आपल्या आयुष्यातून एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे वजा करायचं आणि तिनं मात्र या फार पूर्वी सोडून गेलेल्या आपल्या देवाची आठवण काढत आपल्या शरीर-मनाचा, आपल्या इच्छा-आकांक्षांचा उच्चार न करता आनंदात राहायचं, ही कोणती मानसिकता आहे नेमकी? स्त्रीला माणूस म्हणून न वागवणारी ही वृत्ती आजही कमी झालेली नसताना आपण महिला सक्षमीकरणाच्या किंवा स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी कशाच्या बळावर करायच्या? जर आजच्या काळातील सुशिक्षित स्त्रिया असा विचार करत असतील, तर या काळातल्या जशोदाबेनकडून वेगळा विचार करण्याची अपेक्षा आपण कशी ठेवणार आहोत?
‘उपेक्षित यशोधरेचं काय झालं?’ या शीर्षकाचा लेख याच दिवसांत म्हणजे बुद्धपौर्णिमेच्या निमित्तानं १४ वर्षांपूर्वी मी ‘लोकसत्ता’मध्येच लिहिला होता. आज त्याची पुन्हा एकदा आठवण झाली ती जशोदाबेनच्या बातमीमुळे. आपला देश, आपल्या देशाची संस्कृती आणि संस्कार, आपली महाकाव्ये, अनेक कथाकहाण्या आणि त्यांतून दिलेले संदेश आणि मूल्यशिक्षण याविषयी आपण सतत बोलत असतो आणि त्याचा अभिमानही बाळगत असतो. असा सार्थ अभिमान बाळगण्यासारख्या अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीत आहेतच. मग त्यात आपलं साहित्य असेल, नाटय़शास्त्र असेल, आयुर्वेदाचा आभ्यास असेल, शिल्पकला, चित्रकला, संगीतादी कला असतील किंवा अगदी आपल्या मातीतलं भाषिक वैविध्य असेल, पण या गोष्टींचा सखोल अभ्यास करून आपली खरी संस्कृती जाणून घेत त्यात रमण्यापेक्षा आपण रमतो ते आपला धर्म, त्यानं केलेले संस्कार, वेगवेगळे विधी, कर्मकांडं, रूढी परंपरा, त्यातून झालेलं मूल्यशिक्षण आणि त्याबरोबरच आपल्या महाकाव्यातील आख्यान उपाख्यानातून समोर आलेले भव्यदिव्य आदर्श, इत्यादीमध्ये.
आपल्या जगण्याच्या काही पायाभूत धारणा त्यातूनच तयार होत जातात. आपल्याकडे तर आदर्शाचं इतकं स्तोम माजवलं जातं, की माणूस हा शेवटी चांगल्या वाईट गुणांनी बनलेला असतो हेच विसरलं जातं. त्याचं मन हे पूर्णपणे निर्मळ किंवा पूर्णपणे कलुषित नसतं हे आपल्याला माहीत असलं तरी आपण आपल्या मनात अनेक आदर्श घेऊन जगत राहातो. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श पत्नी, आणि पतिव्रता यांची आपल्या साहित्यात आलेली उदाहरणं आपल्या मनात सतत रुजवली जातात. आणि मग पित्यानं आज्ञा केली म्हणून आईचं डोकं उडवणारा परशुराम असो, की १४ र्वष वनवासाला निघालेला राम असो, त्यांच्या आज्ञाधारकपणाच्या गोष्टी ऐकून आपल्याला गदगदून येतं. पण या परशुरामानं आपल्या आईची नेमकी काय चूक होती हे न विचारता आंधळेपणानं तिचं डोकं उडवलेलं होतं हे आपण सोयीस्कररीत्या विसरतो, किंवा अगदी मर्यादापुरुषोत्तम रामानंही सीतेला रावणाबरोबरच्या युद्धानंतर अयोध्येला परतण्यापूर्वी लंकेत अग्निपरीक्षा द्यायला लावली होती हेही सहज मनावेगळं करतो. पुढं तर कोणी परीट बोलला म्हणून गर्भार असलेल्या सीतेला वनात सोडून येण्याचं काम त्यानं लक्ष्मणावर सोपवलेलं असल्याचंही आपण वाचलेलं असतं. हे सारेच पुरुष गुणसंपन्न असल्यानं आपले आदर्श बनतात हे खरं असलं, तरी त्यांच्या अशा या निर्णयांमुळे आणि वागण्यामुळे त्यांच्या आदर्श असण्याविषयी शंका निर्माण होते. एखाद्या स्त्रीप्रति असलेल्या आपल्या कर्तव्यांचा विचार किंवा तिला माणूस म्हणून वागणूक देण्याचं भान आपल्या या तथाकथित आदर्शपणात आपण गृहीत धरत नाही का? या आपल्या महाकाव्यातील आख्यान व उपाख्यानातून येणाऱ्या कथांतील नायकांच्या किंवा उपनायकांच्या एकपत्नीव्रताचा, बंधुप्रेमाचा किंवा आज्ञाधारकपणाचा आदर्श आपल्यापुढे लहानपणापासून ठेवला जात असला तरी प्रत्यक्ष जीवनात हे आदर्श पाळतोच असं नाही. पण तरीही आपल्यासाठी ते महत्त्वाचे वाटत असल्यानं त्यांची उदाहरणं आपण सतत देत राहातो. पण ही उदाहरणं देताना राम असो की लक्ष्मण यांनी आपल्या पत्नीच्या मनाचा विचार खरंच किती केला होता, हा प्रश्न आपल्याला क्वचितच पडतो. ज्यांना तो पडतो ते लोक तेवढेच संवेदनशील असले, तर मग ते या ऊर्मिलेचं काय झालं असावं याचा शोध घ्यायला लागतात. रेणुकेच्या मनाचा विचार करायला लागतात. शेवटी तरी सीतेनं रामाला नाकारलं आणि त्याच्याकडे पुन्हा जाण्यापेक्षा भुई जवळ केली या विचारानं सुखावतात. सीतेनं राखलेल्या या आत्मसन्मानाला मनातल्या मनात सलाम करतात. आपल्या अनेक लेखकांना आजही ऊर्मिलेविषयी कुतूहल आहे. त्यामुळे काहींनी कथा-कादंबऱ्यांतून तिच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. अगदी आपल्याकडच्या सामान्य माणसानं आणि विशेषत: स्त्रियांनी लिहिलेल्या अनेक लोकगीतांतून आणि ओव्यांतून रामाचं आणि लक्ष्मणाचं भरभरून कौतुक केलं गेलं असलं, तरी सीतेविषयी वाटणारी अनुकंपाही व्यक्त केली आहे. उदा. ‘राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, हिरकणी सीतामाई राम हलक्या कानाचा’ असं म्हणत पूर्णपुरुष समजल्या जाणाऱ्या रामाच्या या स्वच्छ चारित्र्यात असलेली अत्यंत महत्त्वाची फट अधोरेखित केली.
रामामागे वनवासात जाऊन आपलं बंधुप्रेम व्यक्त करणाऱ्या आणि सीतेला वनात सोडून येताना उदास झालेल्या लक्ष्मणानं मात्र आपण वनवासात गेल्यावर १४ र्वष आपल्या पत्नीनं, ऊर्मिलेनं काय केलं असेल याचा विचारही केला नाही किंवा रामायणाच्या रचनाकारांनाही १४ र्वष नवऱ्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या ऊर्मिलेच्या मन:स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी काही पानं खर्च करावीशी वाटली नाहीत. हे सगळं पाहिल्यावर त्या काळातील आत्मकेंद्रित पुरुषसत्ताक व्यवस्थेची मानसिकता लक्षात येते.
