– प्रीती करमरकर

वसईत २२ वर्षांच्या तरुणीच्या नुकत्याच झालेल्या क्रूर हत्येनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींचं निष्क्रिय राहून व्हिडीओ चित्रण करणं खूप चर्चिलं गेलं. परंतु समाजाच्या या प्रतिक्रियेबरोबरच हिंसा घडण्यापूर्वी हिंसक मानसिकता रुजण्यात आणि फोफावण्यात समाजाच्या असलेल्या भूमिकेचं विश्लेषण तितकंच महत्त्वाचं आहे. आजवर अनेक स्त्रियांचा ज्यात बळी गेलाय, त्या ‘समाजप्रक्रिये’चा हा आढावा

वसई इथे ११ जूनला आरती यादव या मुलीच्या झालेल्या हत्येनंतर स्त्रियांच्या बाबतीत होणारी हिंसा आणि आजूबाजूच्या समाजाची त्यावरची प्रतिक्रिया याबद्दलचे प्रश्न पुन्हा उसळी मारून वर आले. या तरुणीचे आरोपीशी जवळपास ६ वर्षं प्रेमसंबंध होते. ते तोडल्याच्या रागातून त्यानं लोखंडी पान्याचे घाव घालून तिची भररस्त्यात हत्या केली. अनेक लोकांच्या देखतच हा प्रसंग घडला. केवळ एका तरुणानं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीनं अंगावर पाना उगारल्यानं तो मागे फिरला. बाकी कोणी तिच्या मदतीला तर आलं नाहीच, पण अनेकांनी मोबाइलमध्ये घटनेचं चित्रण करण्यास प्राधान्य दिलं. स्त्रीच्या बाबतीत सुरू असलेल्या भयंकर घटनेवरची समाजाची ही थंड प्रतिक्रिया चर्चेचा विषय झाली.

हेही वाचा – ‘ती’च्या भोवती..!: ‘ठरलेल्या’ जगण्याला आव्हान देणारी ‘मित्रा’!

मानसशास्त्रात Bystander effect बद्दल अभ्यास झाला आहे. मानसशास्त्रज्ञ निकिता बेंजामिन यांच्या मते ‘बघ्यांची संख्या जितकी जास्त, तितकी वैयक्तिक जबाबदारीची भावना कमी’. म्हणजे ‘एवढे जण आहेत आजूबाजूला, त्यांपैकी कुणी तरी काही तरी करेलच,’ ही भावना. ‘आपण मध्ये पडलो आणि आपल्यावर हल्ला झाला तर?’ ही भीती असतेच. Safety in numbers अशीही एक संकल्पना आहे. म्हणजे ‘एवढ्या गर्दीत काय होणार आहे?’ मात्र हे गृहीतक वसईच्या घटनेत टिकलं नाही. इथे आपलेच रोजचे अनुभव पडताळून बघू या. मुलगी वा स्त्री घरातून बाहेर जाताना, ‘अंधार पडण्याच्या आत परत या, उगाच सुनसान रस्त्यानं जाऊ नका,’ वगैरे सल्ले मिळत असतात. म्हणजे ‘गर्दीचं ठिकाण बाईसाठी सुरक्षित’ असं आपल्या मनात असतं. मात्र गर्दीचा गैरफायदा घेऊन स्त्रियांना नकोसे स्पर्श करण्याचे प्रकार दररोज घडतात.

वसईच्या घटनेत खूप लोक मोबाइलवर व्हिडीओ चित्रण करत होते, ते अन्यत्रही आणि इतरही पुष्कळ संदर्भांत आता सर्रास दिसतं. स्वीडिश माध्यमतज्ज्ञ लिनस अँडरसन यांच्या मते, ‘असं फिल्मिंग करणं हे आपण काही तरी करत असल्याची भावना व्यक्तीला देतं. जणू तुम्ही ‘निष्क्रिय बघ्या’चे ‘सक्रिय साक्षीदार’ होता’. मात्र अशा जबर हिंसा प्रकरणांत मदतीचा कोणताच प्रयत्न न करता चित्रण करत राहणं म्हणजे एक प्रकारे हत्येचे ‘निष्क्रिय साक्षीदार’ होणंच नाही का?…

इथे घटनास्थळाचाही वेगळा विचार करता येईल. एखाद्या ठिकाणी वेगानं होणारे बदल, जमीन-घरांचे प्रचंड वाढते भाव, भू-माफियांची दहशत, अतिक्रमणं, परप्रांतीयांच्या मोठ्या संख्येतून होणारं बकालीकरण, ही प्रक्रिया माणसांना अमानवी परिस्थितीत जगणं भाग पाडते. माणसं निबर बनत जातात. अशी गर्दी अनोळखी, अनामिक असते. ती परकी वाटते. ही अनामिकता, परकेपणाची भावना अशा घटनांमध्ये प्राणघातक ठरू शकते. लोकांनी अशा घटनांत पीडितेला मदत करण्यास पुढे व्हावं, यासाठी समाज म्हणून अजून खूपच मजल मारावी लागेल.

आणखी एक महत्त्वाची बाब अशी, की स्त्रियांवरील हिंसेच्या घटनांत आजूबाजूचे लोक फार मध्ये पडत नसल्याचंच सर्वसाधारणपणे दिसून येतं. यापूर्वीही भररस्त्यात, गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांच्या हत्या झाल्या आहेत. स्त्रियांवरील हिंसेबाबत पारंपरिक धारणा आजही घट्ट असल्याचं त्यातून प्रतीत होतं. स्त्रियांवर सर्वांत जास्त हिंसेच्या घटना जोडीदार/ पतीकडून होणाऱ्या हिंसेच्या असतात. मात्र ‘ती त्यांची खासगी बाब आहे, आपण कसं मध्ये पडायचं,’ ही समजूत घट्ट आहे. कोणाला इजा होत असली किंवा जिवावर बेतत असलं, तरी आपण ‘तो त्यांचा खासगी मामला आहे,’ असं म्हणत राहणार का, हा खरा प्रश्न आहे. आणखी एक घट्ट धारणा म्हणजे ‘तिचं काहीतरी चुकत असणार. नाही तर तो कशाला असं वागेल?’ किंवा ‘ती तिच्या इच्छेनं नात्यात होती ना? मग तीच या हिंसेला जबाबदार आहे.’ असं म्हणून पीडित स्त्रीलाच दोषी धरणं. हे सर्रास दिसतं आणि त्यातून स्त्रियांवरील हिंसेला सामाजिक समर्थन मिळत राहतं.

पितृसत्ताक व्यवस्था स्त्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरुषांना हिंसेचा वापर करू देते. वसईतल्या घटनेतही हे दिसतं. ‘ती माझ्याशी संबंध तोडते म्हणजे काय, मग मी तिला धडा शिकवू शकतो,’ हे धारिष्ट्य कट्टर पितृसत्ताक मानसिकतेतून पुरुषांना मिळतं. म्हणजे स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेला ही व्यवस्था मान्यता देते. स्त्रियाही याच व्यवस्थेच्या वाहक बनतात आणि प्रसंगी दुसऱ्या स्त्रीवर हिंसाही करतात. कारण तेच संस्कार झालेले असतात. त्यामुळे ‘बाईच बाईची शत्रू’ अशा युक्तिवादांना पूर्णविराम द्यायला हवा.

पती/ जोडीदाराकडून स्त्रीवर होणारी हिंसा हा जागतिक पातळीवरचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रांनी २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार त्या वर्षी जगभरात ४७ हजार स्त्रियांची त्यांच्या पती/ जोडीदार वा कुटुंबातील अन्य सदस्यानं हत्या केली होती. म्हणजे दर अकरा मिनिटांना एक स्त्री किंवा मुलगी तिच्या कुटुंबाकडून मारली गेली. जी नाती वा जे घर बाईसाठी सुरक्षित आहे असं समजलं जातं, तिथेच त्या जिवाला मुकल्या. २०२२ मध्ये जगभरात अशा ४८ हजार स्त्री-हत्या झाल्या.

