नाशिक शहरातील एक स्त्री. आपलं घरदार-नोकरी सोडून नर्मदा परिसरातल्या खेडय़ातल्या मुलांना शिकवण्यासाठी आली. २००९ मध्ये लेपा गावात सुरू झाला पहिला अभ्यासवर्ग अर्थात ‘नर्मदालय’, आली फक्त चौदा मुलं. पण महिन्याभरात ही संख्या १३२ झाली. पुढे २७ शिक्षिकांच्या मदतीने, लेपा, आमलाथा, नहारखेडी, ससाबड, भग्यापूर, नगावा, मोगावा, टिग्रीयॉव अशा आठ खेडय़ांतील ८५० मुलांपर्यंत ही शिक्षणाची ‘नर्मदा’ वाहत गेलीय.. हा प्रवास इतका सोपा नव्हता.. कोणकोणते प्रवाह पार करावे लागले ते भारती ठाकूर यांच्याच शब्दांत..
माझ्या आयुष्याची सरळ, साधी, सोपी वाट आमूलाग्र बदलण्यास कारणीभूत ठरली ती माझी नर्मदा परिक्रमा. हजारो वर्षांची परंपरा असलेली नर्मदा खोऱ्यातील संस्कृती, वैविध्यपूर्ण अशी जैविक संपदा धरणांच्या पाण्याखाली जाण्याआधी एकदा डोळे भरून पाहून घ्यावी, या उद्देशाने आम्ही तीन मैत्रिणींनी १४ ऑक्टोबर २००५ ते १२ मार्च २००६ या कालावधीत परिक्रमा केली.
त्या वेळी नर्मदेच्या किनाऱ्यावरील वस्त्यावस्त्यांमधून जात असताना, तिथल्या ग्रामवासीयांबरोबर संवाद साधताना, त्यांचं जगणं जवळून पाहताना एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली- ती म्हणजे आजूबाजूला दिसणारी ही समृद्धी गावकऱ्यांच्या प्रत्यक्ष जीवनात मात्र दिसत नाहीए. यापाठच्या कारणाचा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की जमीन मूठभर लोकांच्या मालकीची आहे आणि त्यावर मजुरी करणाऱ्यांचं किंवा अल्प भूधारकांचं प्रमाण मात्र प्रचंड आहे. त्यातही कापूस आणि मिरची तोडण्यासाठी बालमजुरांचा वापर मोठय़ा प्रमाणात होतोय. महेश्वर तालुक्यातील मंडलेश्वर गावाजवळ होत असलेल्या श्रीमहेश्वर वीजनिर्मिती प्रकल्पामुळे २२ गावे या धरणाच्या डूब क्षेत्रात येतात. काही गावातील विस्थापितांना घराची नुकसानभरपाई आणि पुनर्वसनासाठी जमीन मिळाली आहे, तर काही ठिकाणी ही प्रक्रिया चालू आहे.
तिथल्या बऱ्याच बायकांनी त्यांचं दु:ख आमच्यापाशी मोकळं केलं. म्हणाल्या, ‘नुकसानभरपाईचा पैसा घरातल्या पुरुष मंडळींनी दारूत, जुगार खेळण्यात किंवा गरज नसताना मोटारसायकली विकत घेण्यात वाया घालवला. आता तर घर बांधायला पैसा आहे कुठे? होती ती शेतजमीन गेली. आता तर मजुरीसाठीदेखील आसपास शेतं उरली नाहीत. मग पुढच्या पिढीने उपजीविकेसाठी काय करायचं? ‘‘आम्ही पाहिलं की बहुतांश खेडय़ामध्ये फक्त प्राथमिक किंवा माध्यमिक (आठवीपर्यंत) शाळा आहेत. आठवीपर्यंत शिकूनही अधिकांश मुलांना स्वत:चं नावदेखील लिहिता येत नाहीये. शिक्षण नाही, वडीलधाऱ्यांचे ‘दारू-विडी-गुटखा-जुगारांचे’ आदर्श समोर असल्याने तरुण पिढीदेखील त्याच मार्गाने जातेय. त्यांच्या या प्रश्नाने मला अस्वस्थ-अंतर्मुख केलं आणि परिक्रमेत असतानाच मी निश्चय केला की परिक्रमा पूर्ण झाल्यावर या परिसरात बाल शिक्षणाच्या क्षेत्रात काम सुरू करायचं.
याआधी विवेकानंद केंद्राच्या वतीने आसाममध्ये शाळा सुरू करण्याचा अनुभव माझ्या गाठीशी होता. तिथल्या ‘गोलाघाट’ गावात शाळा सुरू करण्याच्या प्रकल्पाची पूर्ण उभारणी करण्यासाठी मी तिथे बिनपगारी रजेवर ४ वर्षे राहिलेही होते. शिवाय नाशिकमध्ये २० वर्षे झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्याच्या अनुभवाची शिदोरी बरोबर होती. आई-वडील गेल्यापासून २०-२२ वर्षे मी एकटीच राहत असल्यामुळे तोही पाश नव्हता. मनाचा कौल मी स्वीकारला आणि २५ वर्षांच्या केंद्र सरकारच्या नोकरीचा राजीनामा देऊन मी २६ जुलै २००९ या दिवशी नाशिक सोडलं आणि बॅग घेऊन सरळ मध्य प्रदेशातील ‘मंडलेश्वर’ या गावी दाखल झाले.
मात्र महाराष्ट्रातल्या कोण्या एका नाशिक शहरातील एक स्त्री आपलं घरदार-नोकरी सोडून फक्त आमच्या खेडय़ातल्या मुलांना शिकवण्यासाठी इथे येऊन राहिली आहे, ही गोष्ट कुणाच्याच पचनी पडणारी नव्हती. ही बिकट वाट ‘वहिवाट’ करणं हे एक मोठ्ठं आव्हान होतं. पहिला अभ्यासवर्ग (मी त्याला नर्मदालय असं नाव दिलंय) ‘लेपा’ या गावात सुरू झाला. वर्मा समाजाची धर्मशाळा यासाठी ‘मोफत’ मिळली. १७ ऑगस्ट २००९ हा तो दिवस. पहिल्या दिवशी घरोघरी जाऊन सांगितल्यावरही फक्त चौदा मुलं आली. पण महिन्याभरात ही संख्या १३२ झाली आणि ६ महिन्यात अजून ५ खेडय़ांमध्ये १० शिक्षिका आणि २ समन्वयकांच्या मदतीने नर्मदालयं सुरू झाली. पुढचं पाऊल म्हणजे स्थानिक लोकांना सहभागी करून, विशिष्ट ध्येय-धोरण ठरवून आम्ही सर्वानी मिळून नर्मदा (NARMADA- निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट असो.) या संस्थेची स्थापना केली. आज आमचा हा पसारा २७ शिक्षिकांच्या मदतीने, लेपा, आमलाथा, नहारखेडी, ससाबड, भग्यापूर, नगावा, मोगावा, टिग्रीयॉव अशा आठ खेडय़ांतील ८५० मुलांपर्यंत वाढलाय.
माझ्या सहशिक्षिका कोण- तर त्या त्या गावातील १२ वी किंवा १२ वी + शिकलेल्या बायका-मुली. आपल्या गावातील मुलांनी शिकलंच पाहिजे ही जिद्द त्यांची प्रमुख पात्रता. या कामासाठी त्यांना ‘ए.डी.एम. कॅपिटल फंड’ हा एन.जी.ओ. दरमहा १५०० ते १८०० रुपये पगार देतो. नर्मदालयाची वेळ सकाळी साडेसात ते दहा. त्यानंतर मुलं शेतात किंवा अन्य कामावर जातात. काम नसेल तेव्हा तिथल्या सरकारी शाळेत जातात. नर्मदालयात येण्यासाठी इथल्या ७ ते १४ वयोगटातील मुली पहाटे साडेचार- पावणे पाचला उठतात. चुल्हा पेटवून घरातील सगळ्यांचा स्वयंपाक करून ठेवतात आणि मग ३ ते ४ मैल चालत नर्मदालयात येतात. थंडी, ऊन वा पाऊस असो त्यांचा हाच दिनक्रम. इतके कष्ट घेऊन या मुली शिकताहेत. त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याची समाजाची दृष्टी बदलतेय- ही गोष्ट आम्हा शिक्षिकांना बळ देतेय.
नर्मदालय सुरू झालं तेव्हा पहिले दोन महिने फक्त गाणी, गोष्टी, खेळ आणि गप्पा एवढाच अभ्यासक्रम होता. मुलं आंघोळ न करता अस्वच्छ कपडय़ात यायची. अनेक मुलांना खरूज झालेली होती. त्यामुळे इथे येण्यासाठी पहिली अट होती ती ‘स्वच्छ आंघोळ करून धुतलेले कपडे घालून, केस विंचरून येण्याची.’ मुलांना खरूजमुक्त करण्यासाठी प्रथम एक वैद्यकीय शिबीर घेतलं. त्यांच्या आया-बहिणींशी संवाद साधला. रोजच्या पाठपुराव्याने मुलं २/३ महिन्यांत खरूजमुक्त झाली.
त्या दोन-तीन महिन्यांत मी रोजच किमान ५ मिनिटं मुलांशी साबण लावून स्वच्छ आंघोळ आणि धुतलेले कपडे घालणं याबाबतीत बोलायचे. एकदा एका मुलाने मला विचारलं, ‘आम्ही गरीब आहोत, रोजचा रोज साबण आम्हाला कसा परवडणार? मी काही बोलले नाही, पण थोडय़ा वेळाने मुलांशी संवाद साधताना त्यांना सहज प्रश्न केला, ‘तुमच्या घरात गुटखा तंबाखू किती जण खातात?
‘‘वडील, आजोबा, काका, दादा, आई-आजीसुद्धा!’’ असं उत्तर प्रत्येकाकडून आलं. प्रत्येकाची रोज किमान १० पाकिटं.. शिवाय विडी-सिगारेट, दारूही.
मुलांना त्यांच्या घरातील या व्यसनांवर होणाऱ्या खर्चाचा हिशेब करायला सांगितला. त्या पैशांत केळी, चिकू, पेरू अशी फळं, जीवनावश्यक वस्तू, साधे पण स्वच्छ कपडे, औषधोपचार यावर खर्च करता येऊ शकतो हे सांगितलं. या व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणामही समजावले. थोडा आणखी हृदयाला हात घातल्यावर मुलांनी आपापल्या दप्तरातील गुटख्याच्या पुडय़ा पुन्हा न खाण्याच्या निर्धाराने माझ्याकडे दिल्या. एक अस्वस्थ करणाऱ्या विचाराचं बीज त्या दिवशी त्यांच्या मनात रुजलं हे नक्की. या प्रश्नमालिकेची उजळणी दर दोन-तीन दिवसांनी आम्ही करत असतो. यांचं फळं म्हणजे आज नर्मदालयाची सर्वच्या सर्व मुलं व्यसनमुक्त झालीयेत.
कधी कधी आयुष्याचं विदारक वास्तव या मुलांबरोबर अनुभवायला मिळतं. मुलांच्या गैरहजेरीची कारणं शोताना कुणाचे वडील अखंड दारूत बुडलेले म्हणून उपजीविकेसाठी त्या लहानग्याला सकाळपासून उपसावे लागणारे अपार कष्ट किंवा कुणाची एकच खोली म्हणून वडिलांना स्वत:चे देहधर्म उरकण्यासाठी मुलाला दारू पाजून झोपवण्याचा नेम.. अशा नव्यानव्या अनुभवातून धडे घेत माझं जीवनशिक्षण सुरू आहे.
नर्मदालयात क्रमिक पुस्तकं नाहीत. इंग्रजी, गणित, हिंदी व पर्यावरण हे विषय मुलांना आम्ही ‘स्वत:च आखलेल्या अभ्यासक्रमानुसार शिकवतो. इथे येणाऱ्या मुलांकडे तीन तासांहून जास्त वेळ नाही. त्यामुळे इच्छा असूनही इतर विषय शिकवता येत नाहीत. पर्यावरण हा विषय मुलं कधी शेतात, तर कधी नर्मदाकिनारी जाऊन समजून घेतात. शेती संदर्भात मला ठाऊक नसलेल्या बऱ्याच गोष्टी मुलं मला सांगतात आणि आम्ही परस्परांचे गुरू होतो. भाषेच्या बाबतीतही मी त्यांना इंग्रजी शिकवते, ती मला निमाडी भाषा शिकवतात.
मुलांचं प्रेम असं लगेच मिळालं. हळूहळू ग्रामस्थांचा विश्वासही वाढू लागला. नर्मदालयं ही सरकारी शाळांच्या इमारतीत त्या शाळा उघडण्याआधी भरतात. एकदा एका गावात कुणा अहंमन्याच्या सांगण्यावरून सरकारी शाळेची जागा वापरण्यास मज्जाव करण्यात आला. ही गोष्ट समजताच एका गावकऱ्याने आपल्या गोठय़ातील गाई-म्हशी तात्काळ दुसरीकडे हलवल्या आणि तिथे फरशा घालून ती जागा नर्मदालयाच्या स्वाधीन केली. आणखी एका शेतकऱ्याने आपली दोन-तीन बिघा जमीन आमच्या मुलांना मैदानी खेळांसाठी दिली- विशेष म्हणजे या दोघांचीही मुलं नर्मदालयात जाण्याच्या दृष्टीने मोठी होती तरीही. नर्मदालयं रुजताहेत, बहरताहेत याचं मूळ या सहकार्यात आणि आमच्या टीमवर्कमध्ये असावं.
२३ जानेवारी २०१२ या दिवशी माझी उमेद वाढवणारी आणखी एक अनपेक्षित घटना घडली. त्या परिसरात राहणारे, पण माझ्याशी परिचय नसलेले एक नागा साधू ‘संत राजगिरी महाराज’ अचानक नर्मदालयात आले. म्हणाले, ‘‘गेली ३ वर्षे मी तुझी धडपड बघतोय. मला विस्थापित म्हणून सरकारकडून ‘लेपा’ गावात ५५०० स्क्वेअर फुटांचा एक प्लॉट मिळालाय. त्यावर आम्ही २५०० स्क्वेअर फुटांचा एक आश्रमही बांधलाय. मी आज इथे तर उद्या तिथे. तेव्हा हा आश्रम मी तुमच्या कामासाठी दान देऊ इच्छितो.’’ त्या साधूच्या मुखातून जणू नर्मदामाईचा आशीर्वादच मिळाला.
पाच मोठ्ठे हॉल, दोन छोटय़ा खोल्या व एक स्वयंपाकघर अशी रचना असलेला हा आश्रम (नव्हे आश्रमशाळा) आता नर्मदालयाचं मुख्यालय बनलाय. इथे मुलांसाठी कार्यानुभवाचे वर्ग, शिक्षकांचं ट्रेनिंग, हिशेब लिहिणे.. इ. कामं चालतात. ‘प्रथम कौन्सिल फॉर व्हर्नरेबल चिल्ड्रेन’ हा एन.जी.ओ. आमच्या पाठीशी उभा आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये नागपूरच्या ‘रविराज सी.एस.आर.’ या उद्योगाने एक ‘पिकअप व्हॅन’ही भेट दिलीय. पावसाळ्यात जागोजागी चिखलात फसल्याने तिला वेळोवेळी ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढावी लागे ही गोष्ट वेगळी, पण कामाचं मोल लोकांपर्यंत पोहोचतंय हे महत्त्वाचं.
या वाटेवर ‘काचा असणं’ तर अपरिहार्यच होतं. एका बाहेरच्या बाईमुळे आपल्या गावचं विश्व ढवळून निघतंय, हे गावातील काहीही न करणाऱ्या पुरुषांना मानवणारं नव्हतंच. त्यानुसार एका गावात माझ्याविरुद्ध आंदोलनं सुरू झाली. पण त्या वेळी गावातल्या सर्व स्त्रिया एकजुटीने माझ्या पाठी उभ्या राहिल्या. त्यातील स्वाती या माझ्या सहशिक्षिकेने तर भलतंच धाडस केलं- त्या दिवसापासून तिने आपल्या डोळ्यांपर्यंत ओढलेला घुंगट मागे सारून पदर कमरेला बांधला. (तिथे ही एक क्रांतीच होती). ती म्हणाली, ‘‘पदर हा आदर दाखवण्यासाठी असतो आणि आदर काही मागून मिळत नाही.’’ आपला विरोध या पद्धतीने नोंदवून तिने त्या दिवसापासून पदर बांधून, चार मैल सायकल चालवत नर्मदालयात यायला सुरुवात केली. तिच्या पावलावर पाऊल ठेवत रेश्मा, मंजिता, स्वप्ना, नजमा, रुकसाना.. अशा अनेक स्त्रियांनी माझ्या शिडात वारं भरलं.
आमचं ध्येय आहे, इथल्या मुलांना शालेय शिक्षणाबरोबर पर्यावरणाचे धडे देणं, त्याचबरोबर व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन स्वावलंबी बनवणं. गाडय़ांची दुरुस्ती, प्लम्बिंग, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मोबाइल रिपेरिंग.. असं शिक्षण त्यांना किमान पातळीवरील जीवन जगण्यासाठी मदतीचा हात देईल असं आम्हाला गरज आहे. शिखर खूप दूर आहे.. गरजा अनंत आहेत, पण प्रामाणिक इच्छा व जिद्द यांचा विजय होतो हे मला पक्कं ठाऊक आहे. निमाड परिसरात बालशिक्षणाचं बीज लावण्याचा आनंद मी घेतलाय; काही वर्षांत त्याचं झाड होईल हा विश्वास आहे.
(शब्दांकन- संपदा वागळे)
संपर्क- भारती ठाकूर
चौहान सदन, श्रीनगर कॉलनी, मंडलेश्वर,
जिल्हा खारगोन, मध्य प्रदेश.
वेबसाइट – http://nimarabhyudaya.org
ई-मेल – thakurbharati@yahoo.com
दूरध्वनी -०९५७५७५६१४१