घोरण्यामुळे बॅरोरिसेप्टरच्या (मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत करणे) कार्यावर परिणाम होतो. पलंगावरून झटकन उठल्यावर काही लोकांना चक्कर आल्यासारखे वाटते, याचे कारण बॅरोरिसेप्टरचे काम मंदावणे हे आहे. अशा रीतीने घोरण्याने मेंदूच्या रक्तपुरवठय़ावर परिणाम होतो. दुर्दैवाने पक्षाघातासारखा भयंकर परिणाम भोगण्याची वेळ येऊ शकते त्याविषयी.. ‘घोरणे’ या विषयावरील या तिसऱ्या भागात.
गेल्या काही लेखांवरून आलेल्या प्रतिक्रियांपैकी प्रातिनिधिक म्हणजे ‘‘इतकी वष्रे मी घोरतो आहे, अजून तरी काही विशेष प्रॉब्लेम्स जाणवत नाही आहे. अशा वेळी माझ्या घोरण्याला अवास्तव महत्त्व का देऊ?’’
या प्रश्नाचे उत्तर पुढील रूपकामध्ये आहे. आत्तापर्यंत आजूबाजूला न पाहता मी रस्ता क्रॉस करतो आहे, एकदाही अ‍ॅक्सिडेंट झालेला नाही, याचा अर्थ कायम हीच वहिवाट ठेवावी का? अपघात सांगून होत नाहीत. शहाण्या माणसाने ते टाळण्याचा प्रयत्न करावा. निद्रेतील विकार हे गाढ झोपेत असल्यामुळे त्यांना सहजपणे ओळखणे आणि त्यांचे महत्त्व जाणणे स्वाभाविकरीत्या होत नाही. शिवाय ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दुसऱ्या दिवशी जाणवणारा निरुत्साह/थकवा हा अंगवळणी पडून जातो.
दिनेश चव्हाण आणि त्यांची पत्नी हे त्याच्या झोपेसंदर्भात भेटायला आले होते. दिनेशच्या म्हणण्याप्रमाणे त्याला कधी कधी झोप लागण्याची समस्या जाणवते. बऱ्याच वेळेला गाढ झोपेतून जाग येते आणि परत झोपण्यास वेळ लागतो. त्याच्या बायकोचे मत वेगळे होते. तिच्या म्हणण्याप्रमाणे दिनेश अगदी मस्त झोपतो, कारण त्याच्या घोरण्यामुळे तिलाच कधी कधी जाग येते. यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. दिनेशच्या झोपेमध्ये खरेच काय घडत होते? याचा अचूक वेध आधुनिक तंत्रज्ञानाने घेता आला. मागील लेखांमध्ये उल्लेख केलेली ‘पॉलिसोम्नोग्राफी’ या पद्धतीत दिनेशचा मेंदू किती वेळेला त्याला उठवत होता याचे अगदी दर सेकंदाला मापन करता येते. मेंदू झोपला की लगेच घशाचे स्नायू शिथील व्हायचे आणि त्याची परिणती घोरण्यात व्हायची. घोरण्याच्या दरम्यान दिनेशच्या श्वासनलिकेतील अडथळा (रेझिस्टन्स्) वाढायचा. परिणामी छातीच्या स्नायूंना श्वास घेण्यासाठी थोडीशी जास्त मेहनत पडत होती. एका विशिष्ट मर्यादेनंतर दिनेशचा मेंदू त्याला उठवायचा निर्णय घ्यायचा. थोडीशी जागृत अवस्था आल्यावर आपोआपच रेझिस्टन्स कमी व्हायचा आणि मेंदू परत झोपेच्या अधीन व्हायचा. हे चक्र दर तासाला वीस ते पंचवीस वेळेला होत होते! अशा रीतीने ओरबाडून उठवल्यामुळे शरीरात अ‍ॅड्रेनलीनचा स्राव होतो. त्यामुळे हृदयाची धडधड वाढते. काही जणांना झोपेमध्ये पॅनिक अटॅक्स् येतात. त्याचे मूळ या ‘शारीरिक’ कारणात असू शकते.
