रोजच्या व्यवहारातल्या या गोष्टी. ‘कचरा रस्त्यात टाकू नये’ ही गोष्ट आपण अमलात आणत असू कदाचित, पण समोर कुणी कचरा करत असेल तर आपण त्यांना रोखतो का? थांबवतो का? ते सांगण्यापासून काय अडवतं आपल्याला?
पुण्याहून मुंबईकडे आणि मुंबईतल्या मुंबईत रेल्वेने प्रवास करण्याची वेळ माझ्यावर अनेकदा येते. सर्वात स्वस्त आणि वेगवान प्रवास देणारी आपली राष्ट्रीय संपत्ती भारतीय रेल्वे. त्याच प्रवासातल्या या छोटय़ा गोष्टी स्वच्छतेसंदर्भातल्या, मनाला खटकणाऱ्या.
पुणे-मुंबई गाडी, स्त्रियांचा अनारक्षित डबा. नेहमीचीच गर्दी. सामान ठेवण्याच्या बर्थवरही अनेक जणी चढून बसलेल्या. दारातही बसलेला महिला वर्ग. या सर्व गर्दीतून वाट काढत येणारे विक्रेते, चहावाले, खेळणीवाले, वडा-समोसावाले, चिक्कीवाले एक की दोन सांगावे. तशातच इडली-वडावाला आला. कागदी डिशमध्ये भराभर दोन इडल्या आणि दोन मेदूवडे घालत त्यात बचकभर पातळ चटणी घालत त्याने बऱ्याच जणींना ‘क्षुधा तृप्त’ केलं. वरच्या बर्थवर बसलेली एक तरुणीही त्याचा आस्वाद घेत होती. बाकी सर्व जणींनी खाऊन झाल्यावर आरामात खिडकीतून डिश बाहेर फेकून दिल्या. वरचीनेही डिश संपवली आणि दारात बसलेल्या दोघींना ती बाहेर फेकायला सांगू लागली. झालं. भांडणाला तोंड फुटलं, ‘‘आम्ही काय नोकर आहोत तुझ्या? खाली उतरून टाकून दे.’’ यावर त्या मुलीने चक्क बसल्या जागेवरून ती बशी दाराबाहेर फेकली. अर्थातच नेम चुकून बशी दाराच्या पायऱ्यांवर पडली. आता तर भांडणाने चांगलाच जोर धरला.
‘‘बघ, सगळी पायरी खराब झाली चटणी सांडून.’’ दारातल्या ओरडल्या.
‘‘तुला टाकून द्यायला काय झालं होतं? मग मी दिली फेकून..’’
‘‘मी काय नोकर आहे तुझी उष्टी काढायला?’’
भांडण थांबायचं चिन्ह दिसेना. मी वरती बसलेल्या मुलीला म्हटलं, ‘‘अगं, तिने नाही म्हटलं फेकायला तर दुसऱ्या कोणाला तरी सांगायचं ना जरा नीट शब्दांत. कोणीतरी नक्कीच फेकली असती की, असं बसल्या जागेवरून ती फेकून देणं बरोबर नाही. आता पुढच्या स्टेशनला बायकांना चढता-उतरताना त्रास होईल ना?’’
‘‘ए, गप् बस. गाडी काय तुमच्या मालकीची आहे का? मोठी आली शिकवायला शहाणी!’’
त्यावर मी ठामपणे म्हणाले, ‘‘होय, गाडी खरंच मालकीची आहे माझ्या, पण माझ्या एकटीच्याच नाही. आपल्या सगळ्यांच्याच मालकीची आहे. आपल्याच पैशातून ती तयार होते आणि चालवली जाते, आपल्यासाठी. आपलं स्वत:चं घर असं घाण करतो का आपण? नाही ना. ते कसं चकाचक ठेवतो
की नाही?’’
‘‘बरोबर आहे तुमचं.’’ आजूबाजूच्या महिला वर्गाने उत्स्फूर्त आणि अनपेक्षित प्रतिसाद दिला. वरची मुलगी एकदम गप्प झाली.
‘‘रेल्वे गाडय़ा, बस गाडय़ा, रस्ते सगळं आपल्याच मालकीचं आहे – सरकारी मालकीचं म्हणजे आपल्याच पैशाने सरकारने आपल्यासाठी बनवलेलं. कुठे दंगली झाल्या, अपघात झाले, बॉम्बस्फोट झाले की, आपल्याला सरकारची आठवण येते. सरकारने मदतीला धावून यायला पाहिजे असं वाटतं, पण आपण सरकारी मालमत्तेची कुठे काळजी घेतो, ती कुठे जपतो?’’
‘‘खरं आहे तुमचं म्हणणं. कशी तोडफोड- जाळपोळ करतात लोक आपल्याच सरकारी मालमत्तेची. आणि नवीन गाडी घेण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी पुन्हा आपलाच पैसा वापरावा लागणार की, हे कुणाच्या लक्षात नाही येत.’’ एक जण म्हणाली.
‘‘तुमचं नाव काय? तुम्ही शिक्षिका आहात का? समाजसेवक आहात का? कुठल्या पक्षाच्या आहात?’’ इत्यादी प्रश्न आले. त्यांना उत्तर देताना म्हटलं, ‘‘मी या देशाची एक जबाबदार नागरिक आहे आणि माझं देशावर प्रेम आहे. ते आपण सर्वजणी करू शकतो- नाव-गाव-जात-धर्म हे सर्व अगदी बिनमहत्त्वाचं नाही का?’’
असाच एक पुणे-ठाणे प्रवास. आरक्षण केलं होतं. त्यामुळे स्वास्थ्य होते. आजूबाजूला ७-८ जणांचा मोठा ग्रुप होता. त्यात काही मुलीही होत्या. २५ ते ४० अशा वयोगटाचा तो ग्रुप असावा. आपण कसे खेळ खेळायचो- आता कसं जमत नाही आदी गप्पा चालू होत्या. थोडक्यात ‘रम्य ते बालपण’ असं वाटून आठवणींना उजाळा देणं चाललं होतं. एकमेकांची बरीच थट्टामस्करीही चालली होती. या सर्वाबरोबर खाणंही चालू होते. लोणावळा आलं आणि त्यांचा आणखी एक मित्र त्यांच्या गटात येऊन मिळाला. त्याचं जोरदार स्वागत झालं. या नव्या मित्राने त्याच्या घरी तयार झालेला दिवाळीचा फराळ आणला होता. खाद्यपदार्थाच्या पिशव्या भराभर रिकाम्या होत होत्या. दोन महाशयांनी गुटख्याचाही आस्वाद घेतला. त्या रिकाम्या पिशव्या, कागद, पिना खिडकीबाहेरची वाट धरत होत्या. कर्जतला वडा-पाव खाऊन झाला. मग चहा-कॉफीचे कप आले. माझं उतरायचं स्टेशन जवळ यायला लागलं. न राहवून मी त्यांना विचारलं,
‘‘तुम्ही सर्व कुठल्या कॉन्फरन्सला निघाला आहात का?’’
‘‘आम्ही फार्मा कंपनीवाले आहोत- आमच्या कंपनीचे एक गॅदरिंग आहे मुंबईला. दोन दिवसांचे संमेलन आहे. त्यासाठी जातो आहोत.’’ उत्तर आलं.
‘‘एक गोष्ट सांगू का?’’ मी विचारलं.
‘‘हां, सांगा ना.’’ त्यातला एकजण म्हणाला.
‘‘नाही म्हणजे तुम्ही सर्वजण चांगले सुशिक्षित आहात, म्हणून एक विनंती आहे. आपण कचरा खिडकीबाहेर न फेकता एखाद्या कॅरीबॅगमध्ये का ठेवू नये? आपण शिकली सवरलेली माणसं आपणच जर परिसराची काळजी घेतली नाही तर इतर कोणाकडून काय आणि कशी अपेक्षा करावी? राग मानू नका हं, पण राहवलं नाही. म्हणून.. ’’ मी म्हटलं.
‘‘नाही मॅडम, तुमचं बरोबर आहे. सॉरी. इथून पुढे आम्ही नक्कीच ही गोष्ट पाळू,’’ त्यांनी आश्वासन दिलं आणि हसून मला निरोप दिला.
गेल्याच आठवडय़ातली गोष्ट. मी आणि मैत्रीण आरामाची ठाणे गाडी पकडून दादरला जायला निघालो होतो. भोवताली कॉलेजला जाणाऱ्या मुलींचा मोठा ग्रुप होता. त्यांची बहुधा परीक्षा चालू असावी. खाली माना घालून अभ्यास चालू होता. समोरच बसलेली एक मुलगी मात्र वाचता वाचता पुडीतल्या भुईमुगाच्या शेंगा सोलून शेंगदाणे खात होती. खाता खाता टरफलं खाली टाकत होती. एकीकडे वाचतही होती. पुढच्या स्टेशनला त्यांच्या आणखी काही मैत्रिणी आल्या. दाणे खाणाऱ्या मुलीने त्यांनाही दाणे देऊ केले, पण त्यांनी नकार दिला आणि उत्तरं वाचण्यात दंग झाल्या. मग त्यांची उत्तरांची रिव्हिजन उत्तराचे पॉइंट मोजत मोठय़ांदा सुरू झाली. १).. २).. ३) प्रोटेक्शन ऑफ इन्व्हायर्नमेंट असं सामूहिक पठण झालं.
तेव्हा मात्र मला रहावलं नाही, ‘‘काय म्हणालात, प्रोटेक्शन ऑफ इन्व्हायर्नमेंट होय ना, मग अशी टरफलं खाली टाकणं योग्य नाही. नाही का? यू हॅव टू प्रोटेक्ट द एन्व्हायर्नमेंट.’’ मी म्हटलं. थोडी कुजबूज झाली. दाणे खाणारीचा हात थांबला.
‘‘असं रागावू नका. तुम्ही आमची पुढची पिढी आहात. जनरेशन नेक्स्ट- अवर होप! तुम्हीच असे चांगले विचार फक्त कागदावर ठेवलेत, कृतीत नाही आणलेत तर आम्ही कोणाकडे पाहून म्हणायचं, ‘भारताचं भवितव्य सुरक्षित हातात आहे.’ मी म्हटलं. त्यातल्या काहीजणींचे चेहरे उजळले. इतक्यात त्यांच्या कॉलेजचं स्टेशन आलं. त्या खाली उतरून गेल्या. गाडी सुटली. मी पाहिलं तर त्यांच्यातल्या दोघी प्लॅटफॉर्मवर उभ्या राहून माझ्याकडेच पाहात होत्या. नजरानजर झाली आणि त्यांनी हसून हात हलवत मला निरोप दिला.
छोटी गोष्ट, मोलाची
रोजच्या व्यवहारातल्या या गोष्टी. ‘कचरा रस्त्यात टाकू नये’ ही गोष्ट आपण अमलात आणत असू कदाचित, पण समोर कुणी कचरा करत असेल तर आपण त्यांना रोखतो का? थांबवतो का? ते सांगण्यापासून काय अडवतं आपल्याला?
First published on: 07-06-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small thing but important