स्लीप अॅप्नीयासकट घोरणे यावर असलेला ‘रामबाण’ उपाय म्हणजे ‘सीपॅप.’ हे यंत्र एका छोटय़ा खोक्याप्रमाणे दिसते. हवा आतमध्ये घेऊन एका विशिष्ट दाबाने बाहेर टाकणे हे या यंत्राचे काम. १९८० साली सर्वप्रथम कॉलीन सुलीव्हान या डॉक्टरने या यंत्राचा वापर केला. त्याला ही कल्पना पंक्चर टायरमध्ये हवा भरताना बघितल्यानंतर सुचली, त्याविषयी..
मागील लेखात घोरण्याचा तपशीलवार अभ्यास/चाचण्या यावर ऊहापोह होता. या चाचण्यांतून महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. केवळ घोरणे आहे का स्लीप अॅप्नीयादेखील आहे? घोरण्यामुळे मेंदू किती वेळेला उठतोय? ऑक्सिजन कमी होतोय का? कुठल्या तऱ्हेच्या झोपेत अथवा कुठल्या कुशीवर प्रॉब्लेम जास्त आहे.
सर्वप्रथम म्हणजे स्लीप अॅप्नीयासकट घोरणे यावर असलेला ‘रामबाण’ उपाय जो सर्व देशांमध्ये ‘गोल्ड स्टॅन्डर्ड’ मानला जातो त्यावर विचार करू या. या यंत्राचे नाव आहे, सीपॅप (उढअढ). हे यंत्र एका छोटय़ा खोक्याप्रमाणे दिसते. हवा आतमध्ये घेऊन एका विशिष्ट दाबाने बाहेर टाकणे हे या यंत्राचे काम! घोरण्यामध्ये अथवा स्लीप अॅप्नीयामध्ये आपल्या घशाची नळी कशी आकुंचित होते हे मागील लेखांत सांगितले आहेच. कल्पना करा की एखादी खरी नळी उघडायची असेल तर आपण विशिष्ट दाबाने हवा सोडतो. फक्त इथे खरी नळी नसून मानवी घसा असल्याने दाबाची अचूकता महत्त्वाची ठरते. गंमत म्हणजे १९८० साली सर्वप्रथम कॉलीन सुलीव्हान या डॉक्टरने या यंत्राचा (सीपॅपचा) वापर केला. त्याला ही कल्पना पंक्चर टायरमध्ये हवा भरताना (टायर फॅक्टरीवरुन जाताना) बघितल्यानंतर सुचली!
१९८०च्या अगोदर फक्त एकच उपाय माहीत होता, तो म्हणजे गळ्याला भोक पाडणे (ट्रकीओस्टॉमी)! म्हणजे बऱ्याच वेळेला रोगापेक्षा उपाय जालीम! याच कारणाने वैद्यकीय क्षेत्रातदेखील घोरण्याकडे दुर्लक्ष केले जात असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १९८० मध्ये सुलीव्हान यांनी ऑस्ट्रेलियात याचा यशस्वी वापर करूनसुद्धा अमेरिकी तज्ज्ञांनी हे स्वीकारायला तब्बल चार वष्रे लावली. खुद्द सुलीव्हान यांनीच मला त्यांची शोधयात्रा सांगितली. चांगल्या कल्पना स्वीकारायला भारतातच वेळ लागतो हा माझा गरसमज दूर झाला. पण एकदा अमेरिकेत स्वीकार झाल्यानंतर मात्र सबंध निद्राविज्ञान क्षेत्राला प्रचंड उत्थापन मिळाले. गेल्या ३० वर्षांत तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे यंत्राचा आकार कमी होत गेला आणि वेगवेगळ्या क्षमता वाढत गेल्या. आमच्या अमेरिकेतील प्रयोगशाळेत मी १९८४ मधले अवाढव्य यंत्र तुलना म्हणून ठेवले आहे. या यंत्राला नळी लावली जाते आणि एक मास्क नाकावर अथवा तोंडावर ठेवला जातो.
अनेक लोकांचा प्रश्न असतो की हा मास्क लावून काय झोप येणार? आजमितीला अक्षरश कोटय़वधी (२०१० सालांपर्यंत १२ कोटी) लोक हे मशीन दररात्री वापरत आहेत! बहुतांश व्यक्तींना काही रात्रीच्या वापरानंतर दिवसभराच्या कामात उत्साह जाणवतो. काही भाग्यवान व्यक्तींना तर एका रात्रीत जमीनअस्मानाचा फरक जाणवतो. अमेरीकन युनिव्हर्सिटीचे एक इतिहासाचे प्राध्यापक माझे रुग्ण होते. त्यांची एका रात्री सीपॅप वापरल्यानंतरची प्रतिक्रिया होती, ‘माझ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा इतका जिवंतपणा जाणवतोय!’
काही लोकांना यंत्र वापरणे हे कृत्रिमपणा म्हणजे बाह्य़ मदत घेणे असे वाटते, पण तसे बघायला गेलो तर चष्मा लावणे हीदेखील बाह्य़ मदतच आहे! अर्थातच कुणीही मशीन लावून जन्माला आलेले नाही आणि त्यामुळे सवय व्हायला वेळ लागू शकतो. नवीन चप्पल अथवा बूट घातल्यानंतरदेखील काही काळ त्रास होतोच की.
काही लोकांच्या प्रतिक्रिया मजेदार असतात. त्यांचे म्हणणे असते की वैयक्तिकरीत्या त्यांना हा मास्क लावणे जरुरीचे वाटले तरी त्यांच्या जोडीदाराला ते रुचणार नाही आणि म्हणून ते मास्क लावत नाहीत! वास्तविकत हा मास्क आणि मशीन लावल्यावर घोरण्याचा आवाजच पूर्णत बंद होतो. त्यामुळे कित्येकदा तुमची बायको वा नवराच तुम्हाला सांगतात की अहो, ते मशीन लावा बघू!
अनेक लोकांच्या मनात एक भीती असते की या मशीनची सवय झाली तर त्याविना झोपच येणार नाही. एक प्रकारचे व्यसन लागेल! याचे उत्तर सोपे आहे. व्यसन आणि गरज यात मूलभूत फरक आहे. आपल्याला जगायला हवा, पाणी आणि अन्न लागते. याचा अर्थ आपल्याला हवेचे व्यसन लागले असा होत नाही. चाळिशीनंतर जवळचं पाहायला चष्मा लागतो, त्याला आपण चष्म्याचे व्यसन म्हणत नाही. काही लोकांना चेहऱ्याजवळ, विशेषत डोळ्यांच्या समोर काही आड आले तर गुदमरल्यासारखे वाटते. त्याला क्लोस्ट्रोफोबिया असे म्हणतात. कधीकधी लहानपणीच्या काही आठवणींमुळे ही भावना होऊ शकते. अशावेळेला मास्कऐवजी केवळ नाकपुडय़ांत जाणाऱ्या नळ्यासदृश मास्कदेखील उपलब्ध आहेत. या सर्व विवेचनामागे उद्दिष्ट एकच आहे की जर तुम्हाला ट्रीटमेंटची गरज असेल तर काही प्रश्नांमुळे ती थांबवू नका. स्लीप अॅप्नीया आणि घोरणे बंद झाले तर तुमचे सबंध आयुष्य बदलू शकते इतके सामथ्र्य यात आहे!
आधुनिक तंत्रज्ञानामुळे या सीपॅप मशीनमध्ये अनेक बदल / सुविधा निर्माण झाल्या आहेत. अर्थात हे मशीन हवा बाहेर टाकत असले तरी तुमचा श्वास / उश्वास तुम्हीच घ्यायचा असतो. थोडक्यात सीपॅप म्हणजे व्हेंटिलेटर अथवा ऑक्सिजन नाही हे लक्षात घ्या. सीपॅपमधून सतत एका विशिष्ट दाबाने हवा येत असल्याने काही जणांना उश्वास टाकायला जड जाते. अशावेळेला सीपॅपची पुढील आवृत्ती बायपॅप उपयोगी पडते. या बायपॅपमध्ये अशी सोय असते की तुम्ही उश्वास टाकायला लागलात की ते हवेचा दाब कमी करते, त्यामुळे उश्वास टाकणे सोपे जाते. ऑटो सीपॅप म्हणजे स्वयंचलित सीपॅप नावाचा आणखी एक प्रकार उपलब्ध आहे. भारतामध्ये एकंदरीत माहिती कमी असल्यामुळे, प्रसंगी डॉक्टरांमध्येदेखील याबद्दल अज्ञान असल्याने आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांचा अभाव असल्याने, हे मशीन सर्रास खपवले जाते. सर्व घोरणाऱ्या आणि स्लीप अॅप्नीया असणाऱ्या लोकांवर हा अक्सीर इलाज नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
साध्या सीपॅपपेक्षा हे मशीन महाग असते. प्रत्येक व्यक्तीगणिक हवेचा दाब वेगवेगळा लागतो. हा दाब ओळखायला सर्वात उत्तम, सुरक्षित आणि थेट राजमार्ग म्हणजे स्लीप लॅबमध्ये एका रात्रीची तंत्रज्ञामार्फत केलेली दाब ओळखण्याची चाचणी. (मॅन्युअल टायट्रेशन) या चाचणीनंतर त्या त्या व्यक्तीनुरूप विशिष्ट दाब सुनिश्चित झाला की स्वस्त आणि साध्या ‘सीपॅप’ने उपाय होतो. इतका ऊहापोह करायचे कारण असे की स्लीप मेडिसिन हे भारतात गेल्या दशकात आलेले नवीन शास्त्र आहे. त्यातही अनिष्ट प्रथा बोकाळत आहेत. नफेखोरीसाठी सुनिश्चित वैद्यकीय चाचण्यांना बगल देऊन, अज्ञानाचा फायदा घेऊन महागडी मशीन्स् गळी मारली जातात. त्यामुळे या सर्व क्षेत्रालाच बट्टा लागेल. काही वेळेला नाइलाजाने, तंत्रज्ञ अथवा ज्ञान नसल्याने ही मशीन्स् द्यावी लागतात हे अगदी मान्य! पण यावर उपाय म्हणजे डॉक्टरांनी प्रशिक्षण घेणे आणि हॉस्पिटल्सनी तंत्रज्ञ निर्माण करणे हाच आहे.
मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, आमच्या संस्थेने आतापर्यंत १५० डॉक्टर्स आणि १०० तंत्रज्ञांचे अभ्यासवर्ग घेतले आहेत. माझ्या मते निद्राविकारांचे शिक्षण घेण्यासाठी अमूक एक स्पेशलायझेशन झालेला डॉक्टरच पाहिजे असे नाही किंबहुना केवळ अॅलोपाथीच नाही तर आयुर्वेद आणि होमीओपाथीचे डॉक्टर्सदेखील हे शिक्षण घेऊ शकतात. रात्रीचा तंत्रज्ञ होण्याकरता सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे रात्रभर जागण्याची क्षमता आणि निगुतीने, शॉर्टकट न मारता निरीक्षण करणे. बारावी पास झालेला आणि कॉम्प्युटरचे जुजबी ज्ञान असलेला माणूसदेखील उत्तम तंत्रज्ञ बनू शकतो. याचा उल्लेख मागील लेखात आला आहेच.
पुढील लेखात सीपॅपखेरीज इतर उपाय आणि त्यांचा विवक्षित वापर याविषयी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा