बाबासाहेब खेर यांनी रुजवेल्या रोपाचं ‘युवा परिवर्तन’मध्ये रूपांतर करणाऱ्या किशोर आणि मृणालिनी खेर यांनी युवाशक्तीला जगण्याचं बळ मिळवून दिलं. त्यांच्या हाताला काम दिलं आणि ग्रामीण भागातल्या अनेक पिढय़ा सावरल्या. गेली २५ वर्षे युवाशक्तीला मुख्य प्रवाहात आणणाऱ्या मृणालिनी खेर यांचे हे अनुभव.
गेली २५ वर्षे मी ‘युवा परिवर्तन’चं काम पाहतेय, त्याचं बीज १९२८ साली बाबासाहेब खेर यांनी पेरलं ते ‘दि खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशन’च्या रूपाने.  पुढे मी आणि पती किशोर खेर यांनी ‘युवा परिवर्तन’ या नावाने त्याचा विस्तार केला आणि हे काम केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता राजस्थान, बिहार, जम्मू-काश्मीर अशा १८ राज्यांपर्यंत पोहोचवलं. हे काम विस्तारताना इथल्या गोंधळलेल्या, भविष्याबद्दल अनिश्चितता असणाऱ्या युवापिढीच्या हाताना काम दिलं आणि त्यांना जगण्याचं बळ दिलं..
सध्याच्या या खेरवाडीला पूर्वी ‘चमडावालाकी वाडी’ हे नाव होतं. बाळासाहेब खेर, मणिबेन नानावटी, व्ही. जी. राव,
डॉ. झवेरी या गांधीविचारांच्या लोकांनी अगदी तंबू ठोकून या भागात या संस्थेचं काम केलं. स्वत: श्रमदान केलं. इथल्या मुलांनी शिकून-सवरून मोठं व्हावं या हेतूने इथे १९२८ मध्ये बालवाडी सुरू केली. १९५४ साली या बालवाडीचे रूपांतर म्युनिसिपल शाळेत झालं. खेरवाडी आणि परिसरातील मुलांना शिक्षण देणं हेच सुरुवातीला मुख्य ध्येय होतं. पण मी आणि किशोर यांनी १९९८ पासून या संस्थेची धुरा खऱ्या अर्थाने हाती घेतली आणि त्याला थोडं व्यापक रूप देण्याचं ठरवलं आणि ‘युवा परिवर्तन’ची स्थापना करून शालाबाह्य़ मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या हातांना काम दिलं. स्वकष्टावर पैसे मिळविण्याचा आत्मविश्वास दिला. समाजात अनेक प्रकारची सामाजिक कामं सुरू असतात, परंतु हातांना काम मिळवून देण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
आपल्या देशातल्या सामाजिक परिस्थितीचा विचार करताना हे लक्षात आलं की, समाजातल्या अनेक मुलांची शाळा अध्र्यावरच सुटते, ती कायमचीच! काहींना अभ्यासात रस नसतो, तर काहींकडे शिकण्यासाठी पैसे नाहीत.. अशी एक ना अनेक कारणं. मग या शालाबाह्य़ मुलांना पुन्हा शाळेकडे आणण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत किंवा या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नाही. मग ही शालाबाह्य़ मुलं आपला वेळ असाच वाया घालवतात. यातली अनेक मुलं वाईट मार्गाला लागतात. केवळ शिक्षण घेतलं नाही म्हणून या मुलांना समाज अशिक्षित म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. इतकंच नव्हे तर अनेकदा ही मुलं समाजाच्या हेटाळणीचा विषय ठरतात. यातूनच ती समाजापासून तुटतात आणि आपण कुचकामी असल्याची भावना मनात बळावते. पण मला वाटतं जन्मलेल्या प्रत्येक माणसांमध्ये काहीना काही गुणविशेष असतात आणि त्याचा कल्पकपणे उपयोग करून घेतला तर या मुलांचा समाजाला व पर्यायाने या समाजाचा मुलांना उपयोग होऊ शकेल. या विचारमंथनातूनच ‘युवा परिवर्तन’ची संकल्पना आकाराला आली आणि या संस्थेतर्फे या शालाबाह्य़ वा कमी शिक्षित मुलांच्या हातांना व्यावसायिक प्रशिक्षणातून काम द्यावं व त्यांना वाईट मार्गाला जाण्यापासून रोखावं, स्वबळावर उभं राहण्याचं सामथ्र्य द्यावं, हाच यामागचा मुख्य हेतू होता. आम्ही ‘युवा परिवर्तन’तर्फे वायरमन, एसी, रेफ्रिजरेटर, मोटर मॅकेनिक, मोटर ड्रायव्हिंग, मोबाइल रिपेअरिंग, टेलर, फॅशन डिझायनिंग, ब्युटिशियन, मेहेंदी, नर्सिग, रिटेलिंग, हॉस्पिटॅलिटी, कॉम्प्युटर, इंग्रजी संभाषण कौशल्य तसेच ग्रामीण भागात शेती, मत्स्यपालन यांचे प्रशिक्षण देतो. मुलांना व्यवसायासाठी आवश्यक क्षमता, व्यक्तिमत्त्व विकास, समुपदेशन यांचेही प्रशिक्षण देतो. आम्ही काही उद्योजकांशी संपर्क साधून या मुलांना काम देण्यासाठीही प्रयत्न करतो. अनेकदा उद्योगक्षेत्रातून आमच्याकडे काही विशिष्ट कौशल्य असलेल्या कामगारांची मागणी होती आणि ती आम्ही पूर्ण करतो. यामुळे उद्योजक आणि आमचे प्रशिक्षणार्थी यांच्यात एक मेळ साधला गेला आहे. विशेष म्हणजे छोटय़ा-मोठय़ा गुन्ह्य़ांमध्ये अडकलेल्या युवकांचे तुरुंगाबाहेरचे जग अधिक सुरक्षित व्हावे यासाठी त्यांना आम्ही व्यावसायिक प्रशिक्षण देतो. जेणेकरून तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांच्यावरील गुन्हेगाराचा ठपका पुसला जाऊन एक उत्तम कामगार या दृष्टिकोनातून पाहिले जावे आणि त्याचा जीवनातील पुढचा रस्ता भरकटणार नाही, याचीही आम्ही काळजी घेतो.
‘युवा परिवर्तन’तर्फे आम्ही राज्याराज्यांतील खेडोपाडी प्रशिक्षण कॅम्प आयोजित करतो. आतापर्यंत आम्ही ३०० कॅम्प्स घेतले. त्यात गावातील तरुण मुलांना शोधून त्यांना प्रशिक्षित करतो. या मुलांना मोबाइलवर प्रशिक्षण देण्याची योजना आखत आहोत.
नक्षलवादी भागात काम करताना आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दंतेवाडामध्ये आमच्या प्रशिक्षकांना मावोवाद्यांनी पकडून नेलं. सुदैवाने ते प्रशिक्षक या माओवाद्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाले. आम्ही नक्षलवादी कारवाया करतो म्हणूनही आमच्या प्रशिक्षकांना बीएसएफवाल्यांनी पकडलं होतं, पण आमचं काम पाहून त्यांनी त्यांना सोडून दिलं. माओवादी, नक्षलवादी भागांमध्येही तिथल्या भविष्याबद्दल निश्चितता नसलेल्या, गोंधळलेल्या युवकांशी संवाद साधून त्यांना विशिष्ट प्रशिक्षणासाठी त्यांचे मन वळवतो, मात्र हे काम खूपच जिकिरीचे आहे. तरीही आमचे प्रशिक्षक व्रतस्थपणे हे काम करतात. जगदालपरूमध्ये वेश्यांना व्यवसाय प्रशिक्षण देत आहोत. त्यांना या नरकयातनांमधून बाहेर काढून मानाने जगण्यासाठी विविध प्रशिक्षण देत आहोत.
मला इथे एक विशेष बाब नमूद करावीशी वाटते की, जम्मू-काश्मीरमध्येही आम्ही युवा प्रतिष्ठानतर्फे प्रशिक्षण सुरू केले आहे. खरं तर इथलं काम कसं सुरू होईल हीच चिंता होती, पण आमच्या प्रशिक्षकांनी हा खडतर मार्ग पार करून प्रशिक्षण योजना यशस्वीपणे राबवली. अगदी पाकिस्तानच्या सीमेवरील लच्चीपोरा गावातही आम्ही स्थानिक कलाकौशल्यावर आधारित कॅम्प आयोजित करतो. तिथे २० ते ४० प्रशिक्षणार्थी महिला सहभागी होतात. काश्मीरमधील एकूण वातावरण पाहता ही आमच्यासाठी मोठी झेप आहे, असेच मला वाटते.
आम्ही युवा प्रतिष्ठानतर्फे ‘युवापर्वितन लाइव्हहूड एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज’ही सुरू केले आहे. याद्वारे आम्ही आमच्याकडे प्रशिक्षणार्थीना नोकरी देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मागे वळून पाहताना गेली २५ वष्रे आपण या क्षेत्रात आहोत यावर विश्वास बसत नाही. कारण श्रद्धेने काम करीत गेले आणि कामाचा विस्तार होत गेला. मागे वळून पाहताना आपण बराच पल्ला गाठलाय, पण स्वस्थ बसायचं नाही, आणखीही खूप गाठायचय हे लक्षात येतं. आपण हे कसं करू शकलो, याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा याची मूळं मला बालपणीच्या संस्कारांमध्ये दिसतात. माझे आई-वडील हे ब्राह्मो समाजाची तत्त्वे पाळणारे होते. आत्या आणि तिचे पती ग. ल. चंदावरकर हे दोघंही प्रार्थना समाजाचे. लहानपणी सुट्टीत मी नेहमी माझ्या आत्याकडे राहायला जात असे. त्यामुळे या विचारांचा माझ्यावर खूपच पगडा होतो. त्यामुळेच मी सामाजिक कामांना जास्त महत्त्व दिलं. सुदैवाने खेर कुटुंबही सामाजिक बांधीलकी जपणारं असल्यानेच मी हा पल्ला गाठू शकले. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम माझ्या मनाला समाधान देणारं आहे. या वेळी तळागाळातील समाजाची दु:खं, त्यांच्या व्यथा खूप जवळून पाहायला मिळतात. प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण त्यांना प्रतिष्ठा मिळवून देतो, याचं एक समाधान आहे.
मात्र, एक अनुभव नमूद करावासा वाटतो. आमच्या एका प्रशिक्षणार्थीने नर्सिगचा कोर्स पूर्ण केला. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर ती ज्या झोपडपट्टीत राहायची तिथले लोक तिला आदराने वागवू लागले. कोणी आजारी पडलं की लगेच तिला बोलावलं जाऊ लागलं आणि तिही त्यांना मदत करू लागली. या कोर्समुळे लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला, आपल्याला प्रतिष्ठा मिळाली या भावनेनेच तिच्यात मोठा आत्मविश्वास आला होता. या प्रशिक्षणामुळे या गरीब लोकांमध्ये झालेलं परिवर्तन मनाला दिलासा देतं. आमच्या प्रशिक्षकांची चिकाटी पाहूनही हे काम करण्याचं बळ अधिक वाढतं.
भरकटणाऱ्या युवापिढीला काम देणं, देशात सक्षम कामगार उपलब्ध करून देणं, तसेच शालाबाह्य़ मुलांमधील कलाकौशल्य ओळखून त्यांना प्रशिक्षित करून काम उपलब्ध करून देणं, हे सक्षम समाज घडविण्यासाठी मला फार मोलाचं वाटतं आणि या कामात खारीचा का होईना, पण महत्त्वाचा वाटा असल्याबद्दल मी समाधानी आहे.
शब्दांकन: लता दाभोळकर
पत्ता- युवा परिवर्तन
परिश्रमालय, प्लॉट नं. ६१-६२, बांद्रा (पूर्व),
मुंबई –  ४०००५१
दूरध्वनी क्रमांक – २६४७४३८१/ २६४७९१८९
ईमेल – info@yuvaparivartan.org
वेबसाइट –  http://www.yuvaparivartan.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा