अनेकांना निद्राचाचणी का करावी, थेट उपचार का घेऊ नये, असा प्रश्न पडतो. याची कारणमीमांसा म्हणजे, निद्रेचे तब्बल ८४ विकार आहेत. घोरणे आणि स्लीप अ‍ॅप्निया हा एक झाला, पण दुसरे विकारही असतील तर त्यांचाही इलाज होणे तितकेच महत्त्वाचे ठरते.
मागील लेखांमध्ये घोरण्यावरती घरगुती उपायांची आपण चर्चा केली. हे उपाय करूनसुद्धा जर घोरणे कायम असेल अथवा घोरण्याव्यतिरिक्त इतर काही लक्षणे उदा. सकाळी थकवा जाणवणे, पुरेशी झोप झाली नाही असे वाटणे, डोके जड होणे, मधुमेहामध्ये सकाळच्या ‘शुगर्स’ वाढणे, रक्तदाब नियंत्रणासाठी दोन अथवा अधिक गोळ्या लागणे इत्यादी असतील तर घोरण्याव्यतिरिक्त इतर निद्राविकार आहेत हे पक्के.
अशा वेळेला निद्राचाचणी करणे महत्त्वाचे. वेगवेगळ्या प्रकारच्या निद्राचाचण्या उपलब्ध आहेत. यात सर्वोत्तम निद्राचाचणी म्हणजे स्लीप लॅबमध्ये केलेली ‘पॉलिसोम्नोग्राम’ ही चाचणी होय. यात तुम्ही झोपलेले असताना मेंदूपासून ते शरीराच्या अनेक अवयवांच्या कारभाराचे अवलोकन केले जाते. डोक्यापासून पायांपर्यंत बेल्टस् (पट्टा) आणि इलेक्ट्रोड्स लावले जातात. पस्तीसपेक्षा जास्त क्रियांचे निरीक्षण केल्यामुळे तुम्ही कुठल्या सेकंदाला झोपी गेलात, किती वेळेला उठलात, घोरण्यामुळे श्वसनमार्ग कसा होता, कमी झालेल्या ऑक्सिजनचा हृदयावर काय परिणाम होतो, कुठल्या प्रकारची झोप मिळाली, अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे मिळतात. बऱ्याच वेळेला आपण झोपेत कूस बदलतो, विविध हालचाली करतो आणि त्यामुळे इलेक्ट्रोड्स विस्थापित होतात आणि सिग्नल्समध्ये बिघाड होऊ शकतो. या महत्त्वाच्या कारणांकरिता रात्रभर एका तंत्रज्ञाचे सतत निरीक्षण असणे अनिवार्य ठरते!
सर्व पाश्चिमात्य देशात याच कारणाने ‘पॉलिसोम्नोग्राम’ हा गोल्ड स्टॅण्डर्ड मानला गेला आहे. भारतात आल्यानंतर अनेक ठिकाणी अगदी काही नामवंत हॉस्पिटलमध्येदेखील असे तंत्रज्ञांसमवेत निरीक्षण होताना आढळले नाही. बऱ्याच ठिकाणी खाक्या असा होता की एकदा सर्व वायर्स लावल्या की कर्मचारी थेट दुसऱ्या दिवशी सकाळी वायर्स काढायला हजर! यामुळे महत्त्वाचा डाटा गहाळ होतो आणि चुकीचे डायग्नोसिस दिले जाऊ शकते!
 निद्राविज्ञान, पॉलिसोम्नोग्राम ही तंत्रज्ञानाधिष्ठित शास्त्र आहेत. याकरिता रात्री पूर्ण वेळ जागू शकतील, अशा शिक्षित तंत्रज्ञांची नितांत गरज असते. आपल्या देशात अनेक होतकरू तरुण आहेत, ज्यांना रात्रीचे जागणे सहज जमते. त्यांना प्रशिक्षण देऊन अनेक तंत्रज्ञ निर्माण करायचा प्रकल्प आमच्या संस्थेने सुरुवातीपासून यशस्वीपणाने राबवला. नाशिकच्या उत्तरेस असलेल्या सुरगणा तसेच जव्हार येथील काही तरतरीत आदिवासी तरुणांचा सहभाग मिळाला. इंग्रजी फाडफाड न बोलता आल्यामुळे अनेक तरुणांची नोकरी मिळवताना पंचाईत होते. इंग्रजीला काही सोने चिकटलेले नाही. एतद्देशीय भागांमध्येसुद्धा तंत्रशिक्षण देता येते. दोन वर्षांपूर्वी तिरुअनंतपुरम येथे निद्रारोगतज्ज्ञाचे राष्ट्रीय संमेलन झाले. त्यात आमच्या तंत्रज्ञाने आपल्या कौशल्याचे बहारदार प्रदर्शन (मराठीयुक्त िहदीमध्ये आणि तोडक्यामोडक्या इंग्रजीमध्ये) केले. अनेक मोठय़ा वैद्यकीय संस्थांमध्ये त्यानंतर त्याला निमंत्रित केले गेले!
सर्व विवेचनाचे उद्दिष्ट एकच आहे. निद्राविज्ञान हे आपल्या देशाला नवीन आहे. त्याचा प्रसार होण्याअगोदरच काही अनिष्ट प्रथा रुजत आहेत. तंत्रज्ञाच्या देखरेखीविना ही महत्त्वाची चाचणी करणेही चुकीची पद्धत आहे. पुरेसे तंत्रज्ञ नसणे हे कारण (एक्सक्यूज) ठरू शकत नाही. तसे असेल तर रुग्णालयांनी पुढाकार घेऊन त्यांच्यापुरते का होईना, रात्रीचे तंत्रज्ञ प्रशिक्षित केले पाहिजेत. वाचकहो, तुम्हीदेखील जर चाचणी करणार असाल तर जिथे चाचणी होणार आहे तिथे रात्रीचा पूर्ण वेळ तंत्रज्ञ आहे का? याची शहानिशा करा.
अनेक लोकांना हा प्रश्न पडेल की एवढय़ा वायर्स लावल्यानंतर मला झोप कशी येईल? उत्तर अगदी सोपे आहे. एक तर हे सगळे इलेक्ट्रोड्स त्वचेला चिकटवले जातात, कुठेही सुई/वेदना यांचा संबंध नाही. आपल्या सगळ्यांचा स्पर्शाबद्दलचा अनुभव असा आहे की, थोडय़ा वेळानंतर कायम स्पर्शाची भावना नष्ट होते. रात्रभर आपल्या वस्त्राचा स्पर्श होत असतोच की! दुसरे असे की टाळूवर इलेक्ट्रोड्स लावण्याअगोदर गोलाकार घर्षणाने त्वचा स्वच्छ केली जाते. याने मसाजसारखी भावना होऊन अनेक लोकांना पेंग येते. शिवाय वायरी काही फूट लांब असल्याने तुम्ही कुठल्याही कुशीवर वळू शकता. या वायर्स झोपेत सुटल्या तर? ही जबाबदारी तुमची नसून रात्रभर नजर ठेवणाऱ्या तंत्रज्ञाची असते. तुमचे काम बिनधास्त झोपणे एवढेच असते. या सगळ्या वायर्स एकत्रितपणे एका स्विचमध्ये जातात. त्यामुळे रात्री बाथरूमला जाताना एक खटका दाबून मोकळे होऊ शकता. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची घरात होणारी झोप आणि लॅबमध्ये होणारी झोप शक्यतोवर सारखेपण आणायचा प्रयास असतो. काही लोकांना आपले घर सोडून दुसरीकडे कुठेही झोप येत नाही. अशा वेळी केवळ चाचणीच्या रात्रीकरिता ‘झोल्पी डेम’सारखी गोळी दिली जाते. निद्रातज्ज्ञास या गोळीचा मेंदूच्या लहरींवर काय परिणाम होतो, हे माहीत असल्याने त्या अनुषंगानेच तो निष्कर्ष काढतो.
ज्या व्यक्तींना वयोपरत्वे अथवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे लॅबमध्ये येणे शक्य नसेल त्यांच्याकरिता मर्यादित स्वरूपाची चाचणी घरी करणे हा पर्याय उपलब्ध आहे. भारतामध्ये स्लीपलॅब कमी असल्याने हा पर्याय सगळ्यात जास्त वापरला जातो. दुर्दैवाने या चाचणीवर कुठलेही रेग्युलेशन नसल्याने पुरेसे प्रशिक्षण न घेता, वैद्यकक्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्ती या चाचण्या करतात. या चाचणीचा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे रात्रभर तंत्रज्ञाचे सतत अवलोकन असणे. त्याला संपूर्णपणे फाटा दिला जातो. अशा प्रकारे चुकांसकट मिळालेला डेटा सॉफ्टवेअरच्या साहाय्याने ऑटोमेटिकली तपासला जातो. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडते. यात कहर म्हणजे कधी कधी एकच रिपोर्ट नावे बदलून डॉक्टरच्या डेस्कवर ठेवला जातो. माझ्या एका दक्ष डॉक्टर मित्राने हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यावर अतिशय मख्खपणे त्या डिस्ट्रिब्युटरने मग तुम्हीच त्या टेस्ट का करत नाही, असा जबाब दिला. सामान्य जनतेमध्ये आणि डॉक्टर्समध्ये जर या विषयाची माहिती असेल तर असे अपप्रकार घडणार नाहीत यावर माझा ठाम विश्वास आहे.
अनेक लोकांना मनापासून वाटते की कशाला पाहिजे ही चाचणी? थेट उपचार का घेऊ नये? याची कारणमीमांसा अशी आहे. सर्वप्रथम म्हणजे निद्रेचे ८४ विकार आहेत. घोरणे आणि स्लीप अ‍ॅप्निया हा एक झाला, पण दुसरे विकारही असतील तर त्यांचाही इलाज होणे तितकेच महत्त्वाचे ठरते. गाडीची दोन टायर्स पंक्चर्स झाली असताना आपण फक्त एकच टायर दुरुस्त करीत नाही.
 दुसरे असे की उपायांमुळे शंभर टक्के यश आले की नाही हे ठरवायला एक आद्यरेषा (बेसलाइन) महत्त्वाची ठरते. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय लोकांमध्ये विशिष्ट प्रकारे निद्राविकार जास्त प्रमाणात आढळतात. फक्त रेमझोपेत होणारा स्लीप अ‍ॅप्निया आणि श्वासनलिकेत अवरोध वाढून होणारा ‘अपर एअरवेज रेसिस्टान्स सिंड्रोम’ हे केवळ चाचण्यांमधूनच लक्षात येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे कुठली उपचारपद्धती करायची, हे या चाचणीनंतरच स्पष्ट होते. एक उदाहरण देतो. वीस वर्षांपूर्वी रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून पडजीभ आणि टाळूभोवतीच्या अतिरिक्त भागाला संकुचित करण्याची सोम्नोप्लास्टी नावाची पद्धती शोधली गेली. या पद्धतीत अनेक फायदे होते. चाळीस ते पन्नास मिनिटांची, फार दु:खद नसलेली ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे. त्याकरिता ऑपरेशन थिएटरची गरज नव्हती. या सोम्नोप्लास्टीमुळे घोरण्याचा आवाज अगदी कमी अथवा बंद होतो. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातदेखील याची क्रेझ येऊन घोरणाऱ्यांची झुंबड उडाली. कुठलीही चाचणी न घेता, सरसकट घोरणाऱ्या व्यक्तींनी ही शस्त्रक्रिया करून घेतली. माझ्या एका रुग्णाने तर ही शस्त्रक्रिया सिअ‍ॅटल येथील एका मॉलमध्ये करून घेतल्याचे सांगितले. दुर्दैवानेही शस्त्रक्रिया घोरण्याचा आवाज बंद करते पण तुम्हाला मॉडरेट ते तीव्र असा स्लीप अ‍ॅप्निया असेल तर त्यावर काहीही परिणाम करीत नाही! हे म्हणजे बंगल्यातला राखणदार कुत्रा का भुंकतो आहे, हे न बघता त्याचा आवाज माऊथगार्ड लावून बंद करण्यासारखे आहे!
थोडक्यात, आपल्याला नक्की काय समस्या आहे, हे पाहूनच पुढचे पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे. पुढील लेखात नानाविध वैद्यकीय उपायांसंदर्भात विश्लेषण.    

Story img Loader