काही वाचकांच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की, दिनेशला घोरण्यामुळे झोप न येणे कसे शक्य आहे? या प्रश्नाचे उत्तर ‘असोसिएट लर्निग’ म्हणजेच चुकीची होणारी जोडणी यात आहे. घोरण्यामुळे येणारी जाग आणि पलंगावर पडलेले असणे यांची वारंवार जोडणी झाली की हळूहळू जाग म्हणजे पलंगावर पडणे असे असोसिएशन होते. त्याचा क्रम उलटा झाला की पलंगावर पडणे म्हणजे जाग अशी चुकीची जोडणी होते. निद्रानाश(इन्सॉम्नीया) या विषयावरील सविस्तर माहिती पुढील लेखांमध्ये येईलच.
या लेखामध्ये घोरणे आणि त्याबरोबर असलेला ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ हा विकार शारीरिकरीत्या काय बदल घडवतो याचा परामर्श घेऊ या.
‘प्रचंड घोरणे’ म्हणजे ७० डेसिबेल्सच्या पुढचा आवाज! साहजिकच कंपनांची शक्ती जास्त! या कंपनांचा परिणाम गळ्याच्या आजूबाजूंच्या अवयवांवर होतो. आपल्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन प्रमुख रक्तवाहिन्या (कॅरॉटीड आर्टरीज्) या अगदी घशाच्या शेजारीच असतात. प्रत्येक रक्तवाहिनीचे आतले अस्तर (लायिनग) हे नाजूक आणि गुळगुळीत असते. त्यामुळे हृदयापासून मेंदूपर्यंत रक्ताचा प्रवाह सुरळीतपणे पोहोचतो. कुठल्याही कारणाने हे अस्तर जर खडबडीत झाले तर प्रवाहाला अटकाव होतो. आणि त्या ठिकाणी ‘कॉलेस्टेरॉल’सारखे पदार्थ साचायला सुरुवात होते. रक्तवाहिन्यांचा लवचीकपणा कमी होऊन काठिण्य वाढते. या सगळ्या प्रक्रियेला ‘अथेरोस्क्लेरोसीस’ म्हणतात एकंदरीत रक्तप्रवाहातील अडथळा वाढू लागतो.
२०११ साली सिडनी, ऑस्ट्रेलिया येथील शास्त्रज्ञांनी व्हायब्रेशन (कंपन) आणि अथेरोस्क्लेरोसीस यांचा प्रत्यक्ष संबंध दाखवला. यात त्यांनी सशाच्या कॅरोटीड आर्टरींचा वापर केला. फक्त सहा तासांच्या व्हायब्रेशन्सनंतर आतील अस्तर फरक दाखवू लागले! त्याच्या अगोदर याच संशोधकांनी २००८ साली केलेल्या संशोधनात मानवांमध्येदेखील  अप्रत्यक्षरीत्या घोरण्याची पातळी आणि अथेरोस्क्लेरोसीसचा संबंध दाखवला आहे. त्यांच्या पाहणीत मंद घोरणाऱ्यांमध्ये सरासरी २० टक्के, मध्यम घोरणाऱ्यांमध्ये ३३ टक्के तर प्रचंड घोरणाऱ्यांमध्ये तब्बल ६४ टक्के इतके कॅरॉटीडस्डमध्ये अथेरोस्क्लेरोसीसचे प्रमाण वाढते!
अशा रीतीने कॅरॉटीड आर्टरीमध्ये रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाले की मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. आपण आडवे पडल्याच्या स्थितीमधून बसणे अथवा उभे राहिलो की गुरुत्वाकर्षणाने रक्तप्रवाह स्वाभाविक पायांकडे वळतो. यामुळे मेंदूला कमी पुरवठा होण्याची शक्यता निर्माण होते. हे टाळण्यासाठी एक चोख व्यवस्था निसर्गाने केलेली आहे त्याला बॅरोरिसेप्टर व्यवस्था असे म्हणतात. उभे राहिल्यावर एका क्षणार्धात मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत करण्याचे काम हे बॅरोरिसेप्टर करतात.
घोरण्यामुळे या बॅरोरिसेप्टरच्या कार्यावर परिणाम होतो. पलंगावरून झटकन उठल्यावर काही लोकांना हल्लकपणा/चक्कर जाणवतो याचे कारण बॅरोरिसेप्टरचे काम मंदावणे आहे. अशा रीतीने घोरण्याने मेंदूच्या रक्तपुरवठय़ावर परिणाम होतो. शिवाय बॅरोरिसेप्टरचे काम मंदावल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशा परिस्थिती उद्भवते. याची परिणती स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्याची क्षमता मंदावणे आदींमध्ये होते. दुर्दैवाने पक्षाघातासारखा भयंकर परिणाम भोगण्याची वेळ येऊ शकते.
मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे हे दुष्परिणाम टाळण्यासाठी बऱ्याच उपाययोजना आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम घोरणाऱ्या व्यक्तींमध्ये केवळ ‘घोरणे’ मौजूद आहे की त्या अनुषंगाने येणारे श्वसनाचे विकार (उदा. स्लीप अ‍ॅप्नीया)देखील आहे,  हे ठरवणे आत्यंतिक गरजेचे असते. त्यानुसारच उपाय ठरवणे वैद्यकदृष्टय़ा उचित ठरते. प्रत्येक घोरणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय तपासणी जरुरीची नसते, पण काही जणांमध्ये मात्र वैद्यकीय सल्ला/तपासणी आवश्यक असते. लहान मुलांमध्ये मध्यम अथवा तीव्र घोरणारी बालके, मंद घोरणारी पण दिवसा वाभरेपण/चंचलपण असलेले विद्यार्थी, वर्गात झोपणारी मुले इत्यादी. अशा मुलांबाबत निद्रातज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरेल.
गर्भार स्त्रियांमध्ये घोरण्याचे प्रमाण सातव्या महिन्यापासून वाढते. जर त्यांना ब्लडप्रेशरचा त्रास असेल अथवा प्रिएक्लाम्पशियाचे डायग्नोसिस असेल तर ‘स्लीप अ‍ॅप्नीया’तपासून घ्यावा. सबंध जगामध्ये गर्भारपण आणि घोरणे याबद्दल फार संशोधन झालेले नसले तरीही जी काही माहिती उपलब्ध आहे, त्यावरून स्लीप अ‍ॅप्नीया आणि गर्भारपणात वाढलेले ब्लडप्रेशर यांचा संबंध निश्चितपणे पुढे आला आहे.
ज्या लोकांना ब्लडप्रेशरसाठी दोन अथवा अधिक गोळ्या घ्याव्या लागतात आणि घोरण्याचा त्रास आहे अशांमध्ये ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ असण्याची शक्यता ९९ टक्के असते. तसेच यावर उपाय केल्यानंतर ब्लडप्रेशरवर अधिक नियंत्रण येते. माझ्या स्वत:च्या अनुभवामध्ये अनेक ब्लडप्रेशरच्या रुग्णांमध्ये घोरण्याच्या ट्रीटमेंटनंतर गोळ्या निम्म्याने कमी झाल्या तर काहींची गरज पूर्णपणे नाहीशी झाली.
ज्यांना पक्षाघाताचा अथवा हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे आणि पाठीवर पडले असता घोरणे होते आहे अशांनी ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ची तपासणी करून घेणे जरुरी असते. भविष्यात येणारे अटॅक्स् टाळण्याकरिता हीदेखील महत्त्वाची पायरी ठरते. स्वीडनमध्ये पाच हजार हार्टपेशंटचा वर्षांनुवष्रे अभ्यास झाला. त्यात रक्तदाब, डायबिटीस, कोलेस्टेरॉल यांच्या बरोबरीने स्लीप अ‍ॅप्नीया हा एक ‘इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर’ आहे हे निर्वविाद सिद्ध झाले आहे. काही पुरुषांना इरेक्टाईल डिस्फन्क्शनचा त्रास असतो. बऱ्याच वेळेला टेस्टास्टेरॉनची इंजेक्शने घेतली जातात. यानंतर जर घोरणे वाढल्याचे लक्षात आले तर ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ विकार आहे हे लक्षात घ्यावे. मुख्य म्हणजे यावर उपाय केला असता लैंगिक जीवन कमालीचे सुधारते! पुढील लेखात घोरण्यावरील उपायांची चर्चा करू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा