एखादी छोटीशी गोष्ट आपल्या मनात रुतून बसली आणि त्या गोष्टीचा आपण ध्यास घेतला तर जगण्याला एक निश्चित अशी दिशा मिळू शकते, हा माझा अनुभव आहे. मी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घरातील. घरी वडील पूर्णत: नास्तिक तर आई सश्रद्ध त्यामुळे एक वेगळंच मिश्रण वाढत्या वयात माझ्यात तयार होत होतं. आई यल्लमादेवीची भक्त. तिच्याकडे परडी, ‘दर्शन’ घेतलेल्या जोगतिणी येत त्यांच्याविषयी मनात एक कुतूहल तयार झालेलं. समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर आणि समाजकार्यात एम. फिल. केल्यानंतर मी मुंबईत प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यावेळी कुष्ठरोगासंदर्भात अभ्यास करण्यासाठी गोलपीठा, फोरास रोड या भागात गेले असता तिथल्या वेश्यांशी बोलत होते. बऱ्याचशा वेश्यांच्या गळ्यात रेणुकादेवीचं ‘दर्शन’ दिसलं. त्या देवदासी होत्या. देवदासी प्रथेमुळे त्या वेश्यांच्या आयुष्याचं नुकसान झालं होतं. हे मनात कुठेतरी सलू लागलं. पुढे मी कोल्हापूरच्या ‘सायबर’मध्ये समाजकार्य विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. साधारण १९८४ साली माझे एक विद्यार्थी जयसिंग पाटील यांनी कोल्हापुरातील डोंबारवाडय़ातील वेश्यांचा अभ्यास केला होता. त्यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला तो म्हणजे इथंही बऱ्याचशा वेश्यांचं देवाशी लग्न लागलेलं होतं. देवदासी प्रथा हे या महिलांच्या वेश्या बनण्याचं कारण असेल तर देवदासी प्रथेचंच निर्मूलन झालं पाहिजे, हे मी ठरवलं. १९८५ पासून मी या कामाला सुरुवात केली. सदरबाझार भागात आकुर्डेकर नावाचा कार्यकर्ता होता. त्याच्याशी माझी ओळख झाली. त्याने माझी कोल्हापुरात जे प्रमुख ‘जग’ (देवदासींचे ग्रुप) आहेत, त्यांच्यातील प्रमुख महिलांशी ओळख करून दिली. मी सुरुवातीलाच ठरवलं होतं, देवदासींच्या धार्मिक भावनेला दुखवायचं नाही, परंतु जे अनिष्ट आहे त्याच्याशी भिडण्याची मानसिकता तयार करायची. अर्थात हे काम सोप्पं नव्हतं. पहिली पंधरा र्वष ही मानसिकता बदलण्यात गेली. मलादेखील देवदासींची दुनिया समजून घ्यावी लागली. खंडोबाचे वाघ्या-मुरळी, यल्लमाची जोगतीण, तुगांडवाले जोगे, कलावंतीण, अखंड सौभाग्यवती, नित्यसुमंगली असे देवदासीतही प्रकार असतात. गरिबी, अंधश्रद्धा यामुळे. मुला-मुलींना देवाला सोडण्याचे प्रकार घडतात. लहान मुलांनी वयात येण्याआधीच तिचं लग्न लावलं जातं. काही वेळा तर पोटाला बाशिंग बांधून आई गरोदर असतानाच देवाबरोबर लग्न लावलं जातं. जन्मलेलं मूल तृतीयपंथी असेल, काही संकट आलं असेल तर ते टाळण्यासाठी, नवस फेडण्यासाठी खरूज, नायटा असे त्वचाविकार झाले, केसात जट आली अशा अनेक कारणांसाठी देवाबरोबर लग्न लावलं जातं. ‘दासी देवाची अन् मालकी गावाची’ या म्हणीप्रमाणं देवदासींचं आयुष्य पणाला लावलं जाई. देवदासी लग्न करू शकत नाहीत. त्यामुळे विवाहसंस्था अस्तित्वात नाही. कुटुंबसंस्था अस्तित्वात नाही. मुलं अनौरस. बाप कुठेतरी परागंदा झालेला. शाळेत देवदासींच्या मुलांच्या बापाचं नाव काय लावायचं, या प्रश्नामुळे देवदासींची मुलं फी माफ असूनही शिक्षणापासून वंचित राहिलेली. ही देवदासींची स्थिती मी समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. मला प्रमुख जगवाल्या बायकांचा विश्वास संपादन करायचा होता. एकीकडे मी त्यांच्याशी बोलत राहिले तर दुसरीकडे त्यांच्या लहानसहान कामात त्यांना मदत करू लागले. मुलांचं नाव लावायला त्यांच्यासोबत शाळेत जायचं, कुठे कसला दाखला हवा असेल तर जायचं. मी त्यांना सांगू लागले की रेणुकेची भक्ती जरूर करा. देवाची कामं करा. परडी भरा, पूजा करा पण
देवदासींच्या मुलांना शिक्षणासाठी ठिकठिकाणच्या वसतिगृहात मी पाठवत राहिले. मुळात देवदासींना मालकीचं घर नाही, रेशनकार्ड नाही, आधारकार्ड नाही, जातीचा दाखला नाही, देवदासी म्हणून कायमस्वरूपी दाखला नाही. त्यामुळे तिचे बरेचसे प्रश्न जसेच्या तसे पडून आहेत. यासाठी शासनालाही वेळोवेळी जागं करणं आवश्यक होतं. माझ्या या सततच्या पाठपुराव्यामुळे देवदासी कल्याण अभ्यासगटाची मला सदस्य नेमले. त्यामुळे मला शासनाच्या धोरणातील बऱ्याचशा त्रुटी निदर्शनास आणता आल्या. देवदासींना शासनाच्या योजनांची माहिती व्हावी, यासाठी पोस्टर प्रदर्शन, ध्वनिफीत, कलापथकं, मेळे, वारी यातून प्रबोधनाचा मार्ग मी स्वीकारला. देवदासींमध्ये त्यांचं स्वत:चं नेतृत्व तयार व्हावं यासाठी मी सुरुवातीपासूनच प्रयत्नशील राहिले. मार्गदर्शन मी करायचं पण सरकारी कार्यालयात स्वत:च्या कामासाठी त्यांनी स्वत:च जावं, अशी भूमिका मी ठेवली, त्यामुळे त्यांना स्वत:च्या प्रश्नांची जाण आली. संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली. आपणही आपलं काम करू शकतो हा आत्मविश्वास आला. देवदासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे यासाठीच मी काम करत राहिले. त्यातूनच इचलकरंजी येथील बयाबाई गेंजणे या देवदासी महिलेच्या नेतृत्वाखाली संस्था स्थापन झाली. तिची इचलकरंजीच्या संजय गांधी निराधार समितीवर नेमणूक झाली. तिच्या कार्यासाठी तिला शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला.
आज मागे वळून पाहताना माझ्याच अनुभवातून मी घडत गेले असं वाटतं. इतकी र्वष काम करताना खूप शिकत गेले. एक देवदासी शरीरविक्रय करायची. तिचं प्रबोधन करून तिला काही उद्योगधंदा करण्यास प्रवृत्त केली. तीही तयार झाली. तिला एका पतसंस्थेतून कर्ज काढून दिलं. ती म्हणाली, ‘मी चक्री चालवते’ मीही संमती दिली. ही प्रत्येक जत्रेत, बाजारात जायची, चक्रीतून एवढे पैसे मिळाले म्हणून सांगायची. कर्जही फेडत आणलं होतं. स्वत:वर मी खूश होते. खूप काही मिळवल्याचं समाधान होतं. एके दिवशी पोलीस स्टेशनमधून फोन आला. ‘ताबडतोब या, तुमच्या एका कार्यकर्तीला आम्ही पकडलंय.’ मी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं तर ही चक्री चालवणारी तिथं बसली होती. पोलीस म्हणायला लागले, ‘काय हे मॅडम, असले कसले धंदे तुम्ही कार्यकर्त्यांना काढून दिले?’ मला काही कळेना, तोवर माझा समज ही चक्री चालवते म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्याचं गोल फिरणारं चक्र, पाळणा असं काही असेल तेच जत्रेत घेऊन जात असेल. प्रत्यक्षात चक्री हा जुगाराचा एक प्रकार होता. ते पैसे लावण्याचं चक्र घेऊन ती फिरत असे. त्या चक्रावर ठसठशीतपणे लिहिलंही होतं, ‘संवेदना योजनेअंतर्गत’ अर्थात त्याबद्दल त्या बाईला काहीच वाटत नव्हतं. कारण तिच्या नीती-अनीतीच्या पांढरपेशा जगाशी तिचा पहिल्यांदाच असा संबंध येत होता. मी त्यामुळे देवदासीचं जग समजून घेत गेले. आज अक्षरश: एक शब्दकोश तयार होईल एवढे त्यांचे शब्द मला माहिती आहेत. मी मग मटका म्हणजे काय, दारूचे प्रकार, सगळंच माहिती करून घेतलं. तळागाळात काम करायचं तर त्यांचं आयुष्य समजून घेणं महत्त्वाचं असतं. काठावर उभं राहून तुम्ही पाण्यातले भोवरे अनुभवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पाण्यातच उतरावं लागतं, हे मी या प्रसंगातून शिकले.
माझी ‘सायबर’मधली नोकरी, घर, लहान मुली हे सगळं सांभाळून, माझं काम सुरू होतं. घरचा पाठिंबा बिनशर्त होता. पती सुभाष यांचा संयत पाठिंबा खूप मोलाचा होता. देवदासींची मानसिकता बदलताना तृतीयपंथींशी माझा संबंध आला. त्यांची परिस्थिती देवदासींपेक्षा भयानक होती. कपडेवाला जोगता (नेहमी पुरुषांसारखे कपडे वापरणारा) पंचरंगी (कधी स्त्री तर कधी पुरुषांचे कपडे वापरणारा) लुगडवाले जोगते (कायम साडी नेसणार) असे त्यांच्यामध्ये प्रकार असतात. त्यांच्यात मातृत्वाची भावना एकदम प्रबळ असते. त्यांच्या स्वभावात दोन टोकं पाहायला मिळतात. एकदम प्रेमळ होतात तर कधी एकदम चिडतात. त्यांचं पुनर्वसन करण्यात मात्र मला यश आलं नाही. देवदासींना पेन्शन देत नाही. पण मी भारतातील पहिली पेन्शन मंजूर करून आणली, तृतीयपंथींसाठी. तो पासष्ट वयाच्या वरचा होता. हिरू गावडे त्याचं नाव. श्रावणबाळ योजनेंतर्गत ही पेन्शन मंजूर झाली. परंतु हे सगळ्यांसाठी शक्य झालं नाही. तृतीयपंथींना उद्योगधंदा काढून दिला तर लोक छळतात. त्रास देतात. कुणी कामावर ठेवत नाहीत. देवदासींना एखादं मूल असतं. कुठेतरी भावनिक ओलावा तयार होतो पण तृतीयपंथींबाबत तसं होत नाही. त्यांचं आयुष्य खूपच रखरखीत आहे.
देवदासींसाठी काम करताना मी एड्सग्रस्त महिला आणि त्यांच्या मुलांसाठी काम सुरू केलं. एड्सग्रस्त महिलांना कांदे-बटाटे विकणं, पाकिटं तयार करणं, असे व्यवसाय संस्थेमार्फत काढून दिले. मुलांना मी विविध संस्थांमध्ये पाठवलं. त्यांचं शिक्षण सुरू राहावं, हा त्यामागचा उद्देश होता.
आज माझ्या कामाकडे पाहिलं की वाटतं, माझ्या कामाने मला अपार समाधान दिलं. देवदासी, जोगते या सर्वाचं निरपेक्ष प्रेम मिळालं. माझं काम पुढे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यां देवदासींमध्येच तयार झाल्या. ‘तुझ्यावर संकट आलं तर देवाला मुलगी वाहू नको. गाय वाहा. खरी नव्हे, लाकडाची किंवा प्लॅस्टिकची विकत आण आणि वाहा,’ असं सांगण्याइतपत देवदासींची मानसिकता मी बदलू शकले ही समाधानाची बाब आहे. या सगळ्यांची व्यथा मांडणारं ‘भाकरीसाठी चक्री’ हे पुस्तक मी लिहिलं. आतापर्यंतच्या प्रवासात अनेकांचे मदतीचे हात मिळाले. त्यापैकी अनगोळ फाऊंडेशनचे अध्यक्ष महावीर अनगोळ, उपाध्यक्ष डॉ. मालती अनगोळ यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. मीही त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास कधीही ढळू दिला नाही.
आज मी नोकरीतून निवृत्त झाले. गंमत म्हणजे देवदासींच्या पेन्शनसाठी लढणाऱ्या मला मात्र पेन्शन नाही. मी आज पॉलिसी मेकिंगमध्ये काम करते आहे. देवदासींची मानसिकता बदलली, शासनाची भूमिका बदलावी यासाठी प्रयत्न करते आहे. पण खंत अशी की समाजाची मानसिकता नाही बदलली. समाजाकडून देवदासी, वाघ्या-मुरळींची मागणी नाही थांबली. धार्मिक कार्य, देवीला कौल लावणं, यासाठी लोकांना देवदासी, वाघ्या-मुरळी हवे असतात. लोकांना त्यात काहीच वावगं वाटत नाही. हे चित्र बदलावं, हीच माझी तीव्र इच्छा आहे. समाजाची ‘संवेदना’ आणखी जागायला हवी असं वाटतं.
देवदासींच्या पुनर्वसनासाठी ‘संवेदना’
देवदासींच्या विवाहासाठी, त्यांची ‘जट’ कापण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या, देवदासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तसेच तृतीयपंथीयांसाठी काम करीत त्यांना देशातली पहिली पेन्शन मंजूर करणाऱ्या व त्यांच्याप्रती सामाजिक ‘संवेदना’ जागृत करणाऱ्या कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. साधना झाडबुके यांचा हा प्रवास..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-05-2013 at 01:01 IST
TOPICSप्रत्यक्ष जगताना
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social worker sadhana zadbuke