देवदासींच्या विवाहासाठी, त्यांची ‘जट’ कापण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या, देवदासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तसेच तृतीयपंथीयांसाठी काम करीत त्यांना देशातली पहिली पेन्शन मंजूर करणाऱ्या व त्यांच्याप्रती सामाजिक ‘संवेदना’ जागृत करणाऱ्या कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. साधना झाडबुके यांचा हा प्रवास..
एखादी छोटीशी गोष्ट आपल्या मनात रुतून बसली आणि त्या गोष्टीचा आपण ध्यास घेतला तर जगण्याला एक निश्चित अशी दिशा मिळू शकते, हा माझा अनुभव आहे. मी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घरातील. घरी वडील पूर्णत: नास्तिक तर आई सश्रद्ध त्यामुळे एक वेगळंच मिश्रण वाढत्या वयात माझ्यात तयार होत होतं. आई यल्लमादेवीची भक्त. तिच्याकडे परडी, ‘दर्शन’ घेतलेल्या जोगतिणी येत त्यांच्याविषयी मनात एक कुतूहल तयार झालेलं. समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर आणि समाजकार्यात एम. फिल. केल्यानंतर मी मुंबईत प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यावेळी कुष्ठरोगासंदर्भात अभ्यास करण्यासाठी गोलपीठा, फोरास रोड या भागात गेले असता तिथल्या वेश्यांशी बोलत होते. बऱ्याचशा वेश्यांच्या गळ्यात रेणुकादेवीचं ‘दर्शन’ दिसलं. त्या देवदासी होत्या. देवदासी प्रथेमुळे त्या वेश्यांच्या आयुष्याचं नुकसान झालं होतं. हे मनात कुठेतरी सलू लागलं. पुढे मी कोल्हापूरच्या ‘सायबर’मध्ये समाजकार्य विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. साधारण १९८४ साली माझे एक विद्यार्थी जयसिंग पाटील यांनी कोल्हापुरातील डोंबारवाडय़ातील वेश्यांचा अभ्यास केला होता. त्यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला तो म्हणजे इथंही बऱ्याचशा वेश्यांचं देवाशी लग्न लागलेलं होतं. देवदासी प्रथा हे या महिलांच्या वेश्या बनण्याचं कारण असेल तर देवदासी प्रथेचंच निर्मूलन झालं पाहिजे, हे मी ठरवलं. १९८५ पासून मी या कामाला सुरुवात केली. सदरबाझार भागात आकुर्डेकर नावाचा कार्यकर्ता होता. त्याच्याशी माझी ओळख झाली. त्याने माझी कोल्हापुरात जे प्रमुख ‘जग’ (देवदासींचे ग्रुप) आहेत, त्यांच्यातील प्रमुख महिलांशी ओळख करून दिली. मी सुरुवातीलाच ठरवलं होतं, देवदासींच्या धार्मिक भावनेला दुखवायचं नाही, परंतु जे अनिष्ट आहे त्याच्याशी भिडण्याची मानसिकता तयार करायची. अर्थात हे काम सोप्पं नव्हतं. पहिली पंधरा र्वष ही मानसिकता बदलण्यात गेली. मलादेखील देवदासींची दुनिया समजून घ्यावी लागली. खंडोबाचे वाघ्या-मुरळी, यल्लमाची जोगतीण, तुगांडवाले जोगे, कलावंतीण, अखंड सौभाग्यवती, नित्यसुमंगली असे देवदासीतही प्रकार असतात. गरिबी, अंधश्रद्धा यामुळे. मुला-मुलींना देवाला सोडण्याचे प्रकार घडतात. लहान मुलांनी वयात येण्याआधीच तिचं लग्न लावलं जातं. काही वेळा तर पोटाला बाशिंग बांधून आई गरोदर असतानाच देवाबरोबर लग्न लावलं जातं. जन्मलेलं मूल तृतीयपंथी असेल, काही संकट आलं असेल तर ते टाळण्यासाठी, नवस फेडण्यासाठी खरूज, नायटा असे त्वचाविकार झाले, केसात जट आली अशा अनेक कारणांसाठी देवाबरोबर लग्न लावलं जातं. ‘दासी देवाची अन् मालकी गावाची’ या म्हणीप्रमाणं देवदासींचं आयुष्य पणाला लावलं जाई. देवदासी लग्न करू शकत नाहीत. त्यामुळे विवाहसंस्था अस्तित्वात नाही. कुटुंबसंस्था अस्तित्वात नाही. मुलं अनौरस. बाप कुठेतरी परागंदा झालेला. शाळेत देवदासींच्या मुलांच्या बापाचं नाव काय लावायचं, या प्रश्नामुळे  देवदासींची मुलं फी माफ असूनही शिक्षणापासून वंचित राहिलेली. ही देवदासींची स्थिती मी समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. मला प्रमुख जगवाल्या बायकांचा विश्वास संपादन करायचा होता. एकीकडे मी त्यांच्याशी बोलत राहिले तर दुसरीकडे त्यांच्या लहानसहान कामात त्यांना मदत करू लागले. मुलांचं नाव लावायला त्यांच्यासोबत शाळेत जायचं, कुठे कसला दाखला हवा असेल तर जायचं. मी त्यांना सांगू लागले की रेणुकेची भक्ती जरूर करा. देवाची कामं करा. परडी भरा, पूजा करा पण नवीन मुला-मुलींना देवाला सोडू नका. त्यांना शिकवा, त्यांची पुढे रीतसर लग्ने करा. जगाच्या मुख्य बायकांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मी धडपडत राहिले. त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना छोटे-मोठे उद्योगधंदे काढून द्यायला मी पुढाकार घेऊ लागले. देवदासींमध्ये पारंपरिक कौशल्यं कोणती आहेत याचं निरीक्षण सुरू झालं. साहित्य विकणं, बांगडय़ा विकणं, बुट्टय़ा विकणं, भाजी विकणं असे छोटे भांडवली उद्योग या देवदासींना काढून दिले. जगवाल्या मुख्य बायका उद्योग करू लागल्यावर इतर बायकांना उत्साह आला. त्याही जोगवा मागणं सोडून इतर कामधंदा करायला लागल्या. १९९६ साली ‘अनगोळ फाऊंडेशन’चा ‘संवेदना’ हा प्रोजेक्ट सुरू झाला. त्याअंतर्गत देवदासी प्रथा निर्मूलन आणि पुनर्वसन हे काम रीतसर सुरू झालं. राजारामपुरीतल्या माझ्या घरी देवदासी, जोगते यांचं जाणं-येणं सुरू झालं. यल्लूबाई पाटील ही प्रमुख जगवाली भाजी विकायला लागली. आनंदीबाई कांबळे हिनेदेखील छोटासा उद्योग सुरू केला. त्यामुळे मी करत असलेल्या कामाला बळ मिळालं. याच सुमारास इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज, हातकणंगले, करवीर या भागात मी देवदासींसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरत होते. तिथल्या देवदासींशी बोलून त्यांची मानसिकता बदलण्यासाठी जिवाचं रान करत होते. ‘जट कापणे’ हा या प्रथेचा निर्मूलन करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा होता. पूर्णत: मानसिकता बदलल्याशिवाय मी कधीही कुणाची जट कापली नाही. मुळात मी कुणाचीच जट कापली नाही, माझ्या ज्या देवदासींमधील कार्यकर्त्यां होत्या त्यांच्या हातून जट कापली जाई. त्याच हे समजावून सांगत. पूर्वी जट कापल्यावर नदीच्या पाण्यात सोडत, आता देवदासीच सांगतात, ‘पाण्यात जट सोडू नको, पाणी घाण होतं. घरात जाऊन खड्डा खणून पुरून टाक.’ एवढी मानसिकता तयार व्हायला खूप र्वष जावी लागली. नव्वद टक्के देवदासी दलित समाजातील असल्यामुळे त्यांना, त्यांच्या मुलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहिले. देवदासींच्या मुला-मुलींची लग्नं झाली तर शासन त्यांना दहा हजार रुपये अनुदान देते. असे वीसेक विवाह मी लावून दिले.
देवदासींच्या मुलांना शिक्षणासाठी ठिकठिकाणच्या वसतिगृहात मी पाठवत राहिले. मुळात देवदासींना मालकीचं घर नाही, रेशनकार्ड नाही, आधारकार्ड नाही, जातीचा दाखला नाही, देवदासी म्हणून कायमस्वरूपी दाखला नाही. त्यामुळे तिचे बरेचसे प्रश्न जसेच्या तसे पडून आहेत. यासाठी शासनालाही वेळोवेळी जागं करणं आवश्यक होतं. माझ्या या सततच्या पाठपुराव्यामुळे देवदासी कल्याण अभ्यासगटाची मला सदस्य नेमले. त्यामुळे मला शासनाच्या धोरणातील बऱ्याचशा त्रुटी निदर्शनास आणता आल्या. देवदासींना शासनाच्या योजनांची माहिती व्हावी, यासाठी पोस्टर प्रदर्शन, ध्वनिफीत, कलापथकं, मेळे, वारी यातून प्रबोधनाचा मार्ग मी स्वीकारला. देवदासींमध्ये त्यांचं स्वत:चं नेतृत्व तयार व्हावं यासाठी मी सुरुवातीपासूनच प्रयत्नशील राहिले. मार्गदर्शन मी करायचं पण सरकारी कार्यालयात स्वत:च्या कामासाठी त्यांनी स्वत:च जावं, अशी भूमिका मी ठेवली, त्यामुळे त्यांना स्वत:च्या प्रश्नांची जाण आली. संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली. आपणही आपलं काम करू शकतो हा आत्मविश्वास आला. देवदासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे यासाठीच मी काम करत राहिले. त्यातूनच इचलकरंजी येथील बयाबाई गेंजणे या देवदासी महिलेच्या नेतृत्वाखाली संस्था स्थापन झाली. तिची इचलकरंजीच्या संजय गांधी निराधार समितीवर नेमणूक झाली. तिच्या कार्यासाठी तिला शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला.
आज मागे वळून पाहताना माझ्याच अनुभवातून मी घडत गेले असं वाटतं. इतकी र्वष काम करताना खूप शिकत गेले. एक देवदासी शरीरविक्रय करायची. तिचं प्रबोधन करून तिला काही उद्योगधंदा करण्यास प्रवृत्त केली. तीही तयार झाली. तिला एका पतसंस्थेतून कर्ज काढून दिलं. ती म्हणाली, ‘मी चक्री चालवते’ मीही संमती दिली. ही प्रत्येक जत्रेत, बाजारात जायची, चक्रीतून एवढे पैसे मिळाले म्हणून सांगायची. कर्जही फेडत आणलं होतं. स्वत:वर मी खूश होते. खूप काही मिळवल्याचं समाधान होतं. एके दिवशी पोलीस स्टेशनमधून फोन आला. ‘ताबडतोब या, तुमच्या एका कार्यकर्तीला आम्ही पकडलंय.’ मी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं तर ही चक्री चालवणारी तिथं बसली होती. पोलीस म्हणायला लागले, ‘काय हे मॅडम, असले कसले धंदे तुम्ही कार्यकर्त्यांना काढून दिले?’ मला काही कळेना, तोवर माझा समज ही चक्री चालवते म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्याचं गोल फिरणारं चक्र, पाळणा असं काही असेल तेच जत्रेत घेऊन जात असेल. प्रत्यक्षात चक्री हा जुगाराचा एक प्रकार होता. ते पैसे लावण्याचं चक्र घेऊन ती फिरत असे. त्या चक्रावर ठसठशीतपणे लिहिलंही होतं, ‘संवेदना योजनेअंतर्गत’ अर्थात त्याबद्दल त्या बाईला काहीच वाटत नव्हतं. कारण तिच्या नीती-अनीतीच्या पांढरपेशा जगाशी तिचा पहिल्यांदाच असा संबंध येत होता. मी त्यामुळे देवदासीचं जग समजून घेत गेले. आज अक्षरश: एक शब्दकोश तयार होईल एवढे त्यांचे शब्द मला माहिती आहेत. मी मग मटका म्हणजे काय, दारूचे प्रकार, सगळंच माहिती करून घेतलं. तळागाळात काम करायचं तर त्यांचं आयुष्य समजून घेणं महत्त्वाचं असतं. काठावर उभं राहून तुम्ही पाण्यातले भोवरे अनुभवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पाण्यातच उतरावं लागतं, हे मी या प्रसंगातून शिकले.
माझी ‘सायबर’मधली नोकरी, घर, लहान मुली हे सगळं सांभाळून, माझं काम सुरू होतं. घरचा पाठिंबा बिनशर्त होता. पती सुभाष यांचा संयत पाठिंबा खूप मोलाचा होता. देवदासींची मानसिकता बदलताना तृतीयपंथींशी माझा संबंध आला. त्यांची परिस्थिती देवदासींपेक्षा भयानक होती. कपडेवाला जोगता (नेहमी पुरुषांसारखे कपडे वापरणारा) पंचरंगी (कधी स्त्री तर कधी पुरुषांचे कपडे वापरणारा) लुगडवाले जोगते (कायम साडी नेसणार) असे त्यांच्यामध्ये प्रकार असतात. त्यांच्यात मातृत्वाची भावना एकदम प्रबळ असते. त्यांच्या स्वभावात दोन टोकं पाहायला मिळतात. एकदम प्रेमळ होतात तर कधी एकदम चिडतात. त्यांचं पुनर्वसन करण्यात मात्र मला यश आलं नाही. देवदासींना पेन्शन देत नाही. पण मी भारतातील पहिली पेन्शन मंजूर करून आणली, तृतीयपंथींसाठी. तो पासष्ट वयाच्या वरचा होता. हिरू गावडे त्याचं नाव. श्रावणबाळ योजनेंतर्गत ही पेन्शन मंजूर झाली. परंतु हे सगळ्यांसाठी शक्य झालं नाही. तृतीयपंथींना उद्योगधंदा काढून दिला तर लोक छळतात. त्रास देतात. कुणी कामावर ठेवत नाहीत. देवदासींना एखादं मूल असतं. कुठेतरी भावनिक ओलावा तयार होतो पण तृतीयपंथींबाबत तसं होत नाही. त्यांचं आयुष्य खूपच रखरखीत आहे.
देवदासींसाठी काम करताना मी एड्सग्रस्त महिला आणि त्यांच्या मुलांसाठी काम सुरू केलं. एड्सग्रस्त महिलांना कांदे-बटाटे विकणं, पाकिटं तयार करणं, असे व्यवसाय संस्थेमार्फत काढून दिले. मुलांना मी विविध संस्थांमध्ये पाठवलं. त्यांचं शिक्षण सुरू राहावं, हा त्यामागचा उद्देश होता.
आज माझ्या कामाकडे पाहिलं की वाटतं, माझ्या कामाने मला अपार समाधान दिलं. देवदासी, जोगते या सर्वाचं निरपेक्ष प्रेम मिळालं. माझं काम पुढे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यां देवदासींमध्येच तयार झाल्या. ‘तुझ्यावर संकट आलं तर देवाला मुलगी वाहू नको. गाय वाहा. खरी नव्हे, लाकडाची किंवा प्लॅस्टिकची विकत आण आणि वाहा,’ असं सांगण्याइतपत देवदासींची मानसिकता मी बदलू शकले ही समाधानाची बाब आहे. या सगळ्यांची व्यथा मांडणारं ‘भाकरीसाठी चक्री’ हे पुस्तक मी लिहिलं. आतापर्यंतच्या प्रवासात अनेकांचे मदतीचे हात मिळाले. त्यापैकी अनगोळ फाऊंडेशनचे अध्यक्ष महावीर अनगोळ, उपाध्यक्ष डॉ. मालती अनगोळ यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. मीही त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास कधीही ढळू दिला नाही.
आज मी नोकरीतून निवृत्त झाले. गंमत म्हणजे देवदासींच्या पेन्शनसाठी लढणाऱ्या मला मात्र पेन्शन नाही. मी आज पॉलिसी मेकिंगमध्ये काम करते आहे. देवदासींची मानसिकता बदलली, शासनाची भूमिका बदलावी यासाठी प्रयत्न करते आहे. पण खंत अशी की समाजाची मानसिकता नाही बदलली. समाजाकडून देवदासी, वाघ्या-मुरळींची मागणी नाही थांबली. धार्मिक कार्य, देवीला कौल लावणं, यासाठी लोकांना देवदासी, वाघ्या-मुरळी हवे असतात. लोकांना त्यात काहीच वावगं वाटत नाही. हे चित्र बदलावं, हीच माझी तीव्र इच्छा आहे. समाजाची ‘संवेदना’ आणखी जागायला हवी असं वाटतं.

संवेदना
१९९६ साली मुंबईच्या ‘अनगोळ फाऊंडेशन’ च्या पुढाकाराने ‘संवेदना’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला. याअंतर्गत, प्रामुख्याने देवदासी, वारांगना, तृतीयपंथी, एचआयव्हीग्रस्त विधवा, परित्यक्ता व त्यांची मुले यांच्यासाठी काम सुरू झाले. आतापर्यंत देवदासी प्रथा निर्मुलन, पुनर्वसन आणि जाणीव जागृती या स्तरावर ‘संवेदना’ने उल्लेखनीय काम केले आहे. यापुढे तृतीयपंथीयांना माणूस मिळून वागणूक मिळावी, हक्क मिळावेत यासाठी संवेदनाचे कार्यकर्ते प्रयत्नशील राहणार आहेत. समाजात नव्याने तयार होणारे तृतीयपंथी  निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत. यासह  रेशन कार्ड वा आधार कार्डसारखी कागदपत्रे नसणाऱ्या अनाथ मुलांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी फाऊंडेशन प्रयत्नशील राहणार आहे. शासनाच्या बालसंगोपन योजना व संजय गांधी निराधार योजना यांचा लाभ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचावा, यासाठी संस्थेमार्फत विशेष मोहिम राबवली जाणार आहे.
(शब्दांकन – डॉ. प्रिया आमोद)
संपर्क – प्रा. साधना झाडबुके मानद संचालिका, संवेदना, २०४५/ई, गंगा निवास, राजारामपुरी, ११ वी गल्ली, कोल्हापूर. दूरध्वनी – ०२३१-२६९२९१९.

commissioner review facilities in girls ashram school
आयुक्तांकडून कन्या आश्रमशाळेतील सुविधांचा आढावा
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
 ‘मायक्रोफायनान्स’ संस्थांना अवाजवी कर्ज देण्यापासून परावृत्त करणे आवश्यक
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
The position taken by the Court and Chief Justice Dhananjay Chandrachud
घ्यायला हवी तिथे कणखर भूमिका घेतली नाही, यासाठी सरन्यायाधीशांना लक्षात ठेवायचे का?
Sharad pawar demand supreme court to freeze clock,
‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी
article about mangesh kulkarni life
व्यक्तिवेध : मंगेश कुलकर्णी
Before contesting the election give undertaking that you will not use abusive language and insults against women says MASWE
निवडणूक लढवत असाल तर आधी, स्त्रियांबद्दल अपशब्द व शिव्या वापरणार नाही असे प्रतिज्ञा पत्र द्या, ‘मास्वे’चे अनोखे अभियान