सतरा वर्षांचं ‘वेगळं जगणं’ शब्दबद्ध करणं अशक्य आहे. हे जगणं नव्हतं. विरघळणं होतं. त्या जगण्याचं रसायनच वेगळं होतं.. आहे. प्रत्येक क्षणाला असं वाटतं की, आताच तर प्रवासाला सुरुवात केली! किती वाटचाल अजून बाकीच आहे! तर मागे वळून बघताना असं वाटतं की, ‘अरेच्चा, किती लांबलचक, अवघड वळणाचा रस्ता, डोंगर, दऱ्या, खड्डे पार केले आपण.’ अशा विरघळण्यात तुमचं एक व्यक्ती म्हणून भौतिक अस्तित्व मिटून जातं.
‘निवांत’ एक मोठ्ठी प्रयोगशाळा आहे. इथला रोजचा चंद्र-सूर्य नवा-नवाच तर आहे, कारण ज्यांनी प्रकाशाचा एक किरणही पाहिलेला नाही, त्यांच्या ओंजळी प्रकाशकिरणांनी भरतानाच्या त्यांच्या मनात दडलेल्या ‘प्रकाशाचा उगम’ या प्रयोगशाळेतच शोधता आला.
१७ वर्षांपूर्वी जर कोणी भाकीत केलं असतं की, मी अनेक ‘विशेष दृष्टीच्या’ लेकरांची ‘मीरामाय’ होऊन जगेन, तर मी त्या साऱ्यांना वेडय़ात काढलं असतं. पण घडलं मात्र असंच. सर्वसामान्यपणे चाळिशी उलटल्यावर येणाराीेस्र्३८ ल्ली२३ २८ल्ल१िेी मलाही आला. घरच्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या होत्या. पण स्वत:चं ‘असणं’, ‘मी कोण?’ या यक्षप्रश्नांची उत्तरं सापडली नव्हती.. शैक्षणिक क्षेत्रातल्या कामाचा अनुभव होता. पुन्हा कॉलेजमध्ये इंग्लिश विषय शिकवण्याची नोकरी धरण्याचा विचार पक्का केला. कन्या जन्मानंतर गेली १४ र्वष सांसारिक प्रपंचात वेगानं वाहून गेली होती. स्वत:चा शोध जरा विसावा मिळाल्यावर सुरू झाला. माझा नवरा आणि मित्र आनंद दरवर्षी स्वत:च्या वाढदिवसाला रक्तदान करायचा आणि अंधशाळेला डोनेशन द्यायचा. आमच्या धंद्याचं बस्तान बसेपर्यंत पैशांचा अभाव असूनही आनंद हे सारं निष्ठेनं अन् प्रेमानं करायचा. नोकरी सुरू झाली की अंधशाळेला जायला वेळ कुठला मिळणार म्हणून केवळ कुतुहलापोटीच मी आनंदबरोबर अंधशाळेला गेले.
वर्ष १९९६. पुण्याच्या कोरेगाव पार्क अंधशाळेत शिरले, तेव्हा माहीत नव्हतं की तो क्षण ‘निवांत’चा जन्मक्षण होता. समोरच्या जिन्यावरून अडीच-तीन वर्षांची, गोबऱ्या गालाची इवलाली पिल्लांची रांग जिना चढायची धडपड करत होती. नुकतीच शाळेत आलेली चिमणी मुलं होती. एक अगदी होमसिक चिमणं मला येऊन धडकलं. मिठी मारून रडायला लागलं. त्याला मी त्याची आई वाटले.. अन् मला.. ते माझंच वाटलं. समोर सारा अंधार होता त्याच्या, पण स्पर्शातली माया दोघांनाही कळत होती. माझ्या डोळ्यांना आसवांची धार लागली. त्या चिमण्याच्या शिरावर सारी आसवं ओघळली. खरं सांगू? ती मिठी मी आजतागायत नाही सोडवू शकले. १७ वर्षांत अशा अनेक लेकरांनी माझी कूस आपली मानली. शेकडो लेकरांची आई होताना त्यांच्या काळजीनं माझं आयुष्य पिंजून काढलं. कसले पैसे कमावणं अन् कसली नोकरी? सारं सामान्य जगणं ‘निवांत’ नामक जगण्यात मिसळून गेलं, हरवून गेलं.
दुसऱ्या दिवसापासून मी शाळेत सेवा देण्यासाठी, इंग्लिश शिकवण्यासाठी जायला लागले. शाळेतला पहिला दिवस अजून जसाच्या तसा आठवतो. वर्गातल्या सात मुलांच्या चेहऱ्यावर कुठल्याही भाव-भावनांचं चित्र रेखाटलेलं नव्हतं. सारे चेहरे, हावभाव यंत्रवतच होते. हातवारे फारसे नव्हतेच. मी धसकलेच. त्यांचं ब्रेलमधलं पुस्तक उचलून हातात धरलं. सारी टिंबं! एक-दोन नाहीत तर असंख्य टिंबं! बुद्धीचा, ज्ञानाचा टेंभा मिरवणाऱ्या मला क्षणभर माझ्याच ज्ञानाची कीव आली. मी ‘ब्रेल निरक्षर’ होते ना? काय शिकवणार मी यांना? मला अजून खूप वाटचाल करायची आहे याची जाणीव झाली. आमचा वर्ग लायब्ररीत. सगळीच पुस्तक टिंबांची – तक्ते टिंबांचे. पायाखालची जमीनच सरकली. बाप रे! पळून जावंसं वाटलं मला; पण माझी वर्गातली पिल्लं (इ. सातवी) महा-उस्ताद होती. त्यांनी मला ब्रेल शिकवण्याचा चंग बांधला.
मीही ब्रेल शिकायचं नक्की केलं. वास्तविक पाहता आपल्याकडे डोळस पुस्तक अन् मुलांकडे ब्रेल पुस्तक असलं तरी शिकवता येतच; पण अंध जगताचा ‘बॉस’ व्हायला ब्रेल यावंच लागतं. ब्रेल म्हणजे सहा टिंबांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या अनेक कॉन्बिनेशन्सची लिपी. मुलांना फक्त आद्याक्षरं यायची. व्याकरणातील अनेक चिन्हं समाजायची नाहीत. अजून प्रवास अवघड करायला पुस्तकं संक्षिप्त लिखाणात (कॉन्ट्रॅक्शन) असायची. मला कोण ब्रेल नीट शिकवणार? मग मी डोळस पुस्तक समोर ठेवून संक्षिप्त ब्रेल वाचायची. ब्रेल उर्दूसारखी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते आणि उठावाची टिंबं डावीकडून उजवीकडे वाचली जातात. ही ‘मिरर इमेज’ अजून घोटाळ्यात टाकते. मी घरभर ब्रेलचे तक्ते टांगले. ब्रेल शिकायला घरकामात फारसा वेळ व्हायचा नाही. मग मी दात घासायच्या बेसिनवर, स्वयंपाकाच्या ओटय़ावर तक्ते टांगले. करंगळी आणि तर्जनीच्या बोटांची सहा पेरं म्हणजे ब्रेलची सहा टिंब समजून बसमध्ये (शाळेत) जाता-येता सतत कॉम्बिनेशन्स पाठ केली. ‘भारती ब्रेल’ पुस्तक विकत घेऊन ब्रेलचे सगळे नियम मी शिकले.
मग मात्र माझी अन् मुलांची मस्त नाळ जुळली. मुलं त्यांच्या शाळेत डोळस मुलांपेक्षाही छान ब्रेल वाचायला लागली. त्यांच्याबरोबर मी क्रिकेट खेळले, अनेक वैज्ञानिक प्रयोग केले. इंग्लिश शिकवताना ‘बर्थ डे’ पार्टी करूनच बलून, फेस्टून्स, कँडल इत्यादी शब्द शिकवले. छोटी नाटकं बसवली. संवाद-संभाषण मस्त जमायला लागलं. त्यांची जिवाभावाची मैत्रीण झाले. तरीही एक दिवस मी शाळा सोडून दिली. काय घडलं असं? त्या शाळेत माझा जीव गुदमरायला लागला. शाळेच्या छताखाली सर्व सुखसोयी असूनही मुलांना विनामूल्य मिळणाऱ्या अमूल्य सेवांचं मूल्य कळत नाही हे जाणवलं. मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांना शिंगं फुटतात आणि जरुरीपेक्षा जास्त माणसं त्यांच्या सेवेला आल्यानं ते ‘प्रेम’, ‘मैत्री’ हे शब्द विसरून स्वार्थी होतात. त्यांचं कॉपी करणं, शॉर्ट-कटनी पास होणं, चोऱ्या करणं, लबाडय़ा करणं, सारं सारं त्यांना मिळणाऱ्या आयत्या सोयीमुळे होतं. प्रशासकीय वर्ग खूप छान असला, तरीही काय करणार मुलांच्या या मानसिकतेवर? मी अगदी हताश-निराश झाले. वाटलं हरलो, संपलं सारं.
शाळेला जाणं बंद केलं. अचानक दारात सिद्धा (सिद्धार्थ गायकवाड) उभा असलेला दिसला. अंधशाळेत तोंडही न उघडणारा सिद्धा नववीत रस्त्यावर आला. १८ वर्षांनंतर जशी अनेक अंध मुलं रस्त्यावर येतात, तसाच सिद्धा रस्त्यावर आला. त्याला आईवडिलांनी उशिरा शाळेत घातलं. त्यात त्याचा काय दोष? असा सिद्धा बंडगार्डनच्या फुटपाथवर राहायला लागला. उपाशी-तपाशी तसाच जगायला लागला. एक दिवस धीर एकवटून माझ्या दारात उभा राहिला.
पोटात अन्नाचा कण नसल्यानं आधीच कृश सिद्धा पार खंगलेला वाटला. धापा टाकत होता. मला तर वाटलं कुठल्याही क्षणी हा अखेरचा श्वासच घेईल. मी त्याला घरात घेतलं. प्रथम त्याला खूप साखर घालून चहा आणि बिस्किटं खायला घातली. माझा जीव कळवळला. अक्षरश: रडू यायला लागलं. घरचा पत्ता बरोबर हुडकला होता सिद्धानं. काही मुलं चुकली म्हणून साऱ्याच मुलांना मी रस्त्यावर का सोडलं? स्वत:ची लाज वाटली. अंध असूनही शिक्षणाच्या आशेनं माझ्या दारात उभ्या असलेल्या सिद्धाकडे मी भरल्या नजरेनं पाहत होते. शाळेतल्या घटनांनी मी अंध क्षेत्रातलं काम सोडून द्यायला निघाले होते. आणि सिद्धा मात्र मरणाच्या दारात उभा.. तरीही शिक्षण सोडायला तयार नव्हता.
निवांत हा आमचा बंगलाच या मुलाचं घर झालं आणि सिद्धासाठी उघडलेलं दार नंतर अनेकानेक अंध विद्यार्थ्यांसाठी उघडलं गेलं. बारा महिने-तेरा काळ! कधीही बंद न होण्यासाठी!
एकटय़ा सिद्धाबरोबर अनेक लेकरांना खाऊ, पिऊ, न्हाऊ-माखू घातलं, अभ्यास विषय शिकवणं, जगवणं, शिस्त, संस्कार देऊन घडवणं- सारं घडलं कसं कळलं नाही. या प्रवासात मला माझ्यातलं मूल मरू देता आलं नाही. दररोजचे १४-१५ तासही काम केलं. काय होतं माझ्या हाताशी? मुलांचं प्रेम, त्यांच्या गरजांची जाण आणि कसदार तसंच दर्जेदार जीवन त्यांना देऊन आपल्यात सामावून घेण्याची इच्छा – एवढंच हाती होतं. ‘निवांत’ म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखंच होतं.
बराच शोध घेतल्यावर कळलं, की १८ वर्षांनंतर समाजकल्याण खात्याच्या कायद्यानुसार अपंग विद्यार्थ्यांना स्वतंत्र जगायला सोडून दिलं जातं. साधारणपणे अनुत्पादक घटक समजून कुटुंबातील मंडळी त्यांना शाळेत सोडून जातात. कधी कधी हे सोडणं कायमचं असतं. १८ र्वष पूर्ण कशी होतात? कित्येकदा आई-वडिलांना त्यांच्या अंध मुलाची जन्मनोंद करण्याची गरजच भासत नाही. त्याचं जन्मणं त्यांच्या दारिद्रय़ानं भरलेल्या आयुष्यातलं न पेलणारं आव्हान असतं. ज्यांचे पाठीराखे कोणी नाहीत अशी मुलं रस्त्यावरच येतात. परत जायला घर नाही. जाणार कुठं? मनात शिक्षण घ्यायची, चांगलं जगण्याची इच्छा असली, तरी पर्याय संपलेले असतात.
दुर्बल, हरलेले हे जीव वाममार्गाला लावायला समाज टपलेलाच असतो. मुलांना वेगळ्या कारणासाठी, तर मुलींना वेगळ्याच कारणासाठी समाज वापरतो. हे वास्तव फार हृदयविदारक आहे. ही सारी हरवल्यासारखी दिसणारी माणसं माझ्या शोधात घरी आली, हे माझं भाग्यच – अन् त्यांचंही. मुलं माझ्यावर नितांत श्रद्धा अन् निष्ठा घेऊन जिद्दीनं माझ्याकडे येत राहिली. त्यांच्या आयुष्यातले झंझावात माझं आयुष्य पूर्णपणे बदलतं करून गेले. माझं सारं विश्वच बदललं. हरलो-संपलो वाटलं, तरी मुलांच्या जिद्दीनं लढायचं बळ दिलं. या साऱ्या प्रवासात माणूस म्हणून माझ्या अस्तित्वाचा पोत सुधारला.
कधीच वाटलं नव्हतं. सातत्यानं आपण १७ र्वष हे काम करू शकू. आता १५०-२०० विद्यार्थी ‘निवांत’वर आहेत. त्यांना जगण्याची उभारी देताना समाजव्यवस्थेशी लढावं लागलं. तो लढा नव्हता ते महायुद्धच होतं. शाळा संपली की शिक्षण संपलं अशीच अंधक्षेत्राची अवस्था होती. दहावीनंतरच्या मुलांसाठी एकही अक्षर ब्रेलमध्ये उपलब्ध नव्हतं. श्रीमंत अन् घरच्यांचा पाठिंबा असणारी मुलं शिकायची, पण बाकीच्यांचं काय? ‘निवांत’च्या छताखाली अनाथ, शेतकरी, कातकरणींची, धुणं-भांडय़ाची काम करणाऱ्या आयांची, ऊस तोडणी कामगारांची, रिक्षाचालकांची मुलं आली अन् घडली-जगली. या मुलांना अभ्यासक्रम डोळसांचा आहे पण शैक्षणिक सुविधा मात्र शून्य आहेत. हा काय सामाजिक न्याय आहे? आपणच एक समाज म्हणून या विद्यार्थ्यांच्या हाती ब्रेल पुस्तकांऐवजी भिकेचे कटोरे दिले.
निवांतची ‘डोळस’ मुक्ती
‘‘आज १५०-२०० विद्यार्थी ‘निवांत’वर आहेत. त्यांना जगण्याची उभारी देताना समाजव्यवस्थेशी लढावं लागलं. तो लढा नव्हता ते महायुद्धच होतं.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-06-2013 at 01:01 IST
TOPICSप्रत्यक्ष जगताना
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social worker meera badve and nivanta andh mukta vikasalaya