राम-लक्ष्मण ही तर महाकाव्यातील पात्रं आहेत, पण आपल्या समाजात पुढील काळात जी हाडामांसाची जितीजागती माणसं होती त्यांनी काय केलं हेही पाहायला हवं. स्वत: गौतम बुद्धांनी जगातील दु:ख आणि वेदना पाहून घर सोडण्याचा निर्णय घेतला. या दु:खावर आणि वेदनेवर विजय मिळविण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेण्यासाठी निघालेल्या सिद्धार्थानं तर मानवजातीला करुणेचा मंत्र दिला. एक नवं तत्त्वज्ञान, नवा धर्म दिला. पण हा शोध घेण्यासाठी बाहेर पडताना त्यालाही यशोधरेचा विचार घ्यावासा वाटला नाही. एवढे दिवस मनात दाटून आलेल्या प्रश्नांविषयी, त्यातून निर्माण झालेल्या अस्वस्थतेविषयी सिद्धार्थ तिच्याशी बोलला असेल का? मी तुला सोडून जाणार आहे याची कल्पना दिली असेल का? अर्थात तशी कल्पना दिली असती तर अजिंठय़ाच्या गुहेत असलेल्या चित्रात स्वत:ला नवऱ्यावर निश्चिंतपणे सोपवून निजलेली यशोधरा आणि घरातून बाहेर पडताना मागे वळून पाहणारा सिद्धार्थ असं चित्र दिसलं नसतं. यशोधरेला सोडून निघालेल्या सिद्धार्थाच्या मनात आपल्यामागे यशोधरा कसे दिवस काढेल? काय करेल? असा विचार आला असेल का? काय असेल तेव्हा त्याच्या मनात? तिला फसवल्याची भावना, सोडून जातानाचं दु:ख, की तिच्यात अडकलेलं मन सोडवण्याचा प्रयत्न? अर्थात हे सारे आपल्या मनात उभे राहिलेले प्रश्न आहेत, कारण पुढं यशोधरेचं नेमकं काय झालं, याचा कुठंच काही उल्लेख नाही. अगदी बुद्ध चरित्रात नाही की जातककथांमध्ये नाही. अजिंठय़ाच्या चित्रात नंतर ती आपल्याला दिसते ती ज्ञानप्राप्ती झालेला सिद्धार्थ गौतम बुद्ध होऊन तिच्या दाराशी भिक्षा मागायला येतो तेव्हा. अर्थात हे चित्रही बुद्धाच्या संदर्भातच आहे. या भेटीत बुद्धाच्या भिक्षापात्रात काहीही न टाकता ती राहुलसाठी त्याच्या पित्याचा वारसा मागताना दिसते. तेव्हा वाटतं, समजा त्या भिक्षापात्रात काही टाकावंसं वाटलं असतं तिला तर खरंच काय टाकलं असतं तिनं त्या झोळीत? काय होतं तिच्याकडे त्याला देण्यासाठी? सिद्धार्थनं तिला दिलेली चिरंतन वेदना, की त्याच्याशिवाय गेलेलं भकास आयुष्य?
एकूणच आपला सारा इतिहास आणि आजचा वर्तमान पाहिला तर लक्षात येतं की, आपल्याकडे बाईला कायम गृहीतच धरलं गेलं. आजपर्यंत अनेक कर्तृत्ववान पुरुषांची चरित्रं आपल्याकडे लिहिली गेली, पण या साऱ्या महापुरुषांच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली स्त्री मात्र क्वचितच कुठं आली असेल. पुन्हा एकदा खेदानं म्हणावं लागेल, की यामागे आहे ती आपली पुरुषप्रधान व्यवस्था आणि या व्यवस्थेची मानसिकता. त्या मानसिकतेमुळे बाई जमेल त्या परिस्थितीत त्याच्याबरोबर राहिली. त्याला साथ दिली आणि हिमालयाची सावली होऊन त्याची सोबत करत राहिली. कधी त्यानं आपल्याबरोबर ये म्हटलं तर फरफटत जात राहिली. आणि तो सोडून निघून गेला तर त्याच्या येण्याची वाट पाहात राहिली. अगदी मनूच्या काळाआधीपासूनच हे गृहीत धरलेलं असल्यामुळेच स्त्रियांची कर्तव्यं सांगताना मनुस्मृतीतील नवव्या अध्यायात वेगवेगळ्या कारणांनी नवरा बाहेर गेला असेल, तर बाईनं कोणत्या परिस्थितीत किती र्वष वाट पाहावी हेही तिला सांगितलं आहे. जर नवरा काही कामानिमित्त प्रवासास गेला तर त्यानं पत्नीच्या पोटापाण्याची व्यवस्था योग्य रीतीनं ठेवावी (ही सूचना नवऱ्यासाठी) कारण साध्वी स्त्रीसुद्धा उपाशी राहण्याचा प्रसंग आला तर दूषित होण्याचा संभव असतो. (म्हणजे ती माणूस आहे, आपली आहे म्हणून नाही, तर आपण नसताना परपुरुषाकडे तिनं आकर्षित होऊन कलंकित होऊ नये म्हणून तिची व्यवस्था करायची.) असं स्मृतीकार म्हणतात. तो जर पोटापाण्याची व्यवस्था करून गेला असेल तर तो परत येईपर्यंत प्रोषित भर्तृकेचं व्रत (दागदागिने न घालणं, फुलं न माळणं, शरीर संस्कार न करणं, परगृही गमन न करणं वगैरे) धारण करावं आणि व्यवस्था केली नसेल तर रहाटानं सूत काढून, शिवण-टिपण, विणकाम करत अनिंद्यकर्माचरणाने स्वत:चा उदरनिर्वाह करावा. (त्यामुळेच आपल्या चित्रपटांतही पती सोडून गेल्यावर बायकांच्या हाती शिवणयंत्र देऊन कपडे शिवत आयुष्य काढण्याचे प्रसंग दाखवले जातात.) आणि समजा तो धर्मकार्याकरता गेला असेल तर आठ र्वष, विद्या संपादनासाठी किंवा कीर्तिदायक काही कृत्य करण्यासाठी गेला असेल तर सहा र्वष आणि दुसरी भार्या करण्यासाठी गेला असेल तर तीन र्वष वाट पाहून तो न आल्यास पत्नीनं तो स्वत: जिथं असेल तिथं जावं असं म्हटलं आहे. म्हणजे वाट पाहून तो आला नाही तर त्याला विसरून आपला मार्ग शोधायचा नाही तर त्याच्या मागे त्याला शोधायला बाहेर पडायचं. म्हणजेच एक प्रकारे फरफटत जायचं असं सांगितलं आहे.
बायकांना बुद्धी नसते, विद्याभ्यास तर त्यांना नाकारलेलाच होता, मग कीर्तिदायक काम तर त्या करूच शकणार नाहीत हे गृहीत धरल्यामुळे त्या अशा बाहेर पडून नवऱ्यानं त्यांची वाट पाहात आयुष्य काढण्याचे प्रसंग आपल्या इतिहासात कधीच आले नाहीत. मात्र विद्याभ्यास, धर्मकार्य, व्यवसाय अशा गोष्टींसाठी आपल्याकडचे अनेक पुरुष असे जात राहिले आणि बायका त्यांची वाट पाहात जन्म काढत राहिल्या. किती उदाहरणं द्यायची, हा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी बायकोचा विचार न करता असाच संन्यास घेतला आणि ते निघून गेले. मग एक दिवस अचानक परत येऊन पुन्हा संसार मांडला आणि त्यानंतर झालेल्या मुलांना संन्याशाची पोरं अशा अवहेलनेला तोंड द्यावं लागलं. रामदास स्वामींनी तर अंतरपाट खाली येण्याआधीच मंडपातून पळ काढला म्हणतात. कारण लग्नातील शुभमंगल सावधान हे शब्द त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजवत होते. ते ऐकून ते मंडपातून निघून गेले. पण जाताना आपण असे गेलो तर आपल्यासाठी हातात वरमाला घेऊन उभ्या असलेल्या त्या मुलीचं काय होईल, याचा साधा विचारही त्यांनी केला असेल का? स्त्रीची जबाबदारी घ्यायचीच नाही ही मानसिकता असलेल्या व्यवस्थेत आपल्याला संसारात रस नाही हे बोहल्यावर चढल्यावर त्यांच्या लक्षात आलं असेल, तर कमीतकमी तिच्यासाठी दुसरा वर पाहून तिचं लग्न लावून मग त्यांनी जायला हवं होतं, अशी अपेक्षा करण्यातही काही अर्थ नाही. कारण ज्या व्यवस्थेत स्त्रीला शरीर आहे, मन आहे याचा विचार केला गेला नाही, तिच्याबाबतीत असा विचार कोण करणार?
