‘‘माझा आग्रह आहे, की सुधारणा ही ‘आतून’ व्हायला हवी. आज धर्माचा पगडा एवढा आहे की, किती तरी ख्रिश्चन स्त्रिया मला विचारतात की, मी घटस्फोट घेतला तर ते धर्मबाह्य़ वर्तन होईल ना! मग ते मला मेल्यावर कुठे पुरतील? मी म्हणते, अगं बाई, मेल्यानंतरचा विचार आज कशाला करतेस? आज सन्मानाने जग ना! जशी मी जगले.’’ गेली ३० पेक्षा जास्त वर्षे सामाजिक कार्यकर्त्यां म्हणून वावरणाऱ्या तसेच स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी दीपस्तंभ ठरलेल्या ‘मजलीस’ संस्थेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या फ्लेविया अग्नेस. त्यांचा हा प्रवास..
विशीतील सुस्वरूप तरुणी. लग्नाला उभी राहते तेव्हा तिच्या डोळ्यांत कोणती स्वप्नं असतात? प्रेमळ नवरा, गोजिरवाणी मुलं आणि चौकटीतला सुखी संसार! माझ्या बाबतीत मात्र फासे उलटे पडले. संघर्ष हाच माझा संसार झाला. मधुचंद्राच्या काळात सुरू झालेला हिंसाचार लग्न मोडेपर्यंत मला पार मोडून गेला. चारचौघांत वावरताना मात्र जखमा आणि माराचे व्रण झाकण्यासाठी रेशमी साडय़ा, शिवाय दागदागिने आणि मेकअप. मी विझलेली, पण संसार फुलत होता. मी तीन मुलांची आई झाले तरीही माझं डोक भिंतीवर दणादण आपटणं, मला रोज काठीने झोडपून काढणं, डोक्यात वस्तू फेकून मारणं.. शरीर आघात सोसतच होतं; तरीही ते जिवंत होतं. मन मात्र कणाकणाने मरत होतं. तरीही एकदा प्रचंड मारझोडीनंतर मी एकच वाक्य नवऱ्याला ठणकावून बोलले, ‘‘तुम्ही माझं शरीर मोडू शकता. आत्मा नाही.’’ बस्स. माझ्या कार्याची खरी सुरुवात माझ्या स्वत:च्या आयुष्यातल्या या आणि अशा अनेक कडवट आणि दु:खद घटनांमधूनच झाली. एकीकडे स्वत:चा आणि मुलांवरचा छळ सोसत असतानाच, माझ्यासारख्या गरीब व पीडित स्त्रियांसाठी काम करू लागले.
सुरुवात झाली ती १९८१ मध्ये नारी केंद्राच्या कामापासून. या कामाने वेग घेतला तसं माझ्या लक्षात येऊ लागलं, की सर्व काम करणारे समाजसेवक अगदी माझ्यासारख्या संस्थापिकेपासून सर्व जण समान पातळीवर असावेत, पण हा आदर्शवाद झाला, जो प्रत्यक्ष काम करताना उपयोगी पडत नाही. तिथे कोणी तरी प्रमुख, कोणी पूर्णवेळ/ अर्धवेळ समाजसेवक असे गट पडतातच. त्याशिवाय पीडित व्यक्तींना कोणीही समानतेची वागणूक देत नाही. त्याशिवाय ती व्यक्ती अशिक्षित, दुर्बल घटकांतली असेल तर तिला संस्थेतही तशीच सुमार दर्जाची वागणूक मिळते. हे सर्व मनाला पटेना. मी ‘नारी केंद्रा’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मतभेद मिटवण्याचा हा एकच मार्ग होता. समाजसेवेतला पहिला धडा मी तिथे गिरवला.
मी तिथून बाहेर पडले खरी; पण तरीही मला पीडित महिलांसाठी काम करण्याची तळमळ काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून मी YWCA (यंग विमेन्स ख्रिश्चन असोसिएशन) मध्ये रुजू झाले, कारण समाजसेवा व्यक्तिगत पातळीवर करता येणारी गोष्ट नाही. म्हणून एक साधी कार्यकर्ती म्हणून मी तिथे रुजू झाले. तिथे खूप विधायक कामं केली जायची. स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी शिलाईकाम वगैरे पारंपरिक उद्योगांचं त्यांना प्रशिक्षण दिलं जायचं, पण मला वाटायचं, या स्त्रियांना आम्ही खास स्त्रियांची म्हणावी अशीच कामं का बरं शिकवायची? त्यांनी नवे व्यवसाय, त्यातली तंत्रं का बरं आत्मसात करायची नाहीत? YWCA सारख्या संस्थेतही बदल घडवून आणणं आणि पारंपरिक विचारांच्या जोखडातून ती मुक्त करणं मुश्कील आहे, हा समाजसेवेच्या क्षेत्रातला दुसरा धडा मी गिरवला.
दरम्यान, मला कधीकधी अकस्मात विचारलं जायचं, ‘फ्लेविया, अगं, तुझं शिक्षण काय झालंय?’ ‘मारहाण झालेली स्त्री हीच माझी डिग्री,’ असं ओरडून सांगावंसं वाटायचं. कोणतीही पदवी नसल्याने समाजविज्ञान संस्थांतून भाषणांना उपस्थित राहण्याची परवानगीदेखील मला मिळायची नाही. अर्थात दोनच वर्षांनी अशा संस्थांतून एम.ए. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांपुढे भाषणे देण्यासाठी निमंत्रणं येऊ लागली हा भाग वेगळा. मी जिद्दीने एस.एन.डी.टी. मुक्त विश्वविद्यालयात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले. परीक्षेच्या आदल्या दिवशी मला आणि माझ्या तिन्ही मुलांना रात्री दहा वाजता अन्नपाण्याशिवाय नवऱ्याने घराबाहेर काढले होते आणि दुसऱ्याच दिवशी घरातून हुसकवण्याची धमकीही दिली होती, पण तरीही मी जिद्दीने परीक्षा दिली आणि डिस्टिंक्शन मिळवून उत्तीर्ण झाले. त्याच सुमारास कॅनडातील माँट्रियल इथे भरणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी मी केंद्रातील कामावर आधारित लिहून पाठविलेला शोधनिबंध स्वीकारला गेला. ‘स्त्री संदर्भातील संशोधन आणि प्रशिक्षण’ हा परिषदेचा विषय होता आणि माझ्या शोधनिबंधाचे शीर्षक होते ‘पत्नी-मारहाणीविरुद्ध मुंबईतील आमचा संघर्ष.’ यानिमित्ताने मला परदेशी जाण्याची संधी चालून आली होती, पण नवऱ्याने मुलांना दम भरला, ‘जर का तुमची आई परदेशी गेली तर तुम्हाला इथे उपाशी राहावं लागेल.’ तरीही मुलं ठामपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. मैत्रिणींनी धीर दिला आणि मी रवाना झाले.
पीडित, शोषित महिलांसाठी माझं काम करणं चालूच होतं, पण मग लक्षात आलं, की नुसतंच महिलांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील व सक्रिय असून चालणार नाही. त्यापेक्षा काही तरी ‘अधिक’ आपल्याजवळ असायला हवं. ते ‘अधिक’ काय याचा शोध घेताना मला माझेच जुने दिवस आठवले. मी न्यायालयात जायची. माझ्या केसबाबत वकिलांशी बोलायची, ते निरनिराळे कायदेकानू मला समजावून सांगायचे. तेव्हाच मला जाणवलं की, मला जर काही विधायक, ठोस स्वरूपातलं कार्य करायचं असेल तर माझ्याकडे व्यावसायिक ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यातही मी वकीलच असायला हवं. गरजू व पीडित स्त्रियांना माझ्या वकिली ज्ञानाचा कसा उपयोग करून देता येईल या एकाच दृष्टिकोनातून या व्यवसायाकडे मी पाहिलंय.
मला व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणायचा होता आणि वकिली हे त्यासाठी समर्थ व प्रभावी अस्त्र म्हणून मला वापरायचं होतं हे नक्की! त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञ महिलांना मी एकत्र केलं. माझ्या कायदेविषयक ज्ञानामुळे मी स्त्रियांच्या हक्कांसाठी कायदेशीर बाजू लढविण्याची जबाबदारी उचलली. माझी मैत्रीण मधुश्री दत्ता सांस्कृतिक क्षेत्रात होती. नीला आडारकर आर्किटेक्ट होती. आम्ही काही जणी एकत्र आलो आणि ‘मजलीस’ ही संस्था स्थापन केली.
‘मजलीस’च्या माध्यमातून व्यक्तिगत पातळीवर पीडित महिलेशी विचारविनिमय करून तिची समस्या सोडवणं, तिला व तिच्या कुटुंबीयांना समुपदेशन करणं, तिला उत्तम वकील मिळवून देणं ही कामं तर आम्ही करतोच; पण आमच्या टीममध्ये २० उत्तम वकील आहेत. ते काही वस्त्यांमध्ये तेथील संघटनांच्या मदतीने नेमाने संपर्क ठेवतात. कायदेविषयक साक्षरतेच्या कार्यशाळा घेतात. त्यातून स्त्रियांच्या हक्कांबाबत जागृती घडते व गरीब, गरजू स्त्रियांना घरच्या घरी कायद्याचा सल्ला दिला जातो. तसेच, पोलीस, न्यायाधीश, अशासकीय संस्थांचे पदाधिकारी यांच्यासाठीही(!) स्त्री-हक्कांविषयी जाणीव-जागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवितो. लैंगिक अत्याचारांना विरोध करणाऱ्या कार्यक्रमात संघटना या नात्याने केंद्र सहभाग घेते. जागोजागीच्या प्रशिक्षित आणि जागृत स्त्री वकिलांनी कायदा आणि संलग्न कारवाईची आव्हानं स्वीकारली तरच कानाकोपऱ्यातील गरजू स्त्रियांपर्यंत न्याय पोहोचू शकतो. हे लक्षात घेऊन २००३ सालापासून आम्ही दर वर्षी जिल्हा आणि ग्रामीण पातळीवरील १०० स्त्री वकिलांसाठी पाच दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेतो. त्यातून कायद्यातील गुंतागुंतीचे आकलन व स्त्रीविषयक दृष्टिकोन घडविण्याचा प्रयत्न करतो. त्यातील निवडक १५ स्त्री वकिलांना वार्षिक मानद शिष्यवृत्ती देतो. सध्या ‘मजलीस’ने महाराष्ट्रात सुमारे १०० स्त्री वकिलांचे जाळे विणले आहे. आज २३ वर्षांनी मला असं जाणवतंय की, माझं स्वप्न पूर्णत: नव्हे पण अंशत: तरी साकार झालंय. नवऱ्याने हाकललं, मुलांनी अधिकार नाकारले, सासरच्यांनी छळलंय अशा तक्रारी घेऊन दिवसाला ४ ते ५ केसेस माझ्या संस्थेत येतातच. सगळ्या शक्य नाही होत, पण ‘मजलीस’कडे आलेल्या अवघड केसेस आम्ही सोडवल्या, याचं मला निश्चितपणे समाधान आहे.
असंच एक प्रकरण. नवरा बायकोला असह्य़ मारहाण करत असे. मुलींचा लैंगिक छळ करत असे. तो घरात राहिला तर मुलं आणि आई दोघांनाही धोका होता. १९९० मध्ये आम्ही ही केस जिंकली. न्यायालयाने कायदा वाकवून मानवी नातेसंबंधांचा विचार करून निर्णय दिला आणि आम्ही त्या बाईला न्याय व छप्पर मिळवून देण्यात यशस्वी झालो. पुढे तिच्या नवऱ्याने दारू पिऊन माझ्या ऑफिसमध्ये येऊन भरपूर धिंगाणा केला, पण मी डगमगले नाही.
हिंदू स्त्रीला घटस्फोट मिळतो. ख्रिश्चन धर्मात घटस्फोट संमत नव्हता. माझ्या वैयक्तिक जीवनातील घटनांमुळे मला ही गोष्ट खूप डाचत होती. एका ख्रिश्चन महिलेला क्रौर्य आणि हिंसाचार यामुळे नवऱ्यापासून घटस्फोट मिळावा अशी केस मी न्यायालयात दाखल केली. मी त्या वेळी हाच प्रतिवाद केला की, प्रत्येक भारतीय नागरिकाला ‘सन्मानाने जगण्याचा’ अधिकार घटनेने बहाल केलाय. नुसतं जगणं नव्हे तर सन्मानाने जगणं अभिप्रेत आहे, जनावरासारखं जगणं नव्हे! घटनेतील १४ व्या कलमाप्रमाणे सर्व भारतीय नागरिक समान आहेत. असं असताना केवळ ती ख्रिश्चन आहे म्हणून रोज नवऱ्याची मारहाण सहन करत जगायचं का? तुम्ही म्हणता कायद्यासमोर सर्व समान. मग ही विषमता का? हीसुद्धा केस आम्ही जिंकलो. अशीच दुसरी केस. शाळेच्या वॉचमनने चार वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केला. शाळा वॉचमनला पाठीशी घालत होती. पोलीस व पब्लिक प्रॉसिक्युटर आम्हाला सहकार्य करत नव्हते. आमचं हेच आग्र्युमेंट होतं, की ती चार वर्षांची कोवळी पोरगी. कसं सांगू शकेल तिच्याबाबतीत कोणतं घृणास्पद कृत्यं घडलं ते! पण मेडिकल रिपोर्ट आणि परिस्थितीजन्य पुरावा पाहा की! या केसमध्ये आम्हाला खूप झगडावं लागलं, पण अखेर आम्ही त्या मुलीला न्याय मिळवून दिलाच. अशीच आणखी एक स्त्री. सासरा प्रचंड श्रीमंत. आपल्या वेडसर मुलाच्या गळ्यात या मुलीला बांधली आणि पैशाच्या जोरावर सगळ्यांना ‘मॅनेज’ करून तिला घराबाहेर काढलं. काही केल्या तो तिला तिच्या मुलीचा ताबा देईना. आम्ही कोर्टात जंग जंग पछाडलं आणि तिला तिची पोटची मुलगी व हक्काचं घर मिळवून दिलं. आज दर ख्रिसमसला दोघी मायलेकी न चुकता मला शुभेच्छा द्यायला येतात. अशीच कमलाची गोष्ट! नवरा अतिशय छळायचा. ऐन परीक्षेत मुलांची पुस्तकं विकून दारू प्यायचा. १६ वर्षांची तिची मुलगी रोज उशाशी चाकू ठेवून झोपायची. आज तिची मुलं कुवेत एअरलाइन्समध्ये आहेत. तिच्या एका मुलाच्या लग्नाला मी गेले, तर त्यांनी माइकवर माझं नाव पुकारून माझे जाहीर आभार मानले, की आज केवळ फ्लेविया मॅडममुळे आम्हाला हे दिवस दिसले. एका स्त्रीच्या बाबतीत मात्र तिच्या मुलांना सासरची माणसं इतकी पढवून आणायची, की शेवटी न्यायालयाने तिला मुलांचा ताबा नाही दिला. आम्ही ती केस जिंकलो नाही तरीही मला आनंद आहे, की त्या स्त्रीने स्त्री चळवळीत स्वत:ला झोकून दिलेय. आमच्या संगतीत ती खूप खंबीर झाली आहे.
इथे मला एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली, की स्त्रियांना न्याय हवाय, पण तो तिला अपेक्षित आहे तसा, त्याच मार्गाने. मला काही झालं तरी धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्या चौकटीत राहूनच महिलांना न्याय मिळवून द्यावा लागणार आहे, कारण धर्म व संस्कृती हीच त्यांची ओळख असते. मी माझ्या पद्धतीने तिला सुटकेचा वा अन्य मार्ग दाखवला तरी तो मार्ग ती नाही स्वीकारणार. तिला समस्येतून सुटका हवी, पण म्हणून मी तिला माझ्या विचारांच्या चौकटीत नाही कोंबू शकणार. समाजसेवा करताना मला मिळालेला हा धडा माझ्या टीममधल्या उत्तम व तळमळीने काम करणाऱ्या समाजसेविकांच्या गळी उतरवताना खूप कष्ट पडतात. मी नेहमी हेच सांगते, की तुमच्या परिस्थितीची फुटपट्टी एखाद्या पीडित महिलेला न्याय देताना तुम्ही नका लावू. तुम्ही तिच्या भूमिकेत शिरून तिचा विचार करा. तसं केलं नाहीत तर ती इथून उठून दुसरीकडे जाईल आणि यात तिला मूर्ख बनवणारे निव्वळ हात धुऊन घेतील.
माझा आणखी एक आग्रह आहे, की सुधारणा ही ‘आतून’ व्हायला हवी. आज धर्माचा पगडा एवढा आहे, की किती तरी ख्रिश्चन स्त्रिया मला विचारतात, की मी घटस्फोट घेतला तर ते धर्मबाह्य़ वर्तन होईल ना! मग ते मला मेल्यावर कुठे पुरतील? मी म्हणते, अगं बाई, मेल्यानंतरचा विचार आज कशाला करतेस? आज सन्मानाने जग ना! जशी मी जगले. म्हणूनच समाजाने माझ्या कामाची दखल घेतली. माझ्या मुलांनी मला आदर्श माता ठरवलं. व्यक्तिगत आयुष्यातील अडचणी आणि प्रश्न यांना ओलांडून स्त्री हक्क व्यापक बनविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा पहिला ‘नीरजा भानोत पुरस्कार’ मला १९९२ साली मिळाला.
शेवटी माझी एकच इच्छा आहे: प्रत्येक स्त्रीला उचित हक्क आहेतच. ते भक्कम करायला हवेत. तिचा स्वत:चा त्या हक्कांवर विश्वास हवा. श्रद्धा हवी आणि कोणीही माझे हक्क डावलले तर मी त्यासाठी प्राणपणाने झगडेन, अशी समाजातल्या प्रत्येक स्त्रीची विचारधारा हवी. आयुष्य कितीही खडतर आणि अंधकारमय वाटत असलं तरी दूरवर लुकलुकणारा एक तेजस्वी तारा असतोच, हे सत्य आहे.
शब्दांकन-माधुरी ताम्हणे
संपर्क- फ्लेविया अग्नेस
मजलीस-पत्ता
ए-२/४ गोल्डन व्हॅली, कलिना-कुर्ला रोड,
कलिना, मुंबई-४०० ०९८.
दूरध्वनी- ९१२२-२६६६२३९४ किंवा ९१२२-६५०१७७२३.
वेबसाइट- Website: http://www.majlislaw.com
ई-मेल- majlislaw@gmail.com
समाजाचा ‘मजलीस’
माझा आग्रह आहे, की सुधारणा ही ‘आतून’ व्हायला हवी. आज धर्माचा पगडा एवढा आहे की, किती तरी ख्रिश्चन स्त्रिया मला विचारतात की, मी घटस्फोट घेतला तर ते धर्मबाह्य़ वर्तन होईल ना! मग ते मला मेल्यावर कुठे पुरतील?
आणखी वाचा
First published on: 08-06-2013 at 01:01 IST
TOPICSप्रत्यक्ष जगताना
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social worker flavia agnes of majlis