेक नाटयकलावंतांचे देखील मला फोन आले. त्यांच्या कलाविष्कारामागेदेखील असाच काहीसा विचार असतो. त्यामुळे प्रस्तुतीकरणाआधीची नाटयकलावंताची मनोवस्था आणि गायक कलाकाराची मनोवस्था यांच्यात असलेलं साम्य या नाटयकलावंतांना जाणवलं आणि त्यातल्या भावना अचूकपणे मांडल्याचं त्यांना कौतुकही वाटलं. माझा चित्रपट संगीताचा प्रवास, श्रीधर फडकेंच्या गाण्यांचा प्रवास हा देखील लोकांना आवडला. अनेक वाचकांनी मी मांडलेल्या विषयांबद्दल त्यांना असलेली अतिरिक्त माहिती अनुभवदेखील मला ई-मेल द्वारा कळवले. अनेक मोठया गवयांनी केलेल्या रियाजाबद्दल, विविध घराण्यांच्या गुरूंच्या गायकीबद्दल, खडतर प्रवासाबद्दल, अनेक श्रोत्यांनी वेळोवेळी माझ्याशी संवाद साधला.

एक गायिका म्हणून असलेल्या माझ्या प्रवासात खरंतर माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल लिहिण्याचं काही कारण नव्हतं. प्रत्येक मुलाचे आई-वडील आपल्या परीनं कष्ट करून जाणीवपूर्वक आपल्या मुलाचं संगोपन करतात. परंतु माझे आईवडील जितके माझे तितकेच राजूचे.. आणि राजूचे पालक म्हणून त्यांनी त्याच्यावर केलेलं प्रेम, त्याचं केलेलं संगोपन हे मला लोकांसमोर यावं, असं वाटलं. माझे आईवडील नव्हे, तर ‘स्पेशल नीड्स’च्या मुलाचे समर्थ पालक म्हणून. या लेखाला उदंड प्रतिसाद मिळाला! जगभरातील अनेक लोकांनी माझ्याशी संवाद साधला. अशा अनेक मुलांच्या पालकांनीदेखील! प्रत्येकाच्या ई-मेल मध्ये एक ओळ सारखी होती, ‘हा लेख वाचून माझ्या डोळयांत पाणी आलं!’ माझ्या मनालाही हळवा कोपरा आहे आणि श्रोत्यांच्या मनालाही हळवा कोपरा आहे. माझ्या हळव्या कोपऱ्यातले भाव मी शब्दांमार्फत तुमच्या हळव्या मनात पोहोचवले की डोळयांत पाणी आपसूकपणे यायला लागेल!

भैरवीची फर्माईश आल्यानंतर गायकाच्या मनात आपण समर्थपणे तीन तासाची मैफल रंगवल्याचा आनंद, समाधान असतं, पण एक अतृप्तीदेखील असते. अजून मी काय गाऊ शकले असते याचाही विचार मेंदूचा एक कोपरा करत असतो. आणखीही मला खूप काही सांगायचंय, खूप काही गायचंय, असं वाटत राहतं. हे गायचं राहून गेलं असंही वाटतं.. तसंच मला हा शेवटचा लेख लिहितानाही वाटतंय! पहिला लेख लिहिण्याआधी मला वाटत होतं, की वर्षभर लेख लिहिण्याइतकं माझ्याकडे सांगण्यासारखं आहे का? आणि आज या मैफलीच्या भैरवीच्या वेळी वाटतंय की अजून खूप काही सांगायचं राहून गेलंय..

प्रिय श्रोतेहो, आपण माझ्या लेखांचं भरभरून कौतुक केल्याबद्दल आणि दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते.

aratiank@gmail.com

(सदर समाप्त)

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer arati ankalikar bhairavi article about singing journey dvr