आपल्याकडे तर पूर्वीपासून तरुण वयात नवरा सोडून गेलेल्या किंवा वैधव्य आलेल्या बाईनं परपुरुषाचा विचारही मनात आणायचा नाही, असं सांगितलं जात होतं, मग लग्नाची गोष्ट तर पुढंच राहिली. फुले-कर्वे प्रभृतींमुळे कमीतकमी विधवा विवाहाचा आणि परित्यक्त्यांचा विचार तरी केला गेला. पण अशा अनेक परित्यक्तांचे प्रश्न आजही तसेच आहेत. अनेक कुटुंबांत अशा काही कहाण्या दबलेल्या हुंदक्याच्या रूपात ऐकू येतात. न बोलता, कसलीही तक्रार न करता मुकाट मिळालेलं आयुष्य जगत राहायचं, हे त्यांना आपल्या या तथाकथित संस्कृतीनं शिकवलं असल्यामुळे नवऱ्यानं त्यांच्याकडे पाहिलं नाही तरी चालेलं, लग्न केल्यानंतरही त्यांचा स्वीकार केला नाही तरी चालेल, त्यात विशेष काय बिघडतं अशी मानसिकता त्या काळातील पुरुषांची होती आणि हे वास्तव त्याकाळच्या बायकांनीही स्वीकारलेलं होतं.
अर्थात या साऱ्या गोष्टी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आहेत. काही तर इसवीसनपूर्व काळातल्याही आहेत. पण ज्या काळात स्त्री हक्क, स्त्रीचं आत्मभान, तिचं स्वातंत्र्य या गोष्टींविषयी आपण बोलत असतो, त्या काळातही अशा गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्याही देशाच्या महत्त्वाच्या पदावर विराजमान होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या माणसाच्या बाबतीत घडतात तेव्हा मन सुन्न होऊन जातं.
‘जशोदाबेन’विषयी चर्चा सुरू झाली तेव्हा अचानक नरेंद्र मोदींच्या बाजूनं असणारे लोक बचावात्मक पवित्रा घेऊ लागले. पण या बाईची मानसिक अवस्था काय असेल, हे समजून घेण्याचा प्रयत्न मात्र झाला नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होत असतेच पण बाईच्या बाबतीत तर तो नियमच बनून जातो. जशोदाबेन आणि मोदी यांचं लग्न झालं त्या काळात नेमकं काय झालं याविषयी नेमकं कळायला मार्ग आपल्याकडे नाही. कारण त्यांच्या दृष्टीनं त्याविषयी बोलण्यासारखं काही नाहीच. ज्या बाईला एवढी र्वष खिजगणतीत धरलं नाही तिच्याविषयी भरभरून बोलायला ते काही पहिलं प्रेम वगैरे नाही. त्यामुळे त्यांच्या संबंधांविषयी जे काही कळलं आहे ते जशोदाबेनच्या प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीतूनच आणि ही मुलाखत म्हणजे परत आपल्या संस्कृतीतल्या आदर्श पत्नीच्या परंपरेतील स्त्रीनं दिलेली मुलाखत आहे. कुठंही तक्रारीचा सूर नाही, कसलाही दावा नाही, उलट त्यांना या मोठय़ा पदावर पाहायला मला आवडेल, असा पायाचं तीर्थ घेऊन रोज प्राशन करत जगणाऱ्या बायकांसारखा आविर्भाव. त्यामुळे मग तिची काहीच तक्रार नाही, तिला त्यांनी शिक्षण घे म्हणून सांगितलं आहे, ती शिकली आणि स्वत:च्या पायावर उभी राहिली, त्यासाठी त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं, आणखी काय हवंय तुम्हाला? असा युक्तिवाद अगदी सुशिक्षित म्हणवून घेणारे लोकही करताहेत आणि त्यात शाळा-कॉलेजातील काही शिक्षिकाही मागे नाहीत. तिच्या जागी आपली आई किंवा बहीण असती, किंवा आपण स्वत: असतो तर नेमकं कसं आयुष्य काढलं असतं, काय भावना असत्या आपल्या असा विचार करावंसं अगदी स्त्रियांनाही वाटलं नाही. एखाद्या व्यक्तीवर आपण आंधळेपणानं प्रेम करायला लागलो की त्याचा बचाव प्रत्येक गोष्टीत करायला लागतो. पण हाही माणूस आहे आणि त्याच्या स्वत:च्या काही धारणा आहेत, ज्या आपल्यासारख्याच एका स्त्रीला अपमानित करताहेत याचा विचार केला जात नाही. ज्या संस्कृतीवर ही मंडळी भरभरून प्रेम करतात ती संस्कृतीही बायकोचा सांभाळ करणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे हे सांगते. असं असतानाही केवळ आपल्याला कामासाठी देशभर फिरावं लागतं, तू कशासाठी परत आलीस, तू शिक्षण घे, असं म्हणत अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यातून एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे वजा करायचं आणि तिनं मात्र या फार पूर्वी सोडून गेलेल्या आपल्या देवाची आठवण काढत आपल्या शरीर-मनाचा, आपल्या इच्छा-आकांक्षांचा उच्चार न करता आनंदात राहायचं ही कोणती मानसिकता आहे नेमकी? स्त्रीला माणूस म्हणून न वागवणारी ही वृत्ती आजही कमी झालेली नसताना आपण महिला सक्षमीकरणाच्या किंवा स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी कशाच्या बळावर करायच्या? जर आजच्या काळातील सुशिक्षित बायका असा विचार करत असतील, तर या काळातल्या जशोदाबेनकडून वेगळा विचार करण्याची अपेक्षा आपण कशी ठेवणार आहोत?
एवढं सगळं होऊनही तिला आपल्या वाटेवरून अलगद बाजूला करून पुढं गेलेल्या नवऱ्याला देवत्व देणारी ही बाई त्याचं व्यवस्थित चाललं आहे ना, तो मोठा होतो आहे ना याचाच विचार करते आहे. बाईनं स्वत:साठी जगायचं नसतं, त्याच्या सुखातच सुख मानायचं असतं, ही शिकवण मिळालेल्या स्त्रिया यापेक्षा वेगळा विचार काय करणार? अनेकदा गुलामाला आपलं शोषण होतं आहे याचीच कल्पना नसते. त्याला ती जाणीव करून दिली तरी ते मानायला तो तयार नसतो, कारण या व्यवस्थेनं त्याला ‘कन्डिशन्ड’ केलेलं असतं.
तो आपल्या शोषणातही आनंद मानत राहातो. जशोदाबाईंचं तसंच काहीसं झालं नाही ना? की त्यांच्या या भूमिकेमागेही या व्यवस्थेचं राजकारण आहे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा