प्रा. मीनल सोहोनी
स्त्रियांच्या प्रगतीचे मुख्य आधार शिक्षण, ज्ञान, स्वावलंबन, स्वाधीनता, धर्मविचाराची चिकित्सा आणि पुनर्विचार हेच आहेत हे पंडिता रमाबाई यांनी जाणले. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी भाषण, लेखन, प्रवास, संस्था उभारणी अशी वाटचाल केली. त्यांच्या प्रतिभेची आणि कार्याची झेप किती मोठी आहे याची ओळख करून देणारा लेख.

‘‘हजारो वर्षांची स्तब्धता आता भंगली आहे.’’ पंडिता रमाबाई यांच्या ‘The Highcaste Hindu Woman’ – ‘उच्चवर्णीय हिंदू स्त्री’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. रिचर्ड बॉडले या विदुषीनं केलेलं प्रतिपादन. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पंडिता रमाबाई यांच्या भाषणातून, लेखनातून हिंदू स्त्रीजीवनातील परावलंबित्व, न्यूनगंड, हालअपेष्टा, धार्मिक बंधनांचा जाच या गोष्टी समग्रपणे ढवळून निघाल्या आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे, जीवनाचे, भवितव्याचे दरवाजे उघडायला सुरुवात झाली, असे नि:संदिग्धपणे म्हणता येईल. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे या नावांनंतर पंडिता रमाबाई हे नावही येतं, पण त्यांनी ख्रिास्ती धर्म स्वीकारल्यामुळे त्यांच्या कार्याचं वलय काहीसं झाकोळलं गेलं आहे. वस्तुत: एकोणिसाव्या शतकात जेव्हा स्त्रीमुक्ती ही कल्पना दूरवरही दिसण्यासारखी नव्हती; तेव्हा पंडिता रमाबाई स्वयंप्रेरणेतून मुक्तीच्या मार्गावर वाटचाल करत होत्या.

एप्रिल १८५८मध्ये जन्म. वडिलांच्या भ्रमंतीमुळे महाराष्ट्राबाहेर वास्तव्य झालं. वडिलांनी पत्नी व मुला-मुलींना शिकवल्यामुळे रमाबाईंनी संस्कृतवर प्रभुत्व मिळवलं. वडील, आई, पुढे भाऊ गेल्यावर प्रतिकूल परिस्थितीतही रमाबाईंची ज्ञानाची, भाषा शिकण्याची ओढ कायम राहिली. कुटुंबासोबत बराच प्रवास झाला होता. शिक्षणातून आत्मविश्वास मिळाला होता. तत्कालीन स्त्रियांना जो धार्मिक बंधनांचा, रूढी-परंपरांचा दबाव सहन करावा लागे त्यापासून रमाबाई मुक्त होत्या. या वाटचालीतच त्यांनी स्त्रियांसाठी, बालविधवांसाठी, अत्याचारांना बळी पडलेल्या स्त्रियांसाठी केलेल्या कार्याची बीजे दडली असावीत. कोलकाता येथे ब्राह्मो समाजाचे अनुयायीत्व त्यांनी स्वीकारलं. स्त्रियांना स्वाधीन जीवन जगायचं असेल, स्वातंत्र्याचं ईप्सित गाठायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही हे स्वानुभवातून त्यांना तीव्रतेनं जाणवत होतं. त्यासाठी त्यांनी बंगाल प्रांतात व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. पुढे मुंबई-पुण्यातही त्यांनी भाषण, निरूपण हे उपक्रम चालू ठेवले होते.

एकोणिसाव्या शतकातले स्त्रीजीवन म्हणजे श्रुती, स्मृती, पुराणे, वेद यांच्या पगड्यातून संकोचून टाकलेलं जीवन. त्या काळात मुलगी आठ-नऊ वर्षांची झाली की तिचा तातडीने विवाह करून देत. बालाजरठ विवाह, बालविधवा, केशवपन सर्व रूढींमध्ये मुलींच्या देहाचा, मनाचा काहीही विचार केला जात नसे. मात्र, रमाबाईंनी स्वत: तरुण वयात विवाहाचा निर्णय घेतला आणि बिपिनबिहारी मेधावी यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. मेधावी शूद्र वर्गातले होते. तेही ब्राह्मो समाजाचे अनुयायी होते. आपल्या आयुष्यातील स्वाधीनता, स्वयंनिर्णय या क्षमतेचा वापर रमाबाईंनी स्त्री जागृतीसाठी केला. बालविवाहाला विरोध आणि संमतीवयाला पाठिंबा देताना त्यांनी क्रांतिकारी विचार व्यक्त केले आहेत. मुलींनी २०व्या वर्षाच्या टप्प्यावर विवाह आणि जोडीदार निवडीचा विचार करावा असा उपदेश त्यांनी केला. काळाच्या कितीतरी पुढे झेप घेणारी त्यांची प्रतिभा होती.

मेधावी याचं अकाली निधन झालं आणि रमाबाई त्यांच्या मनोरमा या मुलीसह पुण्यामध्ये आल्या. पुण्या-मुंबईमध्ये त्यांना ब्राह्मण आणि उच्चवर्णीय समाजातील स्त्रीजीवनाचं जे दर्शन घडलं त्यातून रमाबाईंना पुढील ध्येयाची प्रेरणा मिळाली असावी. ब्राह्मण किंवा उच्चवर्णीय यांचं समाजातील स्थान जरी वरचं असलं, तरी स्त्रिया धार्मिक बंधनांमध्ये जखडल्या होत्या. बालवयात लग्न, गर्भाधान विधी, वयस्कर पुरुषाबरोबर लगभन, लहान वयातील मातृत्व, मुलगा न झाल्यास पतीचं दुसरं लग्न, वैधव्य आलं तर केशवपन, एकवेळचं जेवण, वैधव्यानंतर इतरांकडून होणारे अत्याचार, कुमारी माता, मुलींच्या आत्महत्या असं वातावरण सगळीकडे होतं. ही परिस्थिती सुधारक मंडळींना अस्वस्थ करत होती. रमाबाईंना आगरकर, न्यायमूर्ती रानडे, रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर यांनी सातत्यानं पाठिंबा दिला.

स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी जे अथक प्रयत्न केले त्यातील महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे मे १८८२मध्ये ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना. त्यावेळच्या सभांसाठी येणाऱ्या पुरुषांनी बरोबर किमान एका स्त्रीला आणलंच पाहिजे अशी अट त्यांनी घातली, त्यामुळे स्त्रिया सभा ऐकायला येऊ लागल्या.

त्या काळात एकीकडे समाजसुधारणा करणं ही पुरुषांची मक्तेदारी राहिली होती. अशा वेळी रमाबाईंच्या नेतृत्वाला परंपरावाद्यांनी साहजिकच विरोध केला. रमाबाईंच्या समकालीन सुधारक स्त्रिया स्वतंत्र विचार करत होत्या. पण बव्हंशी त्यांच्या पतीच्या आदेशांनुसार पुढे जात होत्या. रमाबाई मात्र स्वयंप्रेरणेने, कोणी सुधारणा शिकवण्याची वाट न पाहता कोणत्याही वादाला न घाबरता खंबीरपणे स्त्रीस्वातंत्र्याचा विचार करत राहिल्या. पुढील काळातील स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांसाठी रमाबाईंकडून मिळालेली ही प्रेरणा महत्त्वाची ठरली. रमाबाईंनी जून १८८२मध्ये ‘स्त्री-धर्म नीती’ हे पुस्तक प्रामुख्यानं स्त्रियांसाठी लिहिलं. या पुस्तकात त्यांनी विद्या, भाषा, इतिहास, भूगोल, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीती ज्ञान, वैद्याक, शुश्रूषा, बालकांचे शिक्षण या गोष्टी स्त्रियांनी शिकाव्यात, जोडीदार निवडावा, पती हा मित्र असावा अशी मांडणी केली आहे. स्वयंपाकघराच्या चार भिंतीत अडकून राहिलेल्या स्त्रियांना त्या सांगतात- ‘‘ईश्वराने तुम्हांस नुसती स्वयंपाकादी कामे करण्यासाठी जन्मास घातले नाही. तुम्ही विचार करून पाहाल तर अगणित कामे आहेत.’’ १८८२मध्ये व्यक्त झालेले हे विचार. घरकाम, स्वयंपाक यांच्या न संपणाऱ्या, लादलेल्या बंधनातून स्त्रियांनी मुक्त व्हावे, तसे सामाजिक प्रयत्न व्हावेत हा विचार मोठ्या प्रमाणात पुढे जवळपास १९७५ नंतरच चर्चेत आला. रमाबाईंनी १९व्या शतकातच त्याची मुहूर्तमेढ रोवली होती. १८८२ मध्ये रमाबाईंनी हंटर कमिशनपुढे साक्ष दिली. त्यांनी स्त्रीशिक्षणाविषयी दिलेली ती साक्ष खूप महत्त्वाची ठरली. मुलींना समजून घेण्यासाठी आणि शिकवण्यासाठी शिक्षिकांची नेमणूक केली तर अधिकाधिक मुली शिक्षण प्रवाहात येतील, शाळा तपासणीसाठी स्त्रीनिरीक्षक असाव्यात, इंग्रजी भाषेचेही शिक्षण द्यावे, स्त्रियांना वैद्याकीय शिक्षणासाठी परवानगी द्यावी, स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपचारांसाठी पावले उचलावीत या मागण्यांचा समावेश होता. रमाबाईंच्या साक्षीला इंग्लंडमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. इंग्लंडमधून महिला डॉक्टर, नर्सेस पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. स्त्रियांकरिता विशेष दवाखाने, रुग्णालय उघडण्यासाठीही व्यवस्था केली गेली. डॉ. हंटर यांनी रमाबाईंच्या साक्षीविषयी खूप कौतुक व्यक्त केलं आहे. ‘रमाबाईंची साक्ष’ म्हणजे फक्त त्यांचीच नसून, देशातील अनेक स्त्रियांचे विशेषत: कर्तृत्ववान स्त्रियांचे ते मनोगत आहे. रमाबाईंना स्वत:ही वैद्याकीय शिक्षण घेण्याची इच्छा होती. पुस्तकलेखनातून मिळवलेले पैसे वापरून त्या १८८३ मध्ये इंग्लंडला गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी भारतीय स्त्रियांच्या परिस्थितीचं वर्णन करणारे एक पत्र लिहिले आणि अधिकारी प्रतिष्ठित मंडळींपुढे ते नेण्याचा प्रयत्नही केला. स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी व्यापक पातळीवर विचार नेण्याचा हा प्रयत्न होता. एकीकडे रमाबाईंच्या मनात धर्मव्यवस्थेचा पुनर्विचार करण्याचे विचारमंथन चालू असावे. मनुस्मृतीमध्ये स्त्रीचं माणूस म्हणून स्थान नाकारण्यात आलं आहे, जगाच्या दृष्टीनं तिला तिरस्करणीय ठरवलं आहे. रमाबाईंच्या समकालीन डॉ. आनंदीबाई जोशी या अमेरिकेत जाऊन डॉक्टर झाल्या, पण त्यांचे पती गोपाळराव यांचे धर्मबंधनं पाळण्याचे आदेश, वेशभूषा – खाणंपिणं यांची आबाळ, दडपण यांतून त्यांना क्षय झाला आणि त्यांचा अकाली मृत्यूही झाला. अशा वेळी रूढींच्या काचाखाली दबलेल्या जिवांना करुणेनं जवळ करणारा धर्म अशी रमाबाईंना ख्रिास्ती धर्माची जाणीव झाली असावी. या टप्प्यावर त्यांनी १८८३मध्ये धर्मांतर केलं. रूढ धर्मविचाराची चिकित्सा करतानाच ख्रिास्ती धर्मातील चमत्कार कल्पना, कर्मकांड यांचा स्वीकार त्यांनी केला नाही. स्त्रियांना जिव्हाळ्यानं वागणूक देणाऱ्या धर्मव्यवस्थेचा शोध घेण्याचा हा ध्यास होता.

डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभाला हजर राहण्यासाठी रमाबाई १८८६ मध्ये अमेरिकेला गेल्या. अमेरिकेत त्यांनी जवळपास सर्व मोठ्या शहरांमध्ये प्रवास केला. विविध ठिकाणी भाषणं दिली. ‘International Council of Women’ या जगभरातील स्त्रीवादी प्रतिनिधींच्या सभेमध्ये उपस्थित राहून ‘हिंदुस्थानातील स्त्रिया’ यावर भाषण केलं. स्त्रीजीवनाचं, समस्यांचं स्वरूप त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदवलं. त्यांना व्यापक स्तरावर पाठिंबा मिळाला आणि तिथं ‘रमाबाई असोसिएशन’ स्थापन करण्यात आली. आर्थिक पाठबळ तयार करून भारतात स्त्रीशिक्षण करण्याचं उद्दिष्ट होतं. पुढे जपान, हाँगकाँग येथूनही त्यांना आमंत्रण आलं. तिथंही जाऊन भाषणं देऊन पुढील कार्यासाठी रसद मिळवण्याचं काम केलं. ज्या काळात स्त्रियांनी चपला घालाव्यात का, स्वेटर घालावा का, इंग्रजी भाषा शिकावी का यासाठी वादविवाद होत होते त्या काळात रमाबाई जगप्रवास करत स्त्रीशिक्षणाचा प्रश्न व्यापक स्तरावर नेतात. पारतंत्र्यात ढकलणाऱ्या रुढी परंपरांचं बंधन तोडून टाकून व्यापक स्तरावर विचार व्यक्त करून मोठा पाठिंबा मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय स्त्री म्हणता येतील.

संमतीवयाच्या प्रश्नाची चर्चा वाद-प्रतिवाद चालू असताना पुण्यामध्ये रमाबाई, काशीबाई कानिटकर यांनी स्त्रियांची सभा भरवून तीनशे स्त्रियांच्या सह्या घेतल्या आणि संमती वयाचा कायदा करावा अशी सरकारकडे मागणी केली. अशा रीतीनं स्त्रियांना सामाजिक चळवळींचा भाग बनवलं. सभांमध्ये सामील करून घेणं, सह्या घेणं, स्त्रियांना आपल्या कोषातून बाहेर काढणं हे रमाबाईंचं, काशीबाईंचं श्रेय आहे. बालविवाह, लहान वयातील लैंगिक अत्याचार याविषयी खुद्द स्त्रियाच सभा घेऊ लागल्या, सह्यांचा अर्ज देऊ लागल्या याचा जनमानसावर आणि सरकारवर मोठा परिणाम झाला. ज्यावेळी आगरकरांसारखे काही अपवाद सोडले तर सनातन्यांबरोबर सुधारकांनाही सरकारनं आपल्या शास्त्रात, रीतीरिवाजात दखल देऊ नये असं वाटत होतं; त्यावेळी रमाबाईंनी ५० टक्के प्रजेच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सरकारला जबाबदार धरलं. अखेरीस १८९१मध्ये सरकारनं संमती वयाचा कायदा पास केला. यालाच समांतर जाणारं डॉ. रखमाबाईंवरील खटल्याचं प्रकरण होतं. नकळत्या वयात विवाह झाल्यानंतर समज आल्यावर रखमाबाईंनी पतीकडे जायला नकार दिला. त्यांच्या पतीनं त्यांच्यावर खटला दाखल केला. सुधारक मंडळी रखमाबाईंना काही प्रमाणात पाठिंबा देत होती. परंतु कायद्यातील पळवाटांमुळे रखमाबाईंना शिक्षा फर्मावण्यात आली. रमाबाईंनी यासंदर्भात रखमाबाईंना पूर्ण पाठिंबा दिला. रखमाबाईंवर सक्ती करण्याच्या आणि शिक्षा देण्याच्या रूढीवाद्यांच्या मानसिकतेवर आणि सरकारच्या अन्याय्य धोरणावर टीका केली आहे. या प्रकरणात त्यांनी शास्त्र चिकित्साही केली. ‘‘मी स्वत: हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. स्त्रीला इतकी अन्यायी वागणूक देण्यास शास्त्राने खरे तर कुठेही आधार दिलेला नाही.’’

स्त्रियांचे हक्क आणि अधिकार यासंदर्भात काँग्रेसच्या अधिवेशनात व्यक्त केलेलं मनोगत अतिशय महत्त्वाचं आहे. १८८९मध्ये रमाबाई आठ महिलांसह काँग्रेस अधिशवेशनाला उपस्थित राहिल्या होत्या. या अधिवेशनातील सामाजिक परिषदेत रमाबाईंनी बालविवाह प्रतिबंध, केशवपन यांविषयी रमाबाईंनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. बालविधवेला वयात आल्यानंतर आपण कसं राहायचं, केस काढायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार असायला हवा, असं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केलं. स्त्रियांचे हक्क आणि अधिकार प्रत्यक्ष मिळण्यासाठी शिक्षण, स्वावलंबन यांची गरज आहे हे ओळखून रमाबाईंनी मार्च १८८९ मध्ये मुंबईत ‘शारदासदन’ शाळा व वसतिगृहाची स्थापना केली. अमेरिकेतील असोसिएशनकडून आर्थिक सहाय्य होतं. भाषा, विज्ञान, शरीरशास्त्र हे तर अभ्यासक्रमात होतेच, पण व्यवसाय शिक्षण हा महत्त्वाचा भाग होता. यात कलाकारी, फोटोग्राफी, मातीकाम, शिवणकाम, बुरुडकाम यांचा समावेश होता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याची सोय, अन्नवस्त्र सोय, शैक्षणिक सामग्री, एवढंच नव्हे तर विद्यार्थिनींना नेण्या-आणण्याची सोय असा सर्व बाजूंनी विचार त्यांनी केला होता. वसतिगृहात आपापल्या धार्मिक रीतीनं राहण्याची व्यवस्था होती.

शारदासदनमध्ये बालविधवा, विकेशा विधवाही होत्या. त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष लक्ष दिलं जात असे. अर्थात विरोधी मंडळींच्या धारदार टीकेचा, आक्षेपांचा काच, वैयक्तिक चिखलफेक यांना रमाबाईंना सतत तोंड द्यावं लागत असे. आर्थिक आव्हानांमुळे शारदासदनाचं पुण्यात स्थलांतर केलं. तिथेही ख्रिास्ती धर्मप्रसाराच्या आरोपांना सतत तोंड द्यावं लागलं. परंतु रमाबाईंनी निर्भयतेनं शाळा, वसतिगृह चालवलं. शाळेत येणाऱ्या बालविधवा गोदूताई म्हणजे बाया कर्वे आणि धोंडो केशव कर्वे यांचा पुनर्विवाह करून दिला. कर्वे यांचं वय व तब्येत पाहून रमाबाईंनी त्यांना विमा काढायला सांगितलं. पुढे धर्मप्रसाराचे आरोप वाढत गेले, त्यात प्लेगची साथ अशा परिस्थितीत रमाबाईंनी पुण्यापासून ३५ मैलांवर केडगाव येथे सर्व संस्था नेली. मुलींचं, बालविधवांचं शिक्षण यात खंड पडला नाही. प्लेगच्या साथीत स्वत: अनेक ठिकाणी फिरून लहान मुलं व महिलांना जगवलं, केडगाव येथे तात्पुरत्या झोपड्या उभारल्या आणि त्यांना आश्रय दिला. उत्तर भारतात मथुरा, वृंदावन परिसरात बिकट परिस्थितीत राहणाऱ्या विधवांचं पुनर्वसन करण्याचा रमाबाईंनी प्रयत्नही केला.

पंडिता रमाबाई यांच्या प्रतिभेची, कार्याची झेप मोठी आहे. स्त्रियांच्या प्रगतीचे मुख्य आधार शिक्षण, ज्ञान, स्वावलंबन, स्वाधीनता, धर्मविचाराची चिकित्सा आणि पुनर्विचार हेच आहेत, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी भाषण, लेखन, प्रवास, संस्था उभारणी अशी वाटचाल केली. स्त्रीमुक्तीच्या टप्प्याआधी स्त्रियांच्या अस्तित्वाचा आणि क्षमतांचा कस निर्माण व्हावा लागतो याचं भान एकोणिसाव्या शतकाच्या प्रतिकूल अवकाशातही पंडिता रमाबाईंनी दर्शवलं आहे.

saeechitnis31 @gmail.com

(लेखिका कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयात प्राध्यापक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ती आहेत.)

Story img Loader