साधना दधिच
प्रीती करमकर हे स्त्री चळवळीतील एक उभरते नेतृत्व होते. वयाच्या अवघ्या ५१व्या वर्षीच तिला आकस्मिक मृत्यू येणे, हा स्त्रियांच्या चळवळीला व ‘नारी समता मंच संस्थे’ला बसलेला मोठा धक्का आहे. तिच्या अचानक जाण्याने स्त्री चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रीतीने समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि आता ती आपला डॉक्टरेट प्रबंध लिहीत होती. पुणे विद्यापीठाच्या ‘स्त्री अभ्यास केंद्रा’त काम केल्याने स्त्रीवादाचा अभ्यास, त्या अभ्यासाची शिस्त तिला होतीच. प्रत्यक्ष तळागाळातल्या कामाचा अनुभव हवा म्हणून ती ‘नारी समता मंच’मध्ये सहभागी झाली. सुरुवातीलाच भीमाशंकर येथील आदिवासी क्षेत्रात तिने मुक्कामी राहून काम सुरू केले. तिथे तिने स्त्रिया व आरोग्य यावरचा प्रकल्प हाताळला आणि लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध स्थापित केले. कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या ‘लैंगिक छळ’विरोधी जे ‘विशाखा आदेश’ आले त्यावर तिने काम केले. पाच जिल्ह्यांत या कार्यशाळा घेतल्या आणि त्यातूनच एक पाहणी करायचे ठरवले. ‘विशाखा समिती’बाबत विविध कार्यस्थळी सर्वेक्षण केले (२००१). अभ्यासात आलेले निष्कर्ष दुर्दैवी होते. अवघ्या ९ टक्के कार्यालयात अशा समित्या होत्या. असे सर्वेक्षण तेव्हा भारतात पहिल्यांदाच होत होते, लोकसभेत या कायद्यावर चर्चा झाली तेव्हा मंचाच्या अभ्यासाची मागणी झाली व कायदा निर्मिती प्रक्रियेत उपयोगही झाला.
तिने अभ्यास आणि काम याचा पहिला धडा मंचाला दिला. त्यानंतर, स्वच्छता व पाणीपुरवठा योजनेसंदर्भात राज्य सरकारसाठी केलेल्या धोरणात्मक संशोधनात ती सहभागी होती. पुढे तिने ‘यशदा’(यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) येथे काही काळ काम केले. पुढे ‘यशदा’ने खैरलांजी प्रकरणाच्या अभ्यासासाठी ‘खैरलांजी दलित हत्याकांड सत्यशोधन समिती’ची सदस्य म्हणून तिला नेमले. ती घटनाच इतकी भीषण होती की तिथे तिच्या संवेदनशीलतेचा, तटस्थता ढळू न देता तपास करण्याचा कस लागला. जात – लिंगभाव – सामाजिक स्थान अशा सर्व पातळीवरचे हिंसा, शोषण तिने पाहिले आणि लेखन केले.
हेही वाचा : रिकामटेकडी
पुढे तिला भारतातील १२ राज्यांत शेतकरी स्त्रियांसह लिंगभाव व रोजगार या संदर्भात काम करायची संधी ‘बाएफ’ संस्थेत (भारतीय कृषी औद्याोगिक संस्था) मिळाली. स्त्रिया शेतीमध्ये खूप काम करतात, मात्र त्यांना ज्ञानाच्या संधी फारशा मिळत नाहीत, हे लक्षात घेऊन ‘जेंडर सेन्सिटिव्ह प्रोग्रॅमिंग’साठी ती नेहमी प्रयत्नशील राहिली. ‘महिला किसान सशक्तीकरण परियोजने’त तिने केंद्र सरकारच्या कृषी खात्यालाही संस्था निवड आणि प्रकल्प परीक्षणात मदत केली. ‘बाएफ’मध्ये तिला परिषदांसाठी परदेशी जाण्याची संधीही मिळाली. ‘बाएफ’सारख्या मोठ्या संस्थेत साधारण दशकभर काम केल्यानंतर, ते सोडून ती ‘नारी समता मंच’ या संस्थेत परत आली. इथे तिला आर्थिक तोटा सहन करायला लागणार हे उघड होते, पण तिला ‘लिंगभाव समते’वर अधिक काम करायचे होते. मंचाची जडणघडण ही लोकशाहीवर विश्वास ठेवून झाली होती आणि या दोन मूल्यांचे तिला आकर्षण होते.
मंचाच्या समुपदेशन केंद्राच्या कामावर देखरेख, कौटुंबिक हिंसेवर संशोधनात्मक काम तसेच या संदर्भात पुरुषांमध्ये संवेदनशीलता वाढवण्यासाठी तिचे प्रयत्न चालू राहिले. एका बाजूला स्त्रियांसाठी प्रबोधनावर कार्यक्रम आयोजित करणे, तरुण कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेणे यासाठी ती महाराष्ट्रभर फिरत होती. कायदा आला तरी त्याची अंमलबजावणी व्यवस्था कशी आहे याबाबत तिने अनेक प्रकल्प राबवले, उदा.‘भरोसा सेल’ची पाहणी व अहवाल तयार करणे. नुकताच लंडन येथील ‘क्वीन मेरी विद्यापीठ’ यांच्या साहाय्याने स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचार व त्यास प्रतिबंध करण्यासाठी आलेला कायदा यावर तिने अभ्यास पूर्ण केला आणि तो प्रबंध ऑक्सफर्ड येथे जाऊन सादर केला.
स्त्री चळवळीतील सर्वच उपेक्षित समाज घटक जसे आदिवासी, दलित, छोटे शेतकरी यांना ती नेहमीच आपले साथीदार मानत होती. आदिवासींमधील कातकरी हे सर्वात उपेक्षित आहेत. यांना कुठलीही शासकीय योजना मिळवून देणे अशक्यप्राय होते. त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसणे ही त्यातली मोठी अडचण होती. याचे एक कारण असे होते की, कातकरी हे मुळात रायगड, ठाणे जिल्ह्याचे रहिवासी मानले गेले पण जंगले गेली व त्यांची वणवण सुरू झाली. इतर जिल्ह्यातील कातकरींना प्रमाणपत्र मिळत नव्हते. पुणे जिल्ह्यातील घोडेगाव तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय असा पाठपुरावा तिने चिकाटीने तीन वर्षे करून अखेर ‘आदिवासी संशोधन संस्थे’सोबत कातकरी लोकांची मुलाखत झाली आणि त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. पुणे जिल्ह्यात हे प्रथमच घडले, ही कामगिरी प्रीतीच्या चिकाटीमुळे झाली.
हेही वाचा : स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर तो शिक्षित व्हायला हवा या विचारातून कातकरी मुला-मुलींवर लक्ष केंद्रित करून त्यांना औपचारिक शिक्षणात आणण्याचा प्रयत्न ‘कातकरी खेळघर’ या प्रकल्पामार्फत प्रीतीने केला. अनेक अडचणींचा सामना करत आज पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ तालुक्यात अनेक ‘कातकरी खेळघरां’मार्फत शेकडो कातकरी मुला-मुलींसोबत काम सुरू आहे. तसेच पुणे शहरात भवानी पेठ वस्ती पातळीवरील कामासंदर्भातही तिने मार्गदर्शन केले.
प्रीतीच्या कामाचे वैशिष्ट्य असे की, स्त्रीवर होणाऱ्या हिंसेची रूपे तिने अनेक अंगाने पहिली. त्यांची अगतिकता, सांस्कृतिक जडणघडण याचा तिचा अभ्यास सखोल होता. स्त्री-पुरुषांच्या वर्तनाला जात, वर्ग, धर्म, स्थान, परंपरा यांचे अस्तर कसकसे चिकटले आहे, याबाबतची तिची समज खोल होती म्हणूनच उपाय निवडताना त्याची जाणीव ठेवायला हवी हे तिने कार्यकर्त्यांना शिकवले. कामाच्या ठिकाणी स्त्रियांवरील लैंगिक हिंसेचे अति सूक्ष्म पदर ती अभ्यासत असे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ती सातत्याने प्रयत्नशील होती. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’, आयसर, पुणे रेल्वे, पुणे मेट्रो अशा अनेकानेक महत्त्वाच्या संस्थांमधील तसेच अन्य शैक्षणिक संस्था आणि सॉफ्टवेअर कंपन्यांच्या अंतर्गत समित्यांवर ती बाह्य सदस्य म्हणून कार्यरत होती. लैंगिक छळ तक्रारींच्या चौकशीचा तिला विपुल अनुभव होता. अनेक अवघड आणि गुंतागुंतीच्या तक्रारींची योग्य मार्गाने, संवेदनशीलपणे तिने चौकशी केली आणि अनेक जणींना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत तिने मदत केली. कर्मचाऱ्यांसाठी लिंगभाव समतेबाबत जागरूकता सत्रे तसेच इतरत्र या मुद्द्यावर असंख्य प्रबोधनात्मक भाषणे, प्रशिक्षणे तसेच लेखन तिने सातत्याने केले. या कायद्याअंतर्गत पुणे जिल्हा स्तरावरील शासकीय स्थानिक समितीवर सदस्य म्हणून ती सध्या काम करत होती आणि याद्वारे असंघटित क्षेत्रातील स्त्रियांच्या तक्रारींच्या निवारणासाठी सक्रिय होती.
‘स्थानिक समिती’ हा असंघटित क्षेत्रातील स्त्रियांसाठी महत्त्वाचा फोरम आहे, हे लक्षात घेऊन प्रत्यक्ष काम करतानाच त्यावर ती पीएच.डी. करत होती. हा प्रबंध कधी होतो याची आम्ही वाट पाहत होतो, तिचा हा अभ्यास अनेकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन करणारा ठरला असता, पण ते काम आता अर्धवटच राहिले. प्रीतीने इतर अनेक शोधनिबंध सादर केलेच तसेच अनेक घटनांची नोंद घेत वृत्तपत्रांत, नियतकालिकांत लेख लिहिले शिवाय समाजमाध्यमात ‘यू-ट्यूब’वरील काही चॅनेल्सवर मुलाखती देऊन स्त्रियांवरील हिंसाचाराबाबत वस्तुस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला. तिने अनेक संमेलनातून भाषणे केली. ‘स्त्रीमुक्ती आंदोलन’ संपर्क समितीच्या सर्व कामांत तिचा सहभाग असे.
हेही वाचा : ध्वनिसौंदर्य : असह्य कलकलाटातून सुस्वरांकडे…
प्रीतीविषयी लिहिताना हे एक लिहिलेच पाहिजे की, ती अत्यंत वक्तशीर होती. प्रत्येक प्रकल्पावर तिचे लक्ष असे. आजच्या काळात प्रकल्प लिहिणे, त्याच्यावर सविस्तर आखणी करून प्रगतीचा अहवाल लिहिणे याबाबत तिने कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले. स्वयंसेवी संस्थेचे व्यवस्थापन हा एक अजून महत्त्वाचा पण अनेक ठिकाणी दुर्लक्षिलेला विषय आहे. पण ‘नारी समता मंचा’त तिने ही घडी इतकी व्यवस्थित बसवली आहे की, आश्चर्य वाटावे. अनेक संस्थांच्या परदेशी निधीचे खाते बंद पडत असताना मंचाचे खाते मात्र सुरू आहे कारण हिशोब व अन्य कागदपत्रांची तिने चोख व्यवस्था राखली आहे. मावळ, मुळशी तालुक्यातील कातकरी मुले-मुली किंवा गडचिरोलीमधील आदिवासी स्त्रिया ते अगदी ऑक्सफर्ड असा सर्वदूर संवाद साधण्याची क्षमता तिच्यात होती.
मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांची तिला चांगली जाण होती. वाचनाची तर आवड होतीच व घरात पुस्तकांचा मोठाच संग्रह होता. अगदी नुकतेच आलेले अमोल पालेकारांचे ‘ऐवज’ मी तिच्याच घरी पहिले. आपले व्यक्तिगत जीवन ती रसिकतेने जगली. तिने इंडोलॉजीचा (भारतविद्या) अभ्यास केला, मोडी लिपी शिकली. पणजोबा शिल्पकार करमरकर या आपल्या वारशाशी तिने जागते संबंध ठेवले. आमच्या कार्यकर्त्यांनाही ती सासवण्याला घेऊन गेली व शिल्पकलेचा आस्वाद घ्यायची संधी दिली.
अलीकडेच (२१ डिसेंबर) याच पुरवणीत ‘चतुरंग’मध्ये कायद्याचा स्त्रियांकडून होणारा गैरवापर या संवेदनशील विषयावर ‘गैरवापराचं भ्रामक कथ्य’ हा समतोल लेख तिने लिहिला होता. त्यावर प्रतिसाद म्हणून एक मुलाखत यू-ट्यूब चॅनेलसाठी चित्रित केली, पण आठवड्याच्या आत तिच्या जाण्याचा आघात आमच्यावर झाला.
समाजाशी जोडून राहत ती माणसाच्या वर्तनाची गुंतागुंत समजून घेत राहिली. तिच्या अत्यंत अकाली जाण्याने ‘नारी समता मंच’च नाही तर एकूणच स्त्री चळवळीची हानी झाली आहे.
sadhana.dadhich@gmail.com