आर्थिकदृष्टय़ा निम्नस्तरातील मुलांना न्यूनगंडातून बाहेर काढून आत्मविश्वास देण्याच्या भावनेतून, मुलांच्याच सहकार्याने सुरू केलेल्या ‘गंमतशाळा’ची संख्या आता १२ झाली आहे. तर आपल्या अत्याचाराविषयी व्यक्त व्हावं यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘चाइल्ड लाइन’ला आता दरमहा सुमारे २५००० कॉल्स येतात. मुलांनी  स्वत:ला घडवावं यासाठी डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे गेली १२ वर्षे प्रयत्नशील आहेत. त्यांचे प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याच शब्दांत..
आपण न ठरविता आयुष्यात काही गोष्टी घडत जातात. का घडते, कोण घडविते याला उत्तर नाही. वळून पाहता, माझ्या आयुष्याचा हा जणू नियमच आहे, असे दिसते. मात्र हेही खरे की, ज्या दिशेला मला त्या कोणी अनाकलनीय शक्तीने ढकलले त्या रस्त्याने जाताना इतरांना मी काय दिले माहीत नाही. मात्र या प्रवासात माझे स्वत:चे आयुष्य समृद्ध झाले, हे निर्विवाद.
एक अस्सल पुणेकर म्हणून, घरातील संस्कृती म्हणून, सर्व तऱ्हेच्या सार्वजनिक उपक्रमांत हिरिरीने भाग घेणे, खूप वाचन करणे, संधी मिळेल तेथे व्याख्याने ऐकणे, खूप तऱ्हेचे कोर्सेस करणे, हे उद्योग इतरांसारखे मीही केले, पण शिकविण्याची कला अंगभूत ओळखली म्हणून, आवड म्हणून तसेच एक सुरक्षित करिअर म्हणून अध्यापन हेच ध्येय ठरविले होते. एम.एस्सी.च्या पलीकडे शिकायचे नाही हा निर्णय योगायोगाने मोडला गेला आणि मी पीएच.डी. केली. या प्रवासात दैवगतीनेच म्हणावे लागेल, काही सामाजिक प्रकल्पात ओढली गेले आणि त्यातच रमले. असे जाणवले की, कॉलेजात परीक्षार्थी विद्यार्थिनींना एकच विषय शिकविण्यापेक्षा, समाजातील विविध घटकांपर्यंत आपल्याला नशिबाने मिळालेले ज्ञानभांडार पोहोचविणे अधिक समाधान देणारे तर आहेच, पण आव्हानात्मकही आहे. मुळातच ज्या समाजाला शिकावेसे वाटत नाही, शिक्षणाचे महत्त्व नाही, त्यांच्यापर्यंत ज्ञान पोहोचविणे नक्कीच आनंददायी.
स्थानिक गरजांवर आधारित समाज-विकासाचा हा प्रकल्प होता. अशाच एका वस्तीत महिला केंद्रित उपक्रम राबवीत असता अशी घटना घडली की, ज्याने कामाची दिशा तर निश्चित झालीच, पण आयुष्यभराची न संपणारी समाधानाची शिदोरीही मिळाली. घडले असे की, या वसाहतीतल्या पालकांशी सहज चर्चेतून असे बाहेर पडले की, ते मुलांना शाळेत पाठवीत होते ते शिक्षणाचा अर्थ, महत्त्व पटले आहे म्हणून नव्हे, तर त्यात ‘आम्ही शाळेत पाठवतो’ हा दिखाऊ भाग जास्त होता. हे पालक आपल्या स्वत:बद्दल व आपल्या मुलांबद्दल एक प्रकारचा न्यूनगंड बाळगून आहेत, हे लक्षात आले. हे मला फार धोक्याचे वाटले आणि विचारचक्र सुरू झाले. गरीब वस्त्या/ झोपडपट्टय़ा यांमध्ये राहणाऱ्यांची लोकसंख्या व सुशिक्षित समाजाची लोकसंख्या याचे गणित नेहमीच व्यस्त राहिले आहे. ही दरी वाढतच जाणार, हेही एक सत्य. संख्येने वाढती असलेली, न्यूनगंडाने ग्रासलेली त्यामुळे शैक्षणिकदृष्टय़ा अप्रगत राहिलेली, म्हणून आयुष्यात प्रगती न करू शकलेली, पर्यायाने वैफल्यग्रस्त व व्यसनाधीन झालेली, कदाचित गुन्हेगारी मार्ग स्वीकारलेली बहुसंख्य एकीकडे; तर कुटुंबात एक किंवा दोनच मुले असतील व त्यांना उत्तमातील उत्तम शिक्षण मिळेल त्यासाठी झटणारी मध्यमवर्गीय कमसंख्या दुसरीकडे. याने देशाला विघातक स्थिती निर्माण होऊ शकते. अत्युच्च शिक्षणप्राप्त थोडय़ांनी असमाधानी बहुसंख्येवर राज्य करणे अथवा उलट परिस्थिती- याने असमतोल निर्माण होऊन राष्ट्राच्या प्रगतीला बाधक परिस्थिती तयार होणे अपरिहार्य आहे.
हा झाला लांबचा विचार, पण समोर दिसणाऱ्या न्यूनगंडाच्या घसरगुंडीवरून ज्यांचा प्रवास सुरू झालाय त्यांचे काय? या न्यूनगंडामुळेच भरमसाट प्रमाणावर शालेय गळती होते. एकदा शाळेबाहेर पडलेली मुले बाल-कामगार तरी होतात, नाही तर बाल गुन्हेगार तरी. मुलींचे बालपण १३-१४ व्या वर्षी लग्न लावून हिरावले जाते.
हा न्यूनगंड काढायचा तर मुलांना त्यांच्यातील ताकद दाखविली पाहिजे. या भावनेतून, मुलांच्याच सहकार्याने पहिली ‘गंमत शाळा’ सुरू केली. साधारण १९९० च्या सुमारास संकल्पना अशी होती की, ‘आम्ही बिचारे’, ‘आम्ही कोणीच नाही’ पासून मुलांना ‘आम्हीही कोणीतरी’पर्यंत प्रथम घेऊन जायचे- अस्मितेची जाणीव द्यायची. मुलींना या खेळ-गटासाठी बाहेर काढणे हे पहिले आव्हान, तर मुला-मुलींनी एकत्र खेळणे हे त्याहूनही कठीण आव्हान. ते पार केले. सर्व मुलांनी शाळेत गेले पाहिजे व टिकले पाहिजे हे पुढचे आव्हान. त्यासाठी पालकांना तयार करणे, वेळप्रसंगी स्वत: पालक बनून शाळेत जाणे, गरजू मुलींना वह्य़ा-पुस्तके मिळवून देणे असे एक एक अडथळे पार केले. शाळेत टिकण्यासाठी अभ्यासाची गोडी लागणे व परीक्षेतील यश ही पुढची आव्हाने. अवघड विषयांवर खेळ तयार केले आणि अस्मिता जागृती यशस्वी झाल्यामुळे ‘३५ टक्के, लाल रेघ नाही’ हे यशाचे अत्युच्च शिखर मानणारी मुले ८० टक्क्यांनीसुद्धा समाधानी राहीनात. गंमत शाळेची पुढची दिशा आणि त्याचे आजच्या ‘मॉडेल’ स्वरूपात परिवर्तन या सगळ्याचे श्रेय मी गंमत शाळेतील मुलांना देते. ती आव्हाने देत गेली आणि मॉडेल घडत गेले.
न्यूनगंड दूर करणे, त्यासाठी अस्मितेचे प्रत्यारोपण, त्यातून तयार होणारी महत्त्वाकांक्षा व हार न मानता यश मिळविण्याची जिगर, त्याबरोबर शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन ही जरी या कामाची आम्ही ठरविलेली दिशा असली तरी मुलांना त्यातली सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे ‘आमच्यासाठी कोणी तरी आहे, आमच्यावर ही मंडळी माया करतात, आमचे ऐकून घेतात’ व या भावनेतूनच सापडलेला एक मंत्र ‘ताई, तुम्ही आमच्यावर इतके प्रेम करता, तुम्हाला दगा कसा देणार? यशस्वी झालेच पाहिजे.’ विविध स्वरूपात गंमत शाळेचे मॉडेल स्टेशनवरच्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी, निरीक्षणगृहातील बाल गुन्हेगारांसाठी वापरले असता हे एकच वाक्य वारंवार ऐकायला मिळाले. बालक-पालकांच्या तुटत्या संवादाच्या आजच्या वर्तमानात सगळ्यांनाच मला वाटते खूप काही शिकण्यासारखे आहे.
प्रयोग म्हणून एका ठिकाणी सुरू केलेली गंमत शाळा ११-१२ ठिकाणी २-३ वर्षांतच पसरली. सगळीकडे सातत्याने तेच रिझल्ट मिळत राहिले- ० टक्के शाळा गळती, ० टक्के बाल गुन्हेगारी, ० टक्के बालकामगार वृत्ती, ० टक्के बालविवाह, सर्व मुले व मुली कॉलेजपर्यंत शिक्षण पूर्ण करतात. मुख्य म्हणजे वस्तीचे चांगले कार्यकर्ते बनतात. भंगार वेचणारी, बांधकामावर मजुरी करणारी, मोलकरणीची कामे करणारी माझी मुले आज मोठय़ा पदांवर काम करीत आहेत. आपले कुटुंब व्यवस्थित सांभाळत गंमत शाळेने दिलेली मूल्ये पुढे नेत आहेत. जुगाराच्या अड्डय़ांवरून वेचून वर्गात आणलेली मुले आज कार्यकर्ते बनून त्याच वस्तीत असे अड्डे होऊ न देण्याची दक्षता घेत आहेत. ही माझी रत्ने व हाच माझा मौल्यवान रत्नहार.
गंमतशाळांच्या माध्यमातून युवक, युवती, महिला, पालक, कार्यकर्ते यांच्यासाठीही प्रत्येक वस्तीत उपक्रम राबविले जातात.
‘चाइल्ड लाइन’
मुलांनी आमच्या कार्यकर्त्यांबरोबरचा हा मायेचा बंध फोनमधून चालू ठेवला. म्हणून ‘चाइल्ड लाइन’ ही २४ तास मुलांसाठी असलेली फोन सुविधा पुण्यात आणायचे सुचले. २००१ साली ज्ञानदेवीच्या माध्यमातून सुरू झालेल्या या सेवेचा प्रवास दरमहा सरासरी १५०० कॉल्सपासून २५००० पर्यंत पोहोचला. विविध प्रकारच्या शोषणातून मुक्ती, समुपदेशन, निवारा देणे इत्यादी सेवा चाइल्ड लाइन २४ तास ३६५ दिवस पुण्यातील मुलांना मोफत पुरविते.
‘चाईल्डलाईन’ रोजच नवा अनुभव देऊन जाते. त्यातले खूपसे अनुभव मनात घर करतात. एक अडीच ते तीन वर्षांची मुलगी रोज फोन करून आम्हाला नित्यक्रम सांगायची, गोष्ट सांग म्हणून हट्ट धरायची, गाणे ऐक म्हणायची तिच्या आईला तिच्यासाठी वेळच नव्हता. एका नववीतल्या मुलीने आत्महत्या करते म्हणून फोन केला. कारण कितीही मार्क मिळविले तरी तिच्या आईला आणि बाईला समाधान नव्हते. तिला त्यातून बाहेर काढले.
बालसेना
मुलांच्या हक्कांसाठी, त्यांनी स्वत:च सक्षम व्हावे म्हणून अनोखी अशी बालसेना २००६ साली सुरू झाली. एकमेकांना आधार देणे, शालेय प्रश्नांवर तोडगा काढणे, याबरोबरच नागरी प्रश्नांवर बालसेना काम करते. यातूनच उद्याचे सुजाण नागरिक तयार होतील.
संस्थेच्यावतीने बालसेनेचे काम सुरू करणं हाही एक योगायोगच होता. झालं असं की २००६ साली ज्ञानदेवीच्या स्थापनेला ५ वर्षे पूर्ण होत होती आणि ‘चाइल्ड लाइन’ची सेवा भारतात सुरू झाल्यालाही १० वर्षे पूर्ण होत होती. हे औचित्य साधून आम्ही पुण्यातील मुलांच्या समस्यांबाबत काही ठोस करण्याचे ठरविले. यासाठी आम्ही दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले. रस्त्यावरच्या मुलांपासून अगदी सुस्थितीतल्या कुटुंबातील मुलं-मुली, गतिमंद वा कर्ण-बधिर मुले तसेच फ्लॅटफॉर्मवर काम करणारी, भीक मागणारी मुलेही गोळा केली. त्यांच्यापुढील समस्या, त्यांच्या अम्डचणी जाणून घेतल्या. त्यांची वर्गवारी केली. मुलांच्या समस्या साध्या होत्या तर काही गंभीर होत्या, वडील आईवर हात टाकतात, रिक्षावाले काका जातीवरून उद्धार करतात, तर पालक चांगल्या अपत्याला विशेष वागणूक देतात किंवा बाबांच्या ऑफिसातील लोक आल्यावर पालक अपंग मुलाला घरात लपवून ठेवतात वगैरे वगैरे..मग या समस्यांवर आधारित छोटय़ा नाटिका, विडंबन गीते बसवली. दुसऱ्या दिवशी मुलांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या केलेल्या पालक, रेल्वे पोलीस, रिक्षावाले काका, शाळेतील बाई, शिपाई अशा साऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगितले. त्यांच्यासमोर मुलांनी आपल्या व्यथा नाटकाच्या-गाण्याच्या माध्यमातून मांडल्या. प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षकही अंतर्मुख झाले. पण अपेक्षेप्रमाणे काही आरोपींनी आडमुठे धोरण स्वीकारले. मुलांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मुले काहीशी नाराज झाली. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून संस्थेच्यावतीने ‘मुलांचे हक्क’ या विषयावर आम्ही कार्यशाळा घेतली होती. मुलांसाठी तो टर्निग पॉइंट ठरला. मोठय़ांकडून समस्या सोडवल्या जात नसतील तर आपणच सज्ज झाले पाहिजे, या निर्णयावर मुले आली. बालसभा आम्ही भरवत होतोच. त्याची सुधारित आवृत्ती म्हणून बालसेनेचा जन्म झाला. ‘मुलांकडून, मुलांच्यासाठी व मुलांकरिता’ अशा ध्येयाने बालसेना कार्यरत झाली. अर्थात आम्ही त्यांच्या मदतीसाठी होतोच. पण मुलांचा पुढाकार अचंबित करणारा होता. आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपणच लढायचं, हा मुलांचा निश्चय होता. शाळांमधील अस्वच्छ स्वच्छतागृहांचा मुद्दा मुलांनी सर्वप्रथम हाती घेतला. भरमसाठ फी आकारणाऱ्या अनेक शाळांमध्येही दुर्गंधीयुक्त, पाण्याची सोय नसणारी स्वच्छतागृहे होती. मुलांनी याविरोधात आवाज उठवला. त्या त्या शाळांच्या प्राचार्याना भेटून संबंधित मागणीचे निवेदन दिले व कार्यवाही होण्यासाठी पाठपुरावा केला. मुले ज्या शाळेत शिकतात तेथील मुलांनी जर हे मुद्दे उचलून धरले तर त्या मुलांच्या शैक्षणिक नुकसानीची भीती पालकांना होती. मग प्रत्येक शाळेतून दोन-तीन मुलाची निवड करायची व या मुलांची मिळून विभागीय समिती स्थापन करायची. या समितीचे सदस्य जाऊन संबंधित शाळांच्या प्राचार्याची भेट घेत असत. शाळेबाहेरील मुलांनी समस्या मांडल्याने कधीकधी प्राचार्याकडून सहकार्य मिळत नसे. पण हळूहळू या समितीचा दबाव तयार झाला व कामे मार्गी लागू लागली. मुलांचाही उत्साह दुणावला. त्यांच्यात नेतृत्त्वगुण विकसित होत गेले तसेच सामाजिक भान वाढू लागले. याच पद्धतीने मुलांनी सायकल ट्रक मोकळे नसणे, खेळासाठी मैदान नसणे, फूटबॉलसाठी प्रशिक्षक शोधणे, मध्यान्न भोजनाची अनियमितता अशा अनेक समस्यांचा छडा लावला. पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख बालसेनेच्या कामाने इतके प्रभावित झाले की त्यांनी याची शिफारस वरिष्ठ पातळीवर केली. अखेर पुणे जिल्ह्य़ासाठी जिल्हा परिषदेमार्फत २००७ साली बालसेनेसाठी प्रतिनिधी पाठवण्याचा अध्यादेश काढला. संस्थेच्या कामाचे चीज झाले. बालविवाह, शाळेची वाचनालये पूर्णवेळ कार्यान्वित करून घेणे अशा अनेक समस्यांवर अनेक शाळांमधून बालसेनेने तोडगा शोधला. मुलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले व जबाबदारीची आपुलकीने जाणीव करून दिली की प्रौढांपेक्षाही मुले अधिक संवेदनशीलपणे वागतात. त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवतात, हा माझा आजवरचा अनुभव आहे.
गंमतशाळेची संकल्पना इतरही शाळांमध्ये राबवल्यानंतर हाती येणारे परिणाम कायमच उल्लेखनीय  होते. म्हणून गंमतशाळेच्या विस्ताराकडे अधिक लक्ष केंद्रीत झाले. तरीही बालसेना हा आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.  १७ जणांची प्रशिक्षित टीम ज्ञानदेवीचा व्याप सांभाळते आहे तर १२ जणांचे पथक चाइल्डलाइनसाठी अहोरात्र कार्यरत आहे.
पण एक आहे, येणारे अनुभव खूपच समाधान देतात. एक १२-१३ वर्षांची ताई, तिचा ८ वर्षांचा भाऊ व ४ वर्षांच्या बहिणीबरोबर भीक मागताना सापडली. त्यांचे व्यसनी वडील त्यांच्या भिकेवर जगत. त्यांना निरीक्षण गृहात दाखल केले. भेटायला गेले तर ताई अतीव समाधानाने ४ वर्षांच्या छोटीला गरम वरण-भात भरवित होती. म्हणाली , ‘पहिल्यांदा ताजे स्वच्छ अन्न खाल्ले. आता फक्त शाळेत घाला.’ अशाच दोन बहीण भावंडांना त्यांच्या अत्याचारी बापाच्या कचाटय़ातून सोडविले. दोघांनांही जेवण माहितच नव्हते. भरले ताट पाहून बहीण ढसाढसा रडली. असे अनुभव अस्वस्थ करतात.
सगळ्यात त्रास होतो लैंगिक शोषण झालेली छोटी बाळे बघताना. एका अशा अत्याचारित मुलाला इतका रक्तस्राव झाला होता की त्याला ५२ टाके घालावे लागले. पण त्याहीपेक्षा त्याच्या मनाच्या झालेल्या चिंध्या त्याच्या भेदरलेल्या चेहऱ्यावर आणि शून्य नजरेत दिसत होत्या त्या पाहून आम्ही कोणीच अश्रू आवरू शकलो नाही.

ज्ञानदेवी
ज्ञानदेवी ही एक स्वयंसेवी संस्था असून, पुणे व परिसरातील दुर्बल घटकांसाठी विकास प्रकल्प नियोजन, नियोजनात मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रकल्प राबविणे, संशोधन व प्रशिक्षण अशा स्वरूपाचे काम करते. पुण्यामधील झोपडपट्टय़ांमध्ये संस्थेतर्फे राबविला जाणारा ‘गंमतशाळा’ हा वंचित मुलांसाठीचा अनेक पारितोषिक प्राप्त असा शैक्षणिक प्रकल्प सुप्रसिद्ध आहे. अस्मिता रोपण करून न्यूनगंड घालविल्यास मुले शैक्षणिक व एकूणच आयुष्य प्रगती करतात. हे या प्रयोगाने वेळोवेळी सिद्ध करून शाळा गळती संपूर्णत: रोखणे, बाल कामगार व बाल गुन्हेगारी थांबविणे यात सातत्याने २५ वर्षे यश मिळविले आहे. याच प्रयोगाच्या माध्यमातून निरीक्षण गृहातील बालगुन्हेगार, रस्त्यावर राहणारी मुले यांच्यात सकारात्मक बदल घडविण्यात व स्टेशनवरील मुलांमधील व्यसनाधिनता दूर करण्यात संस्थेला यश आले आहे.
२००१ पासून अडचणीत सापडलेल्या मुलांसाठी असलेली ‘चाइल्ड लाइन’ ही फोनसेवा पुण्यात संस्थेतर्फे चालविली जाते. तसेच ‘बालसेना’ हा पुण्यातील सर्व स्तरातील मुलांच्या सबलीकरणाचा उपक्रम राबविला जातो. पौंगडावस्थेतील मुलांना मार्गदर्शन, बालकांचे शोषण, बालविवाह याबद्दल जागृति उपक्रम गेली १९ वर्षे चालविण्यात येणाऱ्या बालनाटय़ व खुल्या नृत्य स्पर्धा हे संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी काही डॉ. सहस्रबुद्धे यांनी संस्थेसाठी लैंगिक शिक्षण मार्गदर्शिका, खेळ, गाणी, गोष्टी, नाटके, हस्तकला, अशा विविध विषयांवरील २० पुस्तके प्रकाशित केली आहेत.

NEET coaching centre assault | Teacher Beat Student Viral Video
कोचिंग सेंटर आहे की टॉर्चर सेंटर? शिक्षकाने काठी घेऊन विद्यार्थ्यांबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
cash seized Maval, Maval, Pimpri, Maval latest news, Maval cash news,
पिंपरी : खेड शिवापूरनंतर आता मावळमध्ये १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त
Loneliness-Free Seoul
एकाकी मृत्यू म्हणजे काय? त्यांची संख्या का वाढतेय? ते रोखण्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक कशासाठी?
In sambhajinagar minor girl is caught driving scooty shocking video
“मुलांआधी पालकांना शिकवा” संभाजीनगरमध्ये चिमुकलीच्या हातात गाडी देऊन वडील निवांत; VIDEO पाहून संतापले लोक
N Chandrababu Naidu
विश्लेषण: अधिक मुले जन्माला घाला… लोकसंख्या वृद्धीविषयी चंद्राबाबूंचे अजब आवाहन… पण ते असे का म्हणतात?
objective of implementing the mgnrega
लेख : ‘मनरेगा’च्या मूळ हेतूंकडे दुर्लक्ष नको!
Nana Patole, rebellion in Congress, Nana Patole news,
नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वारे, नेमके कारण काय?

गंमतशाळेचे अनुभव
माझ्या एका गंमत शाळेत प्रचंड न्यूनगंड असलेला मुलगा येत असे. शाळा सुटलेली, भंगाराला जाणारा, कळकट, घाणेरडा, सगळ्यांच्यात कधी मिसळला नाही. पण यायचा नियमित. त्याला परत शाळेत घातला. त्याचा अंगभूत चित्रकलेचा गुण ओळखला, फुलवला. त्याच्यातून त्याला स्वत:ची जाणीव झाली. आज तो एक मोठय़ा रिटेल स्टोअरचा व्यवस्थापक आहे. असाच दुसरा, जुगाराच्या अड्डय़ावरून उचलून आणलेला, बालकामगार, चार वेळा शाळेतून गळाला, परवा लग्नाचे आमंत्रण करायला आला. म्हणाला, ‘ग्रॅज्युएट झालो, आज स्वत:ची फर्म आहे. त्याच्या बरोबरच्या इतर मुलांसह आज वस्तीचा कार्यकर्ता आहे. वस्तीत जुगाराचे अड्डे दारुची दुकाने होऊ देत नाहीत.’
मोलकरीण आईची मोलकरीण मुलगी- चिंगी. गंमत शाळेने तिचे अभिनय गुण हेरले. संधी दिली. ती शाळेतून गळालेली मुलगी, तिने कॉलेज पूर्ण केलेच. पण तिला व्यावसायिक रंगभूमीकडून मागणी आली अशी अनेकानेक माझी रत्ने!
मुलांनी दिलेली आव्हाने पेलताना मला माझ्यातील लेखिका सापडली. त्यातून मुलांसाठी गोष्टी, गाणी. लिहिली. खेळ, लैंगिक शिक्षण अशा विविध विषयांवरची २० पुस्तके तयार झाली. मुलांनी मला नाटके लिहायला व बसवायलाही शिकविले. स्वत: बक्षिसे मिळविली. मलाही मिळवून दिली.
‘चाइल्ड लाइन’मुळे रोज मुलांवर होणारे अत्याचार बघून मनावर मोठा ताण येतो. गंमत शाळा’ तो घालवते. ‘आभाळ फाटलेय, कुठे ठिगळ लावत बसतेस?’, ‘एवढे विविधांगी शिक्षण आहे. कुठे असली कामे करतेस? अशी संभावना नेहमीच होते. पण ठिगळे लावणारे हात आहेत म्हणूनच आभाळ कोसळलेले नाही. हा माझा विश्वास आहे- त्यातच माझे छोटेसे बोट! आणि शिक्षणाचा इतका सुंदर उपयोग दुसरीकडे कुठेच नाही, हा आनंद प्रत्यक्ष अनुभवणाऱ्यालाच कळू शकतो.
संपर्क-  ज्ञानदेवी, ६०, पाटील इस्टेट,२, मुंबई रोड , पुणे ४११ ००५
दूरध्वनी-०२०-२५५४०१५६
वेबसाइट- http://www.dnyanadevi.org
इ-मेल childlinepune@rediffmail.com