२०२२ मध्ये भारतात स्त्रियांवरच्या अत्याचारांचे ४ लाख ४५ हजार २५६ इतके गुन्हे नोंदलेले आहेत. यांपैकी सर्वांत जास्त- म्हणजे ३१ टक्के गुन्हे हे पती/ जोडीदार/ कुटुंब यांच्याकडून होणाऱ्या हिंसेचे आहेत. प्रत्यक्ष घटनांपेक्षा नेहमी कमीच घटनांची नोंद होते, हे आपल्याला माहिती आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण- ५ (NHFS-५ २०१९-२१) अनुसार १८ ते ४९ या वयोगटातल्या ३० टक्के स्त्रियांनी आयुष्यात कधी ना कधी कौटुंबिक हिंसा अनुभवाला आल्याचं सांगितलं. ४४ टक्के पुरुषांनी पत्नीला मारहाण करण्याचं समर्थन केल्याचं या अहवालात नमूद आहे. तसंच कुटुंबातल्या निर्णयप्रक्रियेतलं स्त्रियांचं स्थान खाली घसरलं आहे. NHFS-४ अनुसार ८४ टक्के स्त्रियांनी कुटुंबातल्या निर्णयप्रक्रियेत भाग घेता येतो, असं सांगितलं होतं. ते प्रमाण NHFS-५ मध्ये ७१ टक्के असं खाली आलं आहे. ही एक धोक्याची घंटा आहे. निर्णयात काही स्थान नाही, याचा अर्थ स्त्रियांकडे सत्ता नाही आणि हिंसा ही सत्तासंबंधांतून घडते.

हेही वाचा – स्त्री ‘वि’श्व: मासिक पाळीच्या रजेचे प्रश्न

हिंसा आणि हिंसेचे परिणाम गुंतागुंतीचे आहेत. ज्या नात्यात हिंसा असते, तिथे हिंसेचं दुष्टचक्र चालू राहण्याची शक्यता असते. म्हणजे चक्राकार पद्धतीनं हिंसक आणि धोकादायक कृती नात्यात घडत राहते. लेनॉर वॉकर या अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बाईंनी हे चक्र मांडलं. कौटुंबिक हिंसापीडित अशा १,५०० स्त्रियांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आणि त्यातून नात्यात पुन्हा पुन्हा घडणारी हिंसा प्रामुख्यानं लक्षात आली. त्यांच्या अभ्यासानुसार या चक्रात चार अवस्था दिसतात- पहिली म्हणजे तणावपूर्ण परिस्थिती. काही कारणानं हा तणाव वाढत जाऊन पुढच्या टप्प्यावर म्हणजे हिंसक कृतीपर्यंत पोहोचतो. मग होतो समझोता- अत्याचारी व्यक्तीनं माफी मागणं, ‘पुन्हा असं होणार नाही,’ असं वचन देणं. यातून काही काळ नात्यात शांतता राहते. मात्र पुन्हा काही कारणानं तणाव वाढतो आणि हिंसेच्या दिशेनं चक्र पुढे सरकतं. पीडित स्त्री अशा अनेक चक्रांतून गेलेली असते. हे तिच्या जिवावरही बेतू शकतं, हे वरील आकडेवारीत दिसतंच आहे. आरती यादव प्रकरणातही हत्येच्या आधी तिनं पोलिसात जाऊन केलेली तक्रार हे हिंसा वारंवार घडत असल्याचं एक निदर्शक आहे.

घरातील मुलामुलींवरही कौटुंबिक हिंसेचे दूरगामी परिणाम होतात. वाढत्या वयात घरात हिंसा पाहात असलेल्या मुलामुलींना हिंसा ‘नॉर्मल’ वाटण्याची शक्यता असते. पुरुष म्हणेल ते निमूटपणे ऐकलं नाही, तर आपल्यालाही हिंसेचा सामना करावा लागू शकतो, हे लक्षात येऊन मुली ‘आज्ञाधारक’ बनतात. घरातल्या बाईनं ऐकलं नाही तर पुरुष म्हणून आपण तिला मारहाण करू शकतो, असं मुलग्यांना वाटतं आणि ही हिंसा पुढच्या पिढीतही चालू राहण्याची शक्यता वाढते. या दीर्घकालीन परिणामांव्यतिरिक्त मुलामुलींमध्ये भीतीची भावना, मानसिक/ भावनिक आघात, औदासीन्य, सतत चिंता, असहायतेची भावना, असे परिणाम दिसू शकतात. यामुळे एकाग्रतेवर, अभ्यासावर परिणाम होतो. त्यात रस न वाटणं, दिवास्वप्नात रमणं, असे अनेक परिणाम दिसतात. अत्याचारी व्यक्ती मुलामुलींनाही मारहाण करण्याची शक्यता असते, म्हणजे त्यांनाही इजा होण्याचा धोका असतो.

हिंसा करणं स्वाभाविक नाही आणि समर्थनीय तर बिलकूल नाही. ‘पुरुष आक्रमक असतात, त्यांना राग येतोच. मारली बायकोला एखादी थप्पड तर त्यात काय एवढं?’ असं हिंसेचं समर्थन आपण नेहमी ऐकत असतो. मात्र हिंसक कृत्य आपसूक घडत नाही, तर हिंसक पुरुष समाजात घडवले जातात. जेव्हा एखाद्या नात्यात वारंवार हिंसा होते, तेव्हा ती रागाच्या भरात होणारी गोष्ट नसते, तर तसं वागल्यावर मनासारखं होतंय, हे ओळखून आणि समजून केलेली अशी ती कृती असते. म्हणजेच नियंत्रण मिळवण्यासाठी हिंसा केली जाते. अशा नात्यात सहज सुंदर संबंध निर्माण होऊ शकत नाहीत. मर्दानगीबाबतच्या गैरसमजांमुळे अनेक पुरुष हळुवार भावनांना पारखे होतात. मुळात हिंसा/ हत्येपर्यंत मामला जातो, म्हणजे ते प्रेम नाहीच. ती तर मालकीहक्काची भावना. अशा हिंसेतून वर्चस्व मिळवल्याचा आनंद मिळेल, पण प्रेमाचं काय? हिंसा आपल्या अंगात भिनलेली नाही ना, आपण हिंसक वागत नाही ना, याबाबत आपण सगळ्यांनी- विशेषत: पुरुषांनी दक्ष राहायला हवं. नकाराचा स्वीकार करता यायला हवा. स्त्रिया नीट वागल्या तर ही वेळ कशाला येईल, असं gaslighting करणं समाजानं थांबवायला हवं. कोणत्याही कारणानं हिंसेचं समर्थन करणं थांबवायला हवं. त्यासाठी हिंसा करणं ही शरमेची बाब आहे, हे समाजात रुजायला हवं. अत्याचारी व्यक्तीलाच त्यासाठी जबाबदार धरायला हवं, पीडितेला नव्हे. तसंच स्त्रियांवरील हिंसेचा प्रश्न खासगीपणातून बाहेर काढायला हवा. समाजातल्या सर्व स्तरांत यावर प्रबोधन व्हायला हवं. असा प्रसंग पाहिल्यास पीडितेला मदत कशी करता येईल, याचे प्राथमिक धडे सर्वांना देण्याची आता गरज निर्माण झाली आहे. स्त्रियांनीही हिंसा होत असेल तर बोलायला हवं, मार्ग काढायला हवा. सहन करून प्रश्न सुटत नाहीत, उलट हिंसा वाढत जाण्याची शक्यता असते. म्हणूनच पीडित व्यक्तींना याबाबत बोलता येईल असं वातावरण, तशी व्यासपीठं निर्माण करणं, वाढवणं गरजेचं आहे. जोडीदार परस्परांचा आदर करतील, अशी नाती निर्माण करण्यात आपण समाज म्हणून असं खूप काही करू शकतो.

(लेखिका स्त्रियांवरील हिंसेच्या मुद्द्यावर प्रत्यक्ष काम व संशोधन करत आहेत.)

preetikarmarkar@gmail.com