तृतीयपंथीय, समलैंगिक, वेश्या किंवा महिला कैदी यांच्या वाटय़ाला सातत्यानं हेटाळणीच आली आहे. जनप्रवाहातील एक घटक म्हणून त्यांचे प्रश्न, त्यांच्या वेदना समजून घेणंही ज्या ठिकाणी त्याज्य मानलं गेलं, अशा अस्पर्शित विषयांसाठी रझिया सुलताना यांनी स्वत:ला वाहून घेतलं आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष केला आहे. स्वत:च्या आयुष्यातला संघर्ष विसरून त्यांनी दुसऱ्यांना आनंदाचे चार क्षण मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. रझिया यांचे हे अनुभव..
बऱ्याच वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एकदा अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात गेले होते. एका महिलेला स्ट्रेचरवरून नेलं जात होतं. ती जोरजोराने विव्हळत होती. तिचं शरीर रक्तानं माखलं होतं. जखमाही दिसत होत्या. माहिती घेतली तेव्हा कळलं की, ती महिला एक वेश्या होती आणि तिच्यावर एका ग्राहकाने रानटी अत्याचार केले होते. तिला उपचारासाठी बेडवर ठेवण्यात आलं तेव्हा तिच्या बाजूला एक दलाल भावहीन नजरेने उभा होता. तिच्या ओळखीचा तिथे उपस्थित असलेला तो एकमेव होता. डॉक्टरांनी सवयीप्रमाणे उपचार सुरू केले. एका महिला डॉक्टरला विचारलं तर ‘या बाया अशाच’, असं म्हणून तिनंही नाक मुरडलं. पण माझ्या मनात प्रश्न आला, या महिलांचे दु:ख कुणी समजून घेणार की नाही? आणि त्या क्षणापासून अशा स्त्रियांच्या आयुष्यातील पिळवणूक थांबवण्यासाठी काम करण्याचं मी ठरवलं ते आजतागायत. पण केवळ वेश्याच नाहीत तर महिला कैदी, समलिंगी आणि तृतीयपंथी या साऱ्यांच्याच आयुष्यात डोकावायला मिळालं. त्यांच्यासाठी काही करताना खारीचा वाटा उचलता आला याचं समाधान आहे.
आज मागे वळून पाहताना अशा अनेक गोष्टी आठवतायत. महिलांचे प्रश्न समजून घेत असताना त्यांच्या भावविश्वात जावं लागतं. महिला कैद्यांच्या वेदना तुरुंगांच्या भिंतीपलीकडे पोहचू शकत नाही. लोकांनाही त्यांच्याबाबतीत सोयरसुतक नसतं. तृतीयपंथीयांकडे सातत्यानं तिरस्काराच्या नजरेतून पाहिलं जातं. वेश्यांना कायम भोगवस्तू मानलं गेलं आहे. त्यांचेही प्रश्न गंभीर आहेत. अशा अनेक मुद्दय़ांबाबत मी लढते, प्रसंगी लोकांच्या टीकेची धनी झाले तर कधी खूप मानसन्मान पदरी आला. पण एक प्रकर्षांने जाणवलं, त्या त्या वेळी त्या त्या समस्येला प्रामाणिकपणे भिडले. मला काय वाटतंय, त्याच्याशी प्रतारणा न करता निर्भीडपणे माझी मतं मांडत राहिले आणि पुढे जात राहिले.
अगदी आजही समलंगिकांच्या प्रश्नांची जाहीरपणे चर्चा करण्यासही कुणी धजावत नाही. या व्यक्तींना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारण्याइतके आपण निष्ठुर बनलो आहोत का? किमान त्यांच्या वेदना समजून घ्याव्यात या जाणिवेतून मी २५ वर्षांपूर्वी कामाला सुरुवात केली आणि त्यात मी गुंतत गेले.  एकेक प्रश्न हाताळत असताना मात्र अनेक लोकांसोबत संघर्ष करावा लागला.
विवाहानंतर मुस्लीम संस्कृतीशी नाळ जुळली गेली. वैयक्तिक आयुष्याचा सुरुवातीचा काळ संघर्षांचा गेला खरा, पण यातूनच बरंच काही गवसत गेलं. माझ्या मोठय़ा जाऊच्या घरी हिजडे म्हणजेच तृतीयपंथीय यायचे. त्यांच्याविषयी कुतूहल वाटायला लागलं. त्यांच्याशी जवळीक वाढली. २० वर्षांपूर्वी भोपाळला शबनम मौसीला भेटले. त्यावेळी त्या आमदार होत्या. तृतीयपंथीयातील एक व्यक्ती यशस्वी राजकारणी होऊ शकते, हे शबनम मौसीनं सिद्ध केलं होतं. भोपाळमध्ये ब्युटी पार्लर, मेंदीचे वर्ग चालवणाऱ्या तृतीयपंथीयांची भेट झाली. अमरावतीत रस्त्यावर नाच-गाणं करणाऱ्या तृतीयपंथीना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी काही प्रयत्न करता येईल का हा विचार त्यावेळी मनात आला. त्या क्षणापासूनच त्यांच्या पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात केली. तृतीयपंथीयांकडे ये-जा वाढली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावता आलं. अनेक प्रकारचे हिजडे पाहिले. वस्त्यांमध्ये, रेल्वेमध्ये भीक मागणारे, घरोघरी फिरून शगून मागणारे, काही खरे तर काही वेश धारण करणारे, काही व्यसनी, तर काही गुन्हेगार. मात्र आपल्या टाळीचा वापर करून लोकांना हसवणारे, स्वत: अर्थार्जन करून पोट भरणारे, आध्यात्मिक वृत्ती बाळगणारे तृतीयपंथीय मनात घर करून गेले. त्यांची नावे भलेही वेगवेगळी असतील, पण सर्वाच्या वेदना सारख्या. वेदनेला कोणतीच जात नसते हेही तेवढंच खरं. एका अर्थाने सर्व हिजडे समदु:खी. त्यांचे प्रश्न मात्र गुंतागुंतीचे. त्यांचं रस्त्यावरचं नाचणं बंद झालं पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू केले, गेल्या दोन दशकांमध्ये यात बरंच यशही मिळालं आहे. पण करण्यासारखं अजून खूप बाकी आहे, ही जाणीव स्वस्थ बसू देत नाही.
वेश्यांचं जगणंही असंच अंधारातलं. पोट भरण्यासाठी या व्यवसायात गुंतल्या गेलेल्या वेश्यांचे प्रश्नही खूप गुंतागुंतीचे असतात. ते पाहून त्यांच्या पुनर्वसनासाठी काहीतरी करायचं, असा निश्चय पक्का झाला. पण त्यांची कैफियत लिहायला गेले, तेव्हाच स्फोट झाला. समाजाने नाकारलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात अनेकांशी खटके उडाले. पण डगमगले नाही. मुळात वेश्या व्यवसाय बंद होऊ शकेल का, हा प्रश्नच आहे. पण किमान त्यांच्यात जागृती करणं, त्यांना आरोग्याचे विषय समजावून सांगणं तर शक्य आहे, याच विचारातून या घटकांसाठी काम करत राहिले.
आरोग्याकडं दुर्लक्ष केल्यानं अनेक वेश्यांना वयाच्या उत्तरार्धात जीवघेणा त्रास सहन करावा लागतो. पण अलीकडच्या काळात त्यांच्यात जागरूकता वाढली आहे, कायद्याचं ज्ञानही आलं आहे, असा माझा अनुभव आहे. अमरावतीचीच एक गोष्ट. एका युवकाने वेश्येपासून झालेलं मूल नाकारलं. ती त्याच्यावर प्रेम करीत होती. तिला चांगलं जीवन हवं होतं. पण त्याने पितृत्व नाकारलं. अखेर ती मुलगी त्या युवकाच्या घरी पोहचली. त्याच्या कुटुंबाला सर्व काही सांगितलं. डीएनए चाचणीची तयारी दर्शवली. त्याची गरज पडली नाही. नंतर युवकानं त्या मुलाचं पालकत्व स्वीकारलं. मला यावेळी समुपदेशन करता आलं. त्या मुलीनं हा लढा जिंकला याचा आनंद आहे. अशासारख्या घटना हीच माझी स्फूर्ती आहे.
वेश्यांच्या प्रश्नांची व्याप्ती मात्र अनाकलनीय वाढली आहे. दुर्दैवानं आपल्याकडे यावर कोणतीही ठोस उपाययोजना नाही. वस्त्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या आणि फार्महाऊस किंवा अपार्टमेंटमध्ये जाणाऱ्या वेश्या यांच्या कमाईत फरक जरूर असेल, पण वय झाल्यानंतर सगळ्यांच्याच वाटय़ाला सारखंच दु.ख येतं. म्हणूनच, गुन्हेगारांनी विणलेल्या वेश्या व्यवसायाच्या जाळ्यातल्या मुलींना बाहेर काढण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे. म्हणूनच त्यांच्या पुनर्वसनासाठी अजून खूप काम करावं लागेल.
गरिबी, निरक्षरता, फसवणूक ही कारणे देहव्यापाराची आहेतच, पण अनेक कारणांपैकी वाढती महागाई हेही एक कारण आहे. अलीकडच्या काळात मध्यमवर्गीय स्त्रियादेखील मोठय़ा प्रमाणात देहव्यवसायात येताना दिसताहेत. उंबरठय़ाच्या आत आणि उंबरठय़ांच्या बाहेर देहविक्री करणाऱ्या वेगळया असल्या, तरी पोलीस रेकॉर्डवर आल्या की त्यांना सराईत वेश्या म्हटलं जातं. वेश्यांसाठी काम करणाऱ्या हजारो स्वयंसेवी संस्था आहेत, जागतिक पातळीवरून निधीही मिळतो, पण व्यवसाय फोफावतोच आहे. शासन पातळीवरही काही प्रयत्न केले जात नाहीत. पूर्वी शेजारी वाईट धंदे चालत असल्यास लोक समज देण्याचा प्रयत्न करायचे. ते बंद करण्यासाठी पुढाकार घ्यायचे. पण आता जगणंच संकुचित झालं आहे. शेजाऱ्यांशी काहीही देणं-घेणं उरलं नाही. कुंपणाच्या उंच भिंती, मोठमोठाले दरवाजे अशी शेजाऱ्यांशी आपली स्पर्धा चालते. संवाद हरवत चालला आहे. त्यातून अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत.
समलैंगिकांचा विषयही गंभीर बनलाय. त्यांच्याकडे अपराधी म्हणून पाहिलं जातं. सामान्य माणूस त्यांच्यापासून दोन हात दूर राहणं पसंत करतो. पण त्यांनी समाजाचं काय नुकसान केलं आहे? हा प्रश्न स्वत:ला विचारत नाही. या संबंधांचं समर्थन करावं की नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे, पण या प्रश्नाची उकल निश्चितपणे करावी लागणार आहे. आज अनेक देशांमधील समलैंगिक जोडप्यांनी लग्न करून संसार थाटले आहेत. आमच्या परिसरात समलैंगिक संबंधांची अनेक प्रकरणे पोलीस ठाण्यात आली, तेव्हा तिढा सोडवण्यासाठी समन्वयिका म्हणून मी माझी भूमिका पार पाडली. समलैंगिक संबंधांचे आपण समर्थन केले नाही, तरी जे वास्तव आहे, ते मान्य करावेच लागेल.
दुसरीकडे, शाळा-कॉलेजमध्ये रॅगिंगच्या नावावर समलैंगिक शोषणाचे प्रकार वाढले आहेत. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना मोठय़ा प्रमाणावर उघडकीस येत आहेत. त्या रोखण्यासाठी समाजाला जागरूकता वाढवावी लागणार आहे.
महिला कैदी हा तर आणखी एक वेगळाच विषय. त्यांचे तुरुंगापलीकडचं जग विचित्र आहे. त्यांच्या मानवाधिकाराचा विषय चर्चिला जात नाही. पण मला सुरुवातीच्या काळात या प्रश्नावर काम करताना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. केवळ एका पोस्टकार्डाने मागितलेल्या परवानगीच्या आधारावर मला तुरुंगातील महिलांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या लैंगिक आरोग्यविषयक समस्या माहिती झाल्या. त्यातून अनेक महिलांना बाहेर काढता आले. पण हे एका दिवसात झालेलं नाही. अनेक कटू अनुभव आले, पण त्याचं दु.ख नाही. अपमानही सहन करावा लागला. पण यातून बाहेर पडण्याचं बळ या लोकांनीच मला मिळवून दिलं. महिला कैद्यांचे प्रश्न असोत, परित्यक्ता स्त्रियांची घुसमट असो. समाजानं हे विषय दुर्लक्षित ठेवले आहेत. तृतीयपंथीय आपल्या घरीही जन्माला येऊ शकतो, याचा विचार कुणी तरी करायला हवा. त्यांचे दु.ख, वेदना समजून घेता आली, त्यांना जगण्याचं बळ दिलं, तरीही बरेचसे प्रश्न सुटू शकतील. समाज प्रगतिशील बनत चालला आहे, पण काही बाबतीत तो अजूनही अंधश्रद्धाळू आहे. लैंगिक शक्तिवर्धक साधनांचा वाढता खप आणि त्या भूलभुलैयात अडकणाऱ्यांची वाढती संख्या पाहिली की त्याची साक्ष पटते. आपणच आपले प्रश्न तयार केले आहेत, त्याची उत्तरं शोधताना मात्र दमछाक होते आहे. सत्संगांना जाणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे, त्याचवेळी कारागृहेदेखील ठासून भरली जात आहेत. मानवी हिंसेचं प्रमाण वाढलं आहे, एड्सग्रस्तांचे प्रश्नही गंभीर बनले आहेत. शरीरसुखाचा गुलाम बनून जगणाऱ्यांची एक पिढी तयार होत आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. महिलांचे अनेक प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. त्याकडे लक्षच दिलं गेलेलं नाही. लैंगिक अंधश्रद्धा, एकल महिलांच्या समस्या, असा अनेक विषयांचा गुंता आहे. वेश्येला दूषणं दिली जातात, पण ग्राहक उजळ माथ्यानं वावरत असतो. दवाखान्यांमधील स्त्री-भ्रूणहत्येविषयी आज बोललं जात आहे. पण घरगुती उपचार करून गर्भ पाडण्याचे प्रकार कसे रोखणार हा प्रश्न आहे. व्यसनाधीनता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वैवाहिक समस्या, लैंगिक स्वास्थ्य या प्रश्नांवर अधिक डोळसपणे पाहून काम करावं लागेल. समाजाचा या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. वेश्या हादेखील समाजाचाच एक घटक आहे. त्यांना अमानवीय वागणूक मिळू नये, त्यांचं योग्यरीत्या पुनर्वसन व्हावं, तृतीयपंथीयांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देणं ही कामं करावी लागतील. मी माझा खारीचा वाटा उचलला आहे. समाजातल्या संवेदनशील माणसाने थोडा थोडा जरी मदतीचा वाटा उचलला तरी या अन्यायग्रस्तांचे अत्याचार कमी होण्यास मदत होईल.

वैयक्तिक परिचय
रझिया सुलताना यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले परखड विचार, लेख, पुस्तकांमधून मांडले आहेत. कैद्यांच्या जीवनावर आधारित ‘अपराजिता’, ‘कैद मे है बुलबुल’ ही पुस्तकं त्यांनी लिहिली. मुलांच्या भावविश्वावर आधारित ‘अंथरुणातील बंडखोरी’, ‘मुस्लिमांचे भावविश्व’, ‘नकाब- मुस्लिम महिलांचे प्रश्न’, ‘बचतीचा नवा अर्थ’, ‘गणिकांच्या वेदना’, ‘जचकी’, ‘प्रतिती’, ‘सेक्स- एक सामाजिक प्रतिबिंब’, ‘चांदण्यांचे गुपित’, अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
रझिया सुलताना यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवलं आहे. महाराष्ट्र फाऊंडेशनचा सामाजिक कार्य पुरस्कार, हमीद दलवाई पुरस्कार, स्मिता पाटील पुरस्कार, इंडियन मेडिकल असोसिएशनचा पुरस्कार, मानवी हक्क पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार, संघर्ष पुरस्कार असे अनेक गौरवाचे क्षण त्यांना मिळाले आहेत.
अमरावती शहरात त्या ‘मानव संवाद केंद्र’ चालवतात. महिलांच्या आणि पुरूषांच्या खाजगी आयुष्यातील प्रसंगांवरून होणारे मतभेद, आरोग्य, समलैंगिकांचे प्रश्न, अशा अनेक विषयांवर समुपदेशनाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
शब्दांकन- मोहन अटाळकर
संपर्क- रझिया सुलताना
‘मानव संवाद केंद्र’, फ्रेझरपुरा, अमरावती</strong>
भ्रमणध्वनी- ०९५२७३९९८६६

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
psychiatrist sexually abused nearly hundred women in Hudakeshwar area
नागपूर : खळबळजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण…
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!
priti karmarkar
स्त्रीप्रश्नांविषयी आग्रही आणि संवेदनशीलही!
Story